उथरा हत्या प्रकरण: नागाने बायकोला चावावे म्हणून सूरज कुमारने काय केलं?

सुरज आणि त्याची पत्नी उथरा
फोटो कॅप्शन, सुरज आणि त्याची पत्नी उथरा
    • Author, सौतिक बिस्वास आणि अश्रफ पदान्ना
    • Role, बीबीसी न्यूज

गेल्या आठवड्यात केरळमधील एका तरुणाला पत्नीच्याच खूनाच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या तरूणाने अतिशय थंड डोक्याने सुनियोजित पद्धतीने विषारी नागाचा वापर खूनासाठी केला. नागाने पत्नीचा चावा घ्यावा यासाठी परिस्थिती निर्माण केली. यामध्ये कोर्टाने त्याला दोषी मानत दुर्मिळ अशी डबल-जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

सुरज कुमार असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे. 28 वर्षीय सुरजने गेल्या वर्षी 7 हजार रुपयांना एक नाग विकत घेतला होता. जगात विषारी मानल्या जाणाऱ्या सापांमध्ये त्याचा समावेश होतो.

भारतात सापांची खरेदी-विक्री करणं हा गुन्हा मानला जातो. पण सुरजने एका सर्पमित्राकडून बेकायदेशीरपणे हा नाग विकत घेतला.

सुरजने एका प्लास्टिकच्या डब्यात हा विषारी नाग ठेवला होता.

सुरज हा नाग घेऊन थेट आपल्या सासरी गेला. तिथं त्याची पत्नी उथरा ही आधीपासूनच एका सर्पदंशावर उपचार घेत होती.

सुरज आणि उथरा यांची भेट ही लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थामार्फत झाली होती. सुरजचे वडील एक रिक्षाचालक आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे.

उथरा हिचा जन्म एका संपन्न कुटुंबात झाला होता. तिचे वडील एक रबर व्यापारी आहेत. तर आई निवृत्त मुख्याध्यापिका आहे.

सुरज आणि उथरा यांची खोली

फोटो स्रोत, SREEDHAR LAL

फोटो कॅप्शन, सुरज आणि उथरा यांची खोली

उथरा सूरजपेक्षा तीन वर्षांनी लहान होती. पण तिला लिहिण्या-वाचण्यात काही अडचणी होत्या.

सूरजने उथराशी लग्न करण्याचं मान्य केलं. त्यावेळी त्याला उथराच्या कुटुंबाकडून 76 तोळे सोनं, एक सुझुकी सेडान आणि 4 लाख रुपये रोख असा घसघशीत हुंडा मिळाला.

तसंच सूरजला मुलीच्या देखभालीसाठी प्रत्येक महिन्याला 8 हजार रुपये इतकी रक्कमही तिच्या कुटुंबाकडून दिली जात होती, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने कोर्टात दिली.

आधी पण झाला होता प्रयत्न

उथरा ही आधीपासूनच एका सर्पदंशावर उपचार घेत होती. ती सुमारे दोन महिने रुग्णालयात दाखल होती. यादरम्यान तिच्यावर 3 वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

उथराला त्यावेळी घोणस (रसेल्स व्हायपर) या सर्पाचा दंश झालेला होता.

त्यानंतर करण्यात येत असलेल्या उपचारांना उथरा चांगला प्रतिसाद देत बरी होत होती. पण 6 मे रोजी रात्री सुरजने तिला फळांचा रस दिला. त्यामध्ये झोपेचं औषध मिसळलेलं होतं.

रस पिऊन ती शांत झोपी गेल्यानंतर सुरजने आपल्या डब्यातला पाच फुटी नाग तिच्यावर सोडला.

पण नागाने झोपलेल्या उथराचा चावा घेण्याऐवजी तो निसटून निघून गेला. सूरजने त्याला पकडलं आणि पुन्हा उथरावर सोडलं. नाग पुन्हा निसटून गेला.

यानंतर सुरजने नागाला पुन्हा पकडलं. त्याने सापाचं तोंड साप पकडण्याच्या काठीने उथराच्या डाव्या हाताजवळ दाबलं. यावेळी मात्र चिडलेल्या कोब्राने उथराच्या हाताचा दोनवेळा चावा घेतला.

नाग पलंगावून खाली आला आणि कपाटाच्या एका कोपऱ्यात रात्रभर बसून राहिला.

तुम्ही नागाची छेड काढल्याशिवाय तो कधीच चावत नसतो. सूरजने त्याचं तोंड पकडून त्याला पत्नी उथराचा चावा घेण्यास भाग पाडलं, असं मविश कुमार सर्पतज्ज्ञांनी सांगितलं.

यानंतर सुरजने रसाचा ग्लास धुतला. सापावर नियंत्रणासाठी त्याने वापरलेली काठी त्याने नष्ट करून टाकली. तसंच आपल्या मोबाईलमधले संशयास्पद कॉल रेकॉर्डही त्याने डिलीट केले.

