You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. बिपरजॉय चक्रीवादळ एवढे दिवस का टिकून राहिलं? चक्रीवादळांचा कालावधी लांबतो आहे का?
जवळपास आठवडाभर अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावतंय. हे वादळ एवढे दिवस कसं काय टिकून राहू शकलं? चक्रीवादळांची ताकद आणि कालावधी का वाढतोय? जाणून घेऊयात.
6 जून 2023. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. पुढच्या काही तासांतच बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली.
7 जून 2023 चा दिवस संपण्यापूर्वी आधी सीव्हियर सायक्लोन म्हणजे तीव्र चक्रीवादळ आणि मग व्हेरी सिव्हियर सायक्लोन म्हणजे अती तीव्र चक्रीवादळ अशी बिपरजॉयची तीव्रता वाढत गेली.
अवघ्या चोवीस तासांत ज्या वेगानं हे चक्रीवादळ तयार झालं, ते अगदी थक्क करणारं आहे. इतकंच नाही तर या चक्रीवादळानं आपली ताकदही बरेच दिवस टिकवून ठेवली आहे.
2. कोव्हिड डेटा लीक होण्याचे दावे; सरकार म्हणतं
राजकीय नेत्यांसह अनेक प्रसिद्ध लोकांचे पासपोर्ट क्रमांक, ओळखपत्र क्रमांक तसंच वाढदिवस आणि फोन नंबरसारखी माहिती टेलिग्राम अॅपवर उपलब्ध आहे, असा दावा केला जातोय. असंही म्हटलं जातंय की टेलिग्राम अॅपवर कोणाचीही माहिती टाकून त्यांच्यासंबंधी माहिती पाहाता येऊ शकते.
ट्विटरवर अनेकांनी स्क्रीनशॉट शेअर करून असा दावा केलाय की ते अनेक प्रसिद्ध लोकांची माहिती पाहू शकतात.
पण सरकारने हे दावे खोडून काढले आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की कोविन प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांच्यामते, “या बातम्या बिनबुडाच्या आहेत आणि चुकीच्या उद्देशाने दिलेल्या आहेत.”
3. रोजच्या आहारातल्या 'या' 7 गोष्टी खाताना काळजी घेतली नाही तर होऊ शकते विषबाधा
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमधल्या एका खाजगी महाविद्यालयातील 26 विद्यार्थिनींना उलटी, डोकेदुखी, चक्कर असा त्रास सुरू झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
या विद्यार्थिनींनी आजारी पडण्याच्या आदल्या रात्री हॉस्टेलच्या मेसमध्येच जेवण केलं होतं. त्यांना अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याचं निदान करण्यात आलं.
या घटनेच्या आधीही आंध्र प्रदेशमधल्याच श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या एका विद्यालयातील 29 विद्यार्थिनींना फूड पॉयझनिंगचा त्रास झाला होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार जगभरात दरवर्षी जवळपास 16 लाख लोकांना अन्नातून विषबाधा होते किंवा खराब अन्न खाल्यामुळे ते आजारी तरी पडतात.
4. कोहिनूर हिऱ्यासह या 9 अनमोल भारतीय वस्तू ब्रिटनकडून परत मिळणं शक्य आहे?
बहुचर्चित कोहिनूरसह अब्जावधी डॉलर्सएवढ्या मूल्याच्या भारतीय कलाकृती परत कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. ही मागणी पूर्ण होऊ शकेल का?
मागच्या आठवड्यात लंडनमध्ये टिपू सुलतानच्या तलवारीचा आणि आणखी काही कलाकृतींचा लिलाव झाला आणि 142 कोटी रुपयांची रक्कम उभी राहिली.
आधीच्या सरकारांनीसुद्धा ही मागणी लावून धरली होती. आता मोदी सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे. भारतीय वारसा परत मिळवण्यासाठी भारत सरकारपुढे काय काय आव्हानं आहेत आणि ब्रिटीश सरकार कधीकाळी लुटलेला हा अनमोल ठेवा परत देणार का याविषयी बीबीसीचे प्रतिनिधी झुबैर अहमद यांचा हा स्पेशल रिपोर्ट...
5. स्मिता पाटील : राजकीय नेत्याची मुलगी ते समांतर सिनेमातली सशक्त अभिनेत्री
साल होतं 2015. 88 वर्षांचे शिवाजीराव गिरीधर पाटील भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये गेले. जाताना आपल्या लेकीच्या म्हणजेच स्मिताच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले.
पाटील कुटुंबीयांसाठी हा मोठा क्षण होता. कारण बरोबर 28 वर्षांपूर्वी त्यांच्या लेकीला स्मिता पाटील यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन गौरविण्यात आलं होतं.
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तुरुंगवास भोगणारे शिवाजीराव स्वातंत्र्यसैनिक होते.
स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षाचे सदस्य झाले. पण पुढे 1964 मध्ये काँग्रेसवासी झाले.
काँग्रेसमध्ये असताना ते महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. तर त्यांच्या पत्नी विद्याताई पाटील या प्रसिद्ध समाजसेविका होत्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)