कोणताही संबंध नसलेले दोन लोक एकसारखे कसे दिसू शकतात?

मेसूत ओझिल आणि एन्झो फेरारी

फोटो स्रोत, Getty Images

ऍग्नेस ट्रेनने प्रवास करत होती. एक माणूस तिच्याकडे आला आणि त्याने तिच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. तो काय आणि कशाबद्दल बोलतोय याची तिला जराही कल्पना नव्हती.

त्या माणसाचा गैरसमज झालाय हे कळायला वेळ नाही लागला... तो तिला दुसरंच कोणीतरी समजून तिच्याशी बोलत होता.

तिच्यासारखीच दिसणारी दुसरी कोणीतरी त्या माणसाच्या ओळखीची होती... आपल्या हिंदी सिनेमांच्या भाषेत बोलायचं झालं तर ‘हमशकल’

तंतोतंत आपल्यासारख्याच दिसणाऱ्या या मुलीला भेटण्याची ऍग्नेसला उत्सुकता लागून राहिली. मग तिने फेसबुकवर एस्टरचे फोटो पाहिले. त्यानंतर त्या दोघीही प्रत्यक्षात भेटल्या.

“आमचे सूर लगेचच जुळले. आम्ही केवळ दिसायलाच एकसारख्या नव्हतो, तर आमची व्यक्तिमत्त्वंही बरीचशी सारखी होती.”

एस्टरने म्हटलं, की दुसऱ्या एका व्यक्तीमध्ये स्वतःचा अंश पाहणं हे खूप छानही आहे आणि आश्चर्यजनक आहे.

“ऍग्नेस आणि माझ्या आवडीनिवडी, आमचे गुणही बरेचसे सारखे आहेत, हे आम्हाला जास्त खास वाटलं.”

“संगीत, कपडे, टॅटू... आम्हाला आवडणाऱ्या अनेक गोष्टी खूप सारख्या आहेत.”

एस्टर 32 वर्षांची आहे आणि ऍग्नेस 28. या दोघींनी फ्रान्क्वा ब्रुनेलसाठी एकत्र फोटोशूट केलं. त्यानेच बीबीसी मुंडोसोबत या दोन डच महिलांची गोष्ट शेअर केली.

‘त्या दोघींना मी पाहिलं. त्या इतक्या एकसारख्या दिसतात हे पाहिल्यावर मी जाम खूश झालो,’ अशी आठवणही या कॅनेडियन फोटोग्राफरने सांगितली.

जुळी भावंड नाहीत किंवा एकमेकांशी कोणतंही नातं नाहीये, तरीसुद्धा डिट्टो एकमेकांसारख्या दिसणाऱ्या लोकांचे तो फोटोशूट करतो... मग भलेही हे लोक जगाच्या पाठीवर कोठेही असोत.

2015 साली एस्टर आणि ऍग्नेसचं फोटोशूटही त्याने असंच केलं होते.

ब्रुनेलचा ‘I'm not a look-alike!’ नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्या या प्रकल्पात सहभागी झालेल्या शेकडो लोकांपैकी एस्टर आणि ऍग्नेस एक होते.

अॅग्नेस आणि एस्टर

फोटो स्रोत, FRANÇOIS BRUNELLE

सोशल मीडियावर, लेखांधून किंवा इंटरनेटवर तुम्हीही सेलिब्रेटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो पाहिले असतील.

या लोकांचा ग्लॅमरशी काही संबंध नसतो, पण दिसायला ते एकदम तसेच दिसतात. त्यामुळेच प्रकाशझोतात येतात.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

आपल्याकडे ऐश्वर्या राय किंवा कतरिना कैफसारख्या दिसणाऱ्या मुलींचे फोटो व्हायरल झालेले दिसतात. तसाच एक फोटो गेल्या काही वर्षांत युरोपमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.

फेरारी टीमचा संस्थापक एन्झो फेरारी, जो इटालियन आहे, तो मूळ तुर्की असलेल्या जर्मन फुटबॉलपटू मेसु ओझीलसारखा दिसतो. लेखाच्या सुरुवातीलाच या दोघांचे फोटो लावले आहेत.

ब्रुनेलने जेव्हा आपला हा एकसारख्या दिसणाऱ्या लोकांचा प्रोजेक्ट सुरू केला, तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की, त्यातून एका शास्त्रीय संशोधनाला चालना मिळेल.

बार्सिलोना इथल्या एका संशोधन संस्थेमधील तज्ज्ञ जोसेफ कॅरास यांनी त्याच्याशी संपर्क साधला. कोणतेही कौटुंबिक संबंध नसताना एकमेकांसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्तींमधीला शारीरिक सारखेपणाबद्दल समजून घेण्याचा ते प्रयत्न करत होते.

बार्सिलोना विद्यापीठातील जेनेटिक्सचे प्राध्यापक मॅनेल एस्टलर यांनी या प्रकल्पाचं नेतृत्व केलं होतं.

एकसारखे दिसणारे लोक

फोटो स्रोत, FRANÇOIS BRUNELLE

एकसारख्या दिसणाऱ्या या लोकांच्या फोटोचं विश्लेषण तीन फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअर वापरून करण्यात आलं. हे सॉफ्टवेअर सहसा विमानतळावर, पोलिसांकडून किंवा तुमचा मोबाईल अनलॉक करण्यासाठी वापरले जातात.

