विराट कोहली : 20 लाख रुपयांपासून सुरू झालेल्या प्रवासाची 18 वर्षे दीर्घ प्रतीक्षा

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट कोहली आरसीबीसोबत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट कोहली आरसीबीसोबत आहे.
    • Author, प्रवीण
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वाट पाहणं...

तब्बल 18 वर्षे वाट पाहणं...

सोपी गोष्ट नाही!

एका 'नंबर वन' खेळाडूचं चॅम्पियन होण्यासाठीचं वाट पाहणं...

2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात झाल्यापासून हे वाट पाहणं सुरुच होतं. अखेर 3 जून 2025 रोजी हे वाट पाहणं फळास आलं आहे.

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंह जेव्हा शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बाऊंड्री मारु शकला नाही; तेव्हाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय जवळपास निश्चित झालेला होता.

त्यानंतर विराटचे भरुन आलेले डोळेच बरंच काही सांगत होते. आजवर अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याची कहाणी त्याचे ते पाणावलेले डोळेच सांगू पाहत होते.

त्यानंतर, पडलेल्या प्रत्येक बॉलसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय पक्का होत गेला आणि विराट कोहलीची भावनिकता टिपेला पोहोचत गेली.

सरतेशेवटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला सहा धावांनी मात दिली आणि विराट कोहलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

कोहली मैदानावरच आपल्या गुडघ्यांवर बसला. आपला चेहरा हातांनी झाकून घेताना तो दिसला.

या विजयाने भावूक झालेल्या विराटने म्हटलं की, त्याने असा कधीच विचार केला नव्हता की त्याला हा दिवस देखील कधी पहायला मिळू शकेल.

RCB ने 2008 मध्ये लावली होता विराटवर बोली

आरसीबीने विराट कोहलीवर तेव्हा बोली लावली होती, जेव्हा त्याने टीम इंडियासाठी डेब्यूदेखील केलेला नव्हता.

आता पहिल्यांदाच आरसीबी चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने म्हटलं की, "हा विजय जितका त्याच्या संघाचा आहे, तितकाच तो त्याच्या संघाच्या चाहत्यांचाही आहे."

विराट कोहलीने म्हटलं की, "18 वर्षांची भलीमोठी प्रतीक्षा करावी लागली. मी माझे तारुण्य, माझं कौशल्य, माझा अनुभव दिला. मी माझं सगळं काही दिलं. मी असा कधीच विचार केला नव्हता की कधी हा दिवसही येईल. जेव्हा शेवटचा बॉल टाकण्यात आला, तत्क्षणी मी भावूक झालो."

विजयानंतर विराट कोहलीचे डोळे पाणावले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विजयानंतर विराट कोहलीचे डोळे पाणावले.

पुढे त्याने म्हटलं की, "काहीही झालं तरी मी या टीमला जोडूनच राहिलो. असेही काही क्षण आले होते, जेव्हा मी वेगळा विचार केला; मात्र, तरीही मी या टीमशी संलग्न राहिलो. माझं हृदय बंगळुरुसोबत आहे, माझी आत्मा बंगळुरु आणि या टीमसोबत आहे. आणि मी जोपर्यंत आयपीएल खेळेन, तोपर्यंत याच टीमसोबत राहीन."

विराट कोहलीने म्हटलं की, हा विजय त्याच्या करिअरमधल्या सर्वश्रेष्ठ क्षणांपैकी एक आहे.

"आज मी एका लहान मुलाप्रमाणे रडतो आहे. अनेक लोकांनी ऑक्शननंतर आमच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, जे आमच्याकडे होतं, त्यावर आम्ही खुश होतो. माझ्याबद्दल याआधीच बरंच काही बोलण्यात आलंय. हा विजय बंगळुरुसाठी आहे," असंही त्याने म्हटलं.

पहिल्या सीझनमध्ये विराटला मिळाले होते 20 लाख रुपये

विराट कोहली त्यावेळी पहिल्यांदा चर्चेत आला होता जेव्हा 2008 मध्ये त्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अंडर-19 वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरली होती.

