You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनं आता दागिन्याच्या रुपात का खरेदी केलं जात नाहीय? सोनं खरेदीचा बदलता ट्रेंड काय आहे?
- Author, अनाहिता सचदेव आणि निखील इनामदार
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली आणि मुंबईहून
गेल्या काही आठवड्यांत सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला आहे. पण भारतीयांचं सोन्याबद्दलचं प्रेम काही कमी झालेलं नाहीये.
दिवाळीच्या आधी दिल्लीतल्या लाजपत नगर भागातल्या ज्वेलरी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होती. अगदी सुट्टीच्या दिवशीही इथलं मार्केट सुरूच होतं.
सोन्याच्या किमतीत काही दिवसांत एका तोळ्याला (प्रति 10 ग्रॅम) एक लाख 26 हजारांच्या पलिकडे पोहोचल्या आहेत. त्यामुळे सोन्याची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात सोन्याची मागणी काहीशी कमी झाली असली, तरी लोकांचं सोन्याबद्दलचं आकर्षण कमी झालं नाहीये.
दिवाळीतला बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक. तो सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्याआधी धनत्रयोदशीलाही सोनं खरेदी होतेच.
या मुहूर्तांवर लोक सोन्याची नाणी, बिस्किटं, वळी किंवा दागिन्यांच्या रुपात सोनं खरेदी करतात. कारण यामुळे घरात समृद्धी येते, असा समज आहे.
सोन्या-चांदीची खरेदी का वाढत आहे?
या वर्षी सोन्या-चांदीच्या किमती ज्या वेगाने वाढल्या त्यामुळे ग्राहकांमध्ये एकप्रकारे भीती निर्माण झाली.
दिल्लीतल्या कुमार ज्वेलर्सचे मालक प्रकाश पहलाजानी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, आता सोनं नाही खरेदी केलं तर भविष्यात किमती अजून वाढतील असा विचार लोक करताहेत. त्यामुळेच यावर्षी सोन्याची खरेदीही जास्त झाली.
पण आता सोन्याच्या किमती 60 टक्क्यांनी तर चांदी 70 टक्क्यांनी महाग झाली. त्यानंतर ज्वेलर्सनीही ग्राहकांच्या बजेटचा विचार करून आपली रणनीती बदलली.
तनिष्क गुप्तांचं ज्वेलरीचं दुकान प्रकाश पहलाजानी यांच्या दुकानापासून जवळच आहे.
ते सांगतात, "आम्हाला सोनं खरेदीच करायचं नाही, असं लोक म्हणत नाहीयेत. पण थोडं कमी खरेदी करण्याकडे त्यांचा कल आहे."
तनिष्क सांगतात की, त्यांनी आता अशा काही डिझाइन बनवल्या आहेत, ज्या पाहताना भारी वाटतील, पण त्यात सोनं कमी असेल. उदाहरणार्थ- 250 मिलीग्राम सोन्याचं नाणं, ज्याची किंमत जवळपास तीन हजार रुपये आहे. त्याची गोलाई पहिल्यासारखीच आहे, पण जाडी कमी केली आहे.
बाजारात यापेक्षा 10 पट छोटे म्हणजे केवळ 25 मिलीग्राम वजनाची नाणीही उपलब्ध आहेत.
लाजपत नगरच्याच मार्केटमध्ये काम करणारे पुष्पिंदर चौहान सांगतात की, सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे कमी वजनाच्या दागिन्यांची मागणी अजून वाढली आहे. तरूण पिढी आता केवळ काही प्रसंगांनाच वापरता येतील असे जड दागिने घेण्याऐवजी रोज घालता येतील अशा हलक्या दागिन्यांना पसंती देत आहेत.
काही ज्वेलर्सने बीबीसीला सांगितलं की, यावर्षी त्यांना एक ट्रेंड स्पष्टपणे दिसून आला. लोक केवळ दागिने म्हणून सोनं-चांदी खरेदी करत नाहीयेत, तर गुंतवणूक म्हणून सोनं-चांदी घेत आहेत. हाच कल बुलियन मार्केटच्या आकड्यांमधूनही समोर आला आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (डब्ल्यूजीसी) च्या मते भारतात सोन्याच्या मागणीमधल्या दागिन्यांच्या वाट्यात घट झाली आहे. गुंतवणूक म्हणून केल्या जाणाऱ्या खरेदीत (नाणी, वळी, बिस्कीटं) वाढ झाली आहे.
