You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विराट कोहली पुन्हा एकदा ठरला 'चेस मास्टर,' भारताची फायनलमध्ये धडक
"जोपर्यंत शेवटचा बॉल खेळला जात नाही, तोपर्यंत काहीही निश्चित नसतं."
ऑस्ट्रेलियाला मात दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर अंतिम फेरीत पोहोचल्याचं समाधान दिसून येत होतं.
मंगळवारी (5 मार्च) दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला नमवत भारताची क्रिकेट टीम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.
जवळपास 15 महिन्यांपूर्वी 19 नोव्हेंबर 2023 रोजी याच ऑस्ट्रेलिया टीममुळं कर्णधार रोहित शर्माचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं.
त्याची परतफेड भारतानं या सामन्यातून केली. दुबईत खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्स राखून पराभव करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं.
भारताच्या या विजयाचा हिरो ठरलेल्या विराट कोहलीनं 84 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. टीम इंडियानं 48.1 षटकांत 6 गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं.
भारताच्या विजयात विराट कोहलीसोबतच केएल राहुलच्या खेळीनंही महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने 42 धावांची नाबाद खेळी करत विजयी षटकारही लगावला.
त्यासह अय्यरने 45, अक्षरने 27 तर हार्दिक पांड्यानं 28 धावा केल्या.
प्लेअर ऑफ द मॅच म्हणजेच सामनावीराचा किताब विराट कोहलीनं पटकावला.
या विजयाचं श्रेय सर्व खेळाडूंना जातं - रोहित शर्मा
कर्णधार रोहित शर्मानं या विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं.
रोहित म्हणाला, "पिचवर जास्त फटके मारण्याची संधी मिळत नव्हती. पण आम्ही चांगली फलंदाजी केली. चांगली खेळी विजयापर्यंत घेऊन जाते. आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत.
आमच्याकडे गोलंदाजीचे 6 पर्याय आणि फलंदाजीची उत्तम समज आहे. हेच मला हवं होतं. या विजयाचं श्रेय सर्व खेळाडूंना जातं. विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून चांगलं योगदान देत आला आहे."
पुढे बोलताना रोहित म्हणाला, "हार्दिक पंड्यानंही शेवटी चांगले शॉट्स खेळले. जेव्हा तुम्ही अंतिम फेरीत पोहोचता तेव्हा तुम्हाला सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असावेत असं वाटतं.
"सध्या मी अंतिम सामन्याबद्दल जास्त विचार करत नाहीये. अंतिम सामन्यापूर्वी थोडा वेळ मिळतोय, हे चांगलं आहे," असं रोहित शर्मा म्हणाला.
'चेस मास्टर विराट कोहली'
टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 256 धावांचा पाठलाग करताना भारतीय टीमनं 43 धावांवर दोन गडी गमावले होते.
कर्णधार रोहित शर्मा 29 चेंडूत 28 धावा करून कॉनलीच्या चेंडूवर बाद झाला.
शुभमन गिलही मोठी खेळी करू शकला नाही आणि ड्वारश्विसने त्याला 8 धावांवर बोल्ड केले.
मात्र, विराट कोहलीनं मोर्चा सांभाळला. कोहली महत्त्वपूर्ण कामगिरी करत भारताला विजयापर्यंत घेऊन तर गेलाच पण सोबतच त्याने काही विक्रमही आपल्या नावे केले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीनं तो एकदिवसीय क्रिकेटचा 'चेस मास्टर' असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं.
विराट कोहलीनं श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करत संघाला सुरुवातीला बसलेल्या धक्क्यांतून सावरलं.
हे करत असतानाच कोहलीनं त्याचं 74 वं अर्धशतकही पूर्ण केलं. सोबतच लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने एकदिवसीय सामन्यात 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला आहे. हा आकडा गाठणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय.
याआधी सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू होता ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 8000 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
राहुल आणि पांड्याचीही महत्त्वपूर्ण खेळी
भारताला विजयासाठी 40 धावांची गरज असताना विराट कोहली 84 धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक थोडक्यात हुकले.
यानंतर हार्दिक पांड्यासह केएल राहुलनं पुढचा मोर्चा सांभाळला. पांड्यानं 24 चेंडूत तीन षटकार लावत 28 धावांची खेळी केली.
तर, केएल राहुल 34 चेंडूत 42 धावांची खेळी करत नाबाद राहिला. अय्यरनं 45 तर अक्षरनं 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियानं सात गोलंदाज उतरवले होते. पण एडम झाम्पा वगळता इतर कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नाही.
भारताची अथक कामगिरी सुरूच
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या अथक कामगिरीची मालिका सुरूच आहे. ग्रुप स्टेजमध्ये, भारतीय संघानं तिन्ही सामने जिंकून आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.
या सामन्यातील विजेता संघ आणि भारतदरम्यान 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
भारत अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामनादेखील दुबईमध्येच होणार हे निश्चित झालं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.