You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीतून दूध पाजत असाल तर हे नक्की वाचा
- Author, अंजलि दास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत खासदार लारिसा वॉटर्स यांनी आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला दूध पाजलं होतं. या बातमीला जगभर प्रसिद्धी मिळाली.
बऱ्याचं काळापासून आपण ऐकत आहोत की आईचं दूध बाळासाठी अमृततूल्य आहे. जन्मापासून सहा महिन्यापर्यंतच्या मुलांसाठी ते लिक्विड गोल्ड असल्याचं सांगितलं जातं.
ते स्वच्छ आणि सुरक्षित आहे. त्यात अँटीबॉडीज असतात जे बाळाला केवळ संसर्गापासूनच नाही तर अनेक सामान्य आजारांपासूनही संरक्षण देतं. हे डब्लूएचओ, युनिसेफ आणि भारत सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या गाइडलाइनमध्ये सांगण्यात आलं आहे.
असंही म्हटलं जातं की बाळाच्या जन्मानंतर लगेचच काही दिवसांपर्यंत बाळाला आईच्या दुधातून कोलोस्ट्रम हा एक विशेष प्रकारचा प्रोटीन युक्त घटक मिळतो, जो त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असतो. असं असूनही, काही माता या अनेक कारणांमुळं बाळाला स्तनपान देण्यात असमर्थ असतात.
मुलाला जन्म दिल्यानंतर, आई अशक्तपणातून सहज बरी होऊ शकत नाही. तिला पुरेशी झोप मिळत नाही. ज्यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे दुधाचा स्त्राव कमी होतो. एका अभ्यासानुसार, दर सात पैकी एका मातेला तणाव आणि अशक्तपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिच्यात दूध कमी प्रमाणात तयार होतं.
अशा परिस्थितीत, ती ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला दूध एका बाटलीत ठेवते आणि आपल्या मुलाला देते.
कारण काहीही असो, स्तनपान करणाऱ्या बालकांना फॉर्म्युला दूध देण्याचा ट्रेंड जगभरात वाढत आहे. पण प्रश्न हा आहे की नवजात बालकाच्या दुधासाठी वापरलं जाणारं पाणी पुरेसं गरम केलं जातं आहे का?
संशोधनात काय आढळलं?
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असा इशारा देण्यात आला आहे की फॉर्म्युला दूध तयार करणारी 85 टक्के यंत्रं ही हानिकारक बॅक्टेरीया मारण्यास सक्षम नाहीत.
या संशोधनात सहभागी झालेल्या एका आईला हे पाहून धक्का बसला आहे की, जी मशीन नवजात बालकांसाठी बनवण्यात आली होती ती कार्यक्षम नव्हती.
या संशोधनातून असंही दिसून आलं आहे की ज्या बालकांना फॉर्म्युला दूध पाजलं जात आहे त्यांना या दुधातील बॅक्टेरीयामुळं संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो.
स्वान्सी युनिव्हर्सिटीच्या या संशोधनात 69 पालकांनी पाणी गरम करण्यासाठी केटलचा वापर केला, त्यापैकी 22 टक्के पाणी पुरेसं गरम होऊ शकलं नाही.
यात सहभागी असलेल्या एक पालक जॉनी कूपर सांगतात की , "मी पहिल्यांदा माझ्या मशीनमधून पाण्याची चाचणी केली तेव्हा ते फक्त 52 अंश सेल्सिअस होतं. हे पाहून मला धक्काच बसला कारण मी हे गृहित धरलं होतं की हे मशीन मानक गाइडलाइनुसार तयार केलं आहे आणि ते बालकांसाठी डिझाइन केलं आहे."
शिशूंना संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसचं म्हणणं आहे की, झटपट फॉर्म्युला मिल्क बनवताना त्यात कोणतेही बॅक्टेरीया नाहीत याची खात्री करण्यासाठी पाणी कमीतकमी 70 अंशांपर्यंत गरम केलं पाहिजे, नंतर ते थंड करून वापरावं.
जॉनी कूपर या सांगतात की , "मी पालकांना सल्ला देतो की, त्यांनी आधी गरम पाण्याचं तापमान तपासून मगच मशीन खरेदी करावं."
