सौरभ नेत्रावळकर: विराट आणि रोहितला परतीचा रस्ता दाखवणाऱ्या सौरभबद्दल या गोष्टी जाणून घ्या

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आज (12 जून) अमेरिकेत टी-20 विश्वचषकात भारत वि. अमेरिका सामना सुरू आहे. अमेरिकेच्या टीममध्ये सौरभ नेत्रावळकर हा मुंबईकर देखील आहे. पाकिस्तानविरोधात चांगली कामगिरी करणाऱ्या सौरभने विराट कोहली आणि रोहित शर्मांची विकेट घेतली आहे.

या सामन्यासाठी अमेरिकेनी भारताला 111 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताची स्थिती सध्या 16 वर 2 अशी आहे.

टी20 विश्वचषकात अननुभवी अमेरिकेनं पाकिस्तानला धूळ चारली होती. गुरुवारी(6जून) अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान यूएसेननं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. त्यात एका मूळच्या मुंबईकर खेळाडूनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सुपर ओव्हरमध्ये सौरभ नेत्रावळकरनं पाकिस्तानच्या फलंदाजांना 18 धावाही करू दिल्या नव्हत्या.

भारताविरोधातील मॅचमध्ये सौरभ काय करतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही सौरभचीच कहाणी आहे.

कोण आहे सौरभ नेत्रावळकर?

“क्रिकेट पुन्हा कधी खेळायला मिळेल अशी आशा-अपेक्षाही नव्हती. पण खेळायला मिळतंय, यासाठी मी कृतज्ञ आहे."

या वाक्य आहे सौरभ नेत्रावळकर याचं. सौरभ मूळचा मुंबईचा, पण आता तो अमेरिकेच्या संघाकडून क्रिकेट खेळतोय.

एकेकाळी भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळलेला सौरभ शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, तेव्हा आता आपल्याला क्रिकेटमध्ये संधी नाही, हे त्यानं गृहीतच धरल्यासारखं होतं.

पण कुणी म्हणतं ना, तसं सच्चा मुंबईकर मुंबईबाहेर गेला तरी त्याच्यातलं क्रिकेटप्रेम संपत नाही. सौरभचं तसंच झालं.

अमेरिकेत शिकतानाही तो मिळेल तेव्हा मिळेल तसं क्रिकेट खेळत राहिला आणि आता थेट आयसीसी ट्वेन्टी20 विश्वचषकाचं दार त्याच्यासाठी उघडलं आहे.

मुंबईच्या मैदानांपासून अमेरिकन टीमपर्यंतचा सौरभचा प्रवास म्हणजे खेळावरच्या प्रेमाचीच गोष्ट आहे. स्वप्नं पाहणं का सोडू नये आणि संधीचं सोनं कसं करावं याचं हे उदाहरणच आहे.

सौरभशी आम्ही त्याविषयीच संवाद साधला.

अंडर-19 टीममधली कामगिरी

सौरभ नेत्रावळकरचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. तो मुंबईच्या मालाड उपनगरात लहानाचा मोठा झाला आणि दहाव्या वर्षापासून क्रिकेट प्रशिक्षण घेऊ लागला.

मुंबईच्या मैदानांवर सराव करत, शालेय क्रिकेटमध्ये धडे गिरवत सौरभची वाटचाल सुरू होती.

पण त्याचं नाव खऱ्या अर्थानं पहिल्यांदा समोर आलं, ते 2008-09 च्या मोसमात. त्या वर्षी बीसीसीआयच्या कूचबिहार ट्रॉफी या अंडर-19 क्रिकेट स्पर्धेत सौरभनं सहा सामन्यांत 30 विकेट्स अशी चमकदार कामगिरी केली होती.

एरवी मुंबई फलंदाजांची खाण म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इथल्या एखाद्या युवा गोलंदाजानं, विशेषतः वेगवान गोलंदाजांची उत्तम कामगिरी लगेच लक्ष वेधून घेते.

साहजिकच उंचापुरा, शिडशिडीत बांध्याचा डावखुरी जलदगती गोलंदाजी करणारा सौरभ चर्चेत आला.

2010 साली दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिकेत सौरभनं आठ विकेट्स काढल्या आणि पाठोपाठ न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकातही त्यानं नऊ विकेट्स काढल्या.

त्यावेळी केएल राहुल, मयांक अगरवाल, जयदेव उनाडकट हे सौरभसोबत अंडर-19 संघात होते. पण त्यांना भारतीय संघापर्यंत पोहोचता आलं, तसं सौरभचं झालं नाही.

