लाईफ इन्शुरन्स खरेदी करताना 'या' 6 गोष्टींवर ठेवा लक्ष, कोणत्या चुका पडू शकतात महाग?

विमा ही एक आवश्यक गोष्ट आहे. कारण आयुष्यात अनेक प्रकारच्या अनिश्चितता असतात. अशा अनिश्चित काळात आर्थिक तारांबळ आणखीच त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच अशी अनिश्चितता कमी करण्याचं आणि काही प्रमाणात आर्थिक संरक्षण प्रदान करण्याचं काम विमा करतो.

तरीही भारतामध्ये विम्याबाबत फारच कमी जागरूकता आहे.

जर विम्याची योजना योग्य प्रकारे तयार केलेली असेल, तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण नक्कीच मिळू शकतं.

विमा असेल तर विमाधारकाच्या अनुपस्थितीमध्येही अनेक कर्जं फेडली जाऊ शकतात, तसेच मुलांच्या शिक्षणावरही लक्ष दिलं जाऊ शकतं.

मात्र, जर तुम्ही चुकीची पॉलिसी निवडली असेल, तर प्रीमियममध्येच मोठी रक्कम वाया जाण्याची शक्यता असते आणि मग जेव्हा खरोखरच गरज भासण्याची वेळ येते, तेव्हा मात्र त्या प्रमाणात त्याचा मोबदला मिळणं अडचणीचं होऊन बसतं.

भारतात अधिकाधिक लोक असा आयुर्विमा (लाईफ इन्शुरन्स) खरेदी करताना त्यासंदर्भातील नियम आणि अटींबाबत अनभिज्ञच असतात. त्यामुळे त्यांना चुकीची अशी पॉलिसी मिळण्याची शक्यता अधिक असते.

कधी कधी लोक गरजेपेक्षा कमी असलेला विमा खरेदी करतात. त्यामुळे ते 'अंडरइंश्यूअर्ड' राहतात.

तर कधी कधी लोक बचत आणि विमा या प्रकारे एकमेकांत मिसळून टाकतात की, त्यांच्या प्रीमियमची रक्कम अधिक असते, मात्र, त्यांच्या विम्याचं कव्हरेज मात्र कमी असतं.

आयुर्विम्याची गरज का आहे? तो खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या मतानुसार, आयुर्विमा खरेदी करताना पाच गोष्टींवर लक्ष देणं फार गरजेचं आहे.

आयुर्विमा का खरेदी करायचा?

सर्वांत आधी आपल्याला हेच स्पष्ट असलं पाहिजे की, आपण आयुर्विमा का आणि कशासाठी खरेदी करत आहोत?

तुमचा अकाली मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाला पुरेसं आर्थिक संरक्षण मिळावं, यासाठी तुम्हाला विमा खरेदी करायचा आहे का?

की तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी विमा हवा आहे? की तुम्हाला निवृत्तीनंतर उत्पन्नात सातत्य राखण्यासाठी विमा हवा आहे?

नक्की कशासाठी विमा हवा आहे हे निश्चित झाल्यानंतरच तुम्ही योग्य विम्याची निवड करू शकाल.

बीबीसीशी बोलताना अर्थविषयक सल्लागार प्रियांक ठक्कर यांनी म्हटलं की, "जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देऊ इच्छित असाल, तर टर्म प्लॅन घेणं फारच चांगलं राहिल. त्याचा प्रीमियम फार कमी असतो, मात्र, कव्हरेज मोठा असतो.

टर्म प्लॅनमध्ये कोणत्याही बचतीचं तत्त्व नसतं. टर्म प्लॅन एका निश्चित कालावधीसाठी असतो. त्यामुळे, कमी वयातच टर्म प्लॅन खरेदी केला पाहिजे.

जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसं प्रीमियमची रक्कम वाढत जाते आणि त्याच्या अवधीमध्ये घट होत जाते."

पुढे ते सांगतात की, "सामान्यत: कोणत्याही व्यक्तीचं धडधाकट राहून काम करण्याचं वय 60 ते 65 वर्षं मानलं जातं. त्यामुळे, आमचा सल्ला असा आहे की, तुम्ही एवढ्या वर्षांचाच विमा खरेदी करावा जेणेकरून तुमचा प्रीमियम कमी राहील.

जर तुम्ही 75 ते 80 वर्षांच्या अवधीपर्यंतचा विमा खरेदी कराल, तर तुमचा प्रीमियमदेखील मोठ्या प्रमाणावर वाढेल."

बचत आणि विमा, एकमेकांत मिसळू नका

भारतातील विमा क्षेत्रातही युलिप लोकप्रिय आहेत, जे शेअर बाजाराशी संबंधित साधनं आणि बाँड इत्यादींमध्ये गुंतवणूक करून जास्त परतावा देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ते बाजाराशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यामध्ये जोखिमदेखील असते.

त्यानंतर बचत योजना येते जी तुम्हाला नियमितपणे पैशांची बचत करू देण्याव्यतिरिक्त, तुम्हाला विमा संरक्षण देखील देते.

बचत योजनेचा तोटा असा आहे की, ती प्रीमियमच्या तुलनेत खूपच कमी विमा संरक्षण देते आणि तुमच्या बचतीवर तुम्हाला किती परतावा मिळेल, हे त्यामध्ये आधीच सांगता येत नाही.

अशा योजनांबाबत बोलताना प्रियांक ठक्कर सांगतात की, "विमा संरक्षण आणि बचत कधीही एकमेकांत मिसळू नये. जर विमा संरक्षण शक्य असेल तर शुद्ध विमा, म्हणजेच टर्म इंश्यूरन्स खरेदी करा.

