You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'चोर-पोलीस' खेळण्याच्या बहाण्याने सासूला संपवलं, डोकं चक्रावणारं प्रकरण आलं असं उघडकीस
- Author, लक्कोजू श्रीनिवास
- Role, बीबीसीसाठी
(सूचना : या बातमीतील काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते.)
सुनेनं तिच्या सासूला जिवंत जाळल्याच्या घटनेनं आंध्र प्रदेशात खळबळ उडालीय. विशाखापट्टणम इथं ही घटना घडली.
सासू नातवांसोबत 'चोर-पोलीस' खेळ खेळत असताना सुनेने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आधी ही हत्या नसून अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. नंतर चौकशीदरम्यान तिने हत्येची कबुली दिली.
जयंती ललिता असं या आरोपी सूनेचं नाव आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
जयंती ललितानं पोलिसांना सांगितलं की, युट्यूबवर तिनं 'वृद्ध महिलेला कसं मारायचं' असं सर्च करून काही व्हीडिओ पाहिले होते. त्यानंतर तिनं ही हे केलं.
जयंती ललिताने सासू जयंती कनकमहालक्ष्मी यांची हत्या का केली? पोलीस चौकशीत तिने काय सांगितलं? याबाबत विशाखापट्टणाममधील पेंडुर्थी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पश्चिम विभागाचे एसीपी पृथ्वी तेज यांनी बीबीसीसोबत संवाद साधला.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (7 नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यात अप्पणापलेथ येथून एक फोन आला.
यात एका व्यक्तीने 'वर्षिणी होम्स' या अपार्टमेंटमधील एका घरात आग लागून त्यात एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली.
पेंडुर्थी सर्कल इन्स्पेक्टर सतीश कुमार यांनी पोलिसांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी त्यांना 63 वर्षीय जयंती कणगमलक्ष्मी खुर्चीवर मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या हाता-पायावर बांधल्याच्या खुणा होत्या, तसंच डोळेदेखील पट्टीने झाकल्याचं दिसून येत होतं.
यावेळी प्राथमिक चौकशीत सून ललितानं सांगितलं की, "शॉर्ट सर्किटमुळं अचानक आग लागली आणि त्यात सासू कनकमहालक्ष्मी यांचा होरपळून मृत्यू झाला."
एसीपी पृथ्वी तेज म्हणाले की, "आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा घरात सून ललिता आणि दोन मुलं उपस्थित होती. ललिता यांनी टीव्हीच्या वायरमध्ये शॉर्ट-सर्किट होऊन आग लागल्याचं सांगितलं. परंतु आम्हाला घटनास्थळी शॉर्ट-सर्किटचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही."
ललिताने पोलिसांना सांगितलं की, सासू कनकमहालक्ष्मी आणि माझी मुलं 'चोर-पोलीस' खेळत होते. खेळा-खेळात त्यांनी खुर्चीवर बसलेल्या कनकमहालक्ष्मी यांचे हात-पाय बांधले आणि डोळ्यांनाही पट्टी बांधली. दरम्यान, त्याचवेळी टीव्हीचा शॉर्ट-सर्किट झाला."
या अपघातात ललिताच्या मुलीला किरकोळ दुखापत झाल्याचंही एसीपी पृथ्वी तेज यांनी सांगितलं.
पुढं बोलताना ते म्हणाले की, "ललिता यांचा नवरा पुजारी आहे. अपघाताची माहिती मिळताच तो घरात आला. त्याच्याशी बोलल्यानंतर आम्हाला ललितावर संशय आला. त्यामुळं आम्ही तिच्या मोबाईल फोनची तपासणी केली. तेव्हा असता इंटरनेट हिस्ट्रीमध्ये तिनं युट्यूबवर पाहिलेल्या व्हीडिओची माहिती समोर आली. त्यानंतर आम्ही कसून चौकशी केली."