डब्ल्यूजीसीच्या रिसर्च हेड कविता चाको यांनी बीबीसीला सांगितलं की, "2023 च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या खरेदीमधला दागिन्यांचा वाटा 80 टक्के होता. यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत तो कमी होऊन 64 टक्क्यांपर्यंत आला. गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी 19 टक्क्यांवरून वाढून 35 टक्क्यांपर्यंत पोहोचली."
एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ईटीएफ आणि डिजिटल गोल्डच्या माध्यमातूनही सोन्यातली गुंतवणूक वाढत आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सोन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक पाहायला मिळाली. असेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या माध्यमातून ईटीएऱमधल्या गुंतवणूकीत यावर्षी 70 टक्के वाढ झाली होती.
आरबीआयची भूमिका
सोन्याच्या किमतींवर केवळ बाजारपेठेचा नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणांचाही परिणाम पडतो.
डब्ल्यूजीसीच्या माहितीनुसार 2025 मध्ये आरबीआयच्या परकीय चलन गंगाजळीत सोन्याचा वाटा 9 टक्क्यांवरून वाढून 14 टक्के झाला.
ब्रोकरेज हाऊस कोटक सिक्युरिटीजमधील तज्ज्ञ कायनात चेनवाला सांगतात की, गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या जागतिक मागणीमध्ये आरबीआयचा वाटा मोठा आहे.
त्या सांगतात की, परकीय चलन गंगाजळीत वैविध्य आणण्यासाठी, डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि भू-राजकीय तणावाच्या दरम्यान आर्थिक स्थैर्य ठेवण्यासाठी आरबीआय सातत्याने सोन्याचा साठा वाढवत आहे.
सोनं खरेदी झाली अवघड
तज्ज्ञांच्या मते किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली असली तरी येत्या काळात सण आणि लग्नाच्या सीझनमुळे सोनं आणि चांदीची मागणी वाढेल.
बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस सांगतात की, "श्रीमंत लोक सोन्याची खरेदी करणारच. कमी उत्पन्न गटाला सोन्याच्या वाढणाऱ्या किमतीचा फटका बसला आहे. एकूण खरेदीचं प्रमाण कमी होईल, पण किमतीचा विचार करता फार फरक पडणार नाही."
पण वाढत्या किमतीमुळे काही जणांसाठी सोनं खरेदी कठीण बनली आहे.
पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भावनाचं लग्न आहे. लाजपत नगरमधल्या प्रकाश पहलाजानींच्या दुकानाबाहेर त्यांच्याशी आमची भेट झाली.
त्यांनी सांगितलं, "खरेदीच्या आधी बराच विचार करावा लागत आहे. मी तर काही घ्यायचं की नाही याचाही विचार करतीय."
भावनाने आपली खरेदी सध्या तरी थांबवली आहे. सोन्याच्या किमती कमी झाल्यावर आपल्या लग्नाची खरेदी करता येईल, अशी आशा तिला आहे.
तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दागिन्यांचं आकर्षण भारतीय समाजात पहिल्यापासून आहे. त्यामुळे एका ठराविक कालावधीसाठी सोन्याच्या किमती वाढण्याचा किंवा कमी होण्याचा परिणाम याच्या खरेदीवर होऊ शकत नाही.
भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणून नाही, तर संपत्तीचं प्रतीक म्हणूनही पाहिलं जातं. प्रदीर्घ काळासाठी आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो, विशेषतः आर्थिक मंदीच्या काळात किंवा नोकऱ्या मिळणं अवघड होतं तेव्हा.
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टॅनलीच्या माहितीनुसार भारतीय कुटुंबांकडे एकूण 334 ट्रिलियन रुपयांचं सोनं आहे. भारताच्या जीडीपीच्या तुलनेत ते 88.8 टक्के आहे.
मॉर्गन स्टॅनलीच्या अर्थतज्ज्ञ उपासना चाचरा आणि बानी गंभीर यांनी आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे, "याचा अर्थ असा आहे की सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे खरंतर काही भारतीय कुटुंबांच्या संपत्तीत वाढ झाली आहे."
त्यांचं म्हणणं आहे की, आरबीआयच्या वित्तीय धोरणात व्याजदरात कपात करण्यात आली तसंच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कमी केल्यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढली आहे.
सणांच्या सुरुवातीलाच सोन्याचे वाढते दर हा चांगला संकेत आहे. मात्र, विक्रमी किमतीमुळे सोन्याची चमक काहीशी कमी झाली आहे हे नक्की.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)