जे. के. रोलिंग: बेरोजगार, बेघर, 'अपयशी मुलगी' ते जगातील सर्वांत श्रीमंत, प्रभावशाली लेखकांपैकी एक

जे. के. रोलिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जे. के. रोलिंग
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

जर तुम्ही सोशल मिडियावर नेहमी पडीक असाल तर एक पोस्ट वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 'इफ यू रिमेम्बर सो अँड सो अॅंड सो...देन युवर चाइल्डहूड वाज ऑसम.' परंतु, तुमच्या माझ्या किंवा अनेकांच्या लहानपण किंवा किशोरवयीन काळावर ज्या पुस्तकांनी किंवा सिनेमाने खरोखरचं प्रभाव टाकला आहे त्या हॅरी पॉटर सिरीजबद्दल किंवा तिच्या लेखिकेबद्दल एकही तशी पोस्ट वाचायला मिळणार नाही.

कारण, सरळ आहे. अशी पोस्ट टाकून कुणीही आपलं हसू करुन घेणार नाही. जे. के. रोलिंग किंवा हॅरी पॉटरला विसरण्याइतके तर आम्ही कृतघ्न आहोत असं कुणालाच वाटणार नाही. असो निमित्त आहे जे. के. रोलिंगच्या वाढदिवसाचे.

हॅरी पॉटरची जननी अर्थात जे. के. रोलिंगचा आज वाढदिवस आहे. आपल्या लेखणीतून एक जादुई विश्व तयार करणारी जे. के. रोलिंग ही जगातील सर्वांत श्रीमंत लेखकांपैकी एक आहे. सर्वाधिक श्रीमंत महिलांमध्ये जे. के. रोलिंगचा समावेश कित्येक वर्षांपासून होत आहे.

कधी काळी सरकारी अनुदानावर जगणाऱ्या जे. के. रोलिंगची गोष्ट ही तिच्या विश्वाइतकीच अद्भुत आहे. जे. के. रोलिंगच्या वेबसाईटनुसार जे. के. रोलिंगचा अर्थात जोएनला लहानपणापासूनच वाचनाचे वेड होते.

31 जुलै 1965 रोजी जे. के. रोलिंगचा जन्म इंग्लडमधील ब्रिस्टल शहरात झाला.

जे. के. रोलिंगने वयाच्या सहाव्याच वर्षी पहिली कथा लिहिली होती. त्याचं नाव होतं रॅबिट. आणि अकराव्याच वर्षी तिने पहिली कादंबरी लिहिली होती अशी माहिती तिच्या वेबसाइटवर आहे.

रेल्वेला उशीर झाला आणि हॅरी पॉटरची कथा सुचली

1990 मध्ये जे. के. रोलिंग आपल्या रेल्वेची वाट पाहत होती. पण ती रेल्वे येण्यास उशीर झाला. त्यात ही कथा तिला सुचली. पुढील पाच वर्षं ती त्यावर काम करत राहिली. मग हॅरी पॉटरचे सात खंड तयार होतील असं तिने ठरवलं आणि ती लिहित गेली.

जे. के. रोलिंगचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं आणि आईच्या निधनाचा जबर धक्का तिला बसला. आईच्या निधनानंतर ती पोर्तुगालला शिक्षिकेची नोकरी करण्यासाठी गेली.

1992 ला तिचं लग्न झालं आणि अवघ्या तेरा महिन्यांच्या संसारानंतर ती आणि तिचे पती वेगळे झाले. पोर्तुगालची नोकरी सुटली आणि तिने परत लंडन गाठले.

या लग्नातून तिला जेसिका नावाची मुलगी देखील झाली. जे. के. रोलिंग आणि जेसिका लंडनमध्ये राहत होत्या. जे. के. रोलिंगकडे ना चांगलं घर होतं ना नोकरी. या काळात तिला नैराश्याने ग्रासले. मनात आत्महत्येचे देखील विचार येत होते. असं जे. के. रोलिंगने हार्वर्डच्या पदवीदान समारंभावेळी भाषणात म्हटले होते.

सरकारी अनुदानावर काढावे लागले दिवस

जे. के. रोलिंगला सरकारी अनुदानावर आपले दिवस काढावे लागत होते. त्या काळात ती एका लंडनमधील एका कॅफेत बसून हॅरी पॉटर लिहित होती.

अतिशय अल्पकाळ टिकलेलं लग्न, मी बेरोजगार होते, सिंगल पॅरेंट होते, ब्रिटनमध्ये एखादी व्यक्ती जितकी गरीब बनू शकते अगदी मी तितकीच गरीब होते, मी बेघर होते, मला माहित असलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक अपयशी मीच होते, असं तिने म्हटलं होतं.

