ICC T20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक, टीम्स आणि सामने कुठे पाहायचे...सर्व काही जाणून घ्या

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पुरुषांच्या ट्वेन्टी20 वर्ल्ड कपला आता थोडेच दिवस उरले आहेत आणि यंदाची स्पर्धा ऐतिहासिक आहे. कारण यंदा पहिल्यांदाच यूएसए म्हणजे अमेरिकेत एखाद्या क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन केलं जातंय.

1 ते 29 जूनदरम्यान ट्वेन्टी20 वर्ल्ड कपचं आयोजन होणार असून अमेरिकेसोबत वेस्ट इंडीजमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.

स्पर्धेची ही नववी आवृत्ती आहे आणि यावेळी तब्बल 20 संघ त्यात सहभागी होतील.

ट्वेन्टी20 वर्ल्ड कपचं आयोजन नेमकं कुठे होतंय, भारतत कधी खेळणार आहे आणि हे सामने कधी आणि कसे पाहता येतील, जाणून घेऊयात.

टी20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट

यावेळी ट्वेन्टी20 वर्ल्ड कप पुन्हा जुन्या फॉरमॅटनुसार ग्रुप स्टेज म्हणजे साखळी फेरी, सुपर एट आणि नॉकआऊट म्हणजे बाद फेरी, अशा तीन टप्प्यांत खेळवला जाईल.

त्यासाठी स्पर्धेतील 20 संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. एका गटात पाच संघ आहेत, जे साखळी फेरीत एकमेकांशी खेळतील. प्रत्येक गटातून दोन अशा आठ संघांना सुपर एट फेरीत प्रवेश मिळेल.

त्यातले चार संघ बाद फेरीत सेमी फायनलमध्ये पोहोचतील.

यंदा भारतीय संघाचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला असून या गटात पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड आणि अमेरिकेचा समावेश आहे.

ट्वेन्टी 20 वर्ल्ड कपचे सामने कुठे आणि कधी पाहायचे?

ट्वेन्टी20 वर्ल्ड कपची साखळी फेरी 1 जूनपासून सुरू होतील आणि 18 जूनपर्यंत खेळवली जाईल.

तर सुपर एटचे सामने 19 ते 25 जूनदरम्यान रंगतील. वर्ल्ड कपच्या उपांतत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जूनला तर फायनल 29 जूनरोजी खेळवली जाईल.

ही स्पर्धा जगाच्या दुसऱ्या भागात होते आहे. त्यामुळे काही सामने सकाळी तर काही संध्याकाळी खेळवले जाणार आहेत, जेणेकरून संबंधित टीम्सच्या फॅन्सना खेळाचा आनंद लुटता येईल.

साखळी फेरीत भारताचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7:30 वाजता तर बाकीचे तीन सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता रंगतील.

भारतानं उपांत्य फेरी गाठली, तर ते 27 एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत खेळतील असं आधीच ठरलं आहे.

डिस्ने स्टारनं या स्पर्धेच्या प्रसारणाचे अधिकृत हक्क विकत घेतले असून बीबीसी मराठीच्या वेबसाईटवरही तुम्ही महत्त्वाचे अपडेट्स वाचू शकता.

वेळापत्रक

या स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जाणार असून, वेळापत्रक असं आहे :

भारताच्या साखळी फेरीतल्या सामन्यांचं वेळापत्रक असं आहे.

5 जून, बुधवार, संध्याकाळी 7:30 वाजता – भारत विरुद्ध आयर्लंड – न्यूयॉर्क

9 जून, रविवार, रात्री 8 वाजता – भारत विरुद्ध पाकिस्तान – न्यूयॉर्क

12 जून, बुधवार, रात्री 8 वाजता – यूएसए विरुद्द भारत – न्यूयॉर्क

15 जून, शनिवार रात्री 8 वाजता – भारत विरुद्ध कॅनडा – लॉडरहिल

कोणत्या स्टेडियम्समध्ये होतील सामने?