भारतातील पारंपारिक पद्धत कोणती?
भारतातही फॉर्म्युला मिल्कचं प्रमाण वाढत आहे. त्याची अनेक उत्पादने अॅमेझोन आणि फ्लिपकार्ट या सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
डॉ. प्रार्थना या ओडिशातील महानदी कोलफिल्ड इथं बालरोगतज्ज्ञ आहेत. त्या सांगतात की, भारत सरकार असो की डब्ल्यूएचओ, प्रत्येकजण स्तनपानाला प्राधान्य देण्याचा सल्ला देतात.
त्या सांगतात की, "असं असूनही बालकांना फॉर्म्युला मिल्क देण्याच प्रमाण वाढत आहे, याची अनेक कारणं असू शकतात, जसं की जेव्हा आईच्या शरीरात सुरुवातीला दूध कमी येतं, तेव्हा ती बाळाला पाजण्यासाठी पर्याय म्हणून फॉर्म्युला मिल्क देते."
डॉ प्रार्थना सल्ला देतात की, "फॉर्म्युला दुधासाठी असो किंवा दुधाच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी पाणी जास्तीत जास्त तापमानापर्यंत उकळवा आणि ते थंड झाल्यावर वापरा. भारतीय घरांमध्ये ही पारंपारिक पद्धत वापरली जाते.
नवजात अर्भकाच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा, अन्यथा बाळाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो" असा सल्लाही त्या देतात."
फॉर्म्युला मिल्कसाठी पाण्याचं तापमान किती असावं?
स्वान्सी युनिव्हर्सिटीच्या संशोधनाचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. एमी ग्रँट म्हणतात, "फॉर्म्युला मिल्कसाठी पाण्याचं तापमान किमान 70 अंश सेंटीग्रेड असावं. जर कोणत्याही पालकांना तापमानाबद्दल शंका वाटत असेल, तर ते फूड थर्मामीटर विकत घेऊ शकतात."
डॉ. प्रार्थना सांगतात की, भारतात पालकांना वारंवार तापमान तपासणं शक्य नाही, त्यामुळं पाणी वापरण्यापूर्वी ते गॅसवर जास्तीत जास्त तापमानापर्यंत उकळवतात.
तरुलता या 11 महिन्यांच्या मुलाच्या आई आहेत. त्यांना एक मुलगी देखील आहे, जी 10 वर्षांची आहे आणि चौथीत शिकते.
त्या सांगातात की, "मी माझ्या दोन्ही बालकांना स्तनपान केलं आहे. स्तनपानामुळं आई आणि मुलामध्ये एक अतूट बंध निर्माण होतो असं माझ मत आहे.
11 महिन्यांपूर्वी माझ्या मुलाचा जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत माझ्यात स्तनपान करण्याची ताकद आहे, तर मग मी फॉर्म्युला मिल्क का वापरु. मी अजूनही माझ्या मुलाला स्तनपानातून दूध पाजत आहे. तो निरोगी आहे आणि तो आता मोठा होतं आहे."
बालकांसाठी स्तनपान किती फायदेशीर आहे?
पुद्दुचेरी येथील रहिवासी प्रतिभा अरुण म्हणतात, "जेव्हा माझी मुलगी एक वर्षांपेक्षा जास्त वयाची होती, तेव्हा कधी कधी मी तिला बाटलीत दूध द्यायचे.
मग त्या बाटलीशी संबंधित प्रत्येक गोष्ट जंतूमुक्त ठेवण्यासाठी मी विशेष काळजी घ्यायची. यासाठी मी उकळत्या पाण्याचा वापर करायचे."
तरुलता सांगतात, "स्तनपान बालकांसाठी तसंच आईसाठीही फायदेशीर आहे. मीही माझ्या आईचं दूध तीन वर्षांची होईपर्यंत प्यायलं आहे."
'डब्ल्यूएचओ'च्या म्हणण्यानुसार जर ब्रेस्ट मिल्क उपलब्ध नसेल तर फॉर्म्युला मिल्क हा पर्याय आहे. पण मुलाच्या वयानुसार ते अत्यंत काळजीपूर्वक निवडलं पाहिजे.
तसंच जर तुम्हाला स्तनपान करताना समस्या येत असतील तर दुसरा कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)