जे. के. रोलिंग

हॅरी पॉटर लिहून झाल्यावर अनेक ठिकाणी तिने पहिले तीन प्रकरणं पाठवली. आपल्या पुस्तकाची काय संकल्पना आहे हे पाठवले पण अनेक ठिकाणाहून फक्त नकारच आला. मग एके दिवशी एका पब्लिशिंग एजेंटने म्हटले इतर प्रकरणं वाचायला मिळतील का. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा होता असं जे. के. रोलिंग सांगते.

पुढे हॅरी पॉटरचे प्रकाशन झाले, त्यावर चित्रपट आला. आणि बघता बघता या पुस्तकांनी इतिहास घडवला.

पण जे. के. रोलिंग केवळ लोकप्रियच नाही तर जगातील सर्वांत प्रभावशाली लेखकांपैकी एक आहे. जर तुम्ही हॅरी पॉटरचे वाचक असाल तर तुम्ही पूर्वग्रहांना बळी पडणार नाहीत, इतर समुदायांचा द्वेष करणार नाहीत आणि सर्वसमावेशक होऊ शकाल असं एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

राजकीयदृष्ट्या प्रभावशाली

जर मी तुम्हाला म्हटले की जॉर्ज ऑरवेलच्या अॅनिमल फार्म किंवा '1984' सारखाच राजकीय प्रभाव हॅरी पॉटरने सध्याच्या राजकीय जीवनावर किंवा आपल्या आयुष्यावर टाकला आहे तर अनेकांना ही गंमतच वाटेल. राजकीय परिस्थितीवर अचूक बोट ठेवणारी ऑरवेलची पुस्तके कुठे आणि एका अनाथ जादूगराची कथा सांगणारे हॅरी पॉटर कुठे. असेच तुम्ही म्हणाल परंतु मित्रांनो हेच सत्य आहे.

इतकेच नव्हे तर पॉटर सिरीज वाचणारी मुले ही इतर मुलांपेक्षा जास्त संवेदनशील असतात, त्यांच्यात इतर मुलांपेक्षा जास्त समानुभूतीचा भाव असतो असे एक संशोधन आहे. याबरोबरच, हॅरी पॉटरचे वाचक डोनल्ड ट्रम्पला मतदान करणार नाहीत असे देखील सांगणारा एक अभ्यास आहे. हॅरी पॉटर वाचणाऱ्या मुलांमध्ये समानुभूती तर असतेच परंतु त्याबरोबर जर समजा तुम्ही सुरुवातीला एखाद्या बाबतीत संवेदनशील नसताल तर पुस्तके वाचून वाचून तुम्ही बनताल असे निरीक्षण या अभ्यासात मांडण्यात आले आहे.

समानुभूती संवर्धक

इटली विद्यापीठाच्या लॉरीस वेझालीलने याबाबत सखोल संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी ही पुस्तके वाचली आहे ती मुले सर्वसमावेशक असतात. कुठल्याही समूहात मिसळणे त्यांच्यासाठी फार कठीण नाही. आपले हे संशोधन सिद्ध करण्यासाठी लोरीसने इलेमेंट्री आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला आहे.

ज्यांनी सिनेमा आणि पुस्तके पाहिली आहेत त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. तसेच ज्यांनी पाहिली नाहीत त्यांना देखील या प्रयोगात सहभागी करुन घेण्यात आले. या मुलांना आपला समलिंगी, निर्वासित आणि स्थलांतरित या लोकांबद्दल काय विचार आहेत अशी विचारणा करण्यात आली. 0 ते 10 या मोजपट्टीवर तुम्ही त्यांच्यात मिसळू शकतात का? त्यांच्यात तुम्ही राहू शकतात का असे विचारण्यात आले.

जे. के. रोलिंग

फोटो स्रोत, Getty Images

आश्चर्याची बाब म्हणजे ज्यांनी 10 च्या जवळपास रेटिंग दिले आहे ती सर्व मुले हॅरी पॉटरची वाचक होती. काही मुलांनी स्थलांतरीत आणि निर्वासितांमध्ये राहण्याची तयारी दर्शवली होती. परंतु अद्यापही ते समलिंगी लोकांशी बोलण्यात तितकेसे ओपन नव्हते. तशा मुलांना हॅरी पॉटरचे उर्वरित भाग वाचण्यास सांगण्यात आले आणि नंतर त्यांचा दृष्टीकोन त्यांच्याबद्दल सकारात्मक झाल्याचे प्रयोगातून निष्पन्न झाले आहे.