क्रिकेटबरोबरच सौरभला अभ्यासाचीही आवड होती. एकीकडे त्यानं 2009-13 या काळात मुंबईच्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं.

तो सांगतो, “2013 साली इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली होती पुण्यात. तेव्हा मी ठरवलं होतं की दोन वर्ष तरी नोकरी करायची नाही, आणि क्रिकेटलाच वेळ द्यायचा. मला मुंबई टीमसाठी प्रयत्न करायचा होता. त्या वर्षीच माझं मुंबई रणजी संघात पदार्पण झालं.”

दोन वर्ष सौरभनं प्रयत्न केले, पण संघात स्पर्धा इतकी होती की लगेच त्याला स्थान पक्कं करता आलं नाही आणि आयपीएलमध्येही संधी मिळाली नाही.

क्रिकेटर ते क्रिकेट अ‍ॅप डेव्हलपर

अवघ्या 23 वर्षांच्या वयात क्रिकेटर्सच्या कारकीर्दीची खरी सुरुवात होते. पण त्या वयात सौरभनं क्रिकेट सोडायचं ठरवलं.

सौरभ सांगतो, “तेव्हा एक द्विधा मनस्थिती होती - क्रिकेट सोडून पुन्हा अभ्यासावर पूर्णतः लक्ष द्यायचं की नाही?”

मुंबई रणजी संघातलं स्थान निश्चित होत नव्हतं आणि पुढे भारतासाठी खेळायला मिळेल असा मार्ग तेव्हा दिसत नव्हता. त्यामुळे शिक्षणाकडे वळायचं, अभ्यासावर लक्ष द्यायचं सौरभनं ठरवलं ठरवलं.

“2015 साली बॅकअप ऑप्शन म्हणून मी अमेरिकेत मास्टर्ससाठी प्रवेश परिक्षा दिली होती. माझ्या सोबत इंजिनियरींग करणारे अनेकजण अमेरिकेत शिकत होते, त्यांचे अनुभव मला माहिती झाले होते.

“मास्टर्ससाठी न्यूयॉर्कच्या कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश मिळाला, जे कॉम्प्युटर सायन्ससाठी जगातल्या आघाडीच्या विद्यापिठांपैकी एक मानलं जातं.”

2015 साली पुढच्या शिक्षणासाठी सौरभ अमेरिकेला निघून गेला. पुढे वर्षभरात त्याला ओरॅकल या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीही मिळाली.

सौरभनं या काळात क्रिकेटविषयीचं एक अ‍ॅपही तयार केलं होतं. अलीकडच्या काळात इन्स्टाग्रामवर त्याच्या योगा आणि गाण्याच्या व्हिडियोंचीही चर्चा झाली.

अमेरिकेत क्रिकेटचा सराव

अमेरिकेत गेल्यावर क्रिकेट थांबेल असं त्याला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. सौरभ सांगतो, “कॉलेजमध्ये काही मुलं अशीच मजा म्हणून क्रिकेट खेळायची. त्यांनी कॉलेजचा क्रिकेट क्लब बनवला होता. इंटरकॉलेज स्पर्धा भरायच्या.”

ओरॅकलमध्ये नोकरी मिळाल्यावर सौरभ कॅलिफोर्नियात सॅन फ्रान्सिस्कोला राहायला गेला. इथे दर आठवड्याच्या शेवटी क्लब क्रिकेटच्या स्पर्धा असतात. पाच दिवस नोकरी करायची आणि शनिवार रविवार सामन्यांमध्ये खेळायचं असं सौरभचं वेळापत्रक असायचं.

बरं, हे क्रिकेटही व्यावसायिक क्रिकेट नव्हतं, तर कॉलेजमधली मुलं किंवा क्रिकेट चाहते एकत्र येऊन खेळायचे, स्पर्धा भरवायचे.

“त्या स्पर्धा भारताएवढ्या दर्जाच्या नसायच्या. इथे तेव्हा साधी पिचेसही नव्हती, अजूनही नाहीत. आपल्याकडे जसं मातीची व्यवस्थित खेळपट्टी बनवली जाते, तसं इथे नाही. कृत्रिम खेळपट्टी म्हणजे सिंथेटिक मॅटसारखं पिच असते.

“मुंबईच्या ओव्हल मैदानासारखं लॉस एंजेलिसमध्ये एका पार्कमध्ये तीनचार मैदानं आहेत. तिथे व्यवस्थित खेळपट्ट्या आहेत. तिथे आम्ही खेळायला जायचो.”

