मी माझ्या आईशी का लग्न केलं?

लीलियन फेडरमॅन आणि फिलीस इर्विन

फोटो स्रोत, faderman

फोटो कॅप्शन, लीलियन फेडरमॅन आणि फिलीस इर्विन

ही दोन महिलांच्या प्रेमाची कहाणी आहे. फिलीसला तिची लेस्बियन पार्टनर लिलियन यांनी दत्तक घेतलं होतं. तिला आपलं कुटुंब तयार करायचं होतं. पण पुढे त्यांच्या आयुष्यात दुसरंच काहीतरी घडणार होतं.

1971 मध्ये महिला मुक्ती आंदोलनाच्या सुरुवातीच्या वर्षांत कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक लिलियन फेडरमॅन यांनी संस्थेच्या संचालक फिलीस इर्विन यांच्याशी संपर्क साधला.

सुरुवातीला एक नवीन शैक्षणिक कार्यक्रम बनवण्याची चर्चा झाली. पण यातून एका प्रेमकहाणीची सुरुवात होणार होती. यामध्ये अनेक रोमांचक वळणं येणार होती.

जेव्हा लिलियन आणि फिलीस भेटले, त्यावेळी कॅलिफोर्नियासह अमेरिकेत इतर ठिकाणी एलजीबीटीक्यू समुदायाशी भेदभाव करणारे कायदे होते.

कॅलिफोर्नियाने 1975 साली समलैंगिक संबंधांना परवानगी देणारा कायदा मंजूर केला होता. पुढच्या वर्षी तो लागूही झाला.

लिलियन यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या कार्यक्रमात आऊटलुकला सांगितलं, "आम्हाला देशाच्या प्रत्येक भागात गुन्हेगारच मानलं गेलं. बहुतांश लेस्बियन लपून राहत होते."

असं असलं तरी आपलं कुटुंब बनवण्याचं त्यांचं स्वप्न होतं.

या दोन महिलांनी कायदेशीर अडचणींवर तोडगा काढला. त्यावेळी 50 वर्षांच्या असलेल्या फिलीस यांनी 30 वर्षांच्या आसपास असलेल्या लिलियन यांना दत्तक घेऊन आपली मुलगीच बनवलं.

पण पुढे परिस्थितीने वेगळंच वळण घेतलं.

2008 मध्ये कॅलिफोर्नियाने समलैंगिक विवाहाला मान्यता दिली. त्यावेळी लिलियन आणि फिलीस यांनी लग्न केलं आणि आई-मुलगी एकमेकांचे जीवनसाथी बनले.

लिलियन हसत सांगतात, मला वाटतं की जगातील इतर कोणत्याही दाम्पत्यापेक्षा आमच्यातलं नातं जास्त कायदेशीर आहे.

वेगळी सुरुवात

दोघांनीही रोमान्स करायला सुरुवात केली, त्यावेळी त्या समलैंगिक असल्याचं त्यांनी सार्वजनिकरित्या घोषित केलं नव्हतं.

फिलीस सांगतात, त्यावेळी शांत राहून आपलं आयुष्य जगावं लागणार आहे, हे आम्हाला माहिती होतं.

पण लवकरच युनिव्हर्सिटीच्या सहकाऱ्यांना या दोघांमध्ये काहीतरी चाललं असल्याचं लक्षात आलं.

लीलियन फेडरमॅन आणि फिलीस इर्विन

फोटो स्रोत, LILLIAN FADERMAN

फोटो कॅप्शन, लीलियन फेडरमॅन आणि फिलीस इर्विन अवरोमसह

फेडरमॅन सांगतात, आम्ही नेहमीच सोबत दिसल्यामुळे ते आम्हाला फिलियन अँड लिलीस असं म्हणायचे.

जेव्हा महिलांच्या समलैंगिकतेच्या इतिहासावर पुस्तकं लिहिण्यास सुरुवात झाली, तेव्हा आम्ही सोबत असल्याचं सर्वांना कळालं.

मातृत्व

1974 मध्ये दोघांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. लिलियन फर्टिलिटी क्लिनिकला गेली.

विशेषतः सिंगल मानल्या जाणाऱ्या महिलांनी कृत्रिम गर्भधारणा करुन घेणं, ही त्यावेळी असामान्य बाब होती.

पण लिलियन यांनी डॉक्टरांना आपली मदत करण्यासाठी तयार केलं.

त्यावेळची आठवण सांगताना त्या म्हणतात, डॉक्टरांनी मला विचारलं, तुला मूल पाहिजे आहे, तर तू लग्न का करत नाहीस?

मी उत्तर दिलं, मी 34 वर्षांची आहे. डॉक्टरेटची डिग्री आहे. युनिव्हर्सिटी संस्थेची उपाध्यक्ष आहे. अनेक पुरुषांना माझ्या या रुबाबामुळे अडचण होऊ शकते.