साप ठेवलेला डबा

फोटो स्रोत, SREEDHAR LAL

फोटो कॅप्शन, साप ठेवलेला डबा

दुसऱ्या दिवशी उथराची आई तिच्या रुममध्ये गेली. त्यावेळी तिने पाहिलं की उथरा बेडवर झोपलेल्या अवस्थेतच होती. तिचं तोंड उघडं होतं. तिचा डावा हात एका बाजूला लटकत पडलेला होता.

त्यावेळी सूरजसुद्धा रुममध्ये होता. उथराची आई मणिमेखला विजयन जावई सूरजला म्हणाली, ती जागी आहे की नाही, तू पाहिलं नाहीस का?

सूरज उत्तरला, "तिची झोपमोड होऊ नये म्हणून मी तिला डिस्टर्ब केलं नाही."

यानंतर कुटुंबीयांनी उथराला रुग्णालयात नेलं.

डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित करून पोलिसांना बोलावलं.

शवविच्छेदन अहवालात उथराच्या डाव्या हातावर एका इंचाच्या अंतराने दोन सर्पदंश आढळून आले.

रक्तचाचणी तसंच व्हिसेरा अहवालात तिच्या शरीरात नागाचं विष तसंच झोपेचं औषध असल्याचं निष्पन्न झालं.

नागाचं विष थेट श्वसनसंस्थेशी संबंधित मांसपेशींवर हल्ला करतं. त्यामुळे नागदंश झालेल्या व्यक्तीचा एका तासाच्या आतच मृत्यू होऊ शकतो.

उथरा हिचं कोल्लम येथील घर

फोटो स्रोत, SREEDHAR LAL

फोटो कॅप्शन, उथरा हिचं कोल्लम येथील घर

पुढे उथराच्या कुटुंबीयांनी तिचा पती सूरज याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी 24 मे रोजी पत्नी उथराच्या अकस्मात मृत्यू प्रकरणात सूरजला अटक केली होती.

कसा झाला तपास?

या प्रकरणाचा तपास 78 दिवस चालला. त्यामध्ये 1 हजारपेक्षाही जास्त पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

सुनावणीदरम्यान 90 पेक्षा जास्त व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली. यामध्ये सर्पतज्ज्ञ, डॉक्टर यांचा समावेश होता.

सूरजचा कॉल रेकॉर्ड, इंटरनेट हिस्टरी, मागच्या बागेतून सापडलेला मृत कोब्रा, कुटुंबीयांच्या गाडीत सापडेलेले झोपेच्या औषधाचं अंश आणि इतर पुराव्यांद्वारे त्याने एक नव्हे तर दोन साप आणल्याचं निष्पन्न झालं.

उथरा सुरुवातीला ज्या घोणस सापाच्या दंशावर उपचार घेत होती. तो सापही सूरजनेच विकत घेतला होता, असं तपासादरम्यान समोर आलं.

सुरेश नामक सर्पमित्राने सूरजची ओळख पटवली. तसंच त्याला दोन साप विकल्याचंही त्याने मान्य केलं.

सर्पतज्ज्ञांच्या मते नागाने सूरज-उथराच्या खोलीत उंचावरील खिडकीतून प्रवेश करणं ही अशक्य बाब होती.

इतकंच नव्हे तर तपासादरम्यान एक खराखुरा नाग, सर्पमित्र तसंच बेडवर एक डमी यांच्या सहाय्याने गुन्ह्याचं दृश्य पुन्हा रिक्रिएट करण्यात आलं.

नाग हे रात्री फारसे सक्रिय नसतात. डमीवर आम्ही जितक्या वेळा नाग सोडला त्या प्रत्येक वेळी नाग तिथून निसटून खाली गेला. खोलीतील एका अंधाऱ्या कोनाड्यात जाऊन हा नाग प्रत्येकवेळी लपत होता. शिवाय आम्ही कित्येकवेळा छेडलं तरी सापाने चावा घेण्याचा प्रयत्न केला नाही.

उथरा प्रकरणाचा तपास

फोटो स्रोत, SREEDHAR LAL

फोटो कॅप्शन, उथरा प्रकरणाचा तपास

त्यानंतर प्लास्टिकच्या डमी पुतळ्याच्या हातावर चिकनचा तुकडा बांधून एक प्रयोग करण्यात आला.

यावेळी सर्पमित्राने एका नागाचं तोंड पकडून हातावर दाबला. यावेळी त्या नागाचा चावा आणि उथराच्या हातावरील चावा यांच्यात साम्य आढळून आलं.

हे प्रकरण म्हणजे सैतानी आणि भीषण हत्यांकांडाचा प्रकार आहे, असं मत न्यायाधीश एम. मनोज यांनी नोंदवलं.

न्यायाधीश मनोज यांनी सुरजला पत्नी उथराच्या हत्येप्रकरणी दोषी मानत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याने उथराचा खून तर केलाच शिवाय हा सर्पदंशाने झालेला अपघाती मृत्यू असल्याचं दर्शवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असं न्यायाधीश म्हणाले.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यात सूरजने पत्नीवर केलेला हा दुसरा नव्हे तर तिसरा सर्पदंश हल्ल्याचा प्रयत्न होता.

