पंजाबचे माजी DGP आणि माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणानं घेतलं नवं वळण, कुटुंबावरच गुन्हा दाखल

फोटो स्रोत, Charanjeev Kaushal/BBC
पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) मोहम्मद मुस्तफा यांचा मुलगा अकील अख्तर हा 16 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या पंचकुला येथील घरी मृतावस्थेत आढळून आला होता.
हरियाणातील पंचकुला पोलिसांनी अकील अख्तरच्या मृत्यूप्रकरणात त्याच्या कुटुंबाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नव वळण लागलं आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा, अकीलची आई आणि पंजाबच्या माजी कॅबिनेट मंत्री रझिया सुल्ताना, तसेच अकील अख्तरची पत्नी आणि बहीण यांच्या नावांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
पंचकुलाच्या डीसीपी सृष्टी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर 2025 रोजी अकील अख्तर त्याच्या पंचकुला येथील घरी मृतावस्थेत आढळून आला.
कुटुंबीयांनीच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्यात आले.

प्राथमिक चौकशीत कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नाही. त्यामुळे शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे अंतिम संस्कारासाठी सोपविण्यात आला.
परंतु नंतर सोशल मीडियावर काही व्हीडिओ समोर आले, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की ते व्हीडिओ अकीलने स्वतःच्या मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केले होते.
त्या व्हीडिओंमध्ये अकीलने वैयक्तिक वाद आणि त्याच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.
कुटुंबीयांनी काय प्रतिक्रिया दिली?
पोलिसांनी अकीलच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली. मात्र, त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
बीबीसी पंजाबी प्रतिनिधी नवजोत कौर यांच्याशी बोलताना माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा म्हणाले, "पोलिसांना तक्रार मिळाली आणि त्यांनी त्यानुसार कारवाई केली, पण आम्ही या एफआयआरला कायदेशीररित्या उत्तर देऊ."
मुस्तफा म्हणाले की, त्यांचा मुलगा अनेक वर्षांपासून विविध व्यसनांच्या आहारी गेला होता आणि व्यसनमुक्तीच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला.
"आम्ही त्याला अनेकदा पुनर्वसन केंद्रात पाठवलं, पण त्याच्यात सुधारणा झाली नाही. 2021 ते 2023 तो बरा होता, पण 2024 मध्ये त्याची प्रकृती खूपच खालावली होती."
ते पुढे म्हणाले, "तो घरी त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. आम्ही पालक म्हणून तिचं रक्षण करायचो. अनेकदा आम्हीच त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली, पण काही तासानंतर आम्ही त्याला माफदेखील करायचो."

फोटो स्रोत, Razia Sultana/FB
सोशल मीडियावरील व्हायरल व्हीडिओंबाबत बोलताना मुस्तफा म्हणाले, "माझा मुलगा माझ्यावर आरोप करत असलेला तो व्हीडिओ 27 ऑगस्टचा आहे आणि तोच त्याचा खरा व्हीडिओ आहे.
"एक मुलगा त्याच्या आईवर आरोप कसा करू शकतो? त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती. ही गोष्ट फक्त कुटुंबालाच माहित होती. मात्र, आता त्या व्हीडिओच्या आधारे आमच्याविरुद्ध कट रचला जातोय."
मुस्तफा म्हणाले, "16 ऑक्टोबर 2025 रोजी त्याने व्यसनमुक्तीच्या गोळ्यांचं अतिसेवन केलं, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. माझी पत्नी, मुलगी आणि सून त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावत राहित्या. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने माझी मुलगी बाल्कनीतून आत गेली, पण तो बेशुद्धावस्थेत होता."
"आम्ही त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं."
या प्रकरणात कुटुंबानेच पोलिसांना अकीलच्या मृत्यूबद्दल माहिती दिली होती आणि शवविच्छेनानंतर अकीलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीबीसीचे प्रतिनिधी चरणजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकीलला 17 ऑक्टोबररोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील हनन हरदा खेडी या त्याच्या मूळगावात दफन करण्यात आलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणी, मलेरकोटला येथील रहिवासी शमशुद्दीन यांनी 17 ऑक्टोबर रोजी संशयास्पद परिस्थितीत तक्रार दाखल केली.
डीसीपी सृष्टि गुप्ता यांनी सांगितलं की, शमशुद्दीन मुस्तफा हे मुस्तफा कुटुंबीयांचे निकटवर्तीय आहेत.
सोशल मीडिया पोस्ट आणि शमसुद्दीन मुस्तफा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे 17 ऑक्टोबरलाच एफआयआर गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणाच्या निष्पक्ष, पारदर्शक आणि पुराव्यावर आधारित तपासासाठी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (SIT) तयार करण्यात आलं असल्याचं डीसीपी गुप्ता यांनी सांगितलं.
हे एसआयटी पथक या प्रकरणाच्या सर्व बाजूंची सखोल चौकशी करणार आहे.
"तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि खुल्या मनाने केला जाईल, जेणेकरून कोणताही दोषी सुटणार नाही आणि कोणत्याही निर्दोषावर अन्याय होणार नाही."
त्यांनी पुढे सांगितले, "या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे आणि पारदर्शकतेने करण्यावर आमचा भर आहे. जेणेकरुन कोणताही आरोपी यातून सुटणार नाही आमि कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही.
डीजीपी मोहम्मद मुस्तफा आणि रझिया सुल्ताना कोण आहेत?
दिवंगत अकील अख्तरचे वडील मोहम्मद मुस्तफा हे पंजाबचे माजी डीजीपी आहेत. निवृत्तीनंतर ते काँग्रेस पक्षाच्या जवळचे मानले जातात.

फोटो स्रोत, Former DGP Mohammad Mustafa/X
अकीलची आई रझिया सुल्ताना या 2017 ते 2022 या काळात पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या.
त्या मलेरकोटला मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या आणि पंजाब विधानसभेतील एकमेव मुस्लिम महिला सदस्य राहिल्या.
त्या काँग्रेस सरकारच्या काळात सामाजिक सुरक्षा आणि कुटुंब कल्याणसारख्या खात्यांच्या मंत्री म्हणूनही कार्यरत होत्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











