You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोन्याच्या किंमती का वाढत आहेत? ही वेळ सोनं खरेदी करण्यासाठी योग्य आहे का?
- Author, प्रेरणा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बुधवारी (8 ऑक्टोबर) भारतात दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख 21 हजार रुपयांहून अधिक झाली आहे. जाणकारांना असं वाटतं की, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये अशी वाढ होत राहील.
'फोर्ब्स इंडिया'नुसार, 2000 साली प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत 4,400 रुपये होती. 2010 साली ही किंमत वाढून ती 20,728 वर पोहोचली तर त्यानंतर 2020 मध्ये ही किंमत 50,151 पर्यंत पोहोचली.
मात्र, गेल्या फक्त पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किंमतींने एक लाखांचा टप्पा पार केला आहे.
सोन्याच्या किंमतींमध्ये अशी भरमसाठ वाढ होण्याचा हा ट्रेंड कधीपर्यंत सुरू राहिल आणि नजीकच्या भविष्यामध्ये सोन्याच्या या किंमती खाली येऊ शकतात का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
भारतात सणासुदीला तसेच लग्नाच्या सिझनमध्ये सोन्याची मागणी फारच वाढते. ती पाहता, जाणकारांचं असं म्हणणं आहे की, सोन्याच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ सध्या तरी थांबताना तर दिसत नाहीये.
'गोल्डमॅन सॅक्स'ने आपल्या एका रिसर्चमध्ये असा अंदाज वर्तवला आहे की, 2026 च्या मध्यापर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी 6 टक्क्यांची वाढ पहायला मिळू शकते.
सोन्याच्या किंमतींमध्ये होत असलेल्या या भरमसाठ वाढीमागे अनेक कारणं आहेत.
यामागील सर्वात मूलभूत कारण म्हणजे जगभरात अनेक ठिकाणी सुरू असलेला लष्करी संघर्ष आणि त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आर्थिक उलथापालथी दरम्यान, लोक सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात.
गेल्या काही वर्षांमधला ट्रेंड्स पाहिल्यास सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा व्यवहार हा कधीच तोट्याचा ठरलेला नाहीये.
'इकोनॉमिक टाइम्स'च्या मते, गेल्या 20 वर्षांमध्ये फक्त चार कॅलेंडर वर्षच असे राहिलेले आहेत, ज्यांमध्ये सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत आणि गुंतवणूकदारांचं थोडं नुकसान झालेलं आहे. मात्र, हे नुकसानदेखील सिंग डिजीटपुरतंच मर्यादित राहिलं.
उदाहरणार्थ, 2013 मध्ये सोन्याच्या किमती 4.50 टक्क्यांनी घसरल्या, तर 2014 मध्ये 7.9 टक्क्यांनी घसरल्या, 2015 मध्ये 6.65 टक्क्यांनी घसरल्या तर 2021 मध्ये सोन्याच्या किमती 4.21 टक्क्यांनी घसरल्या.
म्हणूनच, एकीकडे जेव्हा जगभरातील शेअर बाजारांमध्ये अशांततेची परिस्थिती आहे आणि टॅरिफबाबतची अनिश्चितता शिगेला पोहोचलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणूक वाढणं ही गोष्ट अपरिहार्यच मानली जात आहे.
मार्केट विश्लेषक आसिफ इकबाल यांनी या याचवर्षी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं होतं की, सध्याच्या परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार सोन्याला 'हेजिंग स्ट्रॅटेजी' अर्थात जोखमीपासून वाचवणारे धोरण म्हणून विचारात घेत आहेत. शेअर बाजारात तोटा होण्याची भीती असल्याने ते सोन्यात गुंतवणूक करण्याकडे चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत.
आसिफ इकबाल पुढे सांगतात की, ग्लोबल मार्केटमधील अनिश्चिततेचं एक कारण डोनाल्ड ट्रम्पदेखील आहेत. तर, रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध हे यामागचं दुसरं कारण आहे.
अशा अस्थिरतेच्या परिस्थितीत, जगात सुरू असलेल्या संघर्षांचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही झाला आहे.
