You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला देण्याची तयारी दाखवलेली F-35 फायटर जेट कशी आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकताच अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेत अनेक गोष्टींवर सहकार्य करण्याबाबत द्विपक्षीय करार झाले.
भारत आणि अमेरिकेनं एकमेकांमधला लष्करी समन्वय वाढवण्याबाबतही यावेळी करार झाले आहेत.
भारतासोबतचे शस्त्रविक्रीचे करार आपण वाढवणार असून फायटर जेट्स F-35 साठीचा विक्री करारही अखेरीस केला जाऊ शकतो, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
ही F-35 फायटर जेट्स काय आहेत? त्यांची कामगिरी कशी आहे? अमेरिका ती भारताला का विकू पाहतेय? आणि भारतामध्ये या जेट्सच्या तोडीचं काही बनतंय का?
एफ 35 फायटर जेट्स
F- 35 फायटर जेट्स 'लॉकहीड मार्टिन' (Lockheed Martin) या अमेरिकन कंपनीने तयार केली आहे.
ही अत्याधुनिक विमानं जगातली सर्वात भेदक, कोणत्याही परिस्थितीत टिकू शकणारी आणि सर्वाधिक कनेक्टेड असणारी जगातली फायटर जेट्स असल्याचं कंपनीची वेबसाईट म्हणते.
याचे F-35 A, F-35 B आणि F-35 C असे व्हेरियंट्स आहेत.
या एका F-35 जेटची किंमत आहे सुमारे 100 मिलियन अमेरिकन डॉलर्स. (अंदाजे 869 कोटी रुपये) ही 'फिफ्थ जनरेशन फायटर जेट्स' आहेत. म्हणजे काय?
'फिफ्थ जनरेशन' म्हणजे आजवरच्या फायटर जेट्सपेक्षा अत्याधुनिक, आकाराने वेगळी, अचूक हल्ला करणारी, भेदक-वेगवान आणि आव्हानात्मक परिस्थितीतसुद्धा पायलटला टेक्नॉलॉजीच्या मदतीने फायदा मिळवून देणारी.
या फायटर जेट्सच्या 'स्टॅल्थ' म्हणजे गुप्तपणे काम करता येण्याच्या क्षमतेमुळे आणि सुपरसॉनिक वेगामुळे यांना फिफ्थ जनरेशन म्हटलं जातं.
म्हणजे यामध्ये अशी टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे की जेट्सच्या वेगामुळे रडारला हे विमान टिपणं, याच्या नेमक्या जागेचा अंदाज मांडणं अशक्य होतं आणि डिटेक्ट न होता या विमानांद्वारे हल्ला केला जाऊ शकतो.
'F-35 A 'चा सर्वोच्च वेग आहे ताशी 1931 किमी
एफ 35 हा जगातला सर्वांत खर्चिक मिलिटरी प्रोग्राम आहे आणि या एका विमानावर त्याच्या पूर्ण आयुष्यभरात - $1.58 ट्रिलियन म्हणजे 1,58,00,000 कोटी डॉलर्स खर्च करावे लागतील, असा अंदाज आहे.
2015 पासून ही F- 35 विमानं अमेरिकेच्या ताफ्यात आहेत आणि सुरुवातीपासूनच त्यांच्या खर्चामुळे या कार्यक्रमावर टीका करण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला अमेरिका, चीन आणि रशियाकडे अशी फिफ्थ जनरेशन फायटर जेट्स आहेत, तर 'नाटो' (NATO) देश, इस्रायल आणि जपान यांच्याकडे ही एफ 35 आहेत.
भारताने यापूर्वी रशियाकडून सुखोई आणि मिग तर फ्रान्सकडून राफेल ही विमानं घेतलेली होती. पण यापूर्वी भारताने अमेरिकेकडून विमानं घेतलेली नाहीत.
मग अमेरिकेकडून ही विमानं घ्यावी का, याबद्दलच्या निर्णयामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात?
रशियन सुखोई-57 चा पर्याय
चीनला शह देण्याच्या हेतूने एफ 35 विमान ट्रम्प यांनी देऊ केली असली तरीदेखील ती प्रचंड महाग आहेत. आणि त्यांच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या सुखोई 57 या रशियन विमानांचा पर्याय भारतासमोर आहे.
