एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडली, तर आम्ही विचार करू – प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. जवळपास अडीच तास ही बैठक चालली होती.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडली, तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू.”
आंबेडकर पुढे म्हणाले की, “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा खिमा केला. उद्धव ठाकरेंना फायनल करायचं असेल तर ते त्यांच्या हातात आहे. सेनेबरोबर समझता करण्यास आम्ही तयार, फायनल कधी करायचे हे उद्धव यांनी ठरवावं. आम्ही एकमेकांना युतीची बांधिलकी दिली आहे. पण ती सार्वजनिक झालेली नाहीये.”
याआधी काय घडलं?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकराना युती करण्याची जाहीररित्या साद घातली.
त्याला काही दिवसात प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा प्रस्ताव मान्य असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी जाहीर केलं.
त्यामुळे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे युतीत लढणार हे स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, FACEBOOK
शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधीही करण्यात आला होता. त्याचा कितपत फायदा झाला? वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती दीर्घकाळ टीकलेली दिसली नाही.
मग शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्या कारणास्तव वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावेसे वाटत आहे? ते पाहूया.

महाविकास आघाडीसोबत की स्वतंत्र?
युतीचा प्रस्ताव जरी वंचित बहुजन आघाडीने मान्य केला असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सध्या महाविकास आघाडीमधला एक पक्ष आहे. मग ही युती झाली तर वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीमधला चौथा पक्ष असेल की त्यांची युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल?
याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या, "आतापर्यंत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्यासोबत दोन बैठका झाल्या आहेत. त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. युतीचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे.
पण ही युती शिवसेनेसोबत असेल की महाविकास आघाडीबरोबर याबाबत आम्हाला निश्चितता हवी आहे. ती निश्चितता मिळाल्यानंतरच आम्ही पुढची बोलणी करू. आमच्याकडे सध्यातरी शिवसेनेचा प्रस्ताव आहे. महाविकास आघाडीचा प्रस्ताव आल्यानंतर पुढची चर्चा करू."
ही युती महाविकास आघाडीसोबत होणार की शिवसेनेसोबत हे अद्याप स्पष्ट नसलं तरी कोणत्या परिस्थितीत शिवसेना आणि वंचित एकत्र येतील?
याबाबत बोलताना जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात की, "ही युती नक्की महाविकास आघाडीसोबत आहे की, स्वतंत्र शिवसेनेसोबत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण जर ही युती महाविकास आघाडीसोबत झाली तर जागावाटपात खूप अडचणी येतील.
पण ही युती सगळ्या ठिकाणी होईल असं वाटत नाही. जर विदर्भाचं उदाहरण घ्यायचं झालं तर कॉंग्रेस विरूद्ध वंचित अशी लढत होते. मग तिथे वंचितला जागा दिल्या जाणार का?
मुंबईत कॉंग्रेस महाविकास आघाडीत लढली किंवा स्वतंत्र लढली तर वंचितकडून कॉंग्रेस विरूद्ध उमेदवार दिले जाणार का? अश्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार ही युती होईल असं वाटतं. "

फोटो स्रोत, Getty Images
वंचित बहुजन आघाडीची कामगिरी कशी राहीली आहे?
2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कामगिरी चांगली राहीली होती. प्रकाश आंबेडकरांच्या सभांना लाखोंच्या संख्येने गर्दी होत होती.
त्यावेळी फक्त सभांना गर्दी नाही तर त्याचं परिवर्तन मतांमध्ये झालेलं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं होतं. सांगली, सोलापूर, परभणी गडचिरोली - चिमूर, बुलढाणा, हातकणंगले या लोकसभेच्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडीला लाखाहूनही अधिक मतं मिळाली होती.
वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत निवडून आला नसला तरी एकूण मतदानाच्या 4.57 टक्के मतदान हे वंचित बहुजन आघाडीला झाले होते. जवळपास 50 लाखांपेक्षा अधिक मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती. त्याचा फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी तिसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर दिसली. मुंबईतले काही महत्त्वाच्या मतदारसंघांवर नजर टाकली तर वंचित बहुजन आघाडीला खूप मतं मिळाली नसली तरी मनसेच्या बरोबरीने किंवा काही ठिकाणी मनसेपेक्षा अधिक मतं वंचित बहुजन आघाडीला मिळालेली दिसतात.

