हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम कमी कसा करायचा? इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यावी?

तुम्ही जेव्हा आर्थिक नियोजन करता, तेव्हा त्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विम्याचा विचार आवर्जून करणं गरजेचं आहे.

फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हेल्थ इन्शुरन्स हे एक मजबूत सुरक्षा कवच समजले जाते. बदलती लाइफस्टाइल, त्यातून निर्माण झालेले वेगवेगळे आजार, वाढलेले उपचार खर्च यांमुळे हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व वाढलं आहे.

मात्र, हेल्थ इन्शुरन्सचे वाढते प्रीमियम ही चिंतेची गोष्ट ठरत आहे. त्यामुळे अनेक जणांना पॉलिसीचे नूतनीकरण (renewal) करणं कठीण जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत प्रीमियममध्ये जास्त वाढ होताना दिसून येत आहे?

हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम महाग का झाले आहेत आणि ते कमी करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

गेल्या वर्षभराचा विचार करता हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम 15 टक्क्यांनी वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर प्रीमियमची रक्कम जास्तच असते.

प्रीमियमची वाढती रक्कम पाहून शेवटी विमा नियामक एजन्सी आयआरडीएआयने यावर्षी जानेवारी महिन्यात निर्देश दिले की, आरोग्य विमा कंपन्यांनी 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पॉलिसी धारकांच्या प्रीमियमची रक्कम वर्षाला 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवू नये.

का महाग होत आहे प्रीमियम? वैद्यकीय क्षेत्रातील वाढती महागाई हे कारण देत विमा कंपन्या हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम वाढवताना दिसतात.

गेल्या काही वर्षांत हॉस्पिटलचा खर्च, औषधांच्या किमती तसंच तपासण्यांचा खर्च वाढत आहे. त्यामुळेच विमा कंपन्यांना क्लेमसाठी जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्याशिवाय वय वाढल्यानंतर आरोग्यविषयक जोखमीही वाढतात. याचाच परिणाम प्रीमियमच्या दरांवर होतो.

याचाच अर्थ क्लेमची रक्कम वाढणं हे हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. जेवढा प्रीमियम जमा केला जातोय, त्यापेक्षा जास्त क्लेम येत असल्याचा विमा कंपन्यांचा दावा आहे. त्यामुळेच आपला खर्च भागवण्यासाठी विमा कंपन्यांना प्रीमियमही वाढवावा लागत आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते काही खास मार्गांचा अवलंब करून तुम्ही काही मर्यादेपर्यंत प्रीमियम कमी करू शकता.

कमी वयातच पॉलिसी घ्या- तुम्ही तरुण असाल आणि तुमचं आरोग्य उत्तम असेल तर प्रीमियमही तितकाच कमी असेल. त्यामुळे कमी वयातच पॉलिसी घेणं उत्तम.

जर तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लॅन निवडला तर प्रीमियमची रक्कम कमी होऊ शकते.

काही तज्ज्ञांच्या मते फॅमिली फ्लोटर प्लॅनमध्ये तुम्ही लहान मुलांचा समावेश करा. घरातल्या वडीलधाऱ्यांसाठी स्वतंत्र विमा काढणंच योग्य राहील.

टॉप प्लॅन- प्रीमियम कमी करण्याचा अजून एक मार्ग म्हणजे टॉप अप प्लॅन. जर तुम्ही 1 कोटी रुपयांची बेस पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर 10 लाख रुपयांची बेस पॉलिसी आणि 90 लाख रुपयांचा टॉप-अप प्लॅन निवडा.

हा पर्याय स्वस्त आहेच, शिवाय तुम्हाला अधिक कव्हरही देणारा आहे. ज्यांना कमी प्रीमियममध्ये अधिक कव्हरेज हवं आहे, त्यांच्यासाठी टॉप प्लॅन फायद्याचा आहे.

जर तुम्ही लाँग टर्म म्हणजे दीर्घ मुदतीची पॉलिसी घेत असाल तरी प्रीमियममध्ये बचत होऊ शकते.

शिवाय जर एका वर्षाच्या प्रीमियम ऐवजी एकदम तीन किंवा चार वर्षांचा प्रीमियम एकरकमी भरला तर विमा कंपन्या तुम्हाला आकर्षक सवलती देतात.

तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तरी विमा कंपन्या तुम्हाला प्रीमियममध्ये सवलत देतात.

याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळच्या वेळी पॉलिसी रिन्यू करा. कारण जर त्यात उशीर झाला तर तुम्हाला दंड होऊ शकतो किंवा कव्हरेजही लॅप्स होऊ शकतो.

हेल्थ इन्शुरन्सचा सगळ्यांत मोठा फायदा म्हणजे कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या आजारपणात तुमची बचत खर्च होत नाही.

दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कॅशलेस ट्रीटमेंट. म्हणजे हेल्थ कव्हर असेल तर तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यावे लागत नाहीत आणि खर्च इन्शुरन्स कंपनी करते.

स्टँडर्ड पॉलिसीमध्ये हॉस्पिटल नेटवर्कची सुविधा असते. त्या त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तर तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट मिळते.

हॉस्पिटलायझेशन शिवाय इतरही अनेक फायदे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्समुळे मिळतात. उदाहरणार्थ- मॅटर्निटीचे फायदे. काही पॉलिसीमध्ये तर डे केअर फॅसिलिटीही मिळतात.

दुसरा एक फायदा टॅक्स बेनिफिटचाही आहे. जर तुम्ही जुन्या टॅक्स रिजीममध्ये असाल तर तुम्हाला सेक्शन 80 डी अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतात.

पॉलिसी लक्षात घेताना काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवं.

सगळ्यांत पहिल्यांदा तुम्ही हे पाहायला हवं की आपल्या जवळच्या हॉस्पिलमध्ये कोणत्या पॉलिसीवर कॅशलेस ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे पॉलिसीमध्ये प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन चार्जेस कव्हर होतात की नाही.

स्टँडर्ड पॉलिसीमध्ये प्री हॉस्पिटलायझेशन कालावधी 30 ते 60 दिवसांपर्यंतचा असतो, तर पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये 60 ते 180 दिवसांपर्यंतचा खर्च कव्हर होतो.

तुमच्या विमा कव्हरवर कोणत्या मर्यादा नाहीत ना, हेही पाहायला हवं. उदाहरणार्थ- बाळंतपणाच्या उपचारांसाठी काही पॉलिसीमध्ये 50 हजार रुपयांपर्यंतची मर्यादा असते. पण तुम्ही जिथे ट्रीटमेंट घेत असाल तिथे खर्च अधिक असू शकतो. त्यामुळे या गोष्टींचा विचार करायला हवा.

काही पॉलिसींमध्ये को-पे ऑप्शन असतो. म्हणजे मेडिकल बिलात तुम्हालाही काही रक्कम द्यावी लागते. त्यामुळे पॉलिसीच्या टर्म्स आणि कंडिशन वाचताना या को-पे अटीकडेही नीट लक्ष द्या.

पॉलिसीमध्ये सध्या तुम्हाला असलेले आजार आणि वेटिंग पीरियडसाठी काय नियम आणि अटी आहेत, तेही काळजीपूर्वक वाचा. कारण या दोन कारणांमुळेच बरेचसे क्लेम हे नाकारले गेल्याची उदाहरणं आहेत.

विमा नियामक एजन्सी IRDAI चं म्हणणं आहे की, 48 महिन्यांपूर्वी ज्या आजारावर उपचार करण्यात आले आहेत, त्याला प्री एक्झिस्टिंग म्हणजेच आधीपासून असलेला आजार मानलं जाईल. त्यामुळे जेव्हाही पॉलिसी घ्याल, तेव्हा आपल्या आजारांचा स्पष्ट उल्लेख करा. लपवू नका.

स्टँडर्ड पॉलिसीमध्ये वेटिंग पीरिय़ड हा 2 ते 4 वर्षांपर्यंतचा असतो.

आजच्या बदलत्या, धकाधकीच्या आयुष्यात हेल्थ इन्शुरन्स ही गरज झाली आहे. त्य़ामुळेच गुंतवणूक करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करताना हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विम्याचं सुरक्षा कवचही घेणं आवश्यक आहे. तो घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करता येऊ शकतो, याची ही एक साधारण रुपरेखा होती.

लेखात दिलेली माहिती ही केवळ उपयुक्ततेसाठी आहे. आर्थिक व्यवहार करताना गुंतवणूक तज्ज्ञ किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.