You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कपिल देव : भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहरा बदलणारा अष्टपैलू 'सुपर क्रिकेटर'
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
साधारणपणे सहा फूट उंची. शरीरयष्टी इतर क्रिकेटपटूंसारखीच. चेहऱ्यावर एक समाधानकारक हास्य आणि काहीसे घारे डोळे. आता असं वर्णन असलेल्या व्यक्तीला सुपर क्रिकेटर का बरं म्हणावं? पण ज्या कपिल देवचं हे वर्णन आहे, त्यानं क्रिकेटमध्ये केलेले कारनामे पाहता तो खरंच काहीतरी चमत्कारिक क्षमता असलेला 'सुपर क्रिकेटर' असावा हे वाटून गेल्याशिवाय राहत नाही.
'भारतात फास्ट बॉलर तयार होऊ शकत नाही' पासून ते 'कपिलसारखा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर पुन्हा होणे नाही' या दोन वाक्यांमधली तफावत दाखवणारी दरी या क्रिकेटपटूमुळं दूर झाली.
कपिल देव निखंज. 6 जानेवारी 1959 मध्ये चंदीगडमध्ये जन्मलेला हा क्रिकेटपटू भारतीय भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकणारा इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू बनला.
त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला सुपर क्रिकेटर का म्हणायला हवं? याची काही कारणं जाणून घेऊयात.
कपिलच्या नेतृत्वात भारतीय संघानं 1983 मध्ये अशा परिस्थितीत क्रिकेट विश्वचषक जिंकला होता, जेव्हा कोणी या संघाची दखलही घ्यायला तयार नव्हतं. अगदी भारतीय संघातील सदस्यांनाही आपण असं काही तरी करू शकतो असं कधी वाटलं नव्हतं.
फक्त एका व्यक्तीला हा विश्वास होता आणि तो सत्यात उतरवण्याचं धाडसही त्याच्यात होतं. तो म्हणजेच भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव.
त्यामुळंच तो सुपर क्रिकेटर होता. पण अर्थात त्याला सुपर क्रिकेटर का म्हणायचं? तर त्याची आणखीही अनेक कारणं आहेत.
आत्मविश्वास आणि प्रेरणा
कपिल देव सुपर क्रिकेटर होता असं म्हणेपर्यंत ठीक आहे. पण ते खरं कसं वाटणार. तर, कपिलचं व्यक्तिमत्त्वही हे त्याची साक्ष देणारे असंच होतं.
खच्चून भरलेला आत्मविश्वास आणि तोच आत्मविश्वास इतरांच्याही मनात पेरण्याचं त्याच्याकडं असलेलं खास कसब. यामुळं त्याच्याबरोबर इतरांनाही विशेष कामगिरी करण्यासाठी तयार करण्याचा हातखंडा कपिलमध्ये होता.
त्याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे 1983 मधील वर्ल्ड कप विजय. प्रतिस्पर्धी संघच काय पण अगदी भारतीय संघातील सदस्यांनाही आपण विश्वचषक जिंकू शकू असं कधी वाटलं नव्हतं. अनेक मुलाखतीमध्ये विश्वविजेत्या संघातील खेळाडूंनी स्वतः अशी कबुली दिली आहे.
या संघातील अनेक क्रिकेटपटूंनी तर आपल्याला पेड हॉलिडे मिळाला आहे इंग्लंड फिरून यायला मिळेल अशा दृष्टीकोनातून याकडं पाहिलं. पण अवघ्या 24 वर्षांच्या या भारतीय कर्णधाराला खुणावत होतं ते जगज्जेतेपद.
अगदी पहिल्याच पत्रकार परिषदेपासून त्याची झलकही पाहायला मिळाली होती. भारतीय कर्णधारानं इंग्लिश पत्रकारांना अगदी अभिमानाने आपण विश्वचषक जिंकण्यासाठीच आलो आहोत, असं सांगितलं होतं.
