अंतिम : आता सलमान खान म्हणणार, 'ही आपली लायकी', 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक

सलमान खान

फोटो स्रोत, SKF PRODUCTION

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सलमान खानचा चित्रपट 'अंतिम : द फायनल ट्रुथ' रिलीज झाला आहे.

कोरोना काळानंतर गेल्या दोन वर्षात रिलीज होणारा हा सलमानचा पहिला चित्रपट आहे, जो थिएटर्समध्ये रिलीज होतोय. याआधी आलेला सलमानचा 'राधे' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

'अंतिम' या चित्रपटात सलमान खान शीख व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.

धर्म हा मुद्दा लोकांसाठी नेहमीच संवेदनशील ठरला आहे. अशात सलमानने ही भूमिका साकारली असताना काय काळजी घेतली या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणतो, "प्रत्येक चित्रपटातली कोणतीही भूमिका साकारताना काळजी घ्यावीच लागते. सिनेमात जेव्हा आपण कोणत्याही संस्कृती आणि परंपरांचं सादरीकरण करतो तेव्हा ते दाखवताना त्यांचा आदर राखला गेलाच पाहिजे."

पत्रकारांशी बोलताना सलमान खाननं म्हटलं होतं की, "अंतिम या चित्रपटात शिखाला राजासारखं दाखवलं आहे. यात आम्ही एका शीख व्यक्तीचं पात्र अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे. याआधीही बजरंगी भाईजानमध्ये आम्ही काहीही चुकीचं दाखवलं नव्हतं."

हिरोईनची मागितली माफी

सलमान खानचा असा कोणताही चित्रपट नाही, ज्यात नायिका नसेल. पण हा पहिला चित्रपट आहे ज्यात तो नायिकेसोबत रोमान्स करताना दिसणार नाही.

सलमान खान

फोटो स्रोत, Skf production

सलमान खान म्हणाला, "हा चित्रपट जेव्हा बनत होता, तेव्हा यात आम्ही एक रोमँटिक ट्रँक ठेवला होता. तो कोणती अभिनेत्री करणार हेही निश्चित झालं होतं. पण जेव्हा मी चित्रपटाचे रशेस् पाहिले, तेव्हा मला वाटलं की हा नायक एकटाच असला पाहिजे, नाहीतर त्याचं पात्र तितकं ठाशीव वाटत नाही."

सलमान म्हणतो की, यानंतर त्याने त्या अभिनेत्रीची माफी मागितली आणि वचन दिलं की पुढे ते दोघं जरूर एकत्र काम करतील.

"मी तिचं नाव तर नाही सांगू शकत. तिची ऑडिशन वगैरे पण चांगली झाली. पण जेव्हा आम्ही परत सोबत काम करू तेव्हा मी सांगेन," सलमान म्हणतो.

आयुष शर्मा

फोटो स्रोत, Skf production

फोटो कॅप्शन, आयुष शर्मा

"या चित्रपटात रोमान्स नसला तरी गाणी भरपूर आहेत. जे आम्ही केलं ते तुमच्या समोर आहे. हा चित्रपट तुमची भरपूर करमणूक करणार आहे आणि लोक म्हणूनच चित्रपटगृहात येतील."

कोरोनाचा परिणाम

सलमान खान म्हणाला की, या चित्रपटातलं प्रमुख पात्र शीख असलं तरी याचं शूटिंग पंजाबमध्ये होऊ शकलं नाही.

त्याने सांगितलं की, "आम्ही आधी आमच्या चित्रपटाचं शूटिंग पंजाब आणि हरियाणात करणार होतो. पण लॉकडाऊनमुळे आम्हाला यांच शूटिंग मुंबईतच करावं लागलं."

सलमानने साकारलेलं हे शीख पात्र मराठीही बोलतं. कारण त्याचं बालपण मुंबईत गेलं आहे.