लॉस एंजेलिस शहर हे सॅन फ्रान्सिस्कोपासून गाडीनं सहा तासांवर आहे. त्यामुळे सौरभ शुक्रवारी संध्याकाळी गाडी चालवत लॉस एंजेलिसला जायचा, शनिवारी तिकडे खेळून परत यायचा आणि रविवारी पुन्हा सॅन फ्रान्सिस्कोला खेळायचा.

“त्या क्लबमध्ये खेळत असताना माझ्यासोबत तीन-चार जण होते जे अमेरिकन संघात खेळत होते. खरं तर तेव्हाच मला कळलं की अमेरिकेची क्रिकेट टीमही आहे.”

“अमेरिकेत सुट्ट्या साधारण शुक्रवारी आणि सोमवारी असतात. अशा लाँग वीकएंडला इथे ट्वेन्टी20 स्पर्धा भरवल्या जातात. तिथे चांगले खेळाडू खेळायला येतात. अगदी वेस्ट इंडीजचे खेळाडूही इथे येतात.

“तिथेही मी खेळायला गेलो, आणि चांगली कामगिरी केली, तेव्हा लोकांना कळलं की असा एक खेळाडू यूएसमध्ये आला आहे आणि चांगलं खेळत आहे.”

पण यूएसएच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची सौरभला फार आशा नव्हती कारण नियम अगदी कडक होते. “सात वर्ष अमेरिकेत राहावं लागेल आणि कायमस्वरुपी वास्तव्य (पर्मनंट रेसिंडट) असायला हवं. मी तेव्हा स्टुडंट व्हिसावर होतो, मग वर्क व्हिसावर.

“त्यामुळे यूएस साठी खेळण्याचा प्रश्नही नव्हता. मी फक्त क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी खेळत होतो.”

2018 साली सौरभची अमेरिकेत तीन वर्ष पूर्ण झाली आणि त्याच सुमारास आयसीसीनं सात वर्षांची अट कमी करून तीन वर्षांवर आणली.

अमेरिकन टीम लॉस एंजेलिसला सरावासाठी आली असताना सौरभचा खेळ कोचना आवडला आणि हळूहळू अमेरिकन संघाचं दार त्याच्यासाठी उघडलं.

पाठोपाठ अमेरिकेतली मेजर लीग क्रिकेट, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि इंटरनॅशनल लीग ट्वेन्टी20 मध्येही तो खेळला.

असोसिएट क्रिकेटचा संघर्ष

अनेकांना वाटतं की क्रिकेटमध्ये सगळं सहज मिळतं किंवा छोट्या संघांसाठी खेळणं सोपं असतं. पण इथेही मोठा संघर्ष करावा लागतो, याकडे सौरभ लक्ष वेधतो.

“असोसिएट देशांचे क्रिकेट खूप कठीण असतं, कारण सोयीसुविधा अगदीच कमी असतात. सरावासाठी आम्हाला सुविधा किंवा साधं पिच वगैरेही अनेक ठिकाणी नाहीत. आम्ही पाच वाजता ऑफिसवरून सुटलो की इनडोअर सराव करायचो, रात्री सात ते नऊ.”

अमेरिकेसारख्या खंडप्राय देशात सॅन फ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क हे अंतर भारतातल्या श्रीनगर-कन्याकुमारी अंतरापेक्षाही थोडं जास्त आहे. त्यात राष्ट्रीय टीमचे खेळाडूही एकाच ठिकाणी राहात नाहीत.

त्यामुळे जेव्हा स्पर्धा असेल, तेव्हा जेमतेम दहा दिवस आधी सगळे एकत्र भेटून आणि सराव करतात. सगळे खेळाडू पूर्णवेळ क्रिकेट खेळत नाहीत तर आपापली नोकरी, कुटुंब सांभाळून खेळतात.

सौरभ अमेरिकेला गेला तेव्हा, अमेरिकेचा संघ आयसीसीच्या डिव्हिजन फोर आणि मग डिव्हिजन थ्रीमध्ये म्हणजे खालच्या स्तरात खेळत होता. ती स्पर्धा जिंकून ही टीम डिव्हिजन टू मध्ये पोहोचली.