हॅरी पॉटर आणि त्याचे जग

आपल्या मनात येईल हे का झाले असावे याचे कारण असे की हॅरी पॉटर हा एक अनाथ मुलगा आहे. तो त्याच्या नातेवाईकांकडे राहतो. त्यांच्याकडून त्याचे हाल केले जातात. असे असले तरी तो अत्यंत साधा मुलगा आहे.

हॅरी पॉटर

संवेदनशील आहे. स्वतःवर अन्याय होत असला तरी त्याच्यापेक्षा कमजोर व्यक्तीवर त्याची अन्याय करण्याची इच्छा नाही. यामुळेच तर हॅरी पॉटर डॉबी या एल्फला मॉलफॉय यांच्या तावडीतून सोडवतो. हॅरी पॉटर जेव्हा त्याच्या शाळेत म्हणजे हॉगवर्ट्समध्ये जातो तिथे सर्व प्रकारची मुले आहेत.

सर्व जगभरातून आलेली. हो अगदी त्यांच्यामध्ये मीरा पाटील ही मराठी वंशाची मुलगी देखील आहे. त्यामुळेच जेव्हा आपण हॅरी पॉटर तल्लीन होऊन वाचतो तेव्हा आपल्यावर सर्वसमावेशकतेचे संस्कार आपोआप होत जातात आणि आपली इतर समूहांसाठी, वंश आणि धर्मियांच्या लोकांसाठीची समानुभूती वाढते. समानुभूती ही सहानुभूती पेक्षा पूर्णपणे निराळी आहे. तुमच्यावर दया न करता तुम्हाला काय वाटते याची जाणीव आपल्याला असणे म्हणजे समानुभूती किंवा एम्पथी.

सर्वसमावेशक पॉटर

हॅरी पॉटरमध्ये असणारी सर्व प्रमुख पात्रे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेली आहेत. हारमायनी ग्रेंजर ही हुशार मुलगी आहे. अभ्यासात तर तिचा हात कुणीही धरू शकणार नाही. परंतु तिचे आई-वडील हे मगल आहेत.

मगल म्हणजे जादुगरांच्या भाषेमध्ये सामान्य लोक. असे असले तरी देखील हारमायनी एक चांगली जादूगर आहे. रॉनचे कुटुंब जादूगर आहे परंतु त्याच्या कुटुंबाला मगल लोकांबद्दल कुतूहल आहे. त्याच्या वडिलांना वाटते की जादू शिवाय मगल लोकांना आपले आयुष्य किती सुंदर बनवले ही देखील काही कमी जादू नाही.

जे. के. रोलिंग

तर या तिघांना पाण्यात पाहणारा मॉलफॉय हा तर चक्क मगल न म्हणता त्यांना मडब्लड म्हणत असतो. इतकेच नव्हे तर इल्फ, जायंट्स, ड्वार्फ, हाल्फ ब्लड असे अनेक वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक हॅरी पॉटर सिरीजच्या विश्वात सुखाने नांदत आहेत. त्यांचा सर्वांचा हितशत्रू व्हॉल्डेमार्ट यांचा सामना करीत आहे.

हॅरी पॉटर अँड गॉबलेट ऑफ फायरमध्ये तर हार्मायनी हाउस एल्वची गुलामगिरीतून सुटका व्हावी यासाठी आंदोलन करते. यावरुनच आपल्याला कळून येते की जे. के. रोलिंगने जी पात्रे उभी केली आहेत, ती काल्पनिक विश्वतील असली तरी त्यांचा संबंध आणि संदर्भ आपल्या रोजच्या जगण्याशी आहे.

या संशोधनाचा आणखी एक खास पैलू म्हणजे ज्या वाचकांना आपण हॅरी पॉटरसारखे आहोत असे वाटते किंवा जे त्याच्याशी किंवा हार्मायनीशी रिलेट करतात त्यांच्यात दिवसेंदिवस समानुभूती वाढत जाते आणि जे लोक व्हॉल्डेमार्टशी, मॉलफॉयशी रिलेट करतात त्यांच्यात काही फरक पडत नाही. यात एक गोम आहे, संशोधकांच्या मते, जर तुम्ही अशा मुलांसोबत चर्चा केली त्यांना प्रश्न विचारले तर त्या मुलांमध्ये सकारात्मक बदलही घडलेला आढळून आले आहे.

हॅरी पॉटर सिरीजमधील राजकारण आणि त्याचा आजचा संदर्भ

हॅरी पॉटरबद्दल दुसरे महत्वपूर्ण संशोधन अमेरिकेत झाले आहे. जे मतदार हॅरी पॉटरचे फॅन आहेत ते डोनल्ड ट्रम्पला मतदान करणार नाहीत, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. जेव्हा जे. के. रोलिंगने डोनल्ड ट्रम्पची तुलना वॉल्डेमॉर्टशी केली तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.

