'मला दत्तक घेत आहेत, तुम्ही यायचंच': 5 वर्षांच्या मुलाचं मित्रांना आमंत्रण

फोटो स्रोत, KENT COUNTY COURT
मुल दत्तक घेण्यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया तशी किचकट आणि तणावपूर्ण असते. पण अमेरिकेतल्या पाच वर्षांच्या मायकलने मात्र आपण दत्तक जात असताना सर्व मित्र-मैत्रिणींनी हजर राहिलंच पाहिजे असा आग्रह धरला. मग काय त्याच्या बालवाडीतली सगळी बच्चेकंपनी कोर्टात हजर राहिली आणि मायकलबरोबर संपूर्ण वेळ थांबली.
पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ती थोडी सुलभ असली तरी मुल दत्तक घेताना वाटणारी काळजी, काहीशी चिंता आणि हुरहुर असतेच. मात्र, अमेरिकेतील मिशिगन प्रांतातील कोर्टात झालेली दत्तक सुनावणी काहीशी अनोखी आणि खास ठरली. कारण या दत्तक सुनावणीत साक्षीदार म्हणून चिमुकल्यांनी गर्दी केली होती.
अनाथ असलेल्या पाच वर्षांच्या मायकलला नुकतेच नवीन आई-वडील मिळाले आणि आपल्या आयुष्यातल्या इतक्या महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी त्याने किंडरगार्टनमधल्या आपल्या सर्व वर्गमित्रांना आमंत्रित केलं होतं. गुरुवारी केंट काउंटी कोर्टात हा अनोखा दत्तक विधान सोहळा पार पडला.
केंट काउंटी कोर्टाने फेसबुकवर या सुनावणीचा एक फोटो शेअर केला आहे. यात पाच वर्षांचा मायकल मोठ्यांसाठीच्या एका खुर्चीत आरामात बसलेला दिसतोय. त्याच्या शेजारीच त्याचे नवीन आई-वडील आहेत. आणि या तिघांच्या मागे मायकलचे सर्व चिमुकले वर्गमित्र हातात कागदापासून बनलेले हार्ट्स उंचावून त्याच्या आनंदात सहभागी होताना दिसत आहेत.
या दत्तक सुनावणीत प्रत्येक मुलाने आपण इथे का आलोय, हे न्यायमूर्तींना सांगितलं.
स्टिव्हन नावाचा मुलगा म्हणला, "मायकल माझा बेस्ट फ्रेंड आहे."
तर एक चिमुकली म्हणाली, "माझं नाव लिली आहे आणि मायकल मला आवडतो."
या खास सुनावणीसाठी केंट काउंटी कोर्टाच्या न्यायमूर्ती पॅट्रिका गार्डनर यादेखील सजून-धजून आल्या होत्या. त्यांनी गळ्यात ख्रिसमस डेकोरेशनसाठी तयार केलेला खास नेकलेस घातला होता.
मायकलच्या शिक्षिका म्हणाल्या, "आम्ही या शालेय वर्षाची सुरुवातच केली ती मुळी एका कुटुंबासारखी. कुटुंब केवळ डीएनएने एकत्र बांधलेलं हवं, असं गरजेचं नाही. जिथे आधार आणि प्रेम असतं ते कुटुंबच असतं."

फोटो स्रोत, KENT COUNTY COURT
न्यायमूर्तींनी दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा करताच मायकल, त्याचे आई-वडील, शिक्षक, मित्र अशा उपस्थित सर्वांनीच एकच जल्लोष केला.
गुरुवारी केंट काउंटी कोर्टाचा वार्षिक दत्तक दिन होता. या दिवशी 37 मुलांचं "प्रेमाने आणि अधिकृतपणे नव्या कुटुंबात स्वागत करण्यात आलं", असं कोर्टाने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केलं.
या सोहळ्यावेळी माननीय न्यायमूर्ती पॅट्रिका गार्डनर म्हणाल्या, "कधी कधी त्यांचा प्रवास खूप मोठा असतो. त्यांनी मुलं आणि त्यांच्या कुटुंबांसाठी चमत्कार आणि परिवर्तन घडवलं आहे आणि भक्कम सामाजिक पाठिंबा मिळवला आहे. मायकलच्या दत्तक सुनावणीत याचा प्रत्यय आलाच आहे."
"किंडरगार्टनचा त्याचा संपूर्ण वर्ग आणि शाळा इथे उपस्थित आहे, त्याला हे सांगायला की "आम्हाला तू आवडतोस", "आम्ही तुझ्यासोबत आहोत", "आणि आम्ही केवळ आज नाही तर भविष्यात येणाऱ्या प्रत्येक वर्षी आम्ही इथे असू"."

फोटो स्रोत, KENT COUNTY COURT
या विशेष दत्तक सुनावणीचं वार्तांकन करण्यासाठी कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही जमले होते. त्यांच्याशी बोलताना मायकल म्हणाला, "I love my daddy". मायकल बोलत होता आणि त्याचे वडील आनंदाश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे कौतुकाने बघत होते.
केंट काउंटी कोर्टाने आपल्या फेसबुकवर टाकलेला मायकलच्या दत्तक सुनावणीचा फोटो फेसबुकवर 1 लाखवेळा शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