“या सॉफ्टवेअरमधले प्रोग्राम तुम्हाला एका चेहऱ्याचं दुसऱ्या चेहऱ्याशी कसं आणि किती साधर्म्य आहे, हे तुलना करून सांगतात,” एस्टलर यांनी समजावून सांगितलं.

“आता जर जुळ्या भावंडांचा विचार केला तर त्यांच्या चेहऱ्यामध्ये या सॉफ्टवेअरमधल्या प्रोग्राममधून 90%-100% साधर्म्य दिसतं. आम्ही ज्या जोड्या निवडल्या होत्या त्यांच्यामध्ये जवळपास 75% साम्य असल्याचं किमान दोन फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअरमधून समोर आलं. 32 पैकी 25 जोड्यांमध्ये हे साधर्म्य दिसून आलं.”

32 पैकी निम्म्या जोड्यांच्या चेहऱ्यातलं साधर्म्य हे एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या भावंडांप्रमाणे असल्याचं तीन सॉफ्टवेअरच्या विश्लेषणातून समोर आलं.

एकसारख्या दिसणाऱ्या दोन मुली

फोटो स्रोत, Francois Brunelle

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बाह्य साधर्म्याखेरीज संशोधकांनी या लोकांचे डीएनए सँपल्सही तपासले आणि त्याचं विश्लेषण केलं. हे काम काहीसं कठीण होतं, कारण या प्रयोगात सहभागी झालेले लोक हे एकाच देशातले, एकाच भौगोलिक प्रदेशातले नव्हते.

“आम्ही जैविक घटकांचाही अभ्यास केला. आम्ही जीनोम, एपिजीनोम (डीएनएचं नियंत्रण करणारे रासायनिक घटक) तसंच मायक्रोबायोम यांवर संशोधन केलं. त्यांच्या शरीरातील जीवाणू आणि विषाणूंचाही अभ्यास केला.

त्यावरून आम्हाला लक्षात आलं की या जोड्यांना एकत्र आणणारे घटक हे त्यांच्या जीनोममध्ये आहेत. तर त्यांच्यामधली भिन्नता ही एपिजीनोम आणि मायक्रोबायोममुळे आहे.

त्यांच्या डीएनएमधील काही सिक्वेन्स समान होते. पण विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये दूर दूरपर्यंत कोणतंही नातं नव्हतं. संशोधकांनी त्यांच्या मागच्या पिढ्यांचा इतिहासही जाणून घेतला, पण तरीही त्यांना काही समान धागा आढळून आला नाही. त्यांच्या डीएनएमध्येच काही ठराविक वैशिष्ट्यं होती, ज्यामुळे ते सारखे दिसत होते.

आता हे सारखे घटक म्हणजे काय? तर असा एखादा घटक ज्यांमुळे त्यांच्या भुवया दाट होत्या, एखादा असा घटक ज्यांमुळे त्यांचे ओठ जाड होते, त्यांची जिवणी किंवा हनुवटीची ठेवण विशिष्ट प्रकारची होते.

“हे सगळे घटक एकत्र येऊन त्यांचे चेहरे एकसारखे बनले होते. हे साधर्म्य टक्केवारीमध्ये मोजता येतं आणि दोन लोकांमधल्या जेनेटिक व्हेरिएंटमध्ये किती साम्य आहे या आधारे ही टक्केवारी कमी-जास्त होते.”

एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती

फोटो स्रोत, Francois Brunelle

या व्यक्तींचं वजन, उंची, वय यांसारख्या गोष्टींचं विश्लेषणही करण्यात आलं.

ज्या सोळा जोड्यांमध्ये सर्वाधिक साम्य आढळून आलं त्यांचं वजनही समान होतं. त्यांच्या बायोमेट्रिक वैशिष्ट्यांचाही अभ्यास केला गेला. त्यातही बऱ्यापैकी साम्य होतं.

पण गोष्टी केवळ शारीरिक समानतेपुरत्या मर्यादित नव्हत्या.

या प्रयोगात सहभागी झालेल्यांना एक प्रश्नावली पण भरून द्यायची होती. यामध्ये 60 पेक्षा जास्त प्रश्न होते. बरेचसे प्रश्न हे या लोकांच्या दैनंदिन सवयींबद्दल होते.

धूम्रपानाचं व्यसन, शैक्षणिक पात्रता आणि इतरही गोष्टी 16 जोड्यांमध्ये समान होत्या.

“याचाच अर्थ त्यांच्यामधले जनुकीय गुणधर्म हे केवळ शारीरिक वैशिष्ट्यांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांच्या सवयी आणि वर्तनावरही त्यांचा प्रभाव होता,” संशोधक सांगतात.

फोटो

फोटो स्रोत, FRANÇOIS BRUNELLE

आमचा अभ्यास हा खूप कमी जोड्यांपुरता मर्यादित असला, तरी त्याची पद्धत ही योग्य होती. त्यामुळेच अधिक जास्त संख्येनं एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास केला तरी हे निष्कर्ष बदलणार नाहीत, असा विश्वास एस्टलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे.

आता यावरून एक प्रश्न तुम्हा-आम्हाला पडू शकतो, तो म्हणजे हुबेहूब आपल्यासारखीच दिसणारी दुसरी व्यक्ती जगाच्या पाठीवर असेल का?

“दोन व्यक्तींमध्ये 100 टक्के साधर्म्य असणं कठीण आहे. पण तुमच्याशी 75 ते 80 टक्के साधर्म्य असणाऱ्या दोन व्यक्ती तरी जगात नक्कीच असतात.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)