आणि याबाबतीतली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही विमानं तयार करणाऱ्या रॉस्तेक (Rostec) या रशियाच्या सरकारी कंपनीने या विमानांसाठीची टेक्नॉलॉजी भारताला ट्रान्सफर (Transfer of Technology) करत भारतामध्ये यांचं उत्पादन होऊ देण्याची देखील तयारी दाखवलेली होती.
त्यामुळे जर सुखोई 57 विमानांसाठी करार झालाच तर नाशिकच्या 'हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड'मध्ये या विमानांची निर्मिती होऊ शकते.
लष्करी साधनांसाठी भारत पूर्वी रशियावर अवलंबून होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये भारताने रशियावर अशाप्रकारे अवलंबून राहणं कमी केलंय.
एफ 35 विमानांचे अपघात
एफ 35 विमानांच्या बाबतीतली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या विमानांचे अनेकदा अपघात झाले आहेत आणि या विमानांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत.
ही विमानं वापरण्यासाठीचे खर्च मोठे आहेत आणि गेल्या काही काळामध्ये त्यांना सॉफ्टवेअर आणि टेक्निकल अडचणी आलेल्या आहेत.
सध्याच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इलॉन मस्क यांनीदेखील नोव्हेंबर 2024 मध्येच या एफ 35 जेट विमानांवरती जाहीर टीका केली होती.
अमेरिकेकडची काही आयुधं ही प्रचंड महाग असली तरी चांगली आहेत पण एफ 35 जेटस 'वर्स्ट मिलिटरी व्हॅल्यू फॉर मनी इन हिस्ट्री' असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
ड्रोन टेक्नॉलॉजी
ड्रोन्सच्या तंत्रज्ञानामुळे एकूण युद्धनीतीमध्येच मोठा बदल झालाय. यामध्ये माणसं असलेल्या फायटर जेट्सने हल्ला करण्यापेक्षा दुरून नियंत्रित करता येणाऱ्या ड्रोन्सनी हल्ला करणं सोपं झालंय.
शिवाय, अँटी एअरक्राफ्ट सिस्टिमलाही ही ड्रोन्स बगल देऊ शकतात आणि तिथेही विमानांपेक्षा सरस ठरतात. रशिया-युक्रेन युद्धामध्ये अशा प्रकारे ड्रोन्सचा हल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचं आढळून आलंय. आणि या ड्रोन्सच्या किमती फायटर जेट्सपेक्षा अर्थातच कमी आहेत.
भारताचं स्वतःचं अत्याधुनिक फायटर जेट
सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत स्वतः 'फिफ्थ जनरेशन फायटर जेट' विकसित करतोय. या प्रकल्पाचे नाव आहे AMCA म्हणजेच 'ॲडव्हान्स्ड मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट' असं आहे.
सुपरसॉनिक वेग असणारं, रडारही डिटेक्ट करू न शकणारं हे पहिलं AMCA फायटर जेट 2028 च्या अखेरपर्यंत आकाशात झेपावेल, असा अंदाज आहे.
बंगळुरूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'एरो इंडिया' (AERO India) शोमध्ये या विमानांची झलक दाखवण्यात आली.
या प्रकल्पाचं काम पूर्ण क्षमतेने सुरू करण्याला एप्रिल 2024 मध्ये मान्यता देण्यात आली आणि पुढची दहा वर्षे यावर काम करण्यात येणार आहे.
भारताने सध्या इंडियन एअर फोर्सला 42 स्क्वॉड्रनच्या क्षमतेची मंजुरी दिलेली आहे. एका फायटर स्क्वॉड्रनमध्ये असतात 18 विमानं.
भारताच्या ताफ्यात सध्या असे 30 स्क्वॉड्रन्स आहेत.
एफ 35 घ्यायची की नाही, याचा निर्णय भारताने अजून घेतलेला नाही. ही विमानं खरेदी केली, तर भारताचा समावेश थेट ट्रम्प यांच्या मर्जीतल्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या यादीत होण्याची शक्यता आहे.
पण, रशियासोबत यापूर्वी भारताने करार केले असल्याने अमेरिका आणि ट्रम्प त्याबद्दल काही अटी घालतात का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)