विदर्भ 7 वर्षांत तीनदा 'रणजी' विजेता, तरी तिथले खेळाडू भारतीय संघात का दिसत नाहीत?

    • Author, विनायक दळवी
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार

केरळला हरवून विदर्भानं यंदा पुन्हा एकदा रणजी करंडक उचलला. भारतीय क्रिकेटमधली ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्याची विदर्भाची गेल्या सात वर्षांतली ही तिसरी वेळ आहे. त्याशिवाय एकदा ते उपविजेते होते.

पण असं असूनही तिथल्या खेळाडूंनी भारतीय संघात स्थान का मिळताना दिसत नाही? असा प्रश्न पडतो.

या प्रश्नाचे उत्तर वरवर दिसते तेवढे सोपे नाही. या निमित्ताने दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.

भारतीय क्रिकेटवर मुंबई, दिल्ली, तमीळनाडू, बंगाल या संघांची पूर्वीप्रमाणे मक्तेदारी राहिलेली नाही आणि एरवी लहान समजल्या जाणाऱ्या विदर्भासारख्या संघांच्या प्रयत्नांना यश येत आहे.

विदर्भच नाही, तर अलीकडच्या काळात सौराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या संघांनी रणजी ट्रॉफी जिंकली. या संघांनी आपापले क्रिकेट कार्यक्रम पद्धतशीरपणे आखले आहेत आणि भारतात क्रिकेटचा खऱ्या अर्थाने प्रसार झाल्याचे हे लक्षण मानले जाते.

त्यामुळेच यंदा जम्मू-काश्मीरने गतविजेत्या मुंबई संघाला त्यांच्याच घरात जेव्हा चारीमुंड्या चीत केले तेव्हा मुंबईची दुर्बलता समजायची की जम्मू काश्मीरचा उंचावलेला क्रिकेट दर्जा? अशी चर्चा सुरू झाली.

या यशाचं कारण आजच्या कामगिरीइतकंच गेल्या अनेक वर्षांमधल्या प्रयत्नांत दडलं असल्याचं माजी कसोटीवीर आणि विदर्भाचे माजी प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत सांगतात.

विदर्भाची जादू

विदर्भाचं यश हा 'फ्लुक' नाही, केवळ नशिबाने ते जिंकलेले नाही. विदर्भाला देशातील मातब्बर संघही आता घाबरायला लागतील, अशी त्यांची कामगिरी आहे.

एकेकाळी रणजीवर मुंबईचीच मक्तेदारी दिसायची. पण गेल्या दोन दशकांत कर्नाटक, राजस्थान, विदर्भ, सौराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश असे संघही जिंकताना दिसले.

पण अलीकडच्या दहा वर्षांत, विदर्भ इतका बलाढ्य झाल्याचं दिसतंय, की बाकीच्या संघांना त्यांची भीती वाटावी.

कारण फक्त रणजीच नाही, तर इराणी करंडक आणि विजय हजारे ट्रॉफीतही विदर्भानं यश मिळवलं.

2024-25च्या रणजी मोसमात तर विदर्भाने दहापैकी नऊ सामने निर्विवाद जिंकले आणि या स्पर्धेवर संपूर्णपणे वर्चस्व गाजविले.

विदर्भाच्या यशाचे रहस्य

चंद्रकांत पंडित यांच्या मते, युवा खेळाडूंना प्रमोट करण्याचा फायदा विदर्भाला झाला आहे. पंडित यांच्या कार्यकाळातच विदर्भानं 2017-18 आणि 2018-19 असं दोनदा रणजी आणि एकदा इराणी करंडक जिंकला होता.

ते सांगतात, "सिनियर्स खेळाडू या यंगस्टर्सना बरोबर घेऊन पुढे जात असतात. म्हणजे संघांच्या भवितव्याचा पाया आपोआपच रचला जात असतो. विदर्भाच्या बाबतीत हेच घडलं आहे."

