ॲमेझॉनचं जंगल हळूहळू नष्ट होतंय, जगाला का आहे धोका?

    • Author, नवीन सिंह खडका, अँटोनिया क्यूबेरोआणि व्हिज्युअल जर्नलिझम टीम
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

या वर्षीची संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान बदल परिषद (COP30) ब्राझीलच्या उत्तर भागात असलेल्या बेलेम या शहरात होते आहे. या शहराला अनेकदा ॲमेझॉनच्या जंगलांचं प्रवेशद्वार म्हटलं जातं. हे जगातील सर्वात मोठं सदाहरित जंगल (वर्षावन) आहे.

हे शहर म्हणजे एक प्रतीकात्मक स्थान आहे. पॅरिसमध्ये झालेल्या हवामान बदलावरच्या परिषदेनंतर दहा वर्षांनी जगभरातील देशांचे प्रतिनिधी बेलेम शहरात जमत आहेत.

पॅरिसमध्ये एक ऐतिहासिक करार झाला होता. त्या कराराचा उद्देश पृथ्वीवरील तापमान वाढवणाऱ्या ग्रीन हाऊस गॅस म्हणजे हरितगृह वायूंचं उत्सर्जन सुरक्षित मर्यादेपर्यंत रोखण्याचा होता.

पर्यावरणात मोठ्या प्रमाणात असणारा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्याचं काम ॲमेझॉनचं हे घनदाट जंगल करतं. त्यामुळे हवामान बदलाच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्याच्या उपायांमध्ये या जंगलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

मात्र वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की अनक दशकांपासून होत असलेली जंगलतोड आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे, ॲमेझॉनच्या जंगलांचं भविष्यच अनिश्चित आणि अंधारमय झालं आहे.

बेलेम ही ब्राझीलच्या पारा प्रांताची राजधानी आहे. याच पारा प्रांतात ॲमेझॉनच्या जंगलांचा सर्वाधिक विनाश होतो आहे.

याच कारणामुळे बीबीसी, ॲमेझॉनच्या जंगलांची सद्यस्थिती आणि या जंगलांना ज्या धोक्यांचा सामना करावा लागतो आहे, त्याचा सखोल आढावा घेत आहे.

ॲमेझॉनच्या जंगलाचा जवळपास 60 टक्के भाग ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलचं म्हणणं आहे की उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी ते एक नवीन करार घडवून आणण्याचा प्रयत्न करतील.

उष्णकटिबंधीय वर्षावनं किंवा सदाहरित जंगलं प्रामुख्यानं विषुववृत्ताजवळ आढळतात. या जंगलांमध्ये उंचच उंच, बहुतांश सदाहरित वृक्ष असतात.

दुर्मिळ प्रजातींचा अधिवास

ॲमेझॉनमध्ये फक्त जंगलच नाही, तर दलदलीचा प्रदेश आणि सवाना म्हणजे गवताळ मैदानी प्रदेश देखील आहे.

ॲमेझॉनचं खोरं दक्षिण अमेरिकेत 67 लाख चौ. किलोमीटरहून अधिक भूभागात पसरलेलं आहे. क्षेत्रफळाचा विचार करता हा आकार भारताच्या दुप्पट आहे. हा भाग पृथ्वीवरील सर्वाधिक समृद्ध आणि जैव विविधता असणाऱ्या भागांपैकी एक आहे.

इथे काय आढळतं?

  • किमान 40,000 वनस्पतींच्या प्रजाती
  • 427 सस्तन प्रजाती
  • पक्षांच्या 1,300 प्रजाती, ज्यात हार्पी ईगल आणि टूकानचा समावेश आहे.
  • हिरव्या इगुआनापासून ते ब्लॅक कॅमनपर्यंत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 378 प्रजाती
  • 400 हून अधिक उभयचर प्रजाती, ज्यात डार्ट पॉयझन फ्रॉग आणि स्मूथ-सायडेड टोड यांचा समावेश आहे.
  • गोड्या पाण्यातील माशांचे जवळपास 3,000 प्रकार, यात पिरान्हा आणि विशाल अरपाइमा माशाचा समावेश आहे. त्याचं वजन 200 किलोपर्यंत असू शकतं.