तुम्हाला वाचवायचं असलेले पैसे म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवा. परंतु, जर तुम्ही ते विम्यामध्ये मिसळले तर त्याचा प्रीमियम वाढेल आणि तुम्हाला पुरेसा कव्हर मिळू शकणार नाही."

किती विमा कव्हर घेतला पाहिजे?

जीवन विम्याचा उद्देश असा आहे की, जर विमाधारक व्यक्तीला काही झालं तरी त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची वेळ येऊ नये.

म्हणूनच, महागाईचा विचार करता विमा रक्कम अशी असावी, जी भविष्यात तुमच्या कुटुंबाला कव्हर करण्यासाठी पुरेशी असेल. सामान्यत: नियम असा आहे की विमा कव्हर तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहापट असावा.

अर्थविषयक सल्लागार प्रियांक ठक्कर यांनी पुढे म्हटलं की, "जर तुम्ही टर्म इन्शुरन्स खरेदी केला तर त्याची रक्कम इतकी असावी की, ती तुमच्या सर्व प्रकारच्या कर्जांना कव्हर करण्यासाठी पुरेशी असावी.

याचा अर्थ असा की, जर तुमचं मासिक उत्पन्न एक लाख रुपये असेल, तर तुम्ही किमान दीड कोटी रुपयांचा जीवन विमा कव्हर खरेदी केला पाहिजे.

तुमच्या भविष्यातील सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा विमा कव्हर असणं फार महत्त्वाचं आहे."

विम्यामध्ये 'रायडर'ही जोडून घ्या

अतिरिक्त फायद्यांसाठी तुम्ही तुमच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये 'रायडर्स' जोडू शकता.

उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू कव्हर जोडला तर तुमचा अपघाती मृत्यू झाल्यास तुम्हाला अतिरिक्त विमा रक्कम मिळू शकेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही गंभीर आजारांसंबधीचा 'रायडर' जोडलात, तर अशा आजारांचं निदान झाल्यावर तुम्हाला विशिष्ट रक्कम भरपाई मिळू शकते.

त्यामुळे वैद्यकीय खर्च भागवण्यास मदत होते. रायडर्सच्या प्रीमियममध्ये सहसा खूपच थोडी वाढ होते. हा एक त्याचा फायदा आहे.

अर्थविषयक सल्लागार प्रियांक ठक्कर यांनी म्हटलं की, "खरं तर प्रत्येकालाच अपघात विमा आणि गंभीर आजारासाठीचा विमा राइडर जोडण्याचा सल्ला दिला जातो. प्रीमियममध्ये थोडीशी रक्कम जोडून, ​​विमा कव्हर 20 ते 25 टक्क्यांनी वाढवता येतो."

कंपनीचा 'क्लेम सेटलमेंट रेशो' तपासा

कोणतीही विमा कंपनी आपल्या ग्राहकांना किती समाधानकारक सेवा देते हे जाणून घेण्यासाठी, तिचा क्लेम सेटलमेंट रेशो (CSR) पाहणं फार महत्त्वाचं आहे.

यावरून विमा कंपनीची विश्वासार्हता निश्चित होते. जर एखाद्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो कमी असेल, तर ती कंपनी टाळणंच योग्य आहे. कारण अशी कंपनी क्लेम प्रक्रियेदरम्यान आक्षेप घेऊ शकते आणि ग्राहकांना त्रास देऊ शकते. म्हणून, उच्च सीएसआर असलेली कंपनीच निवडा.

प्रियांक ठक्कर सांगतात की, "दरवर्षी, नवीन विमा कंपन्या बाजारात प्रवेश करतात आणि आकर्षक योजना देतात. म्हणून, घाईघाईनं निवड करण्याऐवजी, प्रतिष्ठित आणि योग्य लौकिक असलेली कंपनी निवडणं कधीही चांगलं ठरू शकतं.

नवीन कंपन्यांची आर्थिक ताकदीचा अंदाज आपल्याला नसल्यामुळे, क्लेम सेटलमेंटबाबत शंका असू शकते. अशी कोणतीही समस्या टाळण्यासाठी प्रतिष्ठित कंपनी निवडणं कधीही चांगलं."

कुठलीही माहिती लपवू नका

जीवन विमा किंवा कोणताही विमा खरेदी करताना, तुम्ही विमा कंपनीला योग्य आणि अचूक माहिती देणं महत्वाचं आहे. कोणतीही माहिती लपवण्याचा प्रयत्न करणं हे ग्राहकासाठीच हानिकारक ठरू शकतं.

कारण, भविष्यात जेव्हा दावा करण्याची वेळ येते, तेव्हा विमा कंपनी माहिती लपवण्याचं कारण देऊन आपला दावा थेट नाकारू शकते.

प्रियांक ठक्कर सांगतात की, "जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ही माहिती विमा फॉर्मवर आधीच उघड करा. तुमचा प्रीमियम कमी ठेवण्यासाठी ती माहिती लपवू नका.

जर तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या आधीच स्पष्टपणे सांगा, अन्यथा जेव्हा खरोखरच गरज असते, नेमकं तेव्हाच कंपनी तुमचा दावा नाकारू शकते."

म्हणून, पॉलिसीच्या अटी पूर्णपणे समजून घ्या. जर तुम्हाला खात्री नसेल तर सल्लागाराला प्रश्न विचारा. आणि मगच, तुमच्यासाठी कोणती पॉलिसी योग्य आहे ते ठरवा आणि नंतर जीवन विमा खरेदी करा.

एकदा का तुम्ही विमा खरेदी केला की, तुम्हाला वर्षानुवर्षे प्रीमियम भरावे लागतात. त्यामुळेच, कोणत्याही गोष्टीची घाई करू नका.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)