मुलांच्या शिक्षणासाठीचं आर्थिक नियोजन कसं करायचं? गुंतवणुकीची सुरूवात कधी करायची?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

महागाई वाढत आहे आणि त्यासोबत वाढत आहे शिक्षणाचा खर्चही. महागाईचा वाढीचा दर पाहता तुमचं आता शाळेत असलेलं मूल जेव्हा कॉलेजला जाईल, पोस्ट ग्र ग्रॅज्युशनच्या वयाचं होईल तेव्हा फी किती असेल याचं गणित करून पाहा.

त्यामुळेच भविष्यातल्या या खर्चासाठी आजच फायनान्शियल प्लॅनिंग करणं योग्य आहे. कारण मूल मोठं झाल्यावर नेमकं काय शिकणार आहे, कुठे शिकणार आहे देशात की देशाबाहेर, किती वर्षं शिकणार आहे, यातलं काहीच आपल्याला माहिती नाही.

त्यामुळेच मुलांच्या शिक्षणासाठीची आर्थिक गुंतवणूक कशी करायची? ते करताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?

भारतामध्ये शिक्षणक्षेत्रातली महागाई दरवर्षी सरासरी 4-6% वाढत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यातही सरकारी संस्था आणि खासगी संस्थांमधलं शिक्षण यांच्या फीमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे भविष्यातल्या शिक्षण खर्चाचा विचार करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

म्हणजे साधारण कोणत्या कोर्सचा खर्च किती आहे, महागाईचा दर विचारात घेता त्याचा खर्च किती वाढेल हे बेसिक गणित तर आलंच. पण शिक्षणाचा खर्च म्हणजे फक्त कोर्स फी नाही. त्यात तिथे राहणं, खाणं, गरज असेल तर क्लासेस, वर्षातून ठराविक काही वेळा होणारे प्रवास, व्हिसा प्रोसेसिंग यासगळ्या गोष्टीही येतील.

परदेशी शिक्षणासाठीचा विचार करताना हेही लक्षात घ्यायला हवं की इथे Exchange Rate म्हणजे डॉलर किंवा इतर चलनाच्या तुलनेतली रुपयाची किंमत किती आहे, यानुसारही खर्च बदलेल.

उदाहरणार्थ, 2008 साली अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य होतं 45 रुपये. 2025 साली डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आहे 88 रुपये.

तुमच्या मुलांचा कल खेळ, संगीत, मनोरंजन क्षेत्राकडे असेल, तर त्यातल्या कोर्सेससाठीचा वा ट्रेनिंगचा आताचा खर्च किती आहे यावरून तुम्हाला अंदाज बांधावा लागेल.

सगळ्यात आधी - जितक्या लवकर सुरुवात कराल, तितकं चांगलं. मूल लहान असतानाच जर तुम्ही 10 - 12 - 15 वर्षांनंतरच्या खर्चासाठी गुंतवणूक सुरू केलीत तर तुम्हाला चक्रवाढीचा फायदा मिळेल. म्हणून एक उद्दिष्टं रक्कम डोळ्यांसमोर ठेवून त्यानुसार गुंतवणूक करा.

वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांचा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे तुमचं मूल आता किती वर्षाचं आहे यावरून ते कॉलेजला कधी जाईल, उच्च शिक्षणासाठी कधी येईल याचं गणित करून त्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या योजना निवडता येतील.

लहान मुलांसाठीच्या काही योजनांवर कर सवलतही मिळतो. ही गोष्टपण लक्षात घ्या.

भविष्यासाठीची ही गुंतवणूक तुमच्या आताच्या दरमहा गुंतवणुकीचा भाग करता आली, तर चांगलं. म्हणजे इतर खर्च सांभाळून दरमहा काही भाग यासाठी वेगळा काढा.

Diversification म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक पर्याय निवडणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. म्हणजे कमी जोखमीच्या गुंतवणुकीतून खात्रीशीर रिटर्न्स मिळतील, आणि काही प्रमाणात जोखीम घेऊन जास्त परतावा मिळण्याची शक्यता असेल.

वेगवेगळ्या बँका, वित्तीय संस्था आणि इन्शुरन्स कंपन्यांनी Child Education Plans आणले आहेत. हे Insurance - cum - investment प्लान्स आहेत. यातल्या काही योजनांमध्ये पालकांचा मृत्यू झाल्यास त्यानंतरही पॉलिसी टर्म असे पर्यंत योजना सुरू राहील अशी तरतूद असते.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण केलेल्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घ्या. कोणती गुंतवणूक चांगला परतावा देतेय, कोणती देत नाही - यानुसार तुमची धोरणं बदला.

यासगळ्याच्या जोडीला Education Loan म्हणजे शैक्षणिक कर्जाचा पर्याय आहेच. बहुतेक बँका या ग्रॅज्युएशननंतर वा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याचा पर्याय देतात. म्हणजे मुलं कमवायला लागल्यावर हे कर्ज फेडू शकतात.

या सगळ्याचा विचार करून टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण खर्चाचा विचार करून घाबरून जाण्याची गरज नाही. कारण अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये स्कॉलरशिप्स, Fee Concessions, काही विशिष्ट प्रोग्राम्ससाठी स्पॉन्सर्स अशा गोष्टीही असतात. शिवाय पार्ट टाईम नोकरी करणं - टीचिंग असिस्टन्सशिप अशा गोष्टीही मुलांना करता येतात. त्यामुळे वेळ येईल तेव्हा याचाही शोध घ्यायला हवा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)