यापैकी अनेक प्रजाती जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. याव्यतिरिक्त, या प्रदेशात शेकडो मूलनिवासी समुदाय राहतात.

खोरे आणि जैवविविधतेच्या बाबतीत ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीला तब्बल 1,100 हून अधिक उपनद्या आहेत. गोड्या पाण्याचा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्रोत आहे.

हे पाणी शेवटी अटलांटिक महासागरात जाऊन मिळतं आणि सागरी प्रवाह राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.

ॲमेझॉनचं जंगल हे एक भलंमोठं कार्बन सिंक आहे. अर्थात ॲमेझॉनच्या जंगलातील काही भागात वृक्षतोड झाल्यामुळे आणि जमीन खराब झाल्यामुळे असं दिसून आलं आहे की हे जंगल जितक्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतं, त्याच्यापेक्षा अधिक उत्सर्जित करतं आहे.

ॲमेझॉनचं जंगल हे अन्न आणि औषधांचा देखील एक प्रमुख स्त्रोत आहे. या जंगलांमध्ये धातू, विशेषकरून सोन्यासाठी उत्खनन केलं जातं.

हा भाग कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा देखील एक मोठा उत्पादक प्रदेश ठरू शकतो. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात लाकडाचा पुरवठा होतो आहे.

ॲमेझॉनच्या जंगलांमध्ये नेमकं काय घडतं आहे?

तापमानात वेगानं होत असलेली वाढ आणि प्रदीर्घ काळ पडलेल्या दुष्काळामुळे ॲमेझॉनच्या नैसर्गिक संतुलनावर मोठा परिणाम झाला आहे.

सर्वसाधारणपणे ओलसर राहणारं हे जंगल आता मोठ्या प्रमाणात कोरडं झालं आहे. त्यामुळे जंगलाचा असणारा आगीचा धोका वाढला आहे.

उदाहरणार्थ, आयएनपीई या ब्राझीलच्या अंतराळ संस्थेनुसार सप्टेंबर 2024 मध्ये ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्यात 41,463 ठिकाणी आगीचे हॉटस्पॉट नोंदवण्यात आले. हे 2010 नंतर सप्टेंबर महिन्यात नोंदवण्यात आलेलं सर्वाधिक प्रमाण होतं.

अमेरिकेतील येल विद्यापीठातील 'इकोसिस्टम कार्बन कॅप्चर'चे सहायक प्राध्यापक पाउलो ब्रांडो म्हणतात, "दुष्काळ आणि आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे. यामुळे ॲमेझॉनच्या अनेक भागाची धूप वाढली आहे."

ते पुढे म्हणतात, "अनेक भागात ही धूप आता ॲमेझॉनच्या जंगलांसाठी एक मोठा धोका ठरते आहे."

फ्लाईंग रिव्हर्सवरील विनाशकारी परिणाम

समस्या इथूनच सुरू होते. विशाल आकाराचं ॲमेझॉन खोऱ्यात स्वत:च्याच हवामान प्रणाली आहेत.

याची जंगलं अटलांटिक महासागरातून येणारी आर्द्रता किंवा ओलावा पसरवतात. त्यांना आकाशात वाहणाऱ्या 'हवाई नद्या' किंवा 'फ्लाईंग रिव्हर्स' म्हणतात.

या वातावरणातील नद्या सर्वात आधी ॲमेझॉनच्या पूर्व भागात, म्हणजे अटलांटिकजवळच्या प्रदेशात पाऊस पाडतात. त्यानंतर जमीन आणि वृक्षांवरून पाण्याची वाफ होते. मग बाष्पीभवनच्या प्रक्रियेद्वारे ते हवेत पसरतं आणि वर्षावनाच्या इतर भागात पडण्याआधी पश्चिमेकडे जातं.

वर्षावनाच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत पाण्याचं हे चक्र संपूर्ण ॲमेझॉनच्या खोऱ्यात चालतं. हे विशाल वर्षावन इतका प्रदीर्घ काळ कशाप्रकारे बहरलं आहे हे त्यातून दिसून येतं.

वातावरणातील नद्या प्रत्यक्षात पाण्याच्या वाफेच्या नद्या आहेत. त्या आकाशात पाणी वाहून नेतात.

