सोन्याचा दर पुढील 5 वर्षात प्रतितोळा 2 लाख 30 हजार होईल? सध्या गुंतवणूक करावी की नको?

गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनं एक आकर्षक पर्याय बनला आहे.

सोनं फक्त एक सुरक्षित गुंतवणूक मानली जात नाही, तर भविष्यातील वाढीच्या दृष्टीने तो एक आकर्षक पर्याय बनला आहे.

2030 च्या अखेरपर्यंत एक ग्रॅम सोन्याची किंमत 23 हजार रुपयांपेक्षा जास्त होईल, असा अंदाज एका आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कंपनीनं वर्तवला आहे. म्हणजेच सोनं प्रतितोळा 2 लाख 30 हजारहून अधिक होईल.

सध्या एक ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 9600 रुपये इतकी आहे. म्हणजेच प्रतितोळा 96 हजार आहे.

या दर वाढीमागचं कारण काय आहे? अशाप्रसंगी गुंतवणूकदारांनी काय करावं? हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे.

सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना, एक औंस (सुमारे 31.1 ग्रॅम) सोन्याची किंमत सध्या सुमारे 4 ते 5 हजार डॉलर असेल आणि 2030 मध्ये ती 8,900 डॉलरपर्यंत वाढू शकेल, असा अंदाज एका आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्थेच्या अहवालात वर्तवण्यात आला.

एका अमेरिकन डॉलरची किंमत 83 रुपये धरली तरी 2030 मध्ये एक ग्रॅम सोन्याची किंमत 23,751 रुपये होईल. म्हणजेच एक पौंड सोन्याची किंमत सुमारे 1.80 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते, असंही या अहवालात म्हटलं आहे.

लिकटेंस्टाईनमधील गुंतवणूक फर्म 'इन्क्रिमेंटम'ने अलीकडेच 'गोल्ड वी ट्रस्ट रिपोर्ट 2025' हा अहवाल प्रसिद्ध केला.

या अहवालात गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची कारणं काय, भविष्यात सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात का वाढ होऊ शकते याबद्दलच्या कारणांचं विश्लेषण केलं आहे.

विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांच्याकडील सोन्याच्या साठ्यात दरवर्षी 1000 मेट्रिक टनांपर्यंत वाढ केली आहे.

सोन्याच्या वाढत्या किमतीबाबत अहवाल काय सांगतो?

धातूंमध्ये गुंतवणूक करणं टाळणारे पाश्चात्य देशांतील गुंतवणूकदार आता सोन्याकडे वळू लागले आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे.

2024 मध्ये इटीएफमधील (एक्स्चेंज ट्रेडेड फंड, सोन्यावर आधारित गुंतवणूक) गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या व्यतिरिक्त, गुंतवणूक अमेरिकन बाजारांमधून बाहेर जाऊन सोन्याकडे आणि युरोपीय बाजारांकडे वळत आहे. अनेक देश त्यांच्याकडील सोन्याच्या साठ्याचं प्रमाण सतत वाढवत आहेत, असंही अहवालात म्हटलं आहे.

उदाहरणार्थ- रशियाच्या साठ्यातील सोन्याचं प्रमाण गेल्या 10 वर्षांत 8 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे.

याशिवाय गोल्डमॅन सॅक कंपनीच्या अंदाजानुसार चीन दर महिन्याला 40 टन सोनं खरेदी करत आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.

एक ग्रॅम सोनं 10 हजार रुपयांपर्यंत कधी जाईल?

या पार्श्वभूमीवर, या दशकाच्या अखेरीस सोन्याचा दर प्रति औंस 8,900 डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा अर्थ दरवर्षी सोन्याच्या दरात 19 टक्के वाढ होईल.

या वर्षाच्या अखेरीस एक औंसचा दर 4,080 डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच, एक ग्रॅम सोन्याचा दर 10 हजार 895 रुपये होईल.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी जेपी मॉर्गनने गेल्या एप्रिलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याची किंमत प्रति औंस 4,000 डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता.

काय झालं तर सोन्याचे भाव कमी होतील?

सोन्याचे दर कमी होण्यासाठी काही गोष्टी घडाव्या लागतील, असं इन्क्रिमेंटमच्या अहवालात म्हटलं आहे. यानुसार सोन्याचे दर कमी होण्यासाठी जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी करण्याचं प्रमाण कमी करावं लागेल.

भविष्यात युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी करार झाला, मध्यपूर्वेतील समस्या सुटल्या, अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा समारोप झाला, तर जागतिक राजकारणात स्थिरता येईल. यामुळे सोन्यावरील अवलंबित्व कमी होईल.

