द टर्मिनल: तब्बल 18 वर्षे विमानतळावरच काढलेल्या व्यक्तीचा अखेर मृत्यू

मेहरान करीमी नासेरी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेहरान करीमी नासेरी

पॅरिसच्या विमानतळावर तब्बल 18 वर्षे वास्तव्य करणाऱ्या इराणी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मेहरान करीमी नासेरी असं या व्यक्तीचं नाव आहे.

राजनैतिक अडचणीत सापडलेल्या मेहरान करीमी नासेरी यांनी 1988 मध्ये रॉईसी चार्ल्स डी गॉल विमानतळाच्या एका छोट्याशा भागाला आपलं घर बनवलं होतं.

नासेरी यांच्यावर आधारित 2004 साली 'द टर्मिनल' नावाचा सिनेमाही हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात प्रसिद्ध अभिनेते टॉम हँक्स यांनी नासेरींची भूमिका साकारली होती.

नासेरी यांना शेवटच्या काळाच फ्रान्समध्ये राहण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र, काही आठवड्यांपूर्वी ते विमानतळावर परत आले होते आणि तिथंच त्यांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला, असं विमानतळाच्या अधिकाऱ्याने एएफपीला सांगितलं.

1945 मध्ये इराणच्या खुझेस्तानमध्ये नासेरींचा जन्म झाला. आईच्या शोधात ते पहिल्यांदा युरोपला गेले.

इमिग्रेशनची अचूक कागदपत्रे नसल्यामुळे यूके, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांतून हकालपट्टी झाली होती. मग त्यांनी बेल्जियममध्ये काही वर्षे घालवली. त्यानंतर तो फ्रान्सला गेले, जिथे त्यांनी विमानतळाच्या 2F टर्मिनलला आपलं घर बनवलं.

त्यांनी ट्रॉलीने वेढलेल्या बेंचवर आयुष्य वसवलं. त्यावरच ते आवश्यक सामान ठेवत. विमानतळावर राहताना त्यांनी वहीत आपल्या रोजच्या नोंदी लिहिणं आणि पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचण्यात दिवस घालवले.

नासेरींच्या आयुष्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. त्यातील एक होते स्टीव्हन स्पिलबर्ग. या स्पीलबर्ग यांनीच 'द टर्मिनल' सिनेमा दिग्दर्शित केला, ज्यात टॉम हँक्स आणि कॅथरिन झेटा-जोन्स यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

स्टीव्हन स्पिलबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टीव्हन स्पिलबर्ग

'द टर्मिनल' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर जगभरातील माध्यमांनी नासेरींना अक्षरश: गराडा घालण्यास सुरुवात केली. स्वत:ला 'सर आल्फ्रेड' म्हणवून घेणारे मेहरान करीमी नासेरी दिवसाला सरासरी सहा मुलाखती द्यायचे, असं ले पॅरिसियनच्या वृत्तात म्हटलंय.

1999 मध्ये शरणार्थी दर्जा आणि फ्रान्समध्ये राहण्याचा अधिकार मिळाल्यानंतरही ते 2006 पर्यंत विमानतळावरच राहिले. नंतर त्यांना आजारपणावरील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, 'द टर्मिनल' सिनेमातून मिळालेल्या पैशाचा वापर करून ते वसतिगृहात राहिले, असं फ्रेंच वृत्तपत्र लिबरेशननं म्हटलंय.

काही आठवड्यांपूर्वी नासेरी पुन्हा विमानतळावर परत आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या ताब्यात अनेक हजार युरो सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.