टीम इंडियानं जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, न्यूझीलंडवर चार विकेट्स राखून मात

रोहित शर्माच्या टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.

न्यूझीलंडला 4 विकेट्स राखून हरवत भारतानं या स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं. विजयासाठी 252 धावांचं लक्ष्य भारतानं 49 षटकात पार केलं.

भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरीच वेळ ठरली आहे. याआधी 2013 साली भारतानं ही स्पर्धा जिंकली होती. तर 2002 मध्ये भारत आणि श्रीलंकेला विजेतेपद विभागून देण्यात आलं होतं.

दुबईत झालेल्या या फायलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला भारतानं 50 षटकात 251 धावांवर थोपवलं. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 252 धावांचं माफक लक्ष्य होतं.

खरंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं टीम इंडियाला भक्कम सुरुवात करून दिली होती. मात्र पाठोपाठ विकेट्स पडल्यानं भारतीय टीमवर थोडा दबाव निर्माण झाला. भारताचा धावांचा ओघही त्यामुळे थोडा मंदावला.

पण श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि तळाच्या फलंदाजांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

भारतीय फलंदाजांची कामगिरी

भारतीय डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये दिसत होता. रोहितनं शुभमन गिलसह सलामीला 105 धावांची भागीदारी रचली.

एकोणिसाव्या षटकात ग्लेन फिलिप्सनं मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर अफलातून झेल टिपला. शुभमन 31 धावांवर बाद झाला.

तर पुढच्याच षटकात ब्रेसवेलनं विराटला पायचीत केलं. विराटला केवळ एकच धाव घेता आली.

मग रोहित आणि श्रेयस अय्यर हे दोन मुंबईकर मोठी भागीदारी रचतील अशी आशा होती.

पण 27 व्या षटकात न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमनं रोहितला यष्टीचीत केलं. रोहितनं सलामीला 76 धावांची खेळी केली.

श्रेयस अय्यरनं अक्षर पटेलच्या साथीनं 61 धावांची भागीदारी रचली आणि भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला.

39 व्या षटकात सँटनरच्या गोलंदाजीवर रचिन रविंद्रनं श्रेयसला झेलबाद केलं. मग ब्रेसवेलनं 42 व्या षटकात अक्षर पटेल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

टीम इंडियाची अवस्था त्यावेळी बिकट झाली होती. पण केएल राहुल आणि हार्दिक पंड्यानं 38 धावांची झंझावाती भागीदारी रचली आणि भारताला पुन्हा विजयाच्या जवळ नेलं.

हार्दिक पंड्या मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. पण राहुल आणि जाडेजानं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

न्यूझीलंडच्या विकेट्स अशा पडल्या

भारताकडून वरूण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन तर रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक विकेट काढली.

डॅरिल मिचेल आणि मायकल ब्रेसवेलच्या अर्धशतकी खेळींमुळे न्यूझीलंडला अडीचशे धावांचा पल्ला गाठता आला.

खरंतर न्यूझीलंडचा सलामीवर रचिन रविंद्र आणि विल यंग यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यात भारतीय खेळाडूंकडून दोन झेल सुटल्यानं रचिन रविंद्रला दोनदा जीवदान मिळाले.

पण वरुणनं गोलंदाजी करत विल यंगला बाद करत सलामीची जोडी फोडली. यंग 15 धावांवर असताना पायचित झाला.

मग 11 व्या ओव्हरमध्ये रोहितनं कुलदीपच्या हाती चेंडू दिला, तेव्हा कुलपदीपनं पहिल्याच चेंडूवर गुगली टाकत रचिनला बुचकाळ्यात टाकलं. रचिन बोल्ड झाला आणि न्यूझीलंडचे दोन्ही सेट सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले.

त्यानंतर कुलदीपनं त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्येही फिरकीचा जादू दाखवली. कुलदीपनं स्वतःच्याच चेंडूवर विल्यमसनचा झेल घेत, न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. रचिननं 37 तर विल्यमसननं 11 धावा केल्या.

रविंद्र जाडेजानं टॉम लेथमला पायचीत करून न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. लेथम 14 धावाच करू शकला.

त्यानंतर डॅरिल मिचेलनं ग्लेन फिलिप्ससह किवी टीमचा डाव सावरायचा प्रयत्न केला. पण वरुणनं ग्लेन फिलिप्सचा त्रिफळा उडवला आणि ही भागीदारी फोडली. फिलिप्स 34 धावांवर बाद झाला.

डॅरिल मिचेलनं झुंजार खेळी करत अर्धशतक ठोकलं. पण तो 63 धावांवर असताना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माकडे झेल देऊन माघारी परतला.

मिचेल सँटनर आठ धावांवर धावचीत झाला. मायकल ब्रेसवेलनं नाबाद 53 धावांची खेळी केली.

रोहितनं सलग बाराव्यांदा टॉस गमावला

भारताचा कर्णधार रोहित शर्मानं यानिमित्तानं सलग बाराव्यांदा टॉस हरला .

दुबईच्या मैदानात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनं नाणेफेक जिंकेल आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडच्या संघातून मॅट हेन्री दुखातीमुळं बाहेर पडला आणि त्याऐवजी नाथन स्मिथचा किवी टीममध्ये समावेश झाला आहे.

तर भारत सेमिफायनलमध्ये खेळलेल्या संघासहच मैदानात उतरला.

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधली भारताची कामगिरी

बांगलादेशवर 6 विकेट्स राखून मात.

पाकिस्तानला 6 विकेट्स राखून हरवलं.

न्यूझीलंडवर 44 धावांनी मात.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्स राखून हरवलं.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 विकेट्स राखून हरवलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.