डोनाल्ड ट्रम्प यांनी 'या' 12 देशांतील लोकांना अमेरिकेत येण्यास घातली बंदी

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव 12 देशांच्या नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी किंवा त्यांच्या प्रवेशावर मर्यादा घातली आहे. बुधवारी (5 मे) त्यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली.
या आदेशामुळे 12 देशांतील नागरिकांचा अमेरिकेत प्रवेश पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, रिपब्लिक ऑफ काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा या देशांमध्ये समावेश होतो.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर, इतर सात देशांच्या नागरिकांचा अमेरिका प्रवेश अंशतः मर्यादित करण्यात आला आहे. हे देश आहेत बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदेशीररीत्या अमेरिकेचे स्थायी रहिवासी, सध्या व्हिसाधारक आणि काही इतर श्रेणींना अपवाद मानले गेले असून त्यांना या प्रवास बंदीपासून सवलत दिली जाईल.
व्हाइट हाऊसनं काय म्हटलं?
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या एबिगेल जॅक्सन यांनी बीबीसीच्या अमेरिकन भागीदार सीबीएस या चॅनलला सांगितलं की, "आपल्या देशात येऊन आपलंच नुकसान करू इच्छिणाऱ्या विदेशी घटकांपासून अमेरिकेला सुरक्षित ठेवण्याच्या वचनावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे ठाम आहेत."
जॅक्सन म्हणाल्या, "हे निर्बंध अशा देशांवर लादण्यात आले आहेत, जिथे प्रवास करणाऱ्या लोकांची पार्श्वभूमी योग्यरीत्या तपासली जात नाही, जिथे व्हिसाच्या अटींचं उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होतं, किंवा जे ओळख आणि धोक्याशी संबंधित माहिती शेअर करण्यात अपयशी ठरतात."
"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे नेहमीच अमेरिकन जनतेच्या आणि त्यांच्या सुरक्षेच्या सर्वोत्तम हितासाठी काम करतील," असंही त्या म्हणाल्या.
यापूर्वीही ट्रम्प यांनी घेतलेत असे निर्णय
ट्रम्प यांनी लागू केलेला हा पहिला प्रवासबंदी आदेश नाही. आपल्या पहिल्या कार्यकाळात, त्यांनी 2017 मध्ये काही मुस्लीम देशांवर अशाच प्रकारची बंदी घातली होती.
त्या बंदीला विविध कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला. त्यात अनेक वेळा सुधारणा करण्यात आली. नंतर सर्वोच्च न्यायालयाने ती लागू करण्याची परवानगी दिली होती.
त्यावेळी, हजारो पर्यटक, प्रवासी, व्यावसायिक निमंत्रक आणि रहिवासी परवाना धारक जगभरातील विमानतळांवर अडकले होते. अनेकांना प्रवासादरम्यानच परतवण्यात आले किंवा अमेरिकेला जाणाऱ्या विमानात चढण्यास मनाई करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
नवीन प्रवासी निर्बंधांची घोषणा करताना ट्रम्प यांनी आपल्या व्हीडिओ संदेशात म्हटलं की, "एकामागून एक दहशतवादी हल्ले" होत आहेत, जे "धोकादायक ठिकाणांवरून आलेल्या विदेशी व्हिसाधारकांनी" केले आहेत.
त्यांनी अमेरिकेमधील "लाखो बेकायदेशीर स्थलांतरित" साठी बायडन यांची "ओपन डोअर पॉलिसी" जबाबदार असल्याचं सांगितलं.
ट्रम्प म्हणाले की, अमेरिका "अशा कोणत्याही देशाकडून मुक्त स्थलांतरास परवानगी देऊ शकत नाही, जिथून येणाऱ्या लोकांची सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने तपासणी व चौकशी करता येत नाही."
ट्रम्प म्हणाले की, या निर्बंधांचा कडकपणा त्या "धोक्याच्या गंभीरतेवर" अवलंबून आहे, जी संबंधित देशातून येते. त्यांनी असंही सांगितलं की, जर या देशांच्या परिस्थितीत सुधारणा झाली तर निर्बंधित देशांच्या यादीत बदल किंवा दुरूस्ती केली जाऊ शकते.
प्रवासी बंदीतून कोणाला सूट मिळणार?
ट्रम्प यांच्या व्यापक प्रवास निर्बंधामध्ये काही लोकांना सूट दिली गेली आहे. असे लोक अजूनही अमेरिकेत प्रवेश करू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
यामध्ये यांचा समावेश आहे-
- प्रमुख क्रीडा स्पर्धा, जसं वर्ल्ड कप किंवा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू
- असे व्हिसाधारक जे "इराणमध्ये जातीवादी अत्याचार (वांशिक छळ) सहन करत आहेत आणि इराणमधील धार्मिक अल्पसंख्याक आहेत"
- विशेष स्थलांतर व्हिसा (एसआयव्ही) असलेल्या अफगाण नागरिकांना
- अमेरिकेचे "कायदेशीर कायमस्वरूपी निवासी"
- दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्ती ज्यांचे दुसरे नागरिकत्व या प्रतिबंध यादीत समाविष्ट नाही.
- याव्यतिरिक्त, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अशा व्यक्तींना प्रवास बंदीतून सूट देऊ शकतात, जे अमेरिकेच्या "राष्ट्रीय हितांच्या सुरक्षिततेसाठी" महत्त्वाचे असतील.
'मुस्लीम प्रतिबंधाचा विस्तार'
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
वॉशिंग्टनमधील डेमोक्रॅटिक काँग्रेसच्या सदस्या प्रमिला जयपाल यांनी याबाबत सोशल मीडियावर लिहिलं आहे.
त्या म्हणाल्या की, "ही बंदी, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील मुस्लीम प्रतिबंधाचा विस्तार आहे. ही बंदी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडेल."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी म्हटलं, "एखाद्या संपूर्ण समुदायावर बंदी यासाठी की, फक्त त्यांच्या देशातील सरकारच्या रचनेशी किंवा कार्यपद्धतीशी तुम्ही असहमत आहात... हे म्हणजे दोष चुकीच्या जागी थोपवण्यासारखं आहे."
डेमोक्रॅटिक काँग्रेसचे सदस्य डॉन बेयर यांनी ट्रम्प यांच्यावर अमेरिकेच्या संस्थापकांच्या आदर्शांशी "विश्वासघात" केल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, "ट्रम्प यांची ही प्रवासी बंदी पूर्वग्रह आणि द्वेषाने भरलेली आहे आणि ती आपल्याला अधिक सुरक्षित बनवत नाही. ती केवळ आपल्यात फूट पाडते आणि आपल्या जागतिक नेतृत्व क्षमतेला कमकुवत करते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