फक्त बोलण्यापुरतंच नव्हे तर पहिल्या सामन्यातच भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि नंतर कपिलनं स्पर्धेत अनेकदा संघाला आपण विश्वविजेते बनू शकतो हे दाखवून दिलं. भारतीय संघाला विश्वविजेतं बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता.
या नव्या कर्णधारानं त्यावेळी संघात सिनियर असलेल्या खेळाडुंनाही प्रेरणा दिली होती. सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांनी तसं वारंवार सांगितलं आहे. पण फक्त आत्मविश्वास नव्हे तर त्या जोडीला कपिलची कर्तबगारीही होती. ती कर्तबगारी दिसली त्याच्या जगप्रसिद्ध खेळीमधून.
नाबाद 175 ने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरा
भारतीय संघानं 25 जून 1983 रोजी विश्वचषक उंचावला. हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्णाक्षरांत लिहिला गेला. पण तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचा दिवस होता 18 जून 1983.
टनब्रिजच्या मैदानावर झालेल्या झिम्बाब्वे विरोधातील या सामन्यात कपिलची अभूतपूर्व खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात भारतीय संघाची अवस्था 17 बाद 5 अशी झाली होती. पण कपिलनं नाबाद 175 धावांची तुफानी खेळी केली आणि सामना जिंकत संघासाठी उपांत्य फेरीचं दारही उघडलं.
पण या खेळीचं महत्त्व एवढंच होतं असं नाही. विश्वचषकाच्या त्या सामन्यात सुनील गावस्कर हे कपिलचे सिनिअरही होते. गावस्कर त्या सामन्यात शून्यावर बाद झाले होते. कपिलची ही खेळी क्रिकेट विश्वातली आजवरची सर्वोत्तम खेळी आहे, असं सुनील गावस्कर सांगतात.
एवढंच नाही तर कपिलची ती खेळी भारतीय क्रिकेटचं भवितव्य बदलून टाकणारी खेळी होती, असंही गावस्कर म्हणतात. कारण त्यामुळं भारतीय क्रिकेटपटूंकडे पाहण्याचा सगळ्यांचाच दृष्टीकोन बदलला. अनेकांना त्यानं प्रेरणा दिली.
बरं कपिलनं ही खेळी खेळली नसती तर भारत हा सामना जिंकला नसता आणि विश्वचषकातला भारताचा पुढचा प्रवास याशिवाय शक्य नव्हता. त्यामुळं या खेळीमुळंच भारत विश्वचषक जिंकला असंही म्हटलं जातं.
कपिलदेव या खेळीबाबत म्हणतात की, "प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही दिवस हे खास असतात. मला वाटलं तो दिवस माझ्यासाठीच होता. मी सुरुवातीला संयम दाखवला. नंतर मंगूस बॅट मागवली आणि फटकेबाजी केली. त्यादिवशी माझे मिसहिटही चौकार-षटकार जात होते."
झिम्बाब्वेनं स्पर्धेपूर्वी म्हटलं होतं की, आम्हाला गटात फक्त ऑस्ट्रेलियाची भीती आहे. भारताची भीती वाटत नाही. त्यांच्याच विरोधात कपिलनं हल्लाबोल केला होता. कदाचित तोच राग कपिलनं बॅटमधून दाखवला.
भारत आणि क्रिकेट यांच्यातल्या आज घट्ट झालेल्या नात्याला कदाचित त्या इनिंगपासूनच सुरुवात झाली होती. पण त्या खेळीची वर्णनं ऐकल्यानंतर सामान्य क्षमता असलेली व्यक्ती असा खेळ करू शकते यावर विश्वासच बसत नाही.
त्यामुळं कपिलला सुपर क्रिकेटर म्हण्यासाठी तसा हा एकमेव दाखला पुरेसा आहे. पण कपिल मात्र तेवढ्यापुरता मर्यादित नाही.