फोटो स्रोत, facebook
2019 विधानसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी
मुंबादेवी
कॉंग्रेस - 54.87% शिवसेना - 32.85% एमआयएम - 5.93% वंचित - 1.18%
वरळी
शिवसेना - 69.14% राष्ट्रवादी - 16.91% वंचित - 5.9%
सायन कोळीवाडा
भाजप - 42.24% कॉंग्रेस - 31.49 मनसे - 10.54 वंचित - 8.9%
वांद्रे पूर्व
कॉंग्रेस - 30.28% शिवसेना - 25.71% मनसे - 8.44% वंचित - 2.3%
चेंबूर
शिवसेना - 40.15% कॉंग्रेस - 25.2% वंचित - 17.47% मनसे - 10.86
गोरेगाव
भाजप - 53.34% कॉंग्रेस - 21.23% मनसे - 17.52% वंचित - 3.52%
मुंबईतल्या काही महत्वाच्या विधानसभा मतदारसंघात वंचितचा लोकसभेच्या निवडणुकी इतका करिश्मा दिसला नसला तरी वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा सक्रिय दिसला.

फोटो स्रोत, facebook
मुंबईत फायदा कोणाला?
मुंबईमध्ये कोणत्या आधारावर युती होणार यावरही बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. याआधी बाळासाहेब ठाकरे ह्यायात असताना शिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा देण्यात आला होता. पण त्याचा विशेष फायदा त्यावेळी झालेला दिसला नाही.
लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार मधु कांबळे याबाबत विश्लेषण करताना सांगतात, "जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास आठवले यांना सोबत घेतलं होत आणि शिवशक्ती भिमशक्तीचा नारा दिला होता, तेव्हाची शिवसेना ही वेगळी होती.
त्याकाळातील आक्रमक शिवसेनेला आंबेडकरी विचारांच्या मतदाराने फारसं स्विकारलेलं दिसलं नाही. त्या युतीने रामदास आठवले यांचा वयक्तीक राजकीय फायदा झाला. आता जर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचं चित्र पाहीलं तर ते पूर्णपणे बदलेलं आहे.
पक्षाचं राजकारण हे सर्वसमावेशकतेकडे झुकलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचंही वंचित घटकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आताच्या शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्रित येण्याचा दोन्ही पक्षांना फायद्याचं ठरेल असं वाटतं.
सध्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी त्यांना लहान लहान पक्षांची गरज आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या छोट्या छोट्या मतदार संख्येचा विचार करण्याची गरज त्यांना वाटते आहे. "
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती.
मुंबईतला उत्तर भारतीय मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण असल्याचं मत अनेक विश्लेषकांकडून व्यक्त केलं गेलं होतं.
उत्तर भारतीय मतांबरोबर दलित मतांची गरजही उद्धव ठाकरे यांना वाटते. दलित मताचं विभाजन टाळण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीशी युती केली जात आहे असं चित्र आहे.
जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आताची परिस्थिती त्यांना बेरजेचं गणित करावंच लागेल. मुंबईतल्या प्रत्येक घटकातील मतदारांना सोबत आणण्याचा प्रयत्न करावा लागेल.
वंचित बरोबरची युती ही निश्चितच दोन्ही पक्षांना फायदा देणारी ठरेल. पण ही युती सध्या मुंबईपुरती होईल असं वाटतय. कारण मुंबईबाहेरची गणितं वेगळी आहेत. राज्यभर युती होणं कठीण वाटतं. मुंबई महापालिकेत शिवसेना हा मोठा पक्ष आहे.
आताची परिस्थिती वेगळी असली तरी मुंबईच्या मतदाराने शिवसेनेला 25 वर्षांहूनही अधिक काळ सत्तेत ठेवलं. याचा फायदा वंचितला मुंबईत स्वतःच्या पक्षवाढीसाठी होईल. तर शिवसेनेला त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी आंबेडकरी मतदारांचा फायदा होईल. "
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








