You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रणजी चषक: 42 वेळा विजेत्या मुंबई संघाचा जम्मू-काश्मीरकडून पराभव, सामन्यात काय घडलं?
- Author, खुर्रम हबीब
- Role, बीबीसी हिंदीसाठी
निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू-काश्मीरची आता आणखी एक वेगळी ओळख निर्माण होते आहे. जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघाच्या धडाकेबाज कामगिरीमुळे आता क्रिकेटमध्येही त्यांचं नाव गाजायला लागलं आहे.
रणजी ट्रॉफीत मुंबईच्या बलाढ्य संघाचा पराभव करून जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघानं सर्वांनाच धक्का देत लक्ष वेधून घेतलं आहे. या संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया.
जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघानं रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट फेरीतील स्वत:चं स्थान जवळपास पक्कं केलं आहे.
त्यांनी मुंबईच्या संघाचा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मुंबईच्या संघात भारताच्या राष्ट्रीय संघातील पाच कसोटीपटू आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव असलेल्या खेळाडूंचा समावेश होता.
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर असे दिग्गज खेळाडू मुंबईच्या संघात होते. मात्र असं असूनही जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजीवर त्याचा कोणताही प्रभाव पडला नाही.
जम्मू-काश्मीर संघाच्या जलदगती गोलंदाजांनी मुंबईच्या संघाला दोन्ही डावात, 120 आणि 290 धावांवर गुंडाळले.
या जबरदस्त कामगिरीमुळे जम्मू-काश्मीरच्या संघानं हा सामना पाच गडी राखून जिंकला. जम्मू-काश्मीरच्या संघानं सहा सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी करताना चार सामन्यांमध्ये विजय मिळवला तर दोन सामने अनिर्णित राखत 29 गुण मिळवले आहेत.
त्यामुळे गुणांच्या क्रमवारीत जम्मू-काश्मीरचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. बडोदा आणि मुंबई या दोन्ही बलाढ्य संघांना त्यांनी मागे टाकलं आहे.
हा विजय खूप महत्त्वाचा का आहे?
जम्मू-काश्मीरच्या संघांचा विजय खरोखरंच मोठा विजय आहे. कारण मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईच्या संघानं तब्बल 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय हा संघ 6 वेळा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
तर दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरचा संघ आतापर्यंत अंतिम फेरी सोडाच, उपांत्य फेरीत देखील कधी पोहोचला नव्हता.
तसंच सोयीसुविधांचा विचार करता जम्मू-काश्मीर, मुंबईसमोर काहीच नाही.
मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीच्या संस्थापक संघांपैकी एक आहे. मुंबईतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (बीसीसीआय) मुख्यालय आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील पहिला हंगाम मुंबईच्याच संघानं जिंकला होता.
मुंबईत वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचं ब्रेबॉर्न स्टेडियम आणि शरद पवार स्टेडियम संकुलासारखी मोठी आणि आधुनिक क्रिकेट मैदानं आहेत.
वानखेडे स्टेडियम आणि शरद पवार स्टेडियम, ही मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्वत:ची मैदानं आहेत.
दुसऱ्या बाजूला जम्म-काश्मीरकडे फक्त दोन-तीन मैदानं आहेत. तीदेखील महाविद्यालय किंवा सरकारी खात्यांची आहेत.
श्रीनगरमध्ये हिमवर्षाव होत असल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या संघानं 4-5 दिवसांचं शिबीर जम्मूतील एका महाविद्यालयाच्या मैदानात केलं.
राजकीय अस्थिरता असल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटच्या पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही.
इतकंच काय तिथे अजून क्रिकेट असोसिएशन नाही. प्रशासक असलेले मिथुन मन्हास तिथल्या क्रिकेटच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
सुरुवातीपासूनच होत्या आशा
जम्मू-काश्मीरच्या संघावर मुंबईच्या संघावर मिळवलेला विजय धक्कादायक असला, तरी असं काही घडण्याची अपेक्षा आधीपासूनच होती.
जम्मू-काश्मीर संघाचा अनुभवी कर्णधार पारस डोगरा म्हणाला की विजयाबद्दल त्यांना आत्मविश्वास होता. कारण संघ सातत्यानं चांगली कामगिरी करत होता.
डोगरा म्हणाला की विजयाबद्दल खात्री होती. कारण जम्मू-काश्मीरकडे देशातील सर्वात भेदक जलदगती गोलंदाजांची फळी आहे.