सोन्याच्या किमती वाढण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची वाढलेली खरेदी.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात जागतिक बाजारपेठेत सुरू असलेली अशांतता आणि आयात शुल्काबाबत वाढती अनिश्चितता या दोन्ही कारणांमुळे जगभरातील मध्यवर्ती बँका अधिकाधिक सोनं खरेदी करत आहेत.
'इकोनॉमिक टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, सोन्याच्या किंमती वाढत्या असूनही जगभरातील केंद्रीय बँका सोन्याची खरेदी करत आहेत. जेणेकरून, ते आपल्या परकीय चलनात विविधता आणू शकतील आणि अमेरिकन डॉलरवरील आपलं अवलंबित्व कमी करू शकतील.
'वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल'च्या आकडेवारीनुसार, गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी नेट 15 टन सोनं आपल्या साठ्यात जमा केलेलं आहे.
'गोल्डमॅन सॅक्स'च्या रिपोर्टनुसार, जर 'यूएस फेडरल रिझर्व्ह'ने व्याजदरात कपात केली तर गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे वळण्याचा असतो आणि जेव्हा अधिकाधिक लोक सोन्यात गुंतवणूक करायला लागतात तेव्हा सोन्याची किंमत देखील वाढताना दिसते.
डी-डॉलरायझेशनदेखील आहे एक कारण
तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जेव्हा एखादा देश डॉलरपासून दूर जातो किंवा त्यापासून स्वतःला दूर करतो तेव्हा त्याला 'डी-डॉलरायझेशन'ची प्रक्रिया असं म्हणतात.
देश अनेकदा त्यांच्या परकीय चलन साठ्यात डॉलर्स किंवा अमेरिकन बाँड ठेवतात आणि त्यामध्ये सातत्याने वाढ करत राहतात. यामागचं कारण हेच की, कच्च्या तेलाच्या किंवा इतर वस्तूंच्या आयातीसाठी त्यांना डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात.
डॉलरच्या बाबतीत हा ट्रेंड वर्षानुवर्षे चालू आहे.
मात्र, अलीकडच्या काळात, अमेरिकेच्या धोरणांमुळे अनेक देशांमध्ये डॉलरबद्दल चिंता निर्माण झाली आहे. 2015 आणि 2016 मध्ये अमेरिकेने रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्यानंतर, काही देश तेव्हापासूनच डॉलरबद्दल अस्वस्थ झालेले आहेत.
लोक अजूनही सोनं खरेदी करत आहेत का?
भारतासह आशियातील अनेक देशांमध्ये सोन्याकडे भांडवल अथवा जमापुंजी म्हणून पाहिलं जातं.
सोनं खरेदी करणं हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. दिवाळी आणि नवरात्रीसारखे सण असोत किंवा लग्न वा निकाह असोत, सोनं खरेदी करणं ही गोष्ट भारतीयांसाठी नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे.
जगभरातील विविध देशांमधील लोक त्यांच्या उत्पन्नाच्या सरासरी 2 ते 3 टक्के गुंतवणूक सोन्याच्या स्वरूपात जपून ठेवतात, तर भारतात या गुंतवणुकीचं प्रमाण 16 टक्क्यांपर्यंत आहे.
चीननंतर भारत हा सोन्याचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे.
अशा परिस्थितीत, तुमच्या मनात एक प्रश्न उद्भवू शकतो की सोन्याच्या किमती गगनाला भिडत असूनही, भारतीय लोक त्याच नेहमीच्या पद्धतीनं आणि गतीनं सोनं खरेदी करत आहेत की ही खरेदीची गती थोडी मंदावली आहे?
'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'चे प्रवक्ता सुरिंदर मेहता यांचं असं म्हणणं आहे की, दागिन्यांच्या विक्रीमध्ये 27 टक्क्यांची घट झालेली आहे. मात्र, सोन्याची नाणी आणि सराफी बाजारातील देवघेवीमधील घाऊक विक्रीमध्ये वाढ झालेली आहे. संपूर्ण भारतातील लोक मोठ्या संख्येनं सोनं खरेदी करत आहेत. मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरं आणि छोट्या गावांमध्ये जास्त प्रमाणात सोने खरेदी होत आहे.
