जॉनी डेपने एंबर हर्ड विरोधातला खटला जिंकला, नुकसान भरपाई म्हणून मिळणार 116 कोटी रुपये

फोटो स्रोत, Getty Images
हॉलीवुड अभिनेता जॉनी डेपने त्याची पूर्व पत्नी एंबर हर्डविरोधातील खटला जिंकला आहे. एंबर हर्डविरोधात त्याने मानहानीचा खटला दाखल केला होता. एंबर हर्डने जॉनी डेपवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते त्यात तथ्य नसल्याचं ज्युरींना आढळून आलं आहे.
जॉनी डेपने मानहानीची नुकसान भरपाई म्हणून 50 मिलियन डॉलर्सची मागणी केली होती. संबंधित राज्यात असलेल्या मर्यादांमुळे जॉनी डेपला 15 मिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे 116 कोटी 33 लाख रुपये देण्यात यावे असे आदेश कोर्टाने एंबर हर्डला दिले आहेत.
यातील 10 मिलियन डॉलर्स हे नुकसान भरपाई म्हणून मिळतील तर 5 मिलियन डॉलर्सचा दंड एंबर हर्डला ठोठावला आहे, असे एकूण 15 मिलियन डॉलर्स जॉनी डेपला मिळणार आहेत.
अंबर हर्डने काउंटर केस केली होती त्यात तिला देखील दोन मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई देण्याची सूचना कोर्टाने जॉनी डेपला केली आहे.
हॉलीवूडपट तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच पायरेट्स ऑफ कॅरेबियन हा चित्रपट आणि त्याच्या सीरिजबद्दल ऐकलं असेल. पायरेट्स ऑफ कॅरेबियनच्या चाहत्यांना जॉनी डेप माहीत नाही असं होणारच नाही. त्यांना तीन वेळा ऑस्करसाठी नामनिर्देशन मिळालं होतं आणि गोल्डन ग्लोब पुरस्काराचे मानकरीही ते ठरलेत.
हॉलीवूड अभिनेते जॉनी डेप आणि त्यांची माजी पत्नी एंबर हर्डच्या कोर्ट केसची जगभरात चर्चा झाली.
नेमकं काय झालंय?
58 वर्षांच्या जॉनी डेप यांनी आपली माजी पत्नी आणि अभिनेत्री एंबर हर्डवर खटला दाखल होता. 2018 मध्ये एंबर यांनी वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रात एक मोठा लेख लिहिला होता.
आपण कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहोत, असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. अर्थात त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख या लेखात केला नव्हता. जॉनी डेप यांनी म्हटलंय की हा लेख त्यांच्यासाठी अपमानास्पद आहे आणि त्यामुळे त्यांच्या करिअरचं नुकसान होतंय.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर जॉनी डेप यांनी आपल्या माजी पत्नीवर 50 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केलाय. त्याचवेळी एंबर यांनीही 100 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केलाय.
आता या सिव्हिल केसची सुनावणी सुरू आहे. यापूर्वीही म्हणजे 2016 मध्ये एंबर हर्ड यांनी जॉनी डेप यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता.
जॉनी डेप-एंबर हर्ड यांचं लग्न
या दोघांची पहिली भेट 2011 मध्ये हॉलीवूड चिपत्रट 'द रम डायरी' च्या सेटवर झाली होती.
तिचं चित्रिकरण पुर्तोरिकोमध्ये झालं होतं. काही वर्षांनंतर ते पुन्हा एकदा चित्रपटाच्या पब्लिसिटीदरम्यान भेटले आणि तिथूनच त्यांचं नातं सुरू झालं. 2012 पासून ते डेट करत होते आणि 2015 मध्ये त्यांचं लग्न झालं.
नात्यात अंतर
लग्नाच्या 15 महिन्यांनंतर त्या दोघांनी आपलं नातं संपुष्टात आल्याचं घोषित केलं. एंबर हर्डने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि चेहऱ्यावरच्या मारहाणीच्या खुणा दाखवून जॉनी डेपविरूद्ध प्रतिबंधात्मक आदेशाची विनंती केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
जॉनी डेप यांनी घटस्फोटानंतर एंबरला 70 लाख डॉलर्स दिले. एंबरने ही रक्कम आपण दान करणार असल्याचं सांगितलं होतं. जॉनी डेपच्या टीमने या वक्तव्याबाबत प्रश्न विचारले आहेत.
काय आहेत आरोप
एंबर हर्डने साक्षीदरम्यान हे आरोप केलेत-
"माझ्यासाठी हिंसेचं चक्र 2012 मध्येच सुरू झालं होतं. 2012 मध्ये एकदा मी जॉनी डेप यांच्या हातावरचा एक टॅटू बघून हसत होते. तेव्हाच त्यांनी माझ्यावर पहिल्यांदा हल्ला केला. त्यांनी हातावर त्यांची आधीची मैत्रीण विनोना रायडरच्या नावाचा टॅटू काढला होता. मला वाटत होतं की ते मस्करी करतायत म्हणून मी हसत होते. पण त्यांनी माझ्या थोबाडीत मारली.
"जॉनी डेप एक अत्यंत सदगृहस्थ आहेत. पण दारू आणि ड्रग्स घेतल्यावर त्यांना राग आवरत नाही. त्यांना असं वाटायचं की मी दुसऱ्या कोणासोबत नातं जोडतेय.

