केवळ आरोग्य विमाच नाही, तर आरोग्याच्या आर्थिक नियोजनासाठी 'या' पॉलिसीही महत्त्वाच्या

आर्थिक नियोजन करताना तुम्ही कर, घराचे हप्ते, वेगवेगळ्या गुंतवणुकींचा विचार करता. घर, मुलांचं शिक्षण, लग्नं, निवृत्ती अशा टप्प्यांचा विचार करून पैसा गुंतवला जातो.

आरोग्याबद्दलच्या काही समस्या अचानक उद्भवल्या तर खर्चाची तयारी असावी म्हणून आरोग्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्सही घेतला जातो. पण केवळ हेल्थ इन्शुरन्स घेणं पुरेसं नाही. तुम्हाला टर्म इन्शुरन्स, अपघात विमा, मॅटर्निटी कव्हर, क्रिटिकल केअर याबद्दलही माहिती असणं आवश्यक आहे.

या गोष्टींचं आर्थिक नियोजन कसं करायचं, कोणते प्लॅन्स निवडायचे, हेल्थ इन्शुरन्समध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, याबद्दल या लेखातून जाणून घेऊया.

आरोग्य विमा

आर्थिक नियोजनात जर तुम्ही या गोष्टीचा विचार केला नसेल तर तुमची आयुष्यभराची कमाई काही दिवसातच शून्य होऊ शकते.

भारतात वैद्यकीय महागाई वर्षाला 14 टक्के दराने वाढत असल्याचं वॉटसन ग्लोबल मेडिकल रिपोर्टने म्हटलं आहे.

याचाच अर्थ, ज्या उपचारासाठी आज 10 हजार रुपये खर्च आहे, पुढच्या वर्षी त्यासाठी 11,400 रुपये खर्च येणार. आपलं सरासरी आयुर्मानही वाढलं आहे. जर 70 ते 80 वर्षांचं आयुष्य आहे, असं गृहीत धरलं तर या काळात उद्भवणाऱ्या किरकोळ किंवा गंभीर आरोग्य समस्यांसाठीचा खर्च कसा करणार? त्यासाठीच आरोग्य विमा उपयोगी येतो.

कोणत्या गोष्टी विचारात घ्याल?

  • आरोग्य विमा घेताना फॅमिली फ्लोटर प्लॅन निवडा. 10 ते 15 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर असावं.
  • आरोग्य विमा घेताना गंभीर आजार, मॅटर्निटीसारखे अ‍ॅड ऑन्स घ्यायला हवेत.
  • तुमच्या विमा कव्हरवर कोणत्या मर्यादा नाहीत ना, हेही पाहायला हवं. उदाहरणार्थ- बाळंतपणाच्या उपचारांसाठी काही पॉलिसीमध्ये 50 हजार रुपयांपर्यंतची मर्यादा असते. पण तुम्ही जिथे ट्रीटमेंट घेत असाल तिथे खर्च अधिक असू शकतो. त्यामुळे या गोष्टींचा विचार करायला हवा.
  • पॉलिसीमध्ये प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन चार्जेस कव्हर होतात की नाही.
  • स्टँडर्ड पॉलिसीमध्ये प्री हॉस्पिटलायझेशन कालावधी 30 ते 60 दिवसांपर्यंतचा असतो, तर पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये 60 ते 180 दिवसांपर्यंतचा खर्च कव्हर होतो.

काही पॉलिसींमध्ये को-पे ऑप्शन असतो. म्हणजे मेडिकल बिलात तुम्हालाही काही रक्कम द्यावी लागते. त्यामुळे पॉलिसीच्या टर्म्स आणि कंडिशन वाचताना या को-पे अटीकडेही नीट लक्ष द्या.

लाइफटाइम रिन्यूअल असलेल्या प्लॅन्सचा विचार करा.

5 लाखांच्या वजावटीसह 20 लाखांचा सुपर टॉप-अप घ्या. यासाठी तुम्हाला अंदाजे 2500 ते 4000 रुपयांपर्यंत खर्च येतो.

टर्म लाइफ इन्शुरन्स

जर तुमचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून असेल तर टर्म इन्शुरन्सचा विचार करायला हवा. जास्त पैसे मिळतील या आशेने ULIPS किंवा मनी बॅक पॉलिसीचा विचार करून गुंतवणूक करण्यापेक्षा टर्म इन्शुरन्सला प्राधान्य द्यायला हवं.

टर्म इन्शुरन्स हा सध्या बाजारात मिळणारा सर्वात स्वस्त जीवन विमा आहे.

तुमच्या वयानुसार, तुम्हाला ठराविक वर्षांसाठी दरवर्षी एक निश्चित रकमेचा प्रीमियम भरावा लागतो.

या पॉलिसीच्या कालावधीत काही दुर्दैवी घटना (मृत्यू) घडली, तर कुटुंबाला मोठी रक्कम (सम अ‍ॅश्युअर्ड) मिळते.

कोणत्या गोष्टी विचारात घ्याल?

  • तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 15 ते 20 पट अधिक रकमेचा कव्हर घ्या.
  • (उदाहरणार्थ- जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर तुम्ही 50-75 लाख रुपयांपर्यंतचा कव्हर घ्या.)
  • साधारणपणे वयाच्या 80 वर्षापर्यंत संरक्षण देणाऱ्या (ज्या पॉलिसासाठी 65 वर्षांपर्यंत प्रीमियम भरावा लागतो) त्या पॉलिसी निवडा. ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षं असून जास्तीत जास्त वय 60-65 वर्षं आहे.
  • शक्य असल्यास अपघात कव्हर (Accident Rider) आणि गंभीर आजारांचे कव्हरही (Critical Illness Cover) घ्या.
  • टर्म इन्शुरन्स घ्यायला उशीर लावू नका. कारण जसं वय वाढतं, तसं तुमचा प्रीमियम 10-15 टक्क्यांनी वाढतो.

