गाठ समजून केलं ऑपरेशन पण 10 महिन्यांच्या बाळाच्या पोटात सापडला गर्भ

    • Author, झुबैर आलम, अमन ख्वाजा
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

इशारा : बातमीतील काही भाग तुम्हाला विचलित करू शकतो.

डॉ. मुश्ताक अहमद यांनी दहा महिन्यांच्या शाजियावर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील पेशींचा वाढलेला गोळा (ट्यूमर) काढून टाकला. त्यांनी जेव्हा ही गाठ बाहेर काढली तेव्हा त्यांना त्यात विकृत पायांचा आकार दिसला. यापूर्वी त्यांनी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता त्यामुळे ते चकीत झाले.

डॉ. मुश्ताक सांगतात, "मागच्या अनेक महिन्यांपासून पोटात गाठ असल्यामुळे बाळाला वेदना होत होत्या. शस्त्रक्रिया केल्यानंतर बाळाच्या पोटात पायाची बोटे आणि पाठीचा कणा पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. एक मिनिटासाठी आम्हाला खरोखर काय पाहतोय ते समजलंच नाही."

ते म्हणाले, "एक बालरोग शल्यचिकित्सक म्हणून माझ्या 15 वर्षांच्या अनुभवात असा प्रकार कधीच पाहिला नाही."

शाजियाच्या गर्भाशयात जे भ्रूण होतं ते जुळं असल्याचं डॉ. मुश्ताक सांगतात. कदाचित आठ किंवा नऊ आठवड्यात गर्भाची वाढ थांबली असेल.

त्यांनी पुढे सांगितलं की, "या भ्रूणाचे पाय आणि हात तयार झाले होते. अगदी पायाची बोटंही तयार झाली होती, डोळेसुद्धा अर्धवट तयार झाले होते."

पाकिस्तानच्या पंजाबमधील रहीम यारखान येथील शेख झायेद टीचिंग हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली.

बाळाच्या पोटातील गर्भ

याला 'भ्रूणातील गर्भ' किंवा परजीवी गर्भ असेही म्हणतात.

हे असं का घडतं याविषयी काही स्पष्टपणे सांगता येत नाही. पण हे गर्भाच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. इथे एक भ्रूण दुसऱ्या भ्रूणाने झाकलेला असतो.

आतील गर्भाचा तिथे योग्य विकास होत नाही. आणि तो 'परजीवी' बनतो. म्हणजेच जगण्यासाठी हे भ्रूण मुख्य गर्भावर अवलंबून असते. अशी जुळी मुले सहसा जन्माला येताच मरतात.

2000 साली अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या अहवालात असं नमूद करण्यात आलं होतं की, प्रत्येक 5,00,000 जन्मांपैकी एक प्रकरण हे परजीवी गर्भाचं असतं.

शाजियाचं रडणं

जन्माच्या पहिल्या महिन्यापासून शाजियाचं पोट फुगलेलं दिसत होतं. तिचे आई वडील सांगतात की, तीव्र वेदनांमुळे ती सतत रडायची.

शाजियाचे वडील मोहम्मद आसिफ सांगतात, "तिच्या रडण्यामागचं नेमकं कारण काय होतं हे आम्हाला समजलं नाही. पण तिचं पोट कडक असल्याचं जाणवत होतं."

ते शेतात गुरं राखण्याचं काम करतात. त्यांना आणखी दोन मुलं आहेत. शाजियाला जेव्हा खूप त्रास सुरू झाला तेव्हा त्यांनी तिला सादिकाबादमधील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, योग्य वैद्यकीय सुविधा नसल्याने बाळाला नेमकं काय झालंय हे समजत नव्हतं.

शेवटी 25 ऑगस्ट रोजी शाजियाची प्रकृती खूपच खालावली. मग त्यांनी 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या रहीम यारखान येथील शेख झायेद टीचिंग हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांना डॉ. मुश्ताक भेटले.

डॉ. मुश्ताक सांगतात, "बाळाच्या शरीराची तपासणी केल्यानंतर पोटात गाठ असल्याचा संशय आला. आम्ही लगेच अल्ट्रासाऊंड तपासणी केली. तर पोटात गळूसारखा आकार दिसू लागला. आम्हाला वाटलं देखील नव्हतं की तिच्या पोटात गर्भ असेल."