जेपी मॉर्गनच्या अहवालात हेच म्हटलं आहे. ते असा इशारा देतात की, जर मध्यवर्ती बँकांनी अचानक सोन्याची खरेदी कमी केली, तर किंमत घसरण्याच्या धोक्याची जाणीव गुंतवणूकदारांनी ठेवावी.

अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावं?

सोन्याच्या किमती सातत्यानं वाढत असताना, गुंतवणूकदारांनी काय करावं, हा प्रश्न उपस्थित होतो.

मुदत ठेव, म्युच्युअल फंड्स, शेअर बाजार, बाँड यांसारखे अनेक पर्याय गुंतवणूकदारांसमोर आहेत. यात सर्वोत्कृष्ट गुंतवणुकींचाही विचार केला तरी 10 ते 12 टक्के परतावा मिळेल, पण सोबतच सोनं 19 टक्के वाढीचा दर देईल, असं या अंदाजात म्हटलं आहे.

"सोनं हे एकमेव चलन आहे, जे सर्व चलनांच्या तुलनेत स्थिर राहू शकतं. एखाद्याच्या गुंतवणुकीत विशिष्ट प्रमाणात सोनं असलं पाहिजे, असं मी बऱ्याच काळापासून सांगत आलो आहे," असं अर्थतज्ज्ञ आनंद श्रीनिवासन म्हणतात.

"आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला त्याचं त्वरित रोखीत रूपांतरित करता येतं. जेव्हा सोन्याची किंमत कमी होते, तेव्हा आपल्याकडे किमान 400 ग्रॅम सोनं असणं आवश्यक असतं.

सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तरी, एखाद्या व्यक्तीनं किमान 200 ग्रॅम तरी सोनं जवळ ठेवावं," असं आनंद श्रीनिवासन म्हणाले.

सोनं खरेदी करणाऱ्यांनी 'हा' विचार अवश्य करावा

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असली, तरी सोनं खरेदी करणाऱ्यांनी अनेक बाबी लक्षात घ्यायला हव्यात, असं गुंतवणूक सल्लागार व्ही. नागप्पन सांगतात.

"सोन्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर गेल्या एका वर्षात त्याच्या किमतीत सुमारे 75 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तरीदेखील, सोन्याबाबत इतर अनेक गोष्टींचाही विचार करायला हवा."

"मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करत असल्यामुळे किंमत वाढते, असा अंदाज आहे. पण जर समस्या सुटल्या आणि मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी करणं थांबवलं किंवा विकायला सुरुवात केली, तर काय परिणाम होईल हेही लक्षात ठेवायला हवं," असं नागप्पन म्हणतात.

ते म्हणतात की, 2012 ते 2016 या काळात सोन्याच्या किमतीतील चढउतार सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजेच, 2012 मध्ये 10 ग्रॅम सोनं 31,050 रुपये होतं. परंतु, 2015 पर्यंत ते कमी होऊन सुमारे 26,300 रुपये झालं. त्यानंतर 2018 मध्ये सोनं पुन्हा 31,000 रुपयांच्या आसपास पोहोचलं.

"पण जर 2012 मध्ये टायटनसारख्या एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली असती, तर 2018 पर्यंत त्याची किंमत किती प्रमाणात वाढली असती?" असा प्रश्न नागप्पन विचारतात.

गुंतवणुकीत सोन्याचा वाटा किती असावा?

अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी काय करावं?

"एखाद्यानं आधीच कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकी केल्या आहेत पाहूनच हे ठरवायला हवं. पण, एक गोष्ट मात्र आजच्या स्थितीत ठामपणे सांगता येईल की, एखाद्याच्या गुंतवणुकीत निश्चित प्रमाणात सोनं असणं अत्यंत आवश्यक आहे," असं आनंद श्रीनिवासन म्हणतात.

नागप्पन यांच्या मते, आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी सोनं गुंतवणुकीचं एक चांगलं साधन (हेज) मानलं जाऊ शकतं.

"तुम्ही सोन्यात एक निश्चित रक्कम गुंतवू शकता. जर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली, तर तुम्ही त्याचा काही भाग विकून नफा मिळवावा. मग किंमत कमी झाल्यावर पुन्हा सोनं विकत घेता येईल," असं ते म्हणतात.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक आहे. 2025 मध्ये भारतात 700 ते 800 टन सोनं विकलं जाईल, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनं (जागतिक सोनं परिषद) व्यक्त केला आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, भारतात 2023 मध्ये 761 टन सोनं विक्री झालं. 2024 मध्ये हे प्रमाण वाढून 802.8 टन झालं.

याच प्रकारे, गेल्या 2 वर्षांत भारतात सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. 2023 मध्ये 185.2 टन सोन्याच्या किमतीची गुंतवणूक करण्यात आली. 2024 मध्ये ही गुंतवणूक वाढून 239.4 टन सोन्यात झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)