अर्थात, तज्ज्ञ इशारा देत आहेत की आता ॲमेझॉनमधील आर्द्रतेचं किंवा ओलाव्याचं हे नैसर्गिक संतुलन बिघडलं आहे.

ज्या भागात जंगलतोड झाली आहे किंवा जमिनीची धूप झाली आहे, तिथे आता महासागरातून येणारी आर्द्रता पूर्वीप्रमाणे पसरवली जात नाहीये. परिणामी, जमीन आणि वृक्षांमधून वाफ होऊन हवेत परतणारं आर्द्रतेचं प्रमाण खूपच कमी झालं आहे.

ॲमेझॉन संवर्धनासाठी काम करणारे वैज्ञानिक आणि फ्लाईंग रिव्हर्स आणि ॲमेझॉनच्या भविष्यावरील ताज्या अहवालाचे सह-लेखक मॅट फायनर म्हणतात, "ओलावा पसरवणाऱ्या ज्या छोट्या-छोट्या हवामान प्रणाली आधी संपूर्ण ॲमेझॉनमध्ये आपसात जोडलेल्या होत्या. त्या आता मोडल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत."

त्यांचं म्हणणं आहे की याचा सर्वात वाईट परिणाम ॲमेझॉनच्या पश्चिमेकडील भागात झाला आहे. हा भाग अटलांटिक महासागरापासून सर्वात दूर आहे. विशेषकरून दक्षिण पेरू आणि बोलिव्हियाच्या दक्षिणकेडील भागात याचा गंभीर परिणाम झाला आहे.

ते म्हणतात की, "पेरू आणि बोलिव्हियाच्या वर्षावनांचं अस्तित्व, खरंतर पूर्वेकडील ब्राझीलमधील जंगलांवर अवलंबून आहे. जर ही जंगलं नष्ट होत गेली, तर 'फ्लाईंग रिव्हर्स' बनवणारं जल चक्र संपुष्टात येईल आणि ओलावा किंवा आर्द्रता ॲमेझॉनच्या पश्चिम भागापर्यंत पोहोचू शकणार नाही. हे सर्व आपसात जोडलेलं आहे."

ही समस्या जून ते नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या कोरड्या मोसमात सर्वात गंभीर रूप धारण करते.

निर्णायक टप्पा

आधी ॲमेझॉनचं खोरं हे जंगलात लागणाऱ्या आगींना प्रतिरोध करण्याच्या बाबतीत सशक्त होतं. मात्र ज्या भागात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, तिथे आगींबद्दलचा हा बचाव हळूहळू कमकुवत होत चालला आहे.

काही वैज्ञानिकांना शंका वाटतं की कोरडी होत चाललेली वर्षावने आता निर्णायक टप्प्यावर आली आहेत. इथून ती आता पुन्हा सावरू शकणार नाहीत. ही जंगलं आता कायमची नष्ट होण्याचा धोका आहे.

मॅट फायनर म्हणतात, "आता आपल्याला निर्णायक बदलाची सुरूवातीची चिन्हं ॲमेझॉनच्या काही भागात दिसत आहेत."

ऑक्सफर्ड विद्यापीठातील 'इकोसिस्टम्स लॅब'मध्ये वरिष्ठ संशोधन सहाय्यक असलेल्या एरिका बेरेनगुएर यांनादेखील वाटतं की धोका सातत्यानं वाढतो आहे.

फायनर यांच्याप्रमाणेच त्यादेखील म्हणतात की ॲमेझॉनच्या जंगलांच्या काही भागावर इतर भागांच्या तुलनेत अधिक परिणाम झाला आहे.

त्या म्हणतात, "ही एक अत्यंत संथ प्रक्रिया असून ती काही विशिष्ट भागांमध्ये होते आहे."

पाण्याचं संकट

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ॲमेझॉनच्या आकाशात ओलावा किंवा आर्द्रतेचं कमी प्रमाणात होणाऱ्या वहनाचा परिणाम फक्त जंगलांवरच नाही तर ॲमेझॉन आणि तिच्या अनेक उपनद्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात होतो आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ॲमेझॉनच्या खोऱ्यातील अनेक नद्यांचा जलस्तर विक्रमी पातळीवर खाली आला आहे. 2023 मध्ये इथे गेल्या 45 वर्षांमधील सर्वाधिक भीषण दुष्काळ पडला होता.