अविश्वसनीय फिटनेस
क्रिकेटपटू आणि फिटनेस हे शब्द आजच्या काळात समानार्थी शब्द असल्यासारखे आहे. कायम क्रिकेटपटूंच्या फिटनेसची चर्चा होत असते. पण कपिलनं जवळपास चार दशकांपूर्वीच फिटनेस कसा असावा हे दाखवून दिलं होतं.
कपिलचे धावा, विकेट किंवा मैदानावरील कामगिरीचे तर अनेक विक्रम झाले. पण फिटनेसच्या बाबतीत कपिल किती अव्वल होता हे एका तथ्यावरून स्पष्ट होतं.
ते म्हणजे, कपिल त्याच्या 16 वर्षाच्या कसोटी कारकिर्दीमध्ये एकदाही फिटनेसच्या कारणावरून संघाबाहेर राहिला नाही.
131 सामने खेळलेला कपिल फक्त एका सामन्यासाठी संघाबाहेर होता. तेही त्याला व्यवस्थापनानं कामगिरीमुळं संघाबाहेर केलं होतं. तसं केलं नसतं तर सलग एवढे सामने खेळणारा कपिल एकमेव क्रिकेटपटू ठरला असता.
याचं कारण कपिलनं स्वतः मुलाखतीत सांगितलं होतं. कपिल म्हणतो की, "आंतरराष्ट्रीय सामने सुरू नसले की मी खूप जास्त सराव करायचो. अनेकदा तेव्हा दुखापत व्हायची. पण नंतर हंगाम सुरू झाला की मी फिट असायचो. त्यामुळं सामने सुरू नसताना मी स्वतःवर काम करायचो."
वेगवान गोलंदाज असतानाही दुखापत न होणं याबाबत कपिलनं सांगितलं की, "तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल माहिती हवी. तुमचं शरीर सहन करेल तेवढाच ताण त्याला द्यायला हवा. दुसऱ्यांचं पाहून किंवा बरोबरी करण्याच्या प्रयत्नात दुखापत होते, त्याची जाणीव गरजेची असते."
त्यामुळं एकीकडं एका दुखापतीनं क्रिकेटपटूंचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होत असताना कपिल देवच्या संदर्भातील ही बाब त्याच्यातील असामान्य क्रिकेटपटूचं दर्शन घडवते.
थक्क करणारे आकडे
कपिल देवकडं वेगवान गोलंदाज आणि भारताला विश्वचषक जिंकवून देणारा फलंदाज या दृष्टीनंच कायम पाहिलं जातं. पण फलंदाज म्हणूनही त्याचे आकडे अविश्वसनीय असेच आहेत.
नाबाद 175 धावांची खेळी तर आहेच. त्याचबरोबर अनेक वेळा संघाला गरज असताना फटकेबाजी करून सामने जिंकून देण्यात त्यानं मोलाची भूमिका बजावली आहे.
1990 मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत आला होता. त्यावेळी भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी 24 धावांची गरज होती. त्यावेळी कपिलनं सलग 4 षटकार खेचत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं होतं.
कपिलनं 131 कसोटींत 5248 तर 225 वन डे सामन्यांत 3783 धावा केल्या आहेत. वन डे सामन्यांत कपिलचा स्ट्राईक रेट हा जवळपास 95.07 एवढा होता. नंतरच्या काळात काही फलंदाजांनी 100 चा स्ट्राईक रेट ओलांडला. पण त्या काळात कपिलचे हे आकडे कमालीचे होते.
गोलंदाजीचा विचार करता कसोटीत कपिलनं 431 तर वन डे सामन्यांमध्ये 253 विकेट घेतल्या. कसोटीत रिचर्ड हॅडलीनंतर 400 विकेट घेणारा कपिल हा क्रिकेटच्या इतिहासात दुसरा गोलंदाज होता.