पारस डोगरा म्हणाला, "आम्ही चांगलं खेळत होतो, तसंच एकही सामना हरलेलो नव्हतो. त्यामुले आम्हाला माहित होतं की आम्ही मुंबईच्या संघाचा पराभव करू शकतो. आमचे जलदगती गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत."
पारस डोगरा पुढे म्हणाला, "देशांतर्गत क्रिकेटचा विचार करता आमची जलदगती गोलंदाजी सर्वोत्तम आहे. आकिब नबी, उमर नजीर आणि युद्धवीर सिंह या तीन गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला दबावात ठेवलं."
"रसिख सलाम (आयपीएलचा स्टार खेळाडू) याला दुखापत झाली होती, मात्र तरीदेखील आमची कामगिरी चांगली झाली."
रसिख सलाम व्यतिरिक्त जलदगती गोलंदाज उमरान मलिकला देखील दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण मोसमात खेळता आलं नाही.
डोगरा म्हणाला की "लाल चेंडूनं खेळताना तुम्ही जर योग्य दिशा राखत गोलंदाजी केली तर ती प्रभावी ठरते. आमचे गोलंदाज चेंडूला यष्टीच्या आतल्या बाजूस आणि बाहेरच्या बाजूस वळवतात, स्विंग करतात. तसंच ते योग्य टप्प्यावर चेंडू टाकतात. गोलंदाजानं इतकी भेदक गोलंदाजी केल्यास फलंदाजासमोर मोठं आव्हान निर्माण होतं."
31 वर्षांचा जलदगती गोलंदाज उमर नजीर मीर, जम्मू-काश्मीरच्या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे.
उमर 58 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळला आहे. 2013 मध्ये त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
या सामन्यात रोहित शर्माला बाद करून उमरनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. त्यांच्या उंचीमुळे गोलंदाजी करताना त्याला फायदा होतो.
जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघाचा 'पाया'
जम्मू-काश्मीरच्या संघाला इथपर्यंत पोहोचवण्यात दोनजणांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पहिली व्यक्ती म्हणजे कर्णधार पारस डोगरा आणि दुसरी व्यक्ती म्हणजे प्रशिक्षक अजय शर्मा.
देशांतर्गंत क्रिकेटमध्ये अजय शर्मा हे नावाजलेले खेळाडू होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10,000 हून अधिक धावा काढल्या आहेत. अजय शर्मा यांच्याकडे भारतासाठी एक कसोटी सामना आणि 31 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभवदेखील आहे.
खेळाच्या प्रदीर्घ अनुभवामुळे अजय शर्मा यांना क्रिकेटचे बारकावे अतिशय उत्तमरितीनं माहित आहेत.
जम्मू-काश्मीरच्या संघाकडून खेळताना शुभम खजुरिया यानं देखील या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. शुभम म्हणतो की संघाला मिळालेल्या यशात अजय शर्मा यांच्या अनुभवाचा मोठा वाटा आहे.
शुभम खजुरियानं सहा सामन्यांमध्ये 57.56 च्या सरासरीनं 518 धावा केल्या आहेत. धावांच्या दृष्टीनं तो देशात 11 व्या स्थानावर आहे.
शुभम खजुरियानं या मोसमात महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात 255 धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करून दाखवणारा खजूरिया जम्मू-काश्मीरच्या संघातील तिसरा खेळाडू आहे.
एवढंच नाही तर खजुरिया जम्मू-काश्मीरकडून एकाच डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूदेखील झाला आहे.
खजुरियानं या यशाचं श्रेय अजय शर्मा यांना दिलं. तो म्हणतो, "चांगली सुरुवात झाल्यानंतर त्याचं रुपांतर मोठ्या खेळीत कसं करायचं, हे आम्हाला अजय सरांनी शिकवलं आहे. जर तुम्ही 30 धावांवर फलंदाजी करत असाल तर त्या 70 पर्यंत कशा न्याव्यात हे त्यांनी आम्ही शिकवलं आहे. तसंच 70 किंवा 100 धावांवर खेळत असल्यास त्यानंतर मोठी खेळी कशी उभारायची हे शिकवलं आहे."
29 वर्षांच्या खजुरियानी 2011 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी पदार्पण केलं होतं.