सलमानने कोरोना काळामुळे पिक्चरच्या तिकिटांच्या वाढलेल्या किमतीवरही भाष्य केलं आणि म्हणाला की मल्टिप्लेक्सच्या तिकिटांचे दर वाढलेत आणि तसं होणं साहजिक आहे.

"दीड वर्षापासून त्यांची कमाई बंद आहे, त्यांनाही थिएटर चालवायचं आहे, आपल्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायचे आहेत, स्वतःचं घर चालवायचं आहे," तो म्हणाला.

"कोरोनाबदद्ल काहीही सांगता येत नाही. तो परत आपल्यावर हल्ला करू शकतो. पुढे काय होईल कोणाला माहीत? कदाचित अशी परिस्थिती येईल की थिएटरमध्ये फक्त 30 टक्के लोकच जाऊ शकतील. जर कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढलं तर पुन्हा थिएटर्स बंद होतील. अशात थिएटरवाल्यांना कमाई तर करावीच लागेल ना."

सलमान खान

फोटो स्रोत, SKF PRODUCTION

"अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की 'जय हो' चित्रपटाच्या वेळेस मी 650 रुपयांचं तिकिट 250 रुपयांना करायला लावलं होतं. तेव्हा कोणी याचं कौतुक केलं नाही. आमचं तर सगळं नुकसान झालं. त्यामुळे यावेळी थिएटरवाले जसं म्हणतील तसंच आम्ही करू."

'थिएटर कधीच बंद होणार नाहीत'

सूर्यवंशी चित्रपट थिएटरला रिलिज झाला आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यावर सलमान खान म्हणाला की थिएटर कधी बंद होणार नाही कारण आपल्याकडे करमणुकीची इतर साधनं नाहीत.

"बाहेरच्या देशात अनेक पर्याय आहेत करमणुकीचे. पण आपल्याकडे इतके नाहीत. त्यामुळे लोक सहकुटुंब थिएटरमध्ये जाऊन आवडीने सिनेमा पाहातात. जी मजा आपल्या हिरोला मोठ्या पडद्यावर पाहाण्यात आहे ती मोबाईलमध्ये नाही. जेव्हा 'राधे' चित्रपट थिएटर नाही तर मोबाईलवर पहावा लागला तेव्हा लोकांना मजा आली नाही."

'पायरसी थांबवणं गरजेचं'

चित्रपटांची पायरसी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि चित्रपटसृष्टीला यामुळे मोठा फटका बसतो.

याबद्दल सलमान म्हणतो की, 'राधे' चित्रपट सर्वाधिक पायरसी झालेला चित्रपट ठरला. तसं तर तो चित्रपट डिजीटलमध्ये रिलिज झाला होता. 250 रूपये देऊन 10-12 लोक पाहू शकत होते, तरीही खूप पायरसी झाली.

"जे लोक पायरेटेड चित्रपट बघतात त्यांना पकडून चालणार नाही, तर जे लोक अशी पायरसी करतात त्यांना पकडायला हवं. जे पायरसी करतात त्यांना तुरुंगात पाठवा. सरकारी यंत्रणा आपलं काम करतील पण अशा प्रकारचे रॅकेट चालवणाऱ्यांना थांबवायला हवं."

'माझ्या कुटुंबातल्या मुलाने असं काम केल्याचा मला आनंद आहे'

या चित्रपटात सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतोय. त्याच्याबद्दल बोलताना सलमान म्हणतो, "मला आनंद आहे की माझ्या कुटुंबातल्या एका मुलाने इतकं चांगलं काम केलं. तुम्ही त्याच्या कामात काहीही चूक दाखवू शकत नाही."

हा चित्रपट मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न' चा रिमेक आहे. याची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केलीये तर दिग्दर्शन महेश मांजरेकरांचं आहे.

या चित्रपटात अभिनेत्री महिमा मकवाना बॉलिवुडमध्ये डेब्यू करत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)