क्रिकेटमध्ये कोणताही कसोटी किंवा प्रथमश्रेणी सामना जिंकण्यासाठी संघात 20 विकेट्स काढू शकतील असे गोलंदाज असावे लागतात. ती क्षमता असणारे गोलंदाज विदर्भाकडे आहेत.

त्यांचा डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेनं या मोसमात 69 बळी घेतले आणि एकाच मोसमात सर्वाधिक विकेट्सचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला.

तर विदर्भाच्याच यश राठोडनं या मोसमात सर्वाधिक 960 धावा केल्या. 22 वर्षांचा हर्श आणि 24 वर्षांचा यश विदर्भाकडूनच खेळत आले आहेत आणि दोघांनी संघाच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलंय.

हर्ष दुबे, अक्षय वाखरे, दर्शन नलकांडे, यश ठाकूर हे वेगवान गोलंदाजीचे त्रिकूट; मुंबईला हरविण्यात महतत्त्वाची भूमिका बजावणारा पार्थ रेखडे, साडेसातशेवर धावा करणारा मालेवार - ही विदर्भाची तरूण फळी यंदा सातत्याने चमकत राहीली.

मोसमाआधीचं प्लॅनिंग, युवा खेळाडूंची कामगिरी आणि योग्य सपोर्ट स्टाफ या गोष्टी विदर्भाच्या पथ्यावर पडल्या. विदर्भाचे सध्याचे प्रशिक्षक उस्मान गनी त्यांच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचेही प्रशिक्षक होते.

खेळाडू व प्रशिक्षक यांच्यात सौहदार्याचे संबंध असले की काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे विदर्भ संघाची यंदाच्या रणजी विजेतेपदापर्यंतची वाटचाल आहे.

यासोबतच 'प्रोफेशनल्स'ची निवड त्यांनी सार्थ ठरविली. एखाद्या संघाची ताकद वाढवण्यासाठी दुसऱ्या संघातले खेळाडू घेतले जातात, त्यांना रणजी क्रिकेटच्या भाषेत प्रोफेशनल्स किंवा गेस्ट प्लेयर्स म्हटलं जातं. एका संघात साधारण 3 गेस्ट प्लेयर्स असू शकतात.

ध्रुव शोरी हा दिल्लीचा सलामीवीर आणि करुण नायर हा केरळचा अनुभवी खेळाडू विदर्भाकडून खेळले. करूण नायरने तर विदर्भ संघाचे सुकाणू व्यवस्थित सांभाळले होते.

गेस्ट प्लेयर्सच्या निवडीच्या बाबतीत विदर्भाचे निर्णय याआधीही योग्य ठरले. विदर्भने याआधीची दोन विजेतेपदं पटकावली, तेव्हा कर्नाटकचा गणेश सतिश आणि मुंबईचा वासिम जाफर यांना निवडले होते.

गणेश सतीश तर विदर्भाकडून दशकभर खेळला आणि प्रत्येक हंगामात त्यानं किमान 600 वर धावा केल्या. जाफरनं विदर्भाच्या क्रिकेटला बळकटी दिली.

याविषयी पंडित सांगतात, "माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत विदर्भाने जे यश मिळविले त्यामध्ये वासिम जाफरचा एक खेळाडू म्हणून मोठा वाटा होताच. पण एक सिनियर खेळाडू म्हणून मुंबईकडून खेळतानाचा त्याचा अनुभव कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उपयोगी पडत गेला."

आधीच्या विजयांमुळे जिंकण्याची इच्छा अधिकाधिक वाढताना दिसल्याचं पंडीत सांगतात.

"वरच्या पातळीवरील क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची सवय खेळाडूंना लागायला लागते. विजेत्या संघांचा प्रत्येक खेळाडू हा विजेतेपदाच्या पायऱ्यावर चढत असताना कुठेही न मिळणारे हे प्रशिक्षण घेत असतो. मोठा खेळाडू बनण्याची ही प्रक्रीया आहे."

पंडीत सांगतात की, भारतीय संघात येण्यासाठी आधी हा माईंडसेट असणे आवश्यक आहे. तो सहज मिळत नसतो तर सतत वरच्या लेव्हलवर यशस्वी होत गेल्यानंतरच मिळत असतो.

