'दिल्ली स्फोटाचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही', मोदींचा इशारा; गेल्या 24 तासांत काय काय घडलं?

थोडक्यात
  • दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाली एका कारमध्ये स्फोट झाला.
  • या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते संजय त्यागी यांनी बीबीसीला दिली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसंच, या घटनेचा आढावा घेतला आहे.
  • दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ही घटना संध्याकाळी 6.52 वाजता घडली. त्यावेळी सिग्नलवर ही कार थांबली होती.
  • दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाप्रकरणी UAPA आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी एका कारमध्ये स्फोट झाला. या घटनेत किमान 8 जणांचा मृत्यू झाला असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितलं

भूतानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली स्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'या स्फोटाचा कट रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, सर्व जबाबदार व्यक्तींना कडक शिक्षा होईल.'

थिम्पूमध्ये मोदी म्हणाले, "मी येथे खूप दुःखी मनाने आलो आहे. दिल्लीतील भीषण घटनेने सर्वांना दुःखी केलं आहे. मी पीडित कुटुंबांच्या वेदना समजतो. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. मी रात्रभर सर्व तपास यंत्रणांच्या संपर्कात होतो. आमच्या तपास यंत्रणा या प्रकरणाच्या तळापर्यंत जातील."

'दिल्ली डिफेन्स डायलॉग' दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनवर झालेल्या घटनेत मृत पावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला.

ते म्हणाले, "मी माझ्या नागरिकांना खात्री देतो की, देशाच्या प्रमुख तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहेत. या दुःखद घटनेस जबाबदार लोकांना न्याय दिला जाईल."

तपासाचे निष्कर्ष लवकरच सार्वजनिक केले जातील, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

मंगळवारी (11 नोव्हेंबर) एनआयएसह इतर तपास यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

दिल्ली स्फोटप्रकरणी UAPA, BNS अंतर्गत गुन्हा दाखल

दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नॉर्थचे डीसीपी राजा बांठिया यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यूएपीए, स्फोटक पदार्थ कायदा आणि बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे."

तपास सुरू आहे आणि आवश्यक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासातून काही महत्त्वाचे निष्कर्ष मिळाल्यावर त्याची माहिती सार्वजनिक केली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आतापर्यंत कोणती माहिती समोर?

पोलिसांनी रात्री 9.30 वाजता दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते संजय त्यागी यांनी बीबीसीबरोबर फोनवरून बोलताना मृतांच्या संख्येबाबत ही माहिती दिली. स्फोटाच्या कारणाचा शोध घेतला जात असल्याचंही ते म्हणाले.

या घटनेवर जगभरातील देशांतून प्रतिक्रिया आल्या आहेत. भारतातील इराणच्या दूतावासाने दिल्लीमध्ये झालेल्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

तसेच बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांनी देखील घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

या घटनेबाबत संध्याकाळी 6.55 वाजता फोन आला होता, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती फोनवरून मिळाली होती, असं अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणाले.

या स्फोटानंतर तीन ते चार वाहनांना आग लागली. तसंच, जवळ उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेबाबत निवेदन दिलं असून, त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना भेट देत त्यांची चौकशीही केली. तसंच मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान अमित शहांनी घटनास्थळी जात आढावाही घेतला.

दिल्ली अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या.

जखमींना लोकनायक जयप्रकाश (LNJP) रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

अमेरिकन दूतावासाने जारी केल्या सूचना

दिल्लीतील स्फोटावर अमेरिकन दूतावासाने अलर्ट जारी करत सूचना दिल्या आहेत. लाल किल्ला, चांदणी चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, अशा सूचना अमेरिकन दूतावासाने जारी केल्या आहेत. अमेरिकन दूतावासाने पर्यटन स्थळांना जाताना सावधतेचा इशारा दिला आहे.

पंतप्रधान, गृहमंत्री काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं.

"आज संध्याकाळी दिल्लीतील स्फोटात ज्यांनी प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या प्रति मी शोक व्यक्त करतो. जखमी झालेल्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं, ही प्रार्थना. प्रशासनाकडून पीडितांना सर्व आवश्यक मदत पुरवली जात आहे," असं पंतप्रधान म्हणाले.

तसंच, गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यापूर्वी त्यांनी घटनेबाबतही माहिती दिली.

"आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग चौकात कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात काहीजण जखमी झाले असून काही गाड्यांचं नुकसान झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे," असं शाह म्हणाले.

"एनएसजी आणि एनआयएची पथकं आणि एफएसएलनेही सखोल चौकशी सुरू केली आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः दिल्ली पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रँचच्या प्रमुखांशीही बोललो आहे. दिल्ली पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रँचचे प्रमुख घटनास्थळी उपस्थित आहेत," असंही ते म्हणाले.

आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून चौकशी केली जाईल, असंही शाह म्हणाले.

दिल्लीचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आज 6.52 वाजता सौम्य गतीनं चालणारी गाडी सिग्नलवर थांबली होती. त्या गाडीत स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे आसपासच्या गाड्यांनाही नुकसान झालं.

एफएसएल, एनआयए अशा सर्व यंत्रणा इथे उपस्थित आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि काही जखमी झाले आहेत.

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. गृहमंत्र्यांनीही आम्हाला फोन केला होता. त्यांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे."

दरम्यान, दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत पोलिसांकडून सर्वत्र खबरदारीचा इशारा देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिली आहे.

'इमारतीच्या खिडक्या हादरल्या'

राजधर पांडे नावाच्या एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं की, "आम्ही घराच्या टेरेसवरून आगीच्या ज्वाळा पाहिल्या. त्यानंतर काय चाललं आहे, ते पाहण्यासाठी मी खाली आलो. खूप मोठा आवाज झाला. इमारतीच्या खिडकीचे काच हादरले. माझे घर गुरुद्वाराजवळ आहे."

तर, वली उर रहमान म्हणाले की, "स्फोट झाला तेव्हा मी दुकानात बसलो होतो. अचानक एवढा मोठा स्फोटाचा आवाज झाला जो मी आजवर ऐकला नव्हता. त्या स्फोटाच्या आाजानंतर मी तीन वेळा खाली पडलो. यानंतर, आजूबाजूचे सर्व लोक पळून जाऊ लागले."

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, "लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत दुःखद आहे. प्राथमिक माहितीनुसार अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे."

"या दुःखाच्या घटनेप्रसंगी आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत उभे आहोत. जखमींसाठी आम्ही प्रार्थना करतो. सरकारने घटनेची सखोल आणि त्वरित चौकशी करावी."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)