मर्ले ओबेरॉन: हॉलिवूड गाजवणारी एक अभिनेत्री जिने आयुष्यभर भारतीय असल्याची ओळख लपवली

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मेरेल सेबस्टियन
- Role, बीबीसी न्यूज
आजकाल बॉलिवूडच्या टॉप अॅक्ट्रेस हॉलिवूड गाजवताना दिसतात. यात प्रियांका, दीपिका, आलिया यांची नाव आघाडीवर आहेत. कधीकाळी ऐश्वर्या, मल्लिका शेरावत यांसारख्या अभिनेत्री पण हॉलिवूडमध्ये दिसायच्या.
या लिस्टमध्ये आणखीनही एक नाव आहे 'मर्ले ओबेरॉन.' जिला हॉलिवूडमध्ये काम करताना आपण भारतीय असल्याची आपली ओळख लपवावी लागली होती.
'वुदरिंग हाइट्स' या क्लासिक हॉलिवूडपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली मर्ले ओबेरॉन वंशाने अँग्लो-इंडियन होती. तिचा जन्म 1911 साली तत्कालीन मुंबईत प्रांतात झाला. पण हॉलिवूडमध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना देखील तिने तिची ओळख जगासमोर येऊ दिली नाही. ती स्वतःला 'श्वेतवर्णीय' म्हणवत राहिली.
अमेरिका स्थित लेखक मयुख सेन यांनी 2009 मध्ये केलेल्या नोंदीनुसार, ऑबेरॉन ही दक्षिण आशियाई वंशाची पहिली अभिनेत्री होती जिला ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं.
यानंतर मयुख सेन यांनी तिच्या चित्रपटांमध्ये आणि तिच्या भूतकाळात रस घ्यायला सुरुवात केली.
ते सांगतात, "समलैंगिक असल्यामुळे मी तिच्या भावना समजू शकतो. तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी तुमच्या ओळखीचा काही भाग लपवावा लागतो. कारण लोक तुम्हाला त्या ओळखीसह स्वीकारत नाहीत."
ओबेरॉनची गोष्ट दक्षिण आशियाई दृष्टिकोनातून जगासमोर यावी म्हणून मयुख सेन तिच्या चरित्रावर काम करत आहेत.
मर्ले ओबेरॉनचा जन्म मुंबईत 1911 साली एस्टेले मर्ले ओबरायन थॉम्पसन या नावाने झाला. तिची आई सिंहली (श्रीलंकन) आणि माओरी (मूळतः न्यूझीलंडची) होती तर वडील ब्रिटिश वंशाचे होते.
1914 मध्ये मर्लेच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर 1917 मध्य तिचं कुटुंब कोलकात्याला स्थायिक झालं. 1920 मध्ये तिने कलकत्ता एमेच्योर थिएट्रिकल सोसायटीमधून अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.
पहिला चित्रपट पाहून अभिनय करायचं ठरवलं
मर्ले ओबेरॉनने तिच्या आयुष्यातला पहिला वाहिला चित्रपट 1925 साली पाहिला. तो 'द डार्क अँगल' नावाचा मूकपट होता. सेन यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील विल्मा बँकीचा अभिनय पाहून मर्लेने अभिनेत्री होण्याचं ठरवलं.
लष्करात असलेल्या एका कर्नलने तिची ओळख फ्रेंच दिग्दर्शक रेक्स इंग्रामशी करून दिली. त्यानंतर ती 1928 मध्ये फ्रान्सला रवाना झाली. रेक्सने तिला त्याच्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका देऊ केल्या.

फोटो स्रोत, Getty Images
ओबेरॉनची आई शार्लोट सेलबाय ही एक कृष्णवर्णीय स्त्री होती. ती ओबेरॉनसोबत तिची मेड म्हणून फ्रान्सला गेली.
2014 मध्ये आलेल्या 'द ट्रबल विथ मर्ले' या डॉक्युमेंटरी मध्ये समजतं की, सेलबाय तिची आई नसून तिची आजी होती. सेलबायची मुलगी कॉन्स्टन्सने किशोरवयीन असतानाच ओबेरॉनला जन्म दिला. मग सेलबाय त्या दोघींना काही वर्षे बहिणी म्हणून वाढवलं.