तो म्हणतो की तेव्हापासूनच पारस डोगराचा त्याच्यावर प्रभाव आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे जम्मू-काश्मीरच्या संघानं रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईविरोधात हा दुसरा विजय नोंदवला आहे.
2014-15 च्या मोसमात जम्मू-काश्मीरनं वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला होता. त्या संघात देखील खजूरिया होता.
खजुरिया म्हणतो, "मी त्यांच्या (डोगरा) शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचो. कारण आम्ही नेहमीच हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळायचो."
खजुरिया पुढे म्हणाला, "जम्मू-काश्मीरच्या संघाच्या फलंदाजीत त्यांनी स्थैर्य आणि अनुभवाची भर घातली आहे. ते गुरूसारखे आहेत. दोन जण असे आहेत ज्यांनी देशांतर्गंत क्रिकेटमध्ये 10,000 हून धावा केल्या आहेत."
तो म्हणतो, "आम्हाला वेळोवेळी सूचना केल्या जात असतात. ऐन मोक्याच्या क्षणी घ्यायचे निर्णय, क्षेत्ररक्षणाची रचना यासारख्या गोष्टींनी खूप मोठा फरक झाला आहे."
खजुरिया सांगतो, "आम्ही कधीही स्पर्धा जिंकलेलो नाही. मात्र यावेळेस आम्ही दृढनिश्चय केला आहे की अंतिम फेरीत पोहोचयाचं आहे आणि ट्रॉफी देखील जिंकायची आहे. आम्ही फक्त 2-3 वेळाच नॉकआऊटमध्ये पोहोचलो आहोत."
फक्त फलंदाजच नाहीत तर गोलंदाज देखील आहेत अजय-पारस जोडीचे चाहते
जलदगती गोलंदाज आकिब नबीनं रणजी ट्रॉफीच्या या मोसमात 37 गडी बाद केले आहेत. गडी बाद करण्याच्या यादी संपूर्ण देशात तो तिसऱ्या स्थानावर आहे. जलदगती गोलंदाजीचा विचार करता तो अव्वल आहे.
या 28 वर्षांच्या खेळाडूनं 2019 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. त्याला दोन वर्षांपूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या सराव शिबिरात डेल स्टेनकडून शिकण्याची संधी मिळाली होती.
नबी म्हणाला, "स्टेनला मी लाल चेंडूशी निगडित काही तांत्रिक गोष्टींबद्दल विचारलं होतं. त्यानं काही सूचना केल्या आणि त्यांचा समावेश मी माझ्या गोलंदाजीत केला."
नबी देखील, जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीचं श्रेय कॅप्टन डोगरा आणि प्रशिक्षक शर्मा या दोघांना देतो. नबी म्हणतो, "डोगरा यांना उत्तम अनुभव आहे. त्यांनी संघात स्थैर्य आणलं आहे. आम्ही जेव्हा तणावात असतो तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्याचा आम्हाला खूपच फायदा होतो."
नबी पुढे म्हणतो, "अजय शर्मा सरांच्या बाबतीत देखील असंच आहे. ते आमच्यावर खूप मेहनत घेतात. जर एखाद्या खेळाडूला फलंदाजीत किंवा मानसिक पातळीवर काही अडचण आली तर अजय सर त्याच्याशी बोलतात आणि त्याची कामगिरी सुधारण्यास मदत करतात."
नबी म्हणतो, "त्यांना वाटतं की संघातील प्रत्येक खेळाडूनं सर्वोत्तम कामगिरी करावी. ते म्हणतात की त्यांना आमच्याकडून सर्वोच्च प्रयत्न हवे असतात. ते खेळाडूंकडून कठोर परिश्रम करून घेतात."
उपांत्यपूर्व सामन्यापासून फक्त एक पाऊल दूर असूनही, जम्मू-काश्मीरच्या संघाला पुढील फेरीत स्थान मिळण्याची गॅरंटी नाही. त्यासाठी त्यांना बडोद्याविरुद्धचा त्यांचा शेवटचा सामना किमान अनिर्णित (ड्रॉ) तरी ठेवावा लागेल.
मात्र जर त्यांचा पराभव झाला आणि मुंबईच्या संघानं मेघालयच्या संघाला एक डाव किंवा 10 गडी राखून हरवलं, तर मात्र जम्मू-काश्मीरचा संघ तिसऱ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांना अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळणार नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.