You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिमालयातल्या नदीमुळे वाढतेय एव्हरेस्टची उंची?
- Author, नवीन सिंह खडका
- Role, पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
जगातलं सर्वांत उंच पर्वत शिखर म्हणजे - माऊंट एव्हरेस्ट.
या एव्हरेस्टची उंची जितकी असायला हवी, त्यापेक्षा 15 ते 50 मीटर्स जास्त आहे आणि एका नदीमुळे हे घडत असल्याची शक्यता असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.
या नदीमुळे एव्हरेस्टच्या पायथ्याशी असणारे खडक आणि माती यांची धूप होतेय आणि या गोष्टी वरच्या बाजूला सरकत असल्याने एव्हरेस्टची उंची वाढत असल्याचा अंदाज आहे.
माऊंट एव्हरेस्ट किती उंच आहे?
माऊंट एव्हरेस्टची उंची आहे 8849 मीटर्स.
तिबेटियन भाषेमध्ये या पर्वताचं नाव - चोमोलुंग्मा (Chomolungma) ज्याचा अर्थ होतो - Goddess Mother of the World - म्हणजे जगाची देवी माता किंवा Goddess of the Valley - दऱ्याखोऱ्यांची देवी.
याच एव्हरेस्टला नेपाळने दिलेलं अधिकृत नाव - सागरमाथा (Sagarmatha). स्वर्गाला स्पर्श करणारं पृथ्वीचं टोक.
चीन आणि नेपाळमधल्या सीमेवर एव्हरेस्ट आहे आणि याची उत्तरेकडची बाजू चीनच्या दिशेला आहे.
अरुण नदीमुळे हिमालयातल्या शिखरांची उंची कशी वाढतेय?
अरुण नदी तिबेटमधून नेपाळमध्ये वाहत येते आणि नंतर इतर दोन नद्यांमध्ये मिसळून तिची कोसी नदी तयार होते. ही कोसी नदी उत्तरेतून भारतात शिरते आणि गंगेत विलीन होते.
या एव्हरेस्टपासून 75 किलोमीटरवर असणाऱ्या अरुण नदीच्या प्रवाहामुळे खडकांची झीज होत असल्याने जगातल्या सर्वोच्च शिखराची उंची दरवर्षी 2 मिलीमीटरने वाढत असल्याचं युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) च्या संशोधकांनी म्हटलंय.
या संशोधनाचे सहलेखक अॅडम स्मिथ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "हे म्हणजे बोटीवरून सामान बाहेर फेकण्यासारखं आहे. यामुळे बोट हलकी होते आणि किंचित वर तरंगू शकते. त्याचप्रमाणे, जेव्हा Crust म्हणजे वरचा भाग हलका होतो तो किंचित वर तरंगू शकतो."
4 ते 5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय आणि युरेशियन प्लेट्स म्हणजे भूपट्ट एकमेकांवर आदळल्याने हिमालयाची निर्मिती झाली.
या भूपट्टांची म्हणजे प्लेट्सची हालचाल ज्याप्रमाणे होते त्याला म्हटलं जातं - Plate Tectonics - भूपट्ट विवर्तनिकी. याच हालचालींमुळे हिमालयातल्या पर्वतांची उंची वाढतेय.
पण अरुण नदीच्या प्रवाहामुळे एव्हरेस्टची उंची वाढण्यात अधिक हातभार लागत असल्याचं UCLच्या टीमचं म्हणणं आहे.
हिमालयातून वाहताना ही अरुण नदी वाटेत येणाऱ्या नदीखोऱ्यातल्या गोष्टी - म्हणजे पृथ्वीचा Crust म्हणजे पृथ्वी कवच वा पृष्ठभाग कोरत पुढे जाते.
यामुळे पृथ्वीचा या कवचाखालचा थर - Mantle म्हणजेच प्रावरणावरील दाब काहीसा कमी होतो आणि परिणामी पातळ झालेलं कवच वरच्याबाजूला सरकतं.
याला म्हणतात Isostatic Rebound. म्हणजे वरच्या बाजूचं वजन कमी केल्यानंतर खालची जमीन वर येणं.