मात्र, विराट कोहलीकडे इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याचा अद्याप अनुभव आलेला नव्हता. त्यामुळे, आरसीबीने त्याला पहिल्या सीझनमध्ये 20 लाख रुपयांना खरेदी केलं होतं.

2011 मध्ये विराट कोहली आरसीबीचा कर्णधार झाला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2011 मध्ये विराट कोहली आरसीबीचा कर्णधार झाला.

'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विराट कोहलीने पहिल्या सीझनच्या ऑक्शनचा उल्लेख केला होता.

त्याने म्हटलं होतं की, "जेव्हा लीलाव झाला होता तेव्हा आम्ही मलेशियामध्ये होतो. आम्हाला फर्स्ट क्लास क्रिकेटर्स म्हणून खरेदी करण्यात आलं होतं. आम्हाला 20 लाख रुपये मिळत होते. तेव्हा आमच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्यामागे वेगळ्याच भावना होत्या."

त्यानंतर विराट कोहलीने आयपीएल आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधीच मागे वळून पाहिलं नाही.

पहिल्या सीझनमध्ये विराट कोहलीला फारशा धावा करता आल्या नाहीत. त्याने 13 सामन्यांमध्ये फक्त 165 धावा केल्या होत्या.

मात्र, 2010 वर्ष येईपर्यंत त्याची कामगिरी सुधारत गेली आणि तो पहिल्यांदाच एका सीझनमध्ये 300 हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला.

2011 मध्ये झाला कॅप्टन

2011 साली विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं.

तेव्हा विराट कोहलीने आपल्या बॅटची जादू दाखवत 16 सामन्यांमध्ये 557 धावा केल्या आणि आरसीबी दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली.

मात्र, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीला ही ट्रॉफी जिंकण्यापासून रोखलं.

2016 मध्ये विराट कोहलीने 973 धावा केल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2016 मध्ये विराट कोहलीने 973 धावा केल्या होत्या.

इतक्या वर्षांच्या निराशेनंतर 2016 मध्ये विराट कोहली एक वेगळीच जिद्द घेऊन मैदानात उतरला. विराट कोहलीने एकाच सीझनमध्ये भलेभले रेकॉर्ड्स रचले.

त्या सीझनमध्ये विराट कोहलीने 16 सामन्यांमध्ये विक्रमी 973 धावा केल्या. त्याने चार शतकं आणि सात अर्धशतकं साकार केली. त्यानंतर आरसीबी तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली.

मात्र, फक्त आठ धावांच्या अंतराने सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फायनल्समध्ये मात दिली आणि विराट कोहलीचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरंच राहिलं.

जेव्हा स्वप्न झालं साकार...

सरणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत राहिल्या; मात्र, आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न एक स्वप्न म्हणूनच अर्धवट राहत गेलं.

इतकी वर्षे सलग चॅम्पियन होण्यास अयशस्वी ठरल्याच्या निराशेमुळे 2023 च्या सीझनच्या सुरुवातीलाच विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं कर्णधारपद सोडून दिलं.

सरणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत राहिल्या; मात्र, आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न एक स्वप्न म्हणूनच अर्धवट राहत गेलं होतं.

फोटो स्रोत, Facebook/Royal Challengers Bengaluru

फोटो कॅप्शन, सरणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत राहिल्या; मात्र, आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न एक स्वप्न म्हणूनच अर्धवट राहत गेलं होतं.

मात्र, त्याने आरसीबीला चॅम्पियन बनवण्यासाठी आपल्या बॅटमधून कमाल दाखवणं सुरुच ठेवलं.

2023 मध्ये विराट कोहलीच्या बॅटने 639 धावा केल्या आणि 2024 मध्ये तो 741 धावा करण्यात यशस्वी ठरला.

यादरम्यानच, विराट कोहली हा आयपीएलमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला.

या वर्षी देखील विराट कोहलीने आरसीबीला चॅम्पियन बनवण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं.

विराट कोहलीने 15 सामन्यांमध्ये 657 धावा केल्या आणि सरतेशेवटी 18 वर्षानंतर त्याने आपलं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण होताना पाहिलं. म्हणूनच, तो इतका भावूक झाल्याचं आपल्याला पहायला मिळालं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)