आम्ही सुरिंदर मेहता यांना विचारलं की या धनत्रयोदशीला सोन्याची विक्री कशी राहिल?
या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, "गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीच्या दिवाळीला सोन्याची विक्रमी विक्री होईल, असं मला वाटतं."
लोकांमध्ये दागिन्यांच्या देवाणघेवाणीचा ट्रेंडही वाढला आहे का?
या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सुरिंदर सांगतात की, "जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन आणि ट्रेंडी दागिने खरेदी करण्याचा बाजार आता सुमारे 30 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अनेकांना असं वाटेल की, सोन्याच्या किमती वाढल्याने लोक कमी कॅरेटची खरेदी करतील, परंतु वास्तवात तसं नाहीये. लोक 18 कॅरेट आणि 20 कॅरेटचे सोन्याचे दागिने खरेदी करत आहेत. पण बहुतेक लोक अजूनही 22 कॅरेटचे दागिने खरेदी करू इच्छितात."
एखादा व्यक्ती आपल्या घरात किती सोनं ठेवू शकतो?
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निवेदनानुसार, सोने आणि दागिने जर कायदेशीर आणि योग्य प्रकारे मिळवलेले असतील, तर ते घरी ठेवण्याबाबत कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.
कोणतीही व्यक्ती तिच्या उत्पन्नानुसार कितीही सोनं खरेदी करू शकते किंवा स्वत:जवळ बाळगू शकते. मात्र, जर तिची चौकशी किंवा तपासणी झाली तर तिला या सोन्यामागचा कायदेशीर स्रोत सिद्ध करता आला पाहिजे. तसेच, आवश्यक असल्यास त्याची बिलं आणि पावत्याही उपलब्ध करून देता आल्या पाहिजेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या मते, घोषित उत्पन्न, करमुक्त उत्पन्न (जसे की शेतीतून मिळणारं उत्पन्न), "योग्य बचत किंवा वारसा मिळालेल्या कायदेशीर मालमत्तेसारख्या सुस्पष्ट आणि पात्र अशा स्रोतांमधून" केलेल्या सोन्याच्या खरेदीवर कर आकारला जाणार नाही.
भारताच्या अर्थ मंत्रालयाच्या मते, एक विवाहित महिला 500 ग्रॅमपर्यंत आणि एक अविवाहित महिला 250 ग्रॅमपर्यंत सोने ठेवू शकते.
यासोबतच, विवाहित आणि अविवाहित दोन्हीही प्रकारचे पुरुष 100 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवू शकतात.
सर्वांत स्वस्त सोनं कुठं मिळतं?
सोन्याचे दर वेगवेगळ्या देशांनुसार बदलतात आणि ते अनेक घटकांवर अवलंबून असतात.
उदाहरणार्थ, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे प्रमाण आणि अमेरिकन डॉलरची ताकद हे सोन्याच्या पुरवठ्यावर आणि मागणीवर परिणाम करणारे घटक आहेत. स्थानिक कर देखील सोन्याच्या किमतीवर परिणाम करतात.
बिझनेस वेबसाइट 'फोर्ब्स'नुसार, भारत आणि इतर अनेक देशांच्या तुलनेत बहरीन, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, दुबई, अमेरिका आणि पेरूमध्ये सोनं अधिक स्वस्त आहे.
परदेशातून किती सोनं आणलं जाऊ शकतं?
एक पुरुष प्रवासी सीमाशुल्काशिवाय 20 ग्रॅम सोनं सोबत आणू शकतो. परंतु यासाठी दोन अटी आहेत. पहिली अट ही आहे की, सोन्याची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी आणि दुसरी अट अशी आहे की, हे सोनं फक्त दागिन्यांच्या स्वरूपातच असावं.
महिलांसाठी, ही मर्यादा 40 ग्रॅम आणि एक लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त सोनं आणलं तर तुम्हाला कस्टम ड्यूटी अर्थात सीमाशुल्क भरावं लागेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)