सापांना हाताळण्याचं प्रशिक्षण

सूरज एका स्थानिक बँकेत कलेक्शनचं काम करतो. त्याची ओळख गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका सर्पमित्राशी झाली होती.

त्यावेळी त्याने सर्पमित्राकडून 10 हजार रुपयांना घोणस साप विकत घेतला. हा साप डब्यात भरून त्याने आपल्या घरामागच्या लाकडाच्या ढीगात लपवून ठेवला होता.

27 फेब्रुवारी रोजी सूरजने हा साप त्याच्या घरी पहिल्या मजल्यावरील त्याच्या खोलीत सोडून दिला.

त्यानंतर पत्नीला मोबाईल विसरल्याचं सांगत तो आणण्यासाठी खोलीत वर पाठवलं.

उथराने त्यावेळी साप पाहताच आरडाओरडा करून सगळ्यांना सावध केलं, असं तिच्या आईने पोलिसांना सांगितलं.

उथराच्या ओरडण्यानंतर सूरज वर आला. त्याने एक काठी वापरून सापाला पकडलं आणि घराबाहेर गेला. सूरजने साप पुन्हा डब्यात कैद करून ठेवला.

2 मार्च रोजी रात्री सूरजने पुन्हा सर्पहल्ल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पत्नी उथराला झोपेचं औषध देऊन घोणस तिच्या खोलीत सोडून दिला.

यावेळी मात्र सापाने उथरावर हल्ला केला. सापाने उथराच्या पायावर चावा घेतला. कडकडून चाव्याने वेदना होऊन उथरा जागी झाली. आरडाओरडा करू लागली. त्यावेळी सूरजने तो साप खिडकीबाहेर फेकून दिला.

केरळमध्ये साप चावणं ही बाब सामान्य मानली जाते. त्यामुळे यामध्ये सूरजचा काही हात असेल, असं आम्हाला वाटलं नाही, असं उथराचे वडील विजयसेनन विद्याधरन म्हणाले.

केरळमध्ये दरवर्षी सुमारे 60 हजार नागरिकांचा सर्पदंशाने मृत्यू होतो, हे इथं नमूद करायला हवं.

उथराला घोणस चावल्यानंतर रात्री रुग्णालयाचा शोध घेण्यात दोन तास लागले. दरम्यान उथराच्या पायाला सूज आणि रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला होता.

यामुळे उधरावर तीन स्किन ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

त्यानंतर विश्रांती घेण्यासाठी उथरा आपल्या आई-वडिलांच्या दोन मजली घरी कोल्लमच्या वेर्दंत गावात आली.

सूरज आपला मुलगा तसंच आईवडील यांच्यासोबत पाथनमथिट्टा येथेच राहत होता. पण त्याचा कट रचण्याचा उद्योग अजूनही सुरूच होता.

'पत्नी उथरा रुग्णालयात उपचार घेत असताना सूरजने इंटरनेटवर सापांना हाताळण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्याने सापांचं विष यांच्याबाबत सर्व माहिती घेतली,' असं तपास अधिकारी अनुप कृष्णा यांनी दिली.

नाग

फोटो स्रोत, Getty Images

सूरज आपल्या मुलाच्या जन्मापासूनच पत्नीचा खून करण्यासाठी कट रचत होता. त्याने कित्येक वेळा विषारी नाग यांच्याबाबत इंटरनेटवर सर्च केलं. तसंच युट्यूबवर त्याने कित्येक विषारी सापांचे व्हीडिओ पाहिले.

यामधलं एक चॅनल एका स्थानिक सर्पमित्राचंही आहे.

यामध्येच एक व्हीडिओ विषारी आणि आक्रमक अशा घोणस सापासंदर्भात होता.

'बायकोला नागिणीचा शाप आहे अशी अफवा'

सूरजने आपली पत्नी उथरा हिला नागिणीचा शाप असल्याचं कित्येकवेळा आपल्या मित्रांना सांगितलं होतं.

याबाबत आपल्याला अनेक स्वप्नं येतात. तिचा मृत्यू सर्पदंशानेच होणार आहे, असं तो सांगत असे.

पण मुळात सूरजच सर्पदंशाने तिला मारण्याचा कट रचत होता. त्याला तिचे सगळे पैसे घेऊन दुसऱ्या महिलेशी लग्न करायचं होतं, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

'त्याने सुनियोजित पद्धतीने आणि थंड डोक्याने सगळा कट रचला. अखेरीस तिसऱ्या प्रयत्नात तो त्यात यशस्वी ठरला,' असं अपुकुत्तन अशोक या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सरकारी वकील मोहनराज गोपालकृष्णन यांनी हे प्रकरण म्हणजे पोलीस तपासासाठी एक मैलाचा दगड ठरेल, एखाद्या प्राण्याचा कशा प्रकारे हत्येसाठी वापर केला जाऊ शकतो, त्याचं हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर सुरजला दुर्मिळ अशी डबल-जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गोपालकृष्णन यांच्या मते, सूरजला आपल्या कृत्याचा कोणताच पश्चाताप नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)