ते पुढे म्हणतात, "मुंबईचेच उदाहरण घ्या. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, अशोक मांकड यांच्यासारख्या खेळांनी जी उच्च परंपरा निर्माण केली त्या परंपरेला न्याय देण्यासाठी नंतरचे मुंबईचे तरुण खेळाडू खेळत गेले.

"विदर्भाच्या खेळाडूंचे देखील असे पुढे होईल. आपण मोठ्या पातळीवर जिंकू शकतो, यशस्वी होऊ शकतो ही मानसिकता वृद्धिंगत होईल. त्यानंतर आपोआपच निवड समितीला त्यांच्या नावाचा विचार करावा लागेल."

व्हीसीए प्रशासकांचं योगदान

गेली पंधरा वर्षे प्रशांत वैद्य विदर्भाच्या क्रिकेटची आखणी करत आहेत.

विदर्भ क्रिकेट असोसिएशन म्हणजे व्हीसीएचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी क्रिकेटविषयक टीमच्या निर्णयाची सारी सूत्रे वैद्य यांच्याकडे सोपवली होती.

एखाद-दुसरा अपवाद वगळता या प्रशांत वैद्य यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय परिपूर्ण आणि अचूक ठरल्याचं दिसलं.

विदर्भाच्या यशाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी प्रशांत वैद्य यांच्या पुढाकारानं 2009 साली स्थापन केलेली रेसिडेंशीयल क्रिकेट अ‍ॅकॅडमी.

त्यावेळी असा प्रयोग करणारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन भारतातील पहिली क्रिकेट संघटना होती.

ही रेसिडेंशियल अ‍ॅकॅडमी पुढे बंद झाली. पण त्या काळात त्यांनी गावोगाव जाऊन खेळाडू शोधून आणले, त्यांच्यातल्या 'रॉ टॅलन्ट'वर मेहनत घेतली.

त्यांच्यातली सुप्त गुणवत्ता हेरली. त्यातलीच 70 टक्के मुले आता विदर्भ संघात खेळताहेत. आज विजेतेपदानंतर त्याचाही आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याइतपत बळावला आहे.

विदर्भाचे खेळाडू भारतीय संघात का दिसत नाहीत?

अनुभवी करूण नायरने एवढा सातत्यानं खेळ केला आहे. पण भारतीय संघासाठी त्याचा विचार झाल्याचं दिसत नाही, यावर हरभजन सिंगनंही टीका केली होती.

त्यासंदर्भातच करूण नायरला संघांत घ्यायचे तर कुणाला वगळू? असे भारतीय संघव्यवस्थापनाचे विधान बुचकळ्यात टाकणारे आहे.

हर्ष दुबेसारखा भारतातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. त्याला संधी कधी मिळणार?

खरंतर विदर्भाची नवोदितांची ही फलटण तरुण आहेच परंतु मुंबई किंवा अन्य बलाढ्य संघांना नॉक आऊट करून पुढे आलेली आहे. त्यांच्यातला आत्मविश्वास सळसळत आहेच.

पारंपारिक बलाढ्य संघांना हरवून विजेते झालेल्या या संघांतल्या नवोदितांच्या गुणवत्तेला योग्य वेळी न्याय देण्याची जबाबदारी निवड समितीचीही आहे.

या संघातल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून निवड समिती आणि बीसीसीआयचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आज ना उद्या त्यांना भारतीय संघात स्थान द्यावेच लागणार आहे.

पण भारतीय संघातील अनेक खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर सध्या उभे आहेत आणि विदर्भाच्या तरुण रक्ताला वाव देण्याची हीच योग्य वेळ आहे.

बीसीसीआयला अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून निवड प्रक्रियेत आणखी पारदर्शकता दाखवावी लागेल. तरंच रणजी स्पर्धेचे आणि रणजी विजेत्यांचे महत्त्व व पावित्र्य कायम राहील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)