ट्वेन्टी20 वर्ल्ड कपचे सामने वेस्ट इंडीजच्या वेगवेगळ्या देशांमधल्या सहा स्टेडियम्सवर आणि अमेरिकेतल्या तीन स्टेडियम्सवर खेळवले जातील.

भारताचे साखळी फेरीतले सगळे सामने अमेरिकेतच होणार आहेत. त्यातले तीन सामने न्यूयॉर्कच्या नासॉ कौंटी स्टेडियमवर खेळवले जातील तर एक सामना फ्लोरिडामध्ये सेंट्रल ब्रोवार्ड पार्कवर खेळवला जाईल.

नासॉ कौंटीतलं स्टेडियम न्यूयॉर्क राज्यातल्या लाँग आयलंडवरर ईस्ट मीडोज इथे आहे. हे एक तात्पुरतं स्टेडियम असून स्पर्धेसाठी त्याची खास उभारणी करण्यात आली आहे – म्हणजे स्पर्धेनंतर तिथले प्रेक्षकांसाठीचे स्टँड्स काढता येणं शक्य आहे. या स्टेडियमचं पिच खास ऑस्ट्रेलियात तयार करून आणण्यात आलं होतं.

ट्वेन्टी20 वर्ल्ड कपची एक सेमी फायनल ट्रिनिदाद मधल्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवली जाईल तर दुसरी गयानातील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवली जाईल.

फायनलचं यजमानपद बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलला मिळालं आहे, जे एक ऐतिहासिक स्टेडियम आहे.

ट्वेन्टी 20 वर्ल्ड कपचे नियम काय आहेत?

ट्वेन्टी 20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच ‘स्टॉप क्लॉक’चा वापर केला जाणार आहे. म्हणजे बोलिंग करणाऱ्या टीमनं एक ओव्हर संपल्यावर 60 सेकंदांत दुसरी ओव्हर सुरू करायची आहे.

अगदी अपवादा‍त्मक परिस्थिती वगळता सामने तीन तास 10 मिनिटं एवढ्या वेळात संपलेच पाहिजेत, असा नियम आयसीसीनं आणला आहे. म्हणजेच प्रत्येकी 1 तास 25 मिनिटांच्या दोन इनिंग्स आणि त्यामध्ये 20 मिनिटांचा ब्रेक

प्रत्येक डावाच्‌या सुरुवातीला सहा षटकांसाठी पॉवरप्ले असेल, म्हणजे या काळात फिल्डिंगवर निर्बंध असतील. प्रत्येक टीमला अंपायरच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी रिव्ह्यूच्या दोनच संधी मिळतील.

एखादा सामना टाय झाला असेल, तर सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल. सुपर ओव्हरही टाय झाली तर जोवर निकाल लागत नाही तोवर सुपर ओव्हर्स खेळवल्या जातील.

पाऊस आला तर?

नेहमीप्रमाणेच या स्पर्धेतही पावसानं एखाद्या सामन्यात व्यत्यय आणला तर DLS म्हणजे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनं निकाल ठरवला जाईल.

पण DLS लागू होण्यासाठीही ककाही अटी आहेत. साखळी फेरी आणि सुपर एटमध्ये प्रत्येक टीमनं किमान पाच ओव्हर्स आणि नॉकआऊट फेरीत किमान दहा ओव्हर्स खेळल्या असतील आणि पावसानं व्यत्यय आणला, तरच DLS ने निर्णय लावता येईल.

पहिल्या सेमी फायनलसाठी आणि फायनलसाठी राखवी दिवस ठेवण्यात आला आहे. पण ददुसऱ्या सेमीफायनलसाठी केवळ 250 मिनिटांचं अतिरिक्त कालावधी ठेवण्यात आला आहे.

याआधीचे विजेते आणि भारताची कामगिरी

आजवर सहा संघांनी पुरुषांच्या ट्वेन्टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं आहे.

