लाल किल्ल्याजवळ ब्रिटिश व्हॉईसरॉयवर क्रांतिकारकांनी हल्ला कसा घडवून आणला?

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

गव्हर्नर जनरल लॉर्ड चार्ल्स हार्डिंग आणि त्यांच्या पत्नी विनिफ्रेड यांनी 23 डिसेंबर 1912 ला पहिल्यांदा ब्रिटिश भारतात प्रवेश केला. ब्रिटिश भारताचे व्हॉईसरॉय म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर वेगवेगळ्या संस्थांनाच्या राजांकडून स्वागत झाल्यानंतर त्यांची मिरवणूक लाल किल्ल्यांकडे निघाली. व्हॉईसरॉय हार्डिंग आणि त्यांची बायको हत्तीवर विराजमान होते.

"मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. कदाचित काहीतरी वाईट घडणार आहे," व्हॉईसरॉय त्यांच्या पत्नी विनिफ्रेड यांना म्हणाले. या प्रसंगाचं वर्णन त्यांनी स्वतः 'माय इंडियन इयर्स' या त्यांच्या आत्मचरित्रात केलं आहे.

"तुम्हाला प्रवासाचा थकवा आला असेल आणि तसंही तुम्हाला असा दिखावा आवडत नाही," असं उत्तर विनिफ्रेड यांनी दिलं.

कशी होती मिरवणूक?

जोसेफ मॅक्विड यांनी 'फ्युजिटिव्ह ऑफ एम्पायर' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. भारतीय क्रांतिकारक रास बिहारी बोस यांच्या जीवनावर ते आधारित आहे.

पुस्तकात मॅक्विड लिहितात की, "सुरक्षा रक्षकांच्या घेरावात मिरवणुकीनं स्टेशनपासून किल्ल्यापर्यंतचं अर्ध अंतर पार केलं होतं. रस्त्याच्या कडेला लोक गर्दी करून उभे होते आणि आसपासच्या इमारतींच्या खिडक्यांमधूनही लोक हा कौतुकसोहळा पाहत होते. एवढा आवाज होता की, कानांना काही नीट ऐकू येत नव्हतं."

व्हाईसरॉय आणि त्यांच्या पत्नी हत्तीवरून पंजाब नॅशनल बँकेच्या इमारतीसमोरून जात होते. त्याचवेळी हत्तीवर बसण्यासाठी असलेला हौद किवा अंबारीच्या मागच्या भागातून काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला.

क्षणभरात मोठा स्फोट झाला. मैलभर लांबपर्यंत त्याचा आवाज पसरला होता. विनिफ्रेड खाली पडल्या, पण त्या फार जखमी झाल्या नाहीत.

व्हाईसरॉय हार्डिंग यांना मात्र धक्का बसला. आधी तर आपण जखमी असल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. नंतर कुणीतरी पाठीवर जोरानं मारलंय आणि वरून उकळतं पाणी टाकतंय असं त्यांना वाटू लागलं.

त्यांच्या पाठीवर चार इंच खोल जखम होती. त्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. उजव्या बाजुला मानेवर आणि मांडीवर चार ठिकाणी जखमा झाल्या होत्या. अंबारीच्या चांदीच्या कडांमुळं ते काहीसे बचावले होते.

स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की, हार्डिंग यांचं हेल्मेटही तुटलं होतं असं जोसेफ मॅक्विड लिहितात. हेल्मेट नसतं तर त्यांचा मृत्यूच झाला असता.

स्फोटात व्हाईसरॉय यांच्या एका नोकराचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या नोकराच्या कानाचे पडदे फाटले. शिवाय, बॉम्बमुळं इतर 20 लोक जखमीही झाले. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेला एक 16 वर्षांच्या मुलगा जागीच ठार झाला होता.

हत्तीला आणि माहुताला फार काही झालं नाही. पण भीतीनं हत्ती खाली बसत नव्हता. अखेर जखमी व्हाईसरॉयना खाली उतरवण्यासाठी लाकडी शिडी लावावी लागली.

गुप्तहेरांचं जाळं आणि अटकेचं सत्र

स्फोटाच्या तपासाची जबाबदारी डेवीड पेट्री यांच्याकडं देण्यात आली. हल्ल्यात वापरलेला बॉम्ब पंजाब नॅशनल बँकेच्या इमारतीतूनच फेकला गेला असावा असा तपास करणाऱ्यांचा प्राथमिक संशय होता.

स्फोट घडला त्या जागेचं निरिक्षण केल्यावर वापरलेला बॉम्ब बंगालमध्ये गेल्या दोन हल्ल्यात वापरलेल्या बॉम्बसारखाच असल्याचं समजलं.

