कॅटरिना कैफ-विक्की कौशलचा विवाहसोहळा : 700 वर्षे जुना किल्ला, 120 पाहुणे आणि बरंच काही

विकी कौशल-कॅटरिना

फोटो स्रोत, Hype PR

    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, जयपूरहून बीबीसी हिंदीसाठी

अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल हे आज लग्नाच्या बेडीत अडकले. गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा विवाहसोहळा आज (9 डिसेंबर) राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये पार पडला.

दरम्यान, अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ या जोडीच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. पण या दोघांनीही आपल्या लग्नाबद्दल गुप्तता बाळगली होती.

मात्र, राजस्थानात प्रशासनानं या दोन्ही सेलिब्रिटींच्या लग्नासाठी कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्याच्या आधारे माध्यमांमध्ये यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या.

सवाई माधोपूरमध्ये शुक्रवारी ( 3 डिसेंबर) जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांच्या अध्यक्षतेत एक बैठक बोलण्यात आली. त्यात वेडिंग प्लानर्स, हॉटेलचे मालक, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

"स्थानिक प्रशासनाची बैठक घेतली आहे. चौथ का बरवाडामध्ये स्वच्छता आणि कायदा तसंच सुव्यवस्था राखण्यासाठी निर्देश दिले आहेत. काही घटना घडू नये आणि वाहतूक सुरळीत चालावी यासाठी चर्चा करण्यात आली आहे," असं बैठकीनंतर सवाई माधोपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं होतं.

लग्नाचा सोहळा 7 ते 10 डिसेंबरपर्यंत चालेल आणि त्यात 120 पाहुणे उपस्थित असतील, असं त्यांनी सांगितलं. या दरम्यान कोरोनाबाबतची काळजी घेतली जाईल, अशी माहितीही दिली होती.

कशी करण्यात आली होती तयारी?

"कोव्हिडच्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांचे दोन डोस पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे. हॉटेल व्यवस्थापनही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करत आहेत. पाहुण्यांची आरटीपीसीआर चाचणीही आवश्यक असेल. लसीकरण नसेल त्याला जाऊ दिलं जाणार नाही," असं जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांनी सांगितलं होतं.

विकी कौशल-कॅटरिना

फोटो स्रोत, Hype PR

यापूर्वी सवाई माधोपूर जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी सुरेश गुप्ता यांनी बीबीसीबरोबर बोलताना या बैठकीबाबत बोलताना सवाई माधोपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला होता.

"अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ यांच्या विवाह सोहळ्याच्या आयोजनाआधी गर्दीवर नियंत्रण आणि कायदा तसेच सुव्यवस्थेच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करता, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 3.12.2021 रोजी सकाळी 10:15 वाजता बैठक आयोजित केली आहे," असं सवाई माधोपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. सूरज सिंह नेगी यांनी या पत्रात स्पष्ट लिहिलं होतं.

राजस्थानात सवाई माधोपूर जिल्हा मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर चौथ का बरवाडामध्ये एका डोंगरावर असलेल्या जवळपास 700 वर्षे जुन्या किल्ल्याचं रुपांतर हॉटेलमध्ये केल्यानंतर प्रथमच याठिकाणी होत असलेल्या विवाहाबाबत देशभरात चर्चा सुरू होती.

लग्नाच्या कार्यक्रमांसाठी चार डिसेंबरपासून पाहुणे यायला सुरुवात झाली होती

बरवाडा फोर्टमध्ये लग्नासाठी पाहुण्यांसाठी चार ते बारा डिसेंबरपर्यंत रूम, सुईट बूक करण्यात आले होते.

विकी कौशल-कॅटरिना

फोटो स्रोत, Hype PR

लग्नाबाबत हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर, त्यांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला होता. मात्र, हॉटेलमध्ये सहा ते आठ डिसेंबरपर्यंत रूम बूक करण्यासाठी संपर्क केला असता हॉटेल व्यवस्थापनानं सात ते आठ डिसेंबरपर्यंत फोर्टमध्ये बुकींग नसल्याचं सांगत स्पष्ट नकार दिला.

700 वर्षे जुन्या किल्ल्यात संपन्न झाला विवाहसोहळा

राज्यातील शाही विवाह सोहळ्यांचा विचार करता उदयपूरमध्ये अनेक मोठे उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटीजचे विवाह झालेले आहेत. मात्र, सवाई माधोपूरमध्ये प्रथमच विवाह झाला आहे.

सवाई माधोपूरमध्ये चौथ का बरवाडामध्ये बरवाडा फोर्टमध्ये एक आलिशान हॉटेल तयार करण्यात आलं आहे. नुकत्याच सुरू झालेल्या याच हॉटेलमध्ये कॅटरिना आणि विक्की कौशल यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

विकी कौशल-कॅटरिना

फोटो स्रोत, Hype PR

या हॉटेलचा शुभारंभ याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात झाला होता. त्याच्या उद्घाटनासाठी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा याठिकाणी आली होती.

एका स्थानिक पत्रकारानं दिलेल्या माहितीनुसार, बरवाडा फोर्टमध्ये 48 रूम, सुईट आहेत. एका दिवसासाठी त्याचं भाडं 50,000 ते 7 लाख रुपयांपर्यंत आहे.

"लग्न सोहळ्यात 120 पाहुणे सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच सात ते दहा डिसेंबरपर्यंत विवाह सोहळ्याचे कार्यक्रम असतील, असं मला सांगण्यात आलं आहे," असं सवाई माधोपूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)