सर अलेक्झांडर कोर्डा यांनी मर्लेला पहिला बिग बॅनर चित्रपट ऑफर केला. मर्लेने नंतर कोर्डाशी लग्न केलं. 1933 च्या 'द प्रायव्हेट लाइफ ऑफ हेन्री VIII' या चित्रपटात तिची ओळख अॅन बोलिन म्हणून करून देण्यात आली.
कोर्डाच्या पब्लिसिटी टीमने मर्लेच्या पूर्वायुष्यावर एक नवी कथा रचली. द ट्रबल विथ मर्ले या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक मारी डेलोफस्कीने त्यांच्या नोट्समध्ये नमूद केलंय की, "मर्लेचं जन्मस्थान तस्मानिया असल्याचं ठरवण्यात आलं. कारण तस्मानिया अमेरिका आणि युरोपपासून दूर होतं. तसंच हा प्रदेश मूलतः ब्रिटिश प्रदेश म्हणून ओळखला जायचा."
मर्लेची खोटी ओळख
डेलोफस्कीच्या म्हणण्यानुसार, मर्ले ही एक उच्चवर्गीय मुलगी होती. तिचे वडील शिकार करताना मरण पावले होते आणि ती होबार्टमार्गे भारतात स्थलांतरित झाली होती. अशी खोटी गोष्ट रचण्यात आली.
मर्ले ओबेरॉनचं नाव लवकरच तस्मानियापर्यंत पोहोचलं. तिच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियन मीडियाने तिला ऑस्ट्रेलियन मानून कव्हर केलं. तिने पण बऱ्याचदा तस्मानिया हे आपलं होमटाऊन असल्याचं सांगितलं, पण कोलकात्याचं नाव घेण्याचं तिने टाळलचं.
पण कलकत्त्याला मात्र मर्लेची आठवण येत राहिली.
वरिष्ठ पत्रकार सुनंदा के दत्ता सांगतात, "1920 आणि 1930 च्या दशकातील अनेक ब्रिटीश मेमॉयरमध्ये तिचा उल्लेख आढळून यायचा. लोक दावा करायचे की, तिचा जन्म कलकत्त्यात झालाय. ती टेलिफोन एक्सचेंजमध्ये ऑपरेटर म्हणून काम करायची. तिने फिरपो रेस्टॉरंटमध्ये एक स्पर्धा जिंकली होती."

फोटो स्रोत, ARCHIVE PHOTOS
पण मर्लेला जेव्हा हॉलिवूड चित्रपटांमध्ये जास्त काम मिळायला लागलं तेव्हा ती अमेरिकेत गेली. 1935 मध्ये आलेल्या 'द डार्क अँगल' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ऑस्कर नामांकन मिळालं होतं.
पण ती प्रसिद्ध झाली ते 1939 मध्ये रिलीज झालेल्या वुदरिंग हाइट्समधून. या चित्रपटात ती महान अभिनेते लॉरेन्स ऑलिव्हियर सोबत लीड रोलमध्ये होती.
सेन यांच्या म्हणण्यानुसार, मर्लेला दुसरी अभिनेत्री विवियन ली च्या जागी निवडण्यात आलं होतं. विवियनचा जन्मही भारतात झाला होता. सेनच्या म्हणण्यानुसार तेव्हा मर्लेचं नाव प्रसिद्ध झालं होतं साहजिकच ती भूमिका तिच्या पदरात पडली.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या समीक्षेनुसार, मर्लेने भूमिकेला न्याय मिळवून दिला होता.
गोरं दिसण्याच्या प्रयत्नात...
मयुख सेनच्या म्हणण्यानुसार, 1930 पर्यंत मर्ले हॉलिवूडची मोठी स्टार बनली होती. तिच्या जवळच्या वर्तुळात अव्वल दर्जाचे संगीतकार कोल पोर्टर आणि पटकथा लेखक नोएल कॉवर्ड यांचा समावेश होता.