व्हॉल्डेमोर्ट

वॉल्डेमॉर्टही ट्रम्पसमोर फिका पडेल असे तिने म्हटले होते. डोनल्ड ट्रम्प आणि वॉल्डेमॉर्टमध्ये काय साम्य आहे? तर दोघेही सर्वसमावेशकता, सहिष्णुता याविरोधात आहे. दोघांचाही वंशशुद्धतेवर विश्वास आहे. ट्रम्प यांनी देखील प्रसंगी हिंसाचार करण्याला आपला पाठिंबा असल्याचे म्हटलेच आहे. म्हणजे जे वाचक हॅरी पॉटरचे फॅन आहेत ते डोनल्ड ट्रम्पला वॉल्डेमार्टसारखे समजतील आणि त्यांच्याविरोधात मतदान करतील असे मत संशोधनात व्यक्त करण्यात आले आहे.

या दोन्ही संशोधनात एकच गोष्ट ठळकपणे दिसून येते ती म्हणजे की हॅरी पॉटरचा वाचक हा पूर्वग्रहदूषित नसतो. सुरुवातीला जरी असला तर हॅरी पॉटरचे सात खंड संपेपर्यंत त्यामध्ये हळुहळु बदल होत जाऊन तो एक संवेदनशील व्यक्ती होतो. हॅरी पॉटरचे पहिले पुस्तक हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन 1997 ला आले होते. त्यानंतर त्यावर म्हणावे तितके संशोधन झाले नाही अशी ओरड तिथे होत आहे.

भारतीय संदर्भातून पॉटर

जर भारताचा विचार केल्यास भारतासारख्या बहुविध संस्कृती असणाऱ्या देशामध्ये हॅरी पॉटरचे महत्व समजून घेऊन इतरांनाही सांगणे आवश्यक ठरते. भारतात अनेक भाषा, संस्कृती, जाती, वर्ग, पंथ आहेत. एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम वाढण्यासाठी हॅरी पॉटर सिरीजचा वापर आपण निश्चितच करुन घेऊ शकतो.

भिन्न समाजाचा परस्परांबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याच्या कामी ही पुस्तके निश्चितपणे येऊ शकतील.

त्याबरोबरच मला असे वाटते की आपल्याकडे साहित्यावर संशोधन म्हणजे, केवळ सौंदर्यशास्त्र, पात्र, घटना, भूमिका याबाबतच मर्यादित असते. जर आपल्याकडेही असे संशोधन झाले तर सौहार्दाने राहण्यास मदत होईल.

उदाहरण द्यायचे झाल्यास असे संशोधन व्हायला हवे की जी मुले लहानपणी उपेक्षितांचे साहित्य वाचतात त्यांचा त्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असतो की नाही? हे मी केवळ उदाहरण म्हणून देत आहे. तसे झाल्यास नवे दर्जेदार साहित्यही निर्माण होईल आणि असलेल्या साहित्याचा उपयोग समाजासाठी जास्तीत जास्त होईल.

का आहे पॉटर इतका प्रभावशाली?

हॅरी पॉटरची सिरीज इतकी प्रभावशाली का झाली याचे कारण आणखी एका संशोधनात दिले आहे. संशोधन कर्त्यांचे म्हणणे आहे की जर एखादे पात्र ठाराविक अंतराच्या काळाने निर्माण केले गेले असेल, ते तितक्या विस्ताराने तयार केलेले गेले असेल, तर वाचकाच्या अंतर्मनावर त्याचा परिणाम होता.

हॅरी पॉटर हे पात्र सात खंडातून आपल्यासमोर उभे राहते. वाचता वाचता आपण त्याच्याशी एकरूप होतो आणि त्याच समरसतेतून आपल्या मनावर परिणाम होऊन आपण पूर्वग्रहदूषितपणाचा त्याग करीत सर्वसमावेशक आणि सहिष्णू बनत जातो.

मैत्री, प्रेम, वात्सल्य, त्याग, जिज्ञासा या उच्च मानवीय मूल्यांचे संवर्धन करणारे ही पुस्तकाची सिरीज आहे. जे. के. रोलिंगने तिच्या आयुष्यात जो संघर्ष केला आहे, त्या अग्नीदिव्यातून पार होत तिने ही सिरीज आपल्यासमोर ठेवली आहे. मनोरंजनाबरोबरच आपल्याला चांगला माणूस बनविण्यासाठी ही सिरीज कामी येईल, याबाबत शंका असण्याचे काही कारण नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)