अपघात, अपंगत्वासाठीचे संरक्षण

अनेकांना या गोष्टींची कल्पना नसते, पण त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2022 मधील आकडेवारीनुसार, भारतात दर दोन मिनिटाला अपघातामुळे एका व्यक्तीला हात किंवा पायाला इजा होते किंवा कायमचं अपंगत्व येतं.

सहसा टर्म इन्शुरन्स किंवा अन्य विमा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वासाठी कव्हर किंवा संरक्षण देत नाही. तुमचा अपघात झाला, तर हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा) तो खर्च कव्हर करतात. पण जर कायमचं अपंगत्व आलं किंवा तुम्हाला नंतर काम करण्यावर मर्यादा आल्या तर... अशा परिस्थितीचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

यावेळी अपघात विमा उपयोगी ठरतो. जर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर तुम्हाला एक मोठी रक्कम मिळते. जर तात्पुरते अपंगत्व असेल तर उत्पन्नाप्रमाणे आठवड्याला काही रक्कम मिळते.

10 लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी तुम्हाला 1000 रुपयापर्यंतचा प्रीमियम भरावा लागतो. काही बँका 5 लाख रुपयांच्या विमा कव्हरसाठी चारशे ते पाचशे रुपयांचा हप्ता घेतात.

प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघातासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचं संरक्षण मिळतं, तेही 19 रुपयांच्या प्रीमियममध्ये. मात्र, यामध्ये कायमस्वरूपी अपंगत्वासाठीचं विमा संरक्षण आहे.

18 ते 70 वर्षं वयाची कोणतीही व्यक्ती अपघात विमा घेऊ शकते. तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या जोडीदारासाठी तसंच तुमच्या मुलांसाठीही हा विमा घेऊ शकता.

गंभीर आजारांसाठी पॉलिसी

या पॉलिसी जीवनशैलीशी संबंधित असलेले आजार जे भविष्यात जीवघेणे ठरू शकतात तसंच ज्यासाठी दीर्घकालीन आणि महागडे वैद्यकीय उपचार आवश्यक असतात, अशा आजारांसाठी आवश्यक ठरतात.

बहुतांश हेल्थ इन्शुरन्समध्ये गंभीर आजारांसाठीचे कव्हर हे रायडर (ऐच्छिक पूरक कव्हर) म्हणून अतिरिक्त हप्ता भरून मिळते.

तुमच्याकडे कोणताही हेल्थ इन्शुरन्स असू दे, त्यात केवळ हॉस्पिटलचे खर्च भागतात. जेव्हा गंभीर आरोग्यविषयक समस्या असतात, तेव्हा केवळ हॉस्पिटलचेच नाही तर इतरही खर्च खूप असतात.

त्यामधे प्रवास, डॉक्टरांचे सेकंड ओपिनियन, काम करता न येणं आणि त्यामुळे उत्पन्न बंद होणे अशा अनेक गोष्टी असतात. त्यासाठी क्रिटिकल इलनेस पॉलिसी असणं आवश्यक आहे.

या पॉलिसीमध्ये तुम्हाला एकरकमी पैसे मिळतात. किमान 10-25 लाख रुपयांचे विमा संरक्षण घेणं आवश्यक आहे. शक्य असेल तर तुम्ही स्वतंत्रपणेच क्रिटिकल इलनेस पॉलिसी घ्यावी, नसेल तर हेल्थ इन्शुरन्समध्ये अ‍ॅड ऑन्सही घेता येऊ शकतात.

मॅटर्निटी आणि फर्टिलिटी कव्हर

जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करत असाल इन्शुरन्समध्ये काही गोष्टींचा विचार करायलाच हवा.

हेल्थ इन्शुरन्समध्ये बाळंतपणाच्या खर्चाचा समावेश असतो. पण बहुतांश आरोग्य विमा कंपन्या यातल्या कव्हरवर अनेक अटी घालतात. बाळंतपणातला केवळ 25 ते 50 हजारांपर्यंतचाच खर्च भागवतात. पण अनेकदा खर्च यापेक्षा जास्त असू शकतात.

त्यातही बहुतेक पॉलिसींमध्ये आयव्हीएफ आणि वंध्यत्वावरील उपचारांचा समावेश नसतो.

त्यामुळे इन्शुरन्स शोधताना मॅटर्निटी कव्हरसह 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे रिटेल प्लॅन शोधा. फक्त काही कंपन्याच IVF, वंध्यत्व आणि नवजात बाळाशी संबंधित उपचारांसंबंधी फायदे देतात — त्यामुळे या बाबी नीट तपासा.

या योजनांमध्ये वेटिंग पिरियड साधारणतः 2 ते 4 वर्षे असतो. त्यामुळे पॉलिसी घेताना तुमच्या कौटुंबिक नियोजनांचाही विचार करा.

अनेकांना वाटू शकते की इतका पैसा विम्यावर खर्च करायचा तर मग बचत कधी आणि कशी करायची?

पण काही खर्च हे अनपेक्षितरित्या येतात आणि त्यासाठी तयार राहिलो नाही तर आपली बचत त्यातच खर्ची पडू शकतो.

याउलट आपण नीट नियोजन करून या पॉलिसी घेतल्या तर वार्षिक खर्च 25 ते 35 हजारांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे साधारण अडीच ते तीन हजार रुपये महिना.

त्यामुळेच इन्शुरन्सची गरज ओळखून योग्य त्या पॉलिसीचं नियोजन करा.

( हा लेख केवळ गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध असतात याची माहिती देण्यासाठी आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाशी किंवा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करावी. )

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)