जोसेफ मॅक्विड लिहितात की, स्थानिक पोलिसांनी बँकेच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची विचारपूस सुरू केली.

घटनास्थळी महिलांची झडती घेण्यासाठी सेंट जॉन्स रुग्णवाहिकेतून महिला परिचारिका आणल्या गेल्या होत्या. कोणताही पुरूष महिलेच्या वेशात तिथं येऊ नये याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महिलेची झडती घेतली जात होती.

हल्ल्याबद्दल दुसऱ्या शहरांत तारने माहिती कळवण्यात आली होती.

शहरातून बाहेर जाऊ पाहणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला वेढा घात होता. शहरभर गुप्तहेर पसरले होते.

हल्ल्याच्या आधी आणि नंतर आसपासच्या टपाल घरांतून पाठवलेली किंवा तिथं आलेली हजारो पत्रं तपासली गेली.

अलीगड, लखनऊ, बनारस, पेशावर, शिमला, हैदराबाद, इंदौर, मेरठ, कराची आणि पार इराणच्या अबादन शहरातही वेगवेगळ्या लोकांची चौकशी झाली. त्यांच्यावर पाळत ठेवली आणि काहींना अटकही झाली.

पण हे कारस्थान कोणी रचलं ते अजूनही कळालं नव्हतं. तपासाचं नेतृत्व करणारे डेवीड पेट्री खचत चालले होते. मग, अचानक महत्त्वाची माहिती समोर आली.

लाहोरमधून लागला सुगावा

शनिवार 17 मे 1973 रोजी रात्री 8:30 वाजता लाहोरमधल्या जिमखाना लायब्ररीचे कर्मचारी राम पदरथ शेवटचं पार्सल घेऊन निघाले. लायब्ररीचे सचिव मेजर सदरलँड यांचं पुस्तकांचं ते पार्सल होतं.

"लॉरेन्स गार्डन मैदानाच्या कडेनं त्यांच्या लॉजकडे जाताना पदरथ यांना युरोपियन अधिकाऱ्यांच्या ओपन एअर बारच्या बाजुनं चक्कर मारायची लहर आली," असं मॅक्विड लिहितात.

लाहोरच्या या लॉरेन्स गार्डनचं आता 'बाग-ए-जिन्ना' असं नामकरण केलं आहे.

लॉरेन्स आणि मोंटगोमरी सभागृहाच्या समोर रस्त्यावर पडलेल्या एका पाकिटावर पदरथ यांचा पाय पडला आणि त्याचा स्फोट झाला.

पदरथ यांचा पाय भाजला. दोन मोठे खिळे पोटात घुसले. काही काचेचे तुकडेही शरीरात घुसले.

रस्त्यावर खड्डा पडावा इतका मोठा हा स्फोट नव्हता. तपासणी करणाऱ्यांना स्फोटाच्या जागेपासून 30 फूट दूर खिळे, काचेचे तुकडे आणि बाकी अवशेष मिळाले.

पदरथ यांचा जागीच मृत्यू झाला. तेव्हाच शहरात पाऊसही सुरू होता.

घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर हा बॉम्बही आधीच्या हल्ल्यात वापरल्या गेलेल्या बॉम्बसारखाच असल्याचं समजलं.

महत्त्वाचं म्हणजे हीच स्फोटकं व्हॉईसरॉय हार्डिंग यांच्यावर झालेल्या हल्ल्यातही वापरली गेली होती.

पावसानं बहुतेक पुरावे नष्ट झाले. पण स्फोटानं पदरथ यांच्या उजव्या पायावर पिक्रीड ॲसिडचे पिवळ्या रंगाचे छोटे डाग पडले होते.

तर, डाव्या पायावर आर्सेनिक नावाचा पदार्थही होता. नेमकी हीच रसायनं, व्हॉईसरॉय यांच्या हल्ल्यावेळीही वापरली गेली होती.

पिक्रीड ॲसिड आणि बॉम्बचे डेटोनेटर

पदरथ यांचा पाय पडून स्फोट झाला तेव्हाच आसामचे माजी असिस्टंट कमिशनर लॉरेन्स गार्डन हे त्यावेळी ओपन एअर बारमध्ये होते.

विस्फोटकं नेमकी तिथं का ठेवली होती ते डेवीड पेट्री यांना समजलं.

पंजाबला पोहोचण्याआधी लॉरेन्स गार्डन यांच्यावर 27 मार्चला मौलवी बाजारात घरातच हल्ला झाला होता. पण वेळेआधीच बॉम्ब फुटल्याने ते वाचले.