सेन यांच्यामते, कोर्डा आणि सुप्रसिद्ध निर्माता सॅम्युअल गोलडायन यांनी ओबेरॉनला पाश्चात्य रंगात रंगवण्याचा बराच प्रयत्न केला. जसं की, तिचे शब्दोच्चार सुधरवले जेणेकरून तिच्यात दक्षिण आशियाई वंशाच्या गोष्टी राहणार नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
या व्यतिरिक्त ओबेरॉनचं स्वतःचं असं वैशिष्ट्य होतं. तिचा रंग हलक्या टोनचा होता. त्यामुळे तिला पडद्यावर गोरं करणं अगदी सोप्प होतं.
सेन सांगतात, "एवढं करूनही तिच्या मिश्र रंगांची चर्चा व्हायची. त्या काळातले बरेच सिनेपत्रकार तिच्या रंगाबद्दल लिहायचे. त्यामुळे या चर्चा दडपण्याची गरज तिला वाटायची."
गोरं बनण्याच्या प्रयत्नात ब्लीचिंगमुळे तिच्या त्वचेचं खूप नुकसान झाल्याचे दावेही करण्यात आले.
1937 मध्ये ओबेरॉन कार अपघातात जखमी झाली. आणि तिचा चेहरा भाजला. त्याच दरम्यान सिनेमॅटोग्राफर लुसियन बॅलार्ड यांनी एक तंत्र विकसित केलं होतं ज्यामुळे चेहऱ्यावरील दोष लपवले जायचे. याचाच वापर करून ओबेरॉन आपल्या चेहऱ्यावरच्या गोष्टी लपवायची. पुढे ओबेरॉनने कोर्डाला घटस्फोट दिला आणि 1945 मध्ये बॅलार्डशी लग्न केले.
सेन सांगतात की, "मर्लेचा चेहरा पांढरा करण्यासाठी बॅलार्डने आणखीन एक टेक्निक वापरलं होतं असं म्हटलं जातं."
ओबेरॉनचा पुतण्या मायकेल कोर्डाने 1979 मध्ये चार्म्ड लाइव्ह्स हे कौटुंबिक आठवणींवरचं पुस्तक लिहिलं. त्याने त्यात मर्लेचं खरं नाव आणि जन्म ठिकाण लिहिल्याबद्दल, मर्लेने त्याच्यावर खटला भरण्याची धमकी दिली होती. म्हणून त्याने त्या पुस्तकातून तो भाग वगळला.
त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "मला वाटलं की आता बराच काळ निघून गेलाय. पण ती अजूनही तिच्या भूतकाळाबद्दल संवेदनशील आहे."
ओळख लपवणं कठीण बनलं
एवढ्या दिवसात आपली खरी ओळख लपवून ठेवणं तिच्यासाठी कठीण जातं होतं. स्थानिक पत्रकार तिला तिच्या पूर्वायुष्याबद्दल प्रश्न विचारतील म्हणून 1965 मध्ये मर्लेने आपला ऑस्ट्रेलिया दौरा टाळला, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले.
अनेक रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं की, 1978 मध्ये तिच्या शेवटच्या टास्मानिया भेटीच्या वेळीही ती तिच्या ओळखीबद्दल खूप चिंतेत होती.

फोटो स्रोत, Getty Images
तिने तिच्या पूर्वायुष्याबद्दलचं सत्य कधीच जाहीरपणे स्वीकारलं नाही. 1979 मध्ये पक्षाघाताने तिचं निधन झालं. पण या रहस्यावरचा पडदा उठायला 1983 साल उजडावं लागलं. कारण तिचं जीवनचरित्र प्रकाशित झालं होतं.
'प्रिन्सेस मर्ले: द रोमँटिक लाइफ ऑफ मर्ले ओबेरॉन'च्या लेखकांनी मुंबईमधून जाऊन तिचं बर्थ सर्टिफिकेट, तिची धार्मिक दीक्षा प्रमाणपत्रे, भारतीय नातेवाईकांसोबतची पत्रे आणि फोटो गोळा केले आणि या पुस्तकात छापून टाकले.
मात्र, सेन यांना आशा आहे की ते त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून दक्षिण आशियाई महिला म्हणून मर्लेने ज्या दबावांना तोंड दिलं ते जगासमोर आणतील.
ते म्हणतात, "हा संघर्ष सोपा नसतो. जेव्हा तिचा संघर्ष समजतो तेव्हा तिला जज करण्याऐवजी तिच्याबद्दल आदर आणि सहानुभूतीची भावना निर्माण होते."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