नंतर कपिलनं हॅडलीलाही मागे टाकलं आणि 1993-94 मध्ये कपिल सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. तो निवृत्त झाला तेव्हा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. वन डे सामन्यांतही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कपिल सहा वर्षे अव्वल स्थानी होता.
कपिलनं गोलंदाजी करताना कसोटींत कधीही नो बॉल टाकला नाही असं म्हटलं जातं. पण कपिलनं स्वतः यावर स्पष्टीकरण दिलं होतं. प्रमाण कमी असलं तरी कपिलनं नो बॉल टाकले होते. पण अखेरच्या 50 हून अधिक कसोटीत त्यानं कधीही नो बॉल टाकला नाही, असं कपिल स्वतः सांगतो.
कसोटी कारकर्दीत एकदाही धाव बाद न होण्याचा कारनामाही कपिलनं केल्याचं म्हटलं जातं. पण त्याबाबतीतही कुठेही अधिकृत आकडेवारी किंवा नोंद सापडत नाही.
कपिल उत्तम क्षेत्ररक्षकही होता. मैदानावर त्याच्या हातून चेंडू सुटणं हे अगदी दुर्मिळ. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यानं घेतलेला झेल तर भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा क्षण होता. कारण तो झेल होता व्हीव रिचर्ड्स यांचा. ते बाद झाले नसते, तर काय? हा विचारही करायला नको.
हरियाणा हरिकेन
कपिल देवला हरियाणा हरिकेन म्हणून ओळखलं जातं. मात्र क्रिकेटमध्ये यायचंच म्हणून ठरवून कपिल क्रिकेटमध्ये आला होता असं नव्हतं. तर कपिलला फक्त काहीतरी खेळायचं होतं.
कपिलनं एका मुलाखतीत सांगितलं की, "माझा एकच हेतू होता. तो म्हणजे खेळायचं. कारण मला खेळायला आवडायचं. अगदी दिवसरात्र मला खेळायचं असायचं. कारण मला अभ्यास करायला आवडत नव्हता. पण खेळायचं काय? फुटबॉल मॅच दोन तासांत संपायची. त्यामुळं परत वर्गात जावं लागायचं. पण क्रिकेट दिवसभर चालायचं म्हणून क्रिकेट खेळायला लागलो."
कपिल देव यांच्या वडिलांचा लाकडाचा व्यवसाय होता.
देशप्रेम आझाद नावाच्या प्रसिद्ध प्रशिक्षकांनी कपिलला प्रशिक्षण दिलं होतं. ते पैसे घेत नसायचे. पण क्षमता पाहून ते मुलं निवडायचे आणि त्यांनाच प्रशिक्षण द्यायचे. त्यांनी कपिलच्या गोलंदाजीवर काम केलं होतं.
कपिल शाळेत असताना शाळेच्या टीममध्ये कपिलची निवड झाली नव्हती. त्यामुळं रागात कपिलनं गोलंदाजीचा खूप सराव केला. त्यावेळी त्याच्या बाऊन्सरनं काही फलंदाज जखमी झाले होते. त्यामुळं कपिलच्या नावाची चर्चा झाली आणि राज्याच्या संघात कपिलची निवड झाली आणि तिथून त्याचं करिअर वेगानं पुढं गेलं.
कपिल देव खऱ्या अर्थानं भारताचा पहिला वेगवान गोलंदाज होता. त्यापूर्वी असा वेगवान गोलंदाज भारतीय संघाला मिळालेला नव्हता.
एकूणच क्रिकेटचा देव म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो महान फलंदाज सचिन तेंडुलकर. पण सचिन महान बनण्याच्याही अनेक वर्षांपूर्वीच भारतीय क्रिकेटला 'कपिल देव' लाभला होता.
किंबहुना सचिनला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा ज्या विश्वचषक विजयानं मिळाली त्याचा शिल्पकारच हा सुपर क्रिकेटर होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.