यावरून पूर्व आणि पश्चिम बंगालसोबतच सगळ्या उत्तर भारतात आणि पंजाबमध्ये राहणारे वेगवेगळे क्रांतीकारक एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा एकच व्यक्ती किंवा गट वेगवेगळ्या हल्ल्यांसाठी बॉम्बचा पुरवठा करत आहे, असा निष्कर्ष पेट्री यांनी काढला.

नंतर पुराव्यांच्या आधारानं पोलिसांनी कोलकत्त्याच्या एका इमारतीवर धाड मारून चार लोकांना अटक केली. तिथून बॉम्ब बनवायचं साहित्य आणि वसाहतवादविरोधी पुस्तकं असे अनेक पुरावे गोळा केले.

महत्त्वाचं म्हणजे, जप्त केलेल्या साहित्यात लाहोर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात वाटलेली काही पुस्तकं होती.

पेट्री यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना 16 फेब्रुवारीला दिल्लीत अनेक ठिकाणी छापेमारी करण्याचे आदेश दिले. त्यात अमीरचंद यांच्या घराचाही समावेश होता.

त्या घरातून पोलिसांना क्रांतिकारी साहित्य, कापसात गुंडाळलेले बॉम्बचे डेटोनेटर, पिक्रीड ॲसिड आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारण्याची योजना आखलेली कागदपत्रंही मिळाली.

पण या तपासात रास बिहारी बोस या नावाच्या व्यक्तीची ओळखही समोर आली होती. ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. ते अमीरचंद यांच्या घरी राहत होते.

क्रांतिकारकांच्या दिल्ली आणि लाहोर या दोन प्रमुख केंद्रांना जोडण्याचं काम बोस करत होते, असं कागदपत्रांवरून समजलं.

त्यांनी अवध बिहारी यांना लिहिलेली दोन पत्रं पोलिसांना सापडली. ही पत्रं लाहोरमधल्या दिनानाथ या विद्यार्थ्याकडून त्यांना मिळत असल्याचं अवध बिहारी यांनी मान्य केलं.

स्थानिक पोलिसांनी लगेचच दिनानाथला अटक केली. रास बिहारी बोस बंगालच्या क्रांतीकारकांच्या संपर्कात असल्याचं दिनानाथने सांगितलं. तेच दिल्ली आणि लाहोरमध्ये बॉम्बचा पुरवठा करत असल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

लाहोरमध्ये झालेल्या स्फोटमागे वसंत कुमार विश्वास नावाच्या एका बंगाली तरूणाचा हात होता हेही यातून स्पष्टपणे कळालं. तो अवध बिहारी यांच्यासोबत रहायचा आणि बोस यांनीच त्याला गटात सहभागी करून घेतलं होतं.

रास बिहारी बोस आणि हार्डिंग समोरासमोर आले तेव्हा

जानेवारीच्या अखेरीस व्हॉईसरॉय हार्डिंग डेहराडूनला गेले. आत्मचरित्रात त्यांनी लिहिलंय की, ते तिथं एका घराजवळून जात होते. तेव्हा काही भारतीयांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. त्या लोकांबद्दल व्हाईसरॉय हार्डिंग यांनी उत्सुकतेनं विचारलं.

तेव्हा त्या गटातल्या एका बंगाली व्यक्तीनं त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच एका सभा आयोजित केली होती असं त्यांना समजलं. ती व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून रास बिराही बोसच असल्याचं नंतर कळालं.

वसंत कुमार विश्वास यांना 26 फेब्रुवारी 1914 ला बंगालच्या मुरागाछा शहरातून अटक केली. त्यांच्या वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी ते तिथं गेले होते. त्यांच्यावर लाहोरच्या लॉरेन्स गार्डनमध्ये बॉम्ब फेकल्याचाही आरोप होता.

या दिल्ली बॉम्बस्फोट हल्ल्याची सुनावणी 23 मे 1914 ला सुरू झाली. त्यात अमीर चंद, अवध बिहारी आणि भाई बालमुकुंद या तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली. वसंत कुमार विश्वास यांना सुरूवातीला आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. पण विनंतीनंतर त्यांनाही मृत्यूची शिक्षा देण्यात आली.

चरण दास यांना क्रांतीकारकांना आश्रय देण्याच्या आणि त्यांच्यासाठी निधी जमवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं. आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असताना पहिल्या विश्व युद्धानंतर त्यांना पाच वर्षांत सोडून देण्यात आलं.

