न्यूझीलंडसोबतचा सामना भारतासाठी किती आव्हानात्मक ठरू शकतो? आकडे काय सांगतात?

"आजचा अनुभव अप्रतिम आहे. आज आम्हाला एका मजबूत संघानं आव्हान दिलं होतं. आता आम्ही दुबईला जाऊ. तिथं याआधीही आम्ही भारताचा सामना केला आहे."

लाहोरमधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रीकेचा पराभव केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर बोलत होता.

न्यूझीलंडचा 9 मार्चला दुबईत भारतासोबत अंतिम सामना होणार आहे. पण, याबद्दल बोलताना सँटनरवर थोडासाही दबाव दिसत नव्हता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा आतापर्यंत पराभव झाला नाही. पण, सर्व रेकॉर्ड पाहिले तर 9 मार्चला दुबईच्या मैदानावर होणारा न्यूझीलंड सोबतचा अंतिम सामना भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकतो.

याआधीही 25 वर्षांपूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अंतिम सामना झाला होता. 2000 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि भारत यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

त्या रोमांचक सामन्यात भारतानं दिलेल्या 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत न्यूझीलंडनं चार गडी राखून विजय मिळवला होता.

सामन्याच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत भारतीय संघानं चिकाटीनं लढत दिली, पण शेवटी 2 बॉल शिल्लक असताना न्यूझीलंडनं भारताला नमवलं.

पण, मर्यादित ओव्हरच्या टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडचं हे एकमेव विजेतेपद आहे. त्यावेळी भारतीय संघानं भलेही ही संधी गमावली असेल, पण, पुढे भारतीय संघानं मर्यादित ओव्हरची ही टूर्नामेंट पाच वेळा जिंकून दाखवली. यामध्ये भारतानं दोनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली आहे.

न्यूझीलंडला आतापर्यंत जेतेपद पटकावता आलं नसलं, तरी आयसीसी टूर्नामेंटमध्ये त्यांची कामगिरी चांगली आहे.

2007 पासून 2023 पर्यंत न्यूझीलंड संघानं प्रत्येकवेळी वनडे वर्ल्ड कपचा सेमीफायनल किंवा फायनलचा सामना खेळलाय.

आकड्यांच्या खेळात न्यूझीलंड भारतापेक्षा वरचढ

मर्यादित ओव्हर्सच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 16 वेळा झाला. यामध्ये 6 वेळा भारतीय संघाचा विजय झाला, तर 9 वेळा न्यूझीलंडचा विजय झाला.

दोन्ही संघामधील एक सामना अनिर्णित राहिला आहे.

9 मार्चला न्यूझीलंड संघ तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे. पण, भारताकडे अंतिम सामना खेळण्याचा जास्त अनुभव आहे.

भारतीय संघ 9 मार्चला पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये उतरणार आहे.

गेल्या सहा वर्षांत 2 वेळा भारत आणि न्यूझीलंडमध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलचा सामना झालाय.

2019 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धावांनी मात दिली होती, तर 2023 च्या वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारतानं 70 धावांनी विजय मिळवत जुना हिशोब चुकता केला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ एकाच गटात होते. यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना सर्वाधिक त्रास दिल्याचं दिसलं.

भारतीय संघाला 50 ओव्हरमध्ये 9 विकेट देत फक्त 249 रन्स काढता आले होते. इतकंच नाहीतर या सामन्यात श्रेयस अय्यरशिवाय कुठल्याही भारतीय फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आलं नव्हतं.

2019 मध्ये मॅट हेनरीने भारताला अंतिम सामन्यात जाण्यापासून रोखलं होतं. हाच हेनरी या सामन्यात भारतासाठी सर्वात मोठं आव्हान ठरला.

त्यानं पाच विकेट घेतल्या. मात्र, आपल्या स्पीनर्सच्या जोरावर भारतीय संघानं 44 धावांनी न्यूझीलंडचा पराभव केला.

न्यूझीलंडचं जोरदार कमबॅक

ग्रुप सामन्यात भारतानं केलेल्या पराभवाचा न्यूझीलंड संघावर फारसा परिणाम झाला नाही. न्यूझीलंड संघानं आधीच सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलच्या सामन्यात रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी शतकं केली.

यानंतर मिशेलने 37 बॉलमध्ये 49 धावांची नाबाद, तर फिलिप्सने 27 बॉलमध्ये 49 धावांची नाबाद खेळी खेळली. या दोघांनी न्यूझीलंडचा स्कोअर 50 ओव्हरमध्ये 362 पर्यंत नेण्यात महत्वाची भूमिका निभावली.

या सामन्यातील या चारही फलंदाजांनी ही फायनल भारतासाठी किती मोठं आव्हान असेल हे सिद्ध केलं.

लाहोरच्या मैदानावरही न्यूझीलंड स्पीनर्स अत्यंत प्रभावी ठरले. कर्णधार सँटनरने 10 ओव्हरमध्ये 43 धावा देत तीन बळी घेतले. याशिवाय फिलिप्सने दोन तर ब्रेसवेल आणि रचिन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पाकिस्तानच्या तुलनेत दुबईचं पीच स्पीनर्ससाठी फायद्याचं आहे.

त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांची लाहोरच्या मैदानावरील कामगिरी फायनल सामन्यात भारतीय संघासाठी आव्हानात्मक असल्याचं बोललं जातंय.

भारतीय संघाची ताकद

2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना झाला होता. यावेळी न्यूझीलंडने आठ विकेटनं भारताचा पराभव केला होता.

पण, आता दुबईत होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना करणं न्यूझीलंडसाठी आव्हान असणार आहे. चार अव्वल स्पीनर्समुळे भारतीय संघ आणखी मजबूत झालाय.

अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी चार सामन्यात पाच-पाच विकेट घेतले. तर भारताचे मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्तीने फक्त दोन सामन्यात सात विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीने चार सामन्यात 8 विकेट घेतल्या.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या दहा फलंदाजांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

विराट कोहलीने चार सामन्यात 217 धावा काढल्या आणि या टूर्नामेंटमध्ये विराट भारताचा सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा फलंदाज ठरलाय.

9 मार्चला भारत आणि न्यूझीलंड यांच्यापैकी कोणताही संघ विजयी होऊ शकतो. पण या आकडेवारीचा विचार केल्यास दोन्ही संघात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)