'युट्यूबवरून शोधला सासूला मारण्याचा प्लॅन'
पोलिसांनी सांगितलं की, "ललिताच्या इंटरनेटची हिस्ट्री तपासली तेव्हा तिनं अनेकदा 'वृद्ध महिलेला कसे मारायचे' याबाबत सर्च केल्याचं आढळून आलं.
यामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला. आम्ही तिची पुन्हा कसून चौकशी केली, तेव्हा तिनं गुन्ह्याची कबुली दिली.
लग्न होऊन घरात आल्यापासून सून ललिता आणि सासू कनकमहालक्ष्मी यांचं आपसांत पटत नव्हतं. सासू अगदी छोट्या-छोट्या कारणांसाठी बोलायची असं सून ललितानं पोलिसांना सांगितलं. या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर सासूला संपवण्याचा निर्णय घेतला," असंही तिनं सांगितलं."
एसीपी पृथ्वी तेज म्हणाले की, "6 नोव्हेंबरला ललितानं सिंहचलमजवळील एका पेट्रोल पंपावर जाऊन 100 रुपयांचं पेट्रोल विकत आणत घरी लपवून ठेवलं होतं."
ललिताने पोलिसांना सांगितलं की, घटनेच्या दिवशी तिने मुलांना आजीसोबत चोर-पोलीस खेळायला सांगितलं.
या खेळादरम्यान, तिनं सासू कनक महालक्ष्मीचे हात-पाय खुर्चीला बांधले आणि डोळ्यावर पट्टीही बांधली. हा सर्व खेळाचा भाग असल्याचं सांगितल्यानं सासूनंही काही विरोध केला नाही.
त्यानंतर, ललितानं ठरवल्याप्रमाणं सासूला पेटवून दिलं. तसंच हा सर्व प्रकार एक अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्नही केला.
"आगीच्या चटक्यांमुळं कनक महालक्ष्मी वेदनेने जोर-जोरात ओरडू लागल्या. त्यावेळी कोणालाही सासूच्या ओरडण्याचा आवाज जाऊ नये म्हणून ललिता यांनी टीव्ही सुरू करून आवाज वाढवला."
थोड्या वेळानं ललिता जोरा-जोरात शेजाऱ्यांना हाका मारू लागल्या. माझ्या सासुला वाचवा, ती जळत आहे असे म्हणत ओरडू लागल्या, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. ललिताचं ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
सासूच्या रोजच्या जाचाला आणि मानसिक छळाला कंटाळून आपण पाऊल उचलल्यांचं ललितानं पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं.
या प्रकरणी जंयती ललिताच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ललिताला अटक केली.
'अतिसंवेदनशीलतेमुळं टोकाचा निर्णय'
या घटनेबाबत विशाखापट्टणमचे मानसशास्त्रज्ञ डॉ. पूजा जोस्युला बीबीसीसोबत बोलताना म्हणाल्या की, "मानवी भावना अत्यंत संवेदनशील असतात. कुटुंबातील ताण-तणाव, रिती-प्रथा, कठोर सामाजिक आणि सांस्कृतिक नियम माणसाला एका पातळीनंतर सहनशीलतेपलिकडे घेऊन जातात.
सातत्यानं अपमानास्पद वागणूक, धाकात ठेवणं, कमी लेखणं यामुळं व्यक्ती खोलवर दुखावली जाऊ शकते. याचा मनावर दीर्घ परिणाम होऊ शकतो आणि ते धोकादायक परिणामांना कारणीभूत ठरू शकतं."
"काही लोकांना व्यक्तीमत्त्वाची Type-B आणि Type-C समस्या असू शकतात. असे लोक खूप भावनिक आणि प्रतिक्रियाशील असतात. ते नेहमी स्वतःबद्दलच विचार करत असतात आणि इतरांच्या भावनांना महत्व देत नाहीत.
"अशा लोकांमध्ये भावनिक चढ-उतार जास्त पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या भावना नियंत्रित करण्यात असमर्थ ठरतात आणि धोकादायक कृतींचा अवलंब करतात," असं डॉ. पूजा जोस्युला यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)