तर लाल हनुमंत सहाय यांना अंदमानच्या कारागृहात मरेपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं.

'मोस्ट वाँटेड' बोस पोहोचले जपानला

या सगळ्यातून बोस वाचले आणि पोलिसांसाठी 'मोस्ट वॉंडेट' बनले. 'अलिपूर बॉम्ब केस' या पुस्तकात नुरुल हुदा लिहितात की, रास बिहारी बोस तीन वर्ष पोलिसांपासून लपत राहिले आणि 1915 मध्ये जपानला निघून गेले.

साथिदारांना फाशी झाल्यावर ते भुमिगत झाले होते. ते तेव्हाच्या बनारसजवळ राहायचे. भूमिगत असूनही सचिंद्र नाथ सान्याल या साथीदारासोबत इंग्रजांविरोधी देशव्यापी सशस्त्र चळवळीचं नेतृत्व ते करत होते.

पुढे बनारसमधून वी. के. पिंगळे यांना अटक झाल्यानंतर रास बिहारी बोस जपानला निघून गेले.

पण पहिल्या विश्व युद्धाच्या वेळी जपानने ब्रिटनशी हातमिळवणी केली. बोस यांना परत ब्रिटिश भारतात पाठवण्यासाठी जपान तयार होता. पण जपानमधल्या काही लोकांना त्यांच्या कामाबद्दल सहानुभूती वाटत होती.

प्रत्यर्पणाच्या भीतीनं रास बिहारी बोस यांनी जपानमध्ये अनेकदा त्यांची ओळख आणि राहण्याची जागा बदलली. तिथंच त्यांनी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलंही झाली. 1923 मध्ये ते जपानी नागरिक झाले.

दिल्लीच्या इतिहासावर अनेक लेख लिहिणारे पत्रकार, लेखक आरवी स्मिथ यांच्या म्हणण्याप्रमाणे, लाला हनुमंत सहाय यांना अंदमानच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली होती. मात्र, लाहोरच्या कारागृहात कठोर शिक्षा भोगल्यानंतर दया याचिकेनंतर त्यांची शिक्षा माफ केली गेली.

'गुपित मरेपर्यंत माझ्यासोबत राहील'

'रिव्हॉल्यूशनरीझ ऑफ चांदनी चौक' या लेखात आरव्ही स्मिथ लिहितात की, लाला हनुमंत सहाय यांच्याशी 1965 मध्ये त्यांची शेवटची भेट झाली.

थंडीच्या दिवसांत गोधडी गुंडाळून ते गाजराचा हलवा खात बसले होते. वयानुसार फार थकलेले दिसत होते.

दिल्लीतल्या चांदनी चौकातील ज्या खोलीत ते रहायचे ती खोली म्हणजे, व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग यांच्या हत्येची शपथ घेतलेल्या क्रांतीकारकांचा अड्डा होता.

त्यांची आई आणि काकू यांच्यासह कुुटुंबातल्या इतर महिलाही तिथूनच मिरवणूक पाहात होत्या, असं त्यांनी बाल्कनीकडे बोट दाखवत सांगितलं होतं.

बॉम्ब फुटला तेव्हा सगळे लोक आतमध्ये पळाले.

पोलिसांनी धाड टाकली तेव्हा एका खाटेखाली बसून ते खिचडी खात होते. ओळख लपवण्यासाठी त्यांनी आईची साडी डोक्याभोवती गुंडाळून घेतली.

कटात सहभाग असलेले इतर लोक पंजाब नॅशनल बँकेच्या इमारतीत लपले.

बॉम्ब कुणी फेकला याबद्दल अधिकृत दस्ताऐवजात गोंधळात टाकणारी माहिती आहे. त्यात बोस आणि विश्वास या दोघांचं नाव लिहिलं आहे असं जोसेफ मॅक्विड यांनी पुस्तकात लिहिलंय.

बोस यांनीच हार्डिंग यांच्यावर बॉम्फ फेकला असं म्हटलं जातं. पण महिलेच्या वेशात येऊन विश्वास यांनी बॉम्बहल्ला केला असं काही लोकांचं म्हणणं आहे.

पण प्रत्यक्षात ज्यानं बॉम्ब फेकला त्याचं नाव लाला हनमुंत सहाय यांनी कधीही पुढे येऊ दिलं नाही. अगदी मरेपर्यंत नाही.

'हे गुपित मरेपर्यंत माझ्यासोबत राहिल' अशी घोषणाच त्यांनी केली होती. त्यांचं वचन त्यांनी खरोखरच मरेपर्यंत पाळलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)