लाडकी बहीण योजनेची रक्कम कधी वाढणार? बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात आदिती तटकरे काय म्हणाल्या?

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
निवडणूक होण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये होणार अशी घोषणा महायुतीने केली होती. प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांहून 2100 रुपये होईल अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. पण 100 दिवस उलटूनही नेमकी ही रक्कम कधी वाढणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील उत्तरं बीबीसी मराठीच्या मंचावर दिली.
महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राष्ट्र-महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी येऊन आपली भूमिका मांडली.
या कार्यक्रमातच महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले की, ही योजना दीर्घकाळासाठी सुरू ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
1500 रुपये की 2100 रुपये या वादापेक्षा ही योजना दीर्घकाळ यशस्वीपणे राबवता येणे महत्त्वाचे असल्याचे आदिती तटकरेंनी म्हटले.
ही योजना दोन पाच महिन्यांसाठी नाही तर अनेक वर्षं चालेल हे महत्त्वाचे आहे. राज्यात अडीच कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत, तेव्हा या महिलांना कसा याचा जास्तीत जास्त लाभ होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद पडेल असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर ही योजना म्हणजे कॅश फॉर व्होट आहे असा देखील आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.
निवडणुकीनंतर सत्तास्थापना झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आणि निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यावरुन देखील सरकारवर टीका झाली.

फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता का असा देखील एक आरोप महायुती सरकारवर होत आहे.
यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे असं आदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "की सुरुवातीपासूनच या योजनेबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत."
आदिती तटकरे म्हणाल्या, "ही योजना बंद पडेल असे एक वातावरण तयार करण्यात आले. पण शासनाचा जो निर्णय आहे त्यात कोणताही निकष नंतर वाढवण्यात आलेला नाही. जेव्हा ही योजना सुरू केली होती."
"त्यावेळी जे निकष होते तेच आता देखील आहेत. तसेच जुलै महिन्यापासूनच अर्जांची पडताळणी सुरू झाली त्यामुळे निवडणुकीनंतर निकष बदलण्यात आले असा आरोप चुकीचा आहे," असं आदिती तटकरेंनी स्पष्ट केले.
'केवळ गैरफायदा घेणाऱ्यांचे नाव वगळले'
लाडकी बहीण योजना ही देशात किंवा राज्यात सुरू झालेल्या योजनेच्या तुलनेत नवीनच आहे. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा पंतप्रधान मदत निधी योजना असेल तेव्हा हा सर्वंकष विचार करण्यात आला.
त्याचप्रमाणे कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वंकष विचार करणे महत्त्वाचे तर असतेच त्याचबरोबर, ती योजना राबवताना जी आव्हाने आली त्यांना आपण कसं सामोरं जातो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, असं तटकरे म्हणाल्या.

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
आज विरोधक म्हणत आहेत की, हे 'कॅश फॉर व्होट' आहे पण त्यांनी देखील 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिलेच होते याची आठवण तटकरेंनी करुन दिली.
ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला किंवा एका लाभार्थ्याने दहा-दहा जणींचे नाव टाकले आहे, त्यांची नावे वगळली असल्याचे तटकरेंनी स्पष्ट केले.
केवळ महिलांना पैसे देणे हा उद्देश नाही, तर भविष्यात यातून त्या आर्थिकदृष्ट्या कशा सक्षम होतील यावर भर देणे महत्त्वाचे आहे असे आदिती तटकरे म्हणाल्या.


'योजनेते 1500 काही जणांसाठी दीड लाखांसारखे'
उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील बीबीसी मराठीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेबद्दल आपले विचार मांडले.
उदय सामंत म्हणाले, "लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. आम्ही सुरुवातीला देखील असे स्पष्ट केले होते की जे लोक पंचतारांकित हॉटेल्समध्ये ज्या भगिनी 1500 रुपयांची टिप देतात त्यांच्यासाठी ही योजना नाहीये."

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
"काही महिलांसाठी 1500 ही रक्कम 15 लाख रुपयांसारखी आहे. मी जेव्हा विविध लोकांना भेटतो तेव्हा महिलांनी ही योजना त्यांच्यासाठी कशी जीवनदायी ठरली हे सांगितले आहे," असं उदय सामंत म्हणाले.
सामंत यांनी उदाहरण सांगितले की "मला एक महिला भेटली. त्या महिलेनी सांगितले की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या वडिलांचा जीव वाचला. त्या म्हणाल्या की त्यांच्या वडिलांना हार्ट अॅटॅक आला होता. आणि त्याच दिवशी लाडकी बहीणचा दोन महिन्यांचा हप्ता आला होता. त्या पैशांमुळे त्यांना रुग्णवाहिका भाड्याने घेता आली आणि त्या महिलेच्या वडिलांचा जीव वाचला."
उदय सामंत यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनामुळे पायाभूत सुविधांसाठी असणाऱ्या निधीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











