शिवसेनेचे वकील ते विधानसभा अध्यक्षपद, असा आहे राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राहुल नार्वेकर पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

नार्वेकर यांनी आज (8 डिसेंबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एकच अर्ज दाखल झाल्याने राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार हे जवळपास स्पष्ट आहे.

288 सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे मोठं संख्याबळ आहे. त्यामुळे या पदावर नार्वेकर यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारचा (9 डिसेंबर) दिवस निश्चित करण्यात आला आहे.

सोमवारी (9 डिसेंबर) विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाईल. त्याला अनुमोदन दिल्यानंतर आवाजी मतदान पार पडेल. यानंतर विधानसभा अध्यक्ष पदाची निवड होईल.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली होती.

ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली होती.

त्यावेळी सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. या निमित्ताने राहुल नार्वेकर कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे, याविषयी आपण माहिती घेऊ.

शिवसेनेचे वकील ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते

राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलं.

अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम राहुल नार्वेकर करत असत. पुढे राहुल नार्वेकर यांना शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही इंग्रजी टीव्ही चॅनलवर पाठवलं जाऊ लागलं.

राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, "राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते."

राहुल नार्वेकर यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून येत असत. त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत पराभूत

राहुल नार्वेकर यांनी 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं गेलं.

भाजपकडून विधानसभेत

पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

शिवाय भाजपकडून त्यांना माध्यम प्रभारी पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. अशा प्रकारे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपमध्ये ते स्थिरावले आहेत.

2024 च्या निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून नार्वेकर पुन्हा एकदा निवडून आले आहेत.

नार्वेकरांची 2022 साली विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते.

त्यामुळे एकाचवेळी सासरे आणि जावई दोघांचीही विधिमंडळाच्या सभागृहात सभापती-अध्यक्षपदावर असण्याचा दुर्मिळ योग पाहायला मिळाला होता.

दरम्यान, शनिवारी (7 डिसेंबर) शपथविधीच्या पहिल्याची दिवशी विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेवर निवड झालेल्या राज्यातील नवनिर्वाचित सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

मात्र, यावेळी मविआच्या आमदारांनी इव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप करत आमदारकीची शपथ घेण्यास नकार देत बहीष्कार टाकला होता. त्यामुळे केवळ सत्ताधारी आमदारांचा शपथविधी पार पडला होता.

उर्वरित आमदारांचा शपथविधी रविवारी झाला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.