भारतानं 2007 साली झालेला पहिलावहिला ट्वेन्टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं फायनलमध्ये पाकिस्तानवर संस्मरणीय विजय मिळवला होता.

2014 साली भारतात पुन्हा फायनलमध्ये पोहोचला, पण श्रीलंकेविरुद्ध भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

पाकिस्ताननं 2009 साली विजेपद मिळवलं होतं.

इंग्लंडनं याआधी 2010 आणि 2022 साली ही स्पर्धा जिंकली होती. गतवेळचे विजेते तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करतील. यजमान वेस्ट इंडीजनंही 2012 आणि 2016 मध्ये ट्वेन्टी20 वर्ल्ड कप जिंकला होता.

ऑस्ट्रेलियानं 2021 साली ही स्पर्धा जिंकली होती.

आजवरचे विजेेतेे :

  • 2007 – भारत
  • 2009 – पाकिस्तान
  • 2010 – इंग्लंड
  • 2012 – वेस्ट इंडीज
  • 2014 – श्रीलंका
  • 2016 – वेस्ट इंडीज
  • 2021 – ऑस्ट्रेलिया
  • 2022 – इंग्लंड

पुढचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप कुठे होईल?

कोव्हिडच्या काळातला व्यत्यय वगळता पुरुषांचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप सातत्यानं खेळवला गेला आणि या फॉरमॅटमुळे नव्या देशांत नव्या चाहत्यांपर्यंत हहा खेळ पोहोचला.

त्यामुळे ICC नं ही स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवण्याचा निर्णय घेतला.

2024 नंतर पुढचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप 2026 साली खेळवला जाणार असून त्याचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे असेल.

तर 2028 साली होणारा त्यापुढचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळवला जाईल.

ट्वेन्टी20 वर्ल्ड कपमधले महत्त्वाचे विक्रम

सर्वाधिक धावा – विराट कोहली (भारत) 27 सामन्यांत 1,141 धावा.

एका स्पर्धेत सर्वाधिक धावा – विराट कोहली (भारत) 2014 सालच्या ट्वेन्टी20 वर्ल्ड कपमध्ये 319 धावा.

सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या – ब्रेंडन मॅककलम (नूझीलंड) बांगलादेशविरुद्ध 2012 सालच्या स्पर्धेत 123 धावांची खेळी.

सर्वाधिक शतकं – ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) 2 शतकं, 2007 आणि 2016 साली.

सर्वाधिक विकेट्स – शाकिब अल हसन (बांग्लादेश) 36 सामन्यांत 47 विकेट्स

एका स्पर्धेत सर्वादिक विकेट्स – वानिंदू हसरंगा (श्रीलंका) 2021 साली 16 विकेट्स

गोलंदाजीत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी – अजंता मेंडिस (श्रीलंका) 2012 साली 8 धावांच्या मोबदल्यात. 6 विकेट्स

विकेटकीपर म्हणून सर्वाधिक डिसमिसल्स – महेंद्रसिंग धोनी (भारत) – 33 सामन्यांत 32 डिसमिसल्स

सर्वाधिक कॅचेस (क्षेत्ररक्षक) – एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) – 30 सामन्यांत 23 कॅचेस

सर्वाधिक धावसंख्या – श्रीलंका – 2007 साली केनियाविरुद्ध सहा विकेट्सच्या मोबदल्यातत 260 धावा

सर्वात कमी धावसंख्या – नेदरलँड्स 2014 साली श्रीलंकेविरुद्ध सर्व बाद 39 धावा

महिलांचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप कधी आहे?

2016 साली भारतात पुरुष आणि महिलांचे ट्वेन्टी20 वर्ल्ड कप एकाच वेळी खेळवण्यात आले होते. पण यावेळी महिलांचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप स्वतंत्रपणे खेळवला जाणार आहे.

महिलांचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप 2024 साली ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात खेळवला जाणार आहे.