एव्हरेस्ट, ल्होत्से (Lhotse) आणि मकालू (Makalu) सह आजूबाजूच्या शिखरांबाबत असं घडत असल्याचं UCL चं संशोधन सांगतं.
संशोधनाचे सहलेखक डॉ. मॅथ्यू फॉक्स यांनी बीबीसीला सांगितलं, "माऊंट एव्हरेस्ट आणि त्याच्या बाजूच्या शिखरांची ज्या गतीने झीज होतेय त्यापेक्षा अधिक प्रमाणात आयसोस्टॅटिक रिबाऊंड ही शिखरं वर उचलत असल्याने, त्यांची उंची वाढतेय. या शिखरांची उंची दरवर्षी साधारण 2 मिलीमीटरने वाढत असल्याचं आम्ही GPS इन्स्ट्रुमेंट्स वापरून नोंदवलं आणि असं का होतंय हे देखील आता आम्हाला समजलं आहे."
या संशोधनात सहभागी नसलेल्या काही भूशास्त्रज्ञांच्या मते असं होण्याची शक्यता असली तरी या संशोधनातल्या अनेक गोष्टींबद्दल साशंकता आहे.
नदीच्या प्रवाहात इतका जोर कसा?
चीन आणि नेपाळमधल्या सीमेवर एव्हरेस्ट आहे आणि याची उत्तरेकडची बाजू चीनच्या दिशेला आहे. अरुण नदी तिबेटमधून नेपाळमध्ये वाहत येते आणि नंतर इतर दोन नद्यांमध्ये मिसळून तिची कोसी नदी तयार होते. ही कोसी नदी उत्तरेतून भारतात शिरते आणि गंगेत विलीन होते.
ही नदी पर्वतांमधून मोठ्या उंचीवरून वाहून येते आणि त्यामुळे प्रवाहाला वेग असतो. यामुळे मार्गात येणारे खडक आणि माती कापत यांचा भुगा करत हा प्रवाह खाली येतो. म्हणूनच अरुण नदी ही मोठ्या प्रमाणावर गाळ - Silt तयार करणारी नदी आहे.
पण UCL च्या संशोधकांच्या मते या अरुण नदीने 89,000 वर्षांपूर्वी तिबेटमधलीच दुसरी एक नदी किंवा जलप्रवाह बळकावला आणि त्यातून या नदीला इतका जोर आला असावा.
89,000 वर्षांचा हा कालावधी मानवी इतिहासासाठी फार जुना वाटत असला तर Geological Timescale म्हणजे भूविज्ञानाच्या दृष्टीने मात्र नुकतीच घडलेली घटना आहे.
चीनमधल्या भूविज्ञान विद्यापीठाचे संशोधक डॉ. शू हान हे स्कॉलरशिपसाठी UCL ला आलेले असताना त्यांनी हा अभ्यास केला.
ते म्हणतात, "पृथ्वीचा पृष्ठभाग किती गतिमान आहे हे माऊंट एव्हरेस्टच्या बदलत्या उंचीवरून दिसून येतं. अरुण नदीमुळे होणारी झीज, पृथ्वीच्या प्रावरणाकडून वर ढकलणारं बल यामुळे माऊंट एव्हरेस्ट वर सरकतोय. आणि त्याची उंची असायला हवी त्यापेक्षा अधिक होतेय."
युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबराच्या स्कूल ऑफ जिओसायन्सेसचे प्राध्यापक ह्यू सिनक्लेअर या संशोधनात सहभागी नव्हते. पण UCL च्या टीमने मांडलेले सिद्धांत आणि प्रक्रिया तार्किकदृष्ट्या योग्य असल्याचं ते म्हणतात.
पण नदी खालच्या बाजूला वाहताना कशाप्रकारे खडक कापत जाते वा पात्र किती विस्तारतं याचं अचूक प्रमाण आणि कालावधी आणि त्याचा परिणाम म्हणून त्या परिसरातली शिखरं किती वर उचलली जातात याचं प्रमाण, यामध्ये अनिश्चितता असल्याचं ते सांगतात.
UCLच्या संशोधकांनी देखील हे त्यांच्या संशोधनात म्हटलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)