फोटो स्रोत, Getty Images
"जॉनी डेपने आपली ड्रग्सच्या सेवनाची सवय लपवण्याचा प्रयत्न केला. ते कोकेन घ्यायचे आणि दारू प्यायचे. ते मला मारहाण करायचे आणि गायब व्हायचे. परत यायचे तेव्हा ते नशेत नसायचे. तेव्हा मात्र ते माझ्याशी खूपच प्रेमाने वागायचे. ते माझी माफीही मागायचे. म्हणायचे की सगळं ठीक होईल. 2013 सालापर्यंत माझं मन दोन गोष्टींमध्ये विभागलं होतं. एकीकडे माझं जॉनीवर प्रेम होतं आणि दुसरीकडे ते माझ्या आयुष्यातली सगळ्यांत वाईट गोष्ट झाले होते."
एंबरने आपल्या साक्षीदरम्यान एक घटना सांगितली. त्या आणि जॉनी सुट्टीवर होते. त्या म्हणाल्या की, "एक स्त्री आली. ती माझ्यासमोर झुकली. तिने तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. मला वाटलं की ती नशेत असेल. त्यानंतर जॉनीला राग आला आणि आरडाओरडा करू लागले. त्या स्त्रीसोबत जोरात भांडणही झालं. आम्ही परतलो तेव्हा जॉनी ड्रग्स शोधायला लागले. त्यांनी माझी अंडरवेअरसुद्धा फाडून टाकली."
( जॉनी डेप मारहाणीच्या आरोपांना नाकारत राहिलेत.)
साक्षीदरम्यान जॉनी डेप यांचे आरोप -
"मला तर वाटतंय की एंबर हर्डला हिंसा आणि भांडणाची सवय आणि गरजही होती. एंबर सतत माझ्याविरूद्ध अपमानास्पद, टोचणाऱ्या, टॉक्सिक आणि हिंसात्मक चर्चा करायची आणि ती हिंसकही व्हायची. ती कधीकधी मला थोबाडीत मारायची. तर कधी ती माझ्या डोक्यावर टीव्हीचा रिमोट मारायची किंवा चेहऱ्यावर वाइनचा ग्लास फेकायची. मी जर कोणाशी वाईट वागलो असेन तर तो मी स्वतः आहे. मी एकदा झोपेतून जागा झालो तेव्हा माझ्या बाजूला एक विचित्र गोष्ट मिळाली. ती मानवी विष्ठा होती."
( 2018 मध्ये यूकेमध्ये चाललेल्या एका खटल्यात एंबर हर्डने हे आरोप फेटाळून लावले आहेत.)
जॉनी डेपच्या वकिलांच्या मते आक्रमकता आणि हिंसाचार एंबरकडूनच केला जातोय आणि ती आपलं करिअर जास्तीत जास्त चांगलं करण्यासाठी पीडित असल्याचं नाटक करतेय.
जॉनी डेपचं ड्रग्सचं प्रकरण
केसच्या सुनावणीदरम्यान जॉनी डेप म्हणाले की त्यांना पाठीच्या दुखापतीसाठी औषधोपचार सुरू असातना त्यांना ओपिऑइडचं व्यसन लागलं. हे औषध त्यांना उपचारासाठी दिलं गेलं. आपण ड्रग्सचं व्यसन सोडण्याचा प्रयत्न करत असताना एंबर आपल्याला विड्रॉवल सिम्प्टम्स कमी करणारी औषधं घेऊ देत नव्हती, असाही आरोप त्यांनी केलाय.

फोटो स्रोत, Getty Images
केसशी संबंधित इतर बाबी आणि साक्षी
- जॉनी डेप यांनी ब्रिटिश कलाकाराला पाठवलेल्या 2013 मधल्या एका टेक्स्ट मेसेजवर सुनावणी झाली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की तिचा चेहरा जाळून टाकूया. जाळण्यापूर्वी तिला बुडवूया. कोर्टात या टेक्स्टबद्दल जॉनी डेप यांना विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले की, हे मॉन्टी पाथइन सिनेमाशी संबंधित आहे. त्यात हडळींना जाळण्याचा आणि बुडवण्याचा उल्लेख केलाय. ते म्हणतात की त्यांनी दहा वर्षांच्या वयापासून हा चित्रपट पाहिलाय आणि ही एक मस्करी होती.
- न्यायाधीशांनी जॉनी डेप आणि एंबरमधल्या संवादाची ऑडियो रेकॉर्डिंगही ऐकलीय. त्यात जॉनी डेप घाणेरड्या भाषेत बोलताना ऐकू येतंय. एका टप्प्यावर एंबर हर्ड जॉनी डेप यांना ओरडली. त्यांनी सिगारेट दुसऱ्या कोणावरतरी विझवावी असं ती म्हणतेय. जॉनी डेप एंबरला तिच्या वजनावरून अपमानास्पद बोलताना ऐकू येतं.
- न्यायाधीशांनी या माजी दांपत्याच्या थेरपिस्टची साक्षही ऐकली. जॉनी आणि एंबर एकमेकांशी वाईट वागत होते, असं त्यांनी सांगितलं. जॉनी डेप ड्रग्सची सवय सोडायचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही साक्ष दिली.
- सायकॉलजिस्टची साक्ष - एंबर हर्डच्या टीमकडून फॉरेन्सिक सायकॉलॉजिस्टने साक्ष दिलीय. त्यांच्या मते एंबर कौटुंबिक हिंसाचाराचा बळी होती. त्यांनी एंबरसोबत या विषयावर अनेकदा चर्चाही केली. जॉनी डेपच्या वतीने बोलावलेल्या सायकॉलॉजिस्टच्या मते एंबरला दोन प्रकारच्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत.
लाइव्ह ट्रायल
या खटल्याची सुनावणी लाइव्ह ब्रॉडकास्ट होतेय. या केसमध्ये अनेक हाय प्रोफाइल लोकही साक्ष देणार आहेत. त्यात एलॉन मस्क आणि अभिनेता जेम्स फ्रँको यांचीही नावं आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