2019 साली आयसीसीनं सर्व सदस्यांना ट्वेन्टी20 आंतरराष्ट्रीय टीमचा दर्जा दिला. मग 2026 च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत प्रवेश केल्यानं अमेरिकेला तात्पुरता वन डे आंतरराष्ट्रीय दर्जाही मिळाला. त्यानंतरच्या तीन वर्षांत अमेरिकेतलं क्रिकेट झपाट्यानं वाढलं आहे, अशी माहिती सौरभ देतो.

“स्थानिक क्रिकेटचा दर्जा आता सुधारला आहे. मेजर लीग क्रिकेट आणि मायनर लीग क्रिकेटनही फरक पडला आहे. कारण त्यामुळे आम्हाला चांगल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. इथे आता चांगली ग्राऊंड्स तयार होत आहेत. स्थानिक पातळीवर खेळपट्ट्या तयार होऊ लागल्या आहेत.

“अकॅडमी आकाराला येत आहेत आणि त्यातून नवे खेळाडू तयार होऊ लागले आहेत. आमच्या वनडे संघात असे काहीजण आहेत जे जन्मापासून इथलेच आहेत. इथे जन्माला आलेले, मोठे झालेले 13-14 वर्षांचे खेळाडू आहेत, ज्यांची गुणवत्ता पुढच्या चार पाच वर्षांत दिसून येईल. त्यांना आंतरराष्ट्रीय खेळासाठी तयार करणं हे एक पुढचं आव्हान आहे.”

गेल्या तीन वर्षांत काही खेळाडू तर क्रिकेटसाठी अमेरिकेत गेले आहेत. कॅलिफोर्नियासारख्या ठिकाणी फॅन फॉलोईंगही आहे आणि आता तेही वाढेल अशी आशा केली जाते आहे.

पण तरीही यूएसए टीमसाठी वाट सोपी नसल्याची जाणीव सौरभला आहे.

“असोसिएट क्रिकेटमध्ये एक वेगळा दबाव असतो तुमच्यावर. या देशांसाठी वर्षभरात एकच चांगली स्पर्धा असते. त्यातसुद्धा सात दिवसांत पाच सामने असतात. म्हणजे पूर्ण वर्षभराची मेहनत त्या पाच दिवसांत पणाला लागते. तिथे जिंकलो, तरच पुढे जाऊ शकणार. नाहीतर काहीच नाही.”

भारताविरुद्ध खेळायचं आव्हान

ट्वेन्टी-20 विश्वचषकाआधी झालेल्या ट्वेन्टी20 मालिकेत यूएसएनं बांगलादेशवर मात केली. त्या विजयानं आपल्या टीमला नवा आत्मविश्वास मिळाल्याचं सौरभ सांगतो.

मग 2 जूनला स्पर्धेच्य पहिल्या सामन्यात अमेेरिकेेन टीमनं कॅनडाला हरवलं तर 6 जूनला थेेट पाकिस्तानला धूळ चारली. अमेरिकेच्या या विजयात भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावळकर याने चमकदार कामगिरी केली.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सात बळींच्या मोबदल्यात 159 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात अमेरिकेने 20 षटकांत 3 विकेट गमावून 159 धावा केल्या, त्यानंतर सामना बरोबरीत सुटला. मग सुपर ओव्हर खेळवण्यात आली, ज्यामध्ये अमेरिकेने 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 13 धावा करू शकला.

आता 12 जूनला यूएसएला भारताचा सामना करायचा आहे. भारताविरुद्ध खेळणं हा एक भावनिक क्षण असेल, असं सौरभ सांगतो.

“मी लहानपणी अंडर-19 क्रिकेट भारतासाठी खेळलेलो आहे. माझ्यासोबत एके काळी खेळलेले अनेकजण सध्या भारतीय संघात आहेत. त्यांना पुन्हा भेटता येईल हे छान वाटतंय. त्यांच्यासाठी मी खूश आहे की त्यांनी क्रिकेटमध्ये करियर घडवलं आणि भारतासाठी तसंच आयपीएलमध्ये चांगलं खेळतायत.”

“आम्ही मर्यादित सुविधांमध्ये सराव करून इथे आलो आहोत, आणि ते तासंतास क्रिकेट खेळतात. आपले सर्वोत्तम प्रयत्न करायचे, हे आमच्या हाती आहे. त्या तीन तासांत आम्ही उत्तम खेळण्याचा प्रयत्न करू.

“ट्वेंटी20 मध्ये काहीही होऊ शकतं. आम्ही सकारात्मक आहोत, पण एका वेळी एकाच सामन्याचा विचार करतो आहोत.”