'भारतीयांना व्हिसा नियमांमध्ये कोणतीही सूट मिळणार नाही', ब्रिटिश पंतप्रधानांचं वक्तव्य, रशियाच्या कच्च्या तेल आयातीवरही भाष्य

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ॲलेक्स फॉरसिथ
- Role, राजकीय प्रतिनिधी
युके भारतासाठी व्हिसाचे नियम शिथिल करणार नाही, असं वक्तव्यं युकेचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी भारतात येण्यााआधी केलं आहे. ते भारत दौऱ्यावर असून अलीकडेच झालेल्या व्यापार कराराचं महत्त्व आणि फायदे सांगण्यासाठी आले आहेत.
पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्याबरोबर 100 हून जणांचं शिष्टमंडळ आहे. त्यात उद्योजक, सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वं आणि विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. युकेमधील गुंतवणूक वाढवण्याचा आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सर किएर स्टार्मर म्हणाले की, भारताबरोबरचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी 'प्रचंड संधी' आहेत.
मात्र ते असंही म्हणाले की, भारतीय कामगार किंवा विद्यार्थ्यांसाठी व्हिसाचे आणखी मार्ग खुले करण्याची कोणतीही योजना नाही.
भारतात बोलताना किएर स्टार्मर म्हणाले की त्यांच्या भेटीदरम्यान त्यांना भेटलेल्या कोणत्याही उद्योजकानं "व्हिसाचा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केला नाही."
युके आणि भारतातील व्यापार करार
उलट भारतातील दौरा म्हणजे अनेक वर्षांच्या वाटाघाटींनंतर जुलै महिन्यात युके आणि भारतामध्ये झालेल्या व्यापारी कराराचा भारतीय उद्योग-व्यवसायांना 'फायदा घेण्यासाठी' 'संधी उपलब्ध करून देण्यासाठी' आहे.
त्याचा अर्थ, युके आणि भारतामधील अब्जावधी पौडांच्या व्यापार वाढीचा भाग म्हणून युकेच्या कार आणि व्हिस्कीची भारतात निर्यात करणं स्वस्त होईल आणि भारतीय कापड आणि दागिन्यांची युकेत निर्यात करणं स्वस्त होईल. म्हणजेच दोन्ही देशांना या व्यापारी कराराचा फायदा होईल.
या व्यापारी करारामध्ये, युकेमध्ये अल्पकालीन व्हिसावर काम करत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेवरील खर्चात तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
मात्र मंत्र्यांनी आग्रहानं सांगितलं की इमिग्रेशन धोरणात कोणतेही मोठे बदल नाहीत.
स्थलांतरित, व्हिसासंदर्भात कठोर धोरण
लेबर पक्षाचं सरकार युकेतील स्थलांतराचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करतं आहे. गेल्या आठवड्यात सरकारनं लेबर पक्षाच्या परिषदेमध्ये सेटलमेंट स्टेटसबाबत (स्थलांतरितांचं युकेतील वास्तव्य) कठोर धोरण जाहीर केलं.
युकेतून मुंबईला येत असताना विमानात पत्रकारांशी बोलताना सर किएर स्टार्मर म्हणाले की भारताबरोबर झालेल्या व्यापार करारात व्हिसाशी संबंधित गोष्टीचा 'कोणतीही अंतर्भाव नव्हता' आणि त्यासंदर्भातील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील एच-1बी व्हिसामध्ये बदल केल्याच्या पार्श्वभूमीवर युके तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांना आकर्षित करण्याचा विचार करू शकतं का असा प्रश्न सर किएर स्टार्मर यांना विचारण्यात आला.
त्यावर सर किएर म्हणाले की युकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी युकेला जगभरातून 'आघाडीची प्रतिभा' आकर्षित करायची आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी वारंवार सांगितलं की भारतासाठी व्हिसाचे नवीन मार्ग किंवा पर्याय आणण्याची कोणतीही योजना नाही.
"व्यापाराच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी भारतात आलेलं हे आतापर्यंतचं आमचं सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे," असं किएर स्टार्मर यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितलं. सध्या युके आणि भारतामधील संबंध 'सार्वकालिक घनिष्ठ स्तरावर' आहेत.