लीलियन फेडरमॅन आणि फिलीस इर्विन

फोटो स्रोत, LILLIAN FADERMAN

यानंतर डॉक्टरांनी कृत्रिम गर्भधारणा करुन दिली. ती यशस्वी ठरली. त्यांना अवरोम नावाचा मुलगा झाला

तीन जणांचं कुटुंब

लवकरच त्यांना आपल्या नात्यावरच्या कायदेशीर मर्यादांचा अंदाज आला.

लिलियन सांगतात, तेव्हा आमच्यात कोणतंही कायदेशीर नातं नाही, यामुळे आम्ही चिंतित होतो.

जर अवरोम आजारी पडला तर फिलीसला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा कायदेशीर अधिकार नव्हता. यामुळे त्यांना काळजी वाटायची.

लिलियन सांगतात, मला काही झालं तर माझ्या मुलावर त्यांचा कोणताच कायदेशीर अधिकार नव्हता. हीसुद्धा चिंतेत टाकणारी बाब होती.

या काळात समलैंगिक दांपत्याला दत्तक घेण्याचा किंवा कृत्रिम गर्भधारणा करुन घेण्याचा अधिकारही नव्हता.

आई आणि मुलगी

त्यामुळे त्यांनी कॅलिफोर्नियातील एका कायद्याचा वापर करण्याचं ठरवलं. या कायद्यान्वये दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर असेल तर एक प्रौढ व्यक्ती दुसऱ्या प्रौढ व्यक्तीला दत्तक घेऊ शकतो.

त्यामुळे आता फिलीस कायदेशीररित्या अवरोमच्या आजी बनल्या.

लीलियन फेडरमॅन आणि फिलीस इर्विन

फोटो स्रोत, LILLIAN FADERMAN

दोघांनी हा निर्णय घेण्यात थोडाही उशीर केला नाही.

फिलीस सांगतात, मी हे अवरोमसोबत कायदेशीर नातं प्रस्थापित करण्यासाठी एक मार्ग म्हणून केलं.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या सांगतात, आमच्या दोघांमधलं नातं म्हणजे व्यभिचार होता.

लिलियन या गोष्टी गंभीरपणे समजावून सांगतात, आम्हाला हे कधीच विचित्र वाटलं नाही. कारण आम्ही कधीच एकमेकांना आई आणि मुलीच्या नजरेनं पाहिलं नव्हतं. आम्ही हे फक्त कायद्याचा वापर करण्यासाठी केलं होतं.

मामा फिलीस

दोन महिलांनी या काल्पनिक नात्याचा वापर कायदेशीर गरजेपेक्षाही जास्त केला.

लिलियन सांगतात, अवरोमचा जन्म झाला तेव्हा समलैंगिक जोडप्यांना मुल-बाळ असणं दुर्मिळ होतं. त्यामुळे फिलीस यांना त्याला आजीच्या स्वरुपात पाहणं सोपं होतं.

हे अवरोमसाठी सोपं होतं. पण फिलीस त्याची दुसरी आई असल्याचंही त्याला माहीत होतं.

तो नेहमी त्यांना मामा फिलीस म्हणायचा, अवरोम आता 35 वर्षांचा आहे. अजूनही तो त्यांना मामा फिलीस असंच म्हणतो.

2008 ला कॅलिफोर्नियाने समलैंगिक विवाहाला परवानगी दिली. लिलियन आणि फिलीस यांनी कायदा पारित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लग्न केलं.

पण त्यांनी आपलं दत्तक प्रमाणपत्र कायदेशीररित्या रद्द केलं नाही. त्यामुळे त्या आई-मुलगी या नात्यासह एकमेकांच्या जोडीदारही बनल्या.

लिलियन सांगतात, आमच्यासाठी दत्तक घेणं ही फक्त कायदेशीर कार्यवाही होती. त्यामुळे आम्ही याबाबत जास्त विचार केला नाही.

नंतर मोठी अडचण

पण आपलं दत्तक प्रमाणपत्र रद्द न केल्यामुळे त्यांचा विवाह कायदेशीर होऊ शकला नाही.

कारण ते रद्द केल्याशिवाय त्या इतर अमेरिकन राज्यांमध्ये गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती.

पुढे 2015 मध्ये अमेरिकेतील सगळ्यांच राज्यांमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली. तेव्हा एका वकिलाने त्यांना दत्तक प्रमाणपत्र रद्द करण्याचा आणि पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर दोघांनीही पुन्हा विवाह केला. त्यानंतर त्यांचा मुलगा अवरोम याने त्याची इच्छा प्रकट केली.

पुन्हा अवरोमला दत्तक घेतलं

विवाह केल्यानंतर अवरोमला फिलीस यांनी पुन्हा कायदेशीररित्या दत्तक घेतलं. आता तो त्यांचा मुलगा होता. अनेक कायदेशीर चढ-उतारानंतर त्यांचं कुटुंब अखेरीस पूर्ण झालं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)