कुटुंबाला एमआरआय स्कॅन करणं परवडणारं नव्हतं. त्या स्कॅनद्वारे पोटात नेमकं काय आहे हे चांगल्या प्रकारे जाणून घेता येतं. मुश्ताकने यांनी बाळाच्या आई-वडिलांना सांगितलं की ते शस्त्रक्रियेद्वारे पोटातील गाठ काढून टाकतील.

"हे ऐकताच पालक थोडे घाबरले. एवढ्या लहान बाळावर शस्त्रक्रिया कशासाठी करणार हे त्यांना समजत नव्हतं. त्यामुळे भावूकही झाले होते."

त्यामुळे शाजियाचे पालक सुरुवातीला या शस्त्रक्रियेसाठी तयार नव्हते. ते तिला घरी घेऊन गेले.

मात्र, काही दिवसांनी ते पुन्हा परत आले. त्यावेळी बाळाची तब्येत आणखीनच खालावली होती, आणि त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं.

डॉ. मुश्ताक सांगतात, "त्यांची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. एक दिवसाचं पोट भरणं त्यांच्यासाठी अवघड होतं त्यामुळे आम्ही शस्त्रक्रियेला मदत करण्याचा विचार केला."

29 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रियेच्या दिवशी शाजियाच्या पोटात जिवंत असलेला गर्भ पाहून धक्का बसला. हा गर्भ काढण्यासाठी खूप अवघड शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं डॉ. मुश्ताक यांच्या लक्षात आलं.

डॉ. मुश्ताक सांगतात, कुपोषित बाळाच्या पोटात विकृत गर्भ आढळून आल्याने आम्हाला धक्का बसला.

हा गर्भ एक परजीवी असतो. तो बाळाच्या पोटातील आतड्यांद्वारे रक्त आणि पोषक द्रव्ये शोषून घेतो. त्यामुळे शाजियाला पुरेसे पोषक तत्व मिळत नव्हते.

शस्त्रक्रियेनंतर शाजिया बरी होत असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ. मुश्ताक यांनी सांगितलं.

"आता बाळाचं रडणंही कमी झालं आहे. शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीतही सुधारणा झाली आहे" असंही त्यांनी सांगितलं.

शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलंय. तिच्या केसचा तपशील एका सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.

शाजिया गरोदर नव्हती

अत्यंत दुर्मिळ प्रकरण असल्याने, शाजियाबद्दल माध्यमांमध्ये खूप उत्सुकता आहे. मात्र, काही आक्षेपार्ह प्रश्नांची उत्तरे देता न आल्याने शाजियाच्या वडिलांनी त्यांचा फोनही बंद केला.

"वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स विचारत आहेत की हे बाळ गरोदर होतं का? आम्ही अशा प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही," असं शाजियाचे वडील म्हणाले.

यासंदर्भात स्थानिक पत्रकारांना स्पष्ट माहिती देण्यात आली असून शाजियाच्या पालकांचेही समुपदेशन करण्यात आल्याचे रुग्णालयाने सांगितले.

इस्लामाबादच्या पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) येथील बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. नदीम अख्तर म्हणाले की, 'गर्भातील भ्रूणाचा गर्भधारणेशी संबंध नाही' हे बातमीत स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे.

अनेक पत्रकारांना हे समजत नाही. त्यामुळे बाळाच्या पालकांना त्रास होत असल्याचं नदीम अख्तर यांनी सांगितलं.

ते पुढे सांगतात, "जर कधी एखादे भ्रूण लहान बाळाच्या गर्भाशयात राहिले तर ते सामान्य गर्भधारणा किंवा गाठीसारखे वाढत नाही. ते जिथे तयार होते तिथेच राहते म्हणजे ओटीपोटात,"

भारतातही असंच एक प्रकरण समोर आलं होतं

भारतातही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. एका 36 वर्षीय व्यक्तीचं पोट इतकं वाढलं होतं की त्याला श्वास घेणंही कठीण झालं होतं.

पोटात प्रचंड दुखत असल्याने पोटात गाठ वाढत असावी, असा डॉक्टरांचा अंदाज होता. मात्र चाचण्यांमध्ये त्याच्या पोटात जुळे गर्भ असल्याचे आढळून आले.

पोटातील तो गर्भ अनेक वर्ष परजीवीसारखा राहिला. तो गर्भ नाभीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचं रक्त शोषत होता.

ज्या गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा चांगल्या नसतात, तिथे काही लोकांच्या पोटात असे विकृत गर्भ असण्याची शक्यता असते, असं डॉक्टरांचे म्हणणं आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)