बॉलीवूडसाठी दरवाजे खुले, यश राज फिल्म्स करणार युकेमध्ये चित्रीकरण
सर किएर स्टार्मर यांनी या भेटीत बॉलीवूडसंदर्भातील देखील घोषणा केली. 2026 पासून यश राज फिल्म्स युकेमध्ये तीन बॉलीवूड चित्रपटांची निर्मिती करेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे युकेमधील बॉलीवूड चित्रपटांच्या चित्रीकरणाला पडलेला 8 वर्षांचा खंड संपुष्टात येईल.
डाऊनिंग स्ट्रीटनं (युकेच्या पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान) याचा संबंध युके-भारत व्यापार कराराशी जोडला. त्यांनी सांगितलं की यामुळे 3,000 नोकऱ्या निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेत लाखो पौंड येतील.

फोटो स्रोत, Getty Images
यश राज फिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अक्षय विधानी म्हणाले की 'आमच्या ह्रदयात युकेला विशेष स्थान आहे'. त्यांची चित्रपट निर्मिती कंपनी युकेत पुन्हा चित्रीकरण करणार आहे याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केलं.
"युकेमधील पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि प्रतिभा अतुलनीय आहे. युकेनं सर्जनशीलतेनं उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आम्हाला नेहमीच बळ दिलं आहे. त्यामुळे युकेबरोबरचे आमचे सांस्कृतिक संबंध दृढ करताना आम्हाला आनंद होतो आहे," असं विधानी म्हणाले.
पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्याबरोबर जे उद्योग समूह, कंपन्या आल्या आहेत, त्यात ब्रिटिश एअरवेजदेखील आहे. कंपनीनं पुढील वर्षी दिल्ली ते हीथ्रोदरम्यान दिवसातील तिसरं उड्डाण सुरू करणार असल्याचं जाहीर केलं.
मँचेस्टर विमानतळानं दिल्लीला जाण्यासाठीचा एक थेट नवीन मार्गदेखील जाहीर केला.
रशिया-भारत संबंधाबाबत स्टार्मर यांची भूमिका
पंतप्रधान किएर स्टार्मर त्यांच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची अपेक्षा आहे. किएर स्टार्मर यांच्या भेटीच्या आधीच पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' दिल्या आहेत.
सर किएर म्हणाले की ते मोदींप्रमाणे शुभेच्छा देणार नाहीत. ते पत्रकारांना म्हणाले, "मी पुतिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत आणि मी तसं करणारही नाही. ते आश्चर्यजनक आहे, असं मला वाटत नाही."
किएर स्टार्मर यांना जेव्हा विचारण्यात आलं की भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करतो आहे, याबद्दल ते मोदींवर टीका करणार का? त्यावर सर किएर म्हणाले की युकेचं लक्ष रशियाच्या कच्च्या तेलाच्या छुप्या तेलवाहू जहाजांच्या ताफ्यावर (शॅडो ऑईल टँकर फ्लीट) आहे.
छुपी तेलवाहू जहाजं म्हणजे ज्यांच्या मालकीबद्दल पुरेशी स्पष्टता नसते आणि त्यांनी योग्य पाश्चात्य विमा किंवा सुरक्षा प्रमाणपत्राचं संरक्षण घेतलेलं नसतं. ही अनियंत्रित स्वरुपाची जहाजं असतात.
पंतप्रधान किएर स्टार्मर म्हणाले की, छुप्या किंवा अनियंत्रित जहाजांशी संबंध येणाऱ्या आघाडीच्या देशांपैकी युके हा एक देश आहे. रशियातून कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या या अनियंत्रित तेलवाहू जहाजांना छुपी जहाजं किंवा 'शॅडो फ्लीट' असं म्हटलं जातं.
सर किएर स्टार्मर यांनी या दौऱ्यादरम्यान असंही सुचवलं की ते जगतार सिंग जोहलच्या प्रकरणाचा मुद्दाही उपस्थित करतील. जगतार सिंग हा एक ब्रिटिश शीख व्यक्ती असून त्याला दोषी ठरवण्यात आलेलं नसतानाही तो सात वर्षांपासून भारतातील तुरुंगात आहे.
त्यांची 9 ऑक्टोबरला मोदींशी भेट होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाबद्दल विचारलं असता, सर किएर म्हणाले की "अर्थातच, आम्ही दुतावासाशी संबंधित प्रकरणं प्रत्येक पातळीवर नेहमीच उपस्थित करतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