2023 आणि 2024 च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये दुष्काळाची ही परिस्थिती अंशत: 'अल नीनो'च्या प्रभावामुळे निर्माण झाली होती. ही एक नैसर्गिक हवामान प्रणाली आहे. यात पूर्व पॅसिफिक महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं.

त्याचा परिणाम संपूर्ण जगातील पावसाच्या पॅटर्नवर होतो. विशेषकरून दक्षिण अमेरिकेत तो होतो.

बेकायदेशीर खाणींचं आव्हान

जंगलतोड आणि हवामान बदलाचं संकट यामुळे आधीच गंभीर नुकसान झालेलं असताना आता बेकायदेशीर उत्खनन, विशेषकरून सोन्याच्या उत्खननामुळे देखील ॲमेझॉनच्या खोऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे.

एरिका बेरेनगुएर म्हणतात, "आता या प्रदेशात रेअर अर्थ खनिजांसाठी देखील उत्खनन सुरू झालं आहे."

ही खनिजं इलेक्ट्रिक वाहन, पवनचक्क्या, मोबाईल फोन आणि उपग्रहांमध्ये वापरली जातात. त्यामुळेच ती आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

अर्थात उत्खननामुळे खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत नाही. मात्र त्यामुळे पाऱ्यासारख्या रसायनांनी नद्या, माती आणि वृक्ष प्रदूषित होतात. नंतर हेच विष प्राणी मानव या दोघांसाठी घातक ठरू शकतं.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या आणि संघटित गुन्हेगारी नेटवर्कमधील संबंध सातत्यानं वाढत आहेत. यामध्ये शस्त्रं आणि बंदूकांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा देखील समावेश आहे.

मॅट फायनर म्हणतात, "गुन्हेगारी नेटवर्क संपूर्ण ॲमेझॉन खोऱ्यात पसरलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाला प्रत्यक्षात त्यावर नियंत्रण ठेवणं खूपच कठीण झालं आहे."

ॲमेझॉनचं खोरं आठ देशांमध्ये पसरलेलं आहे. प्रत्येक देशाची कायदा तयार करण्याची आणि तो लागू करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळेच सीमेपलीकडील गुन्ह्यांना आळा घालणं खूपच कठीण होऊन बसतं.

चिंतेचं आणखी एक कारण म्हणजे, ॲमेझॉनच्या खोऱ्याखाली मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन आढळले आहेत.

इन्फोअमेझोनियानुसार, या प्रदेशात 2022 ते 2024 दरम्यान जवळपास 5.3 अब्ज बॅरलचे कच्च्या तेलाचे साठे शोधण्यात आले आहेत.

त्यांचं म्हणणं आहे की जगात अलीकडच्या काळात शोधण्यात आलेल्या कच्च्या तेलाच्या साठ्यांपैकी जवळपास पाचवा हिस्सा या प्रदेशात आहे. त्यामुळे जीवाश्म इंधन उद्योगासाठी हे एक नवीन केंद्र झालं आहे.

या साठ्यांचा शोध लागण्यापूर्वीच आणि 'फ्लाईंग रिव्हर्स' वर ताजं संशोधन होण्याआधी, 'सायन्स पॅनल फॉर द ॲमेझॉन'च्या अहवालात दाखवण्यात आलं होतं की वर्षावनाच्या विनाशामुळे 10,000 हून अधिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

या प्रदेशासाठीच नाही तर जगासाठी असलेलं महत्त्व

ॲमेझॉनचं जंगल अजूनही एक मजबूत कार्बन सिंक आहे. त्यामध्ये पृथ्वीचं तापमान वाढवणाऱ्या कार्बन डायऑक्साईड (CO2) या प्रमुख वायूला मोठ्या प्रमाणात शोषून घेण्याची क्षमता आहे.

2024 मध्ये प्रकाशित झालेल्या 'मॉनिटरिंग ऑफ द अँडीज ॲमेझॉन प्रोग्रॅम' (एमएएपी) च्या अहवालानुसार, 2022 पर्यंत ॲमेझॉन खोऱ्याच्या जमिनीवर आणि खाली जवळपास 71.5 अब्ज मेट्रिक टन कार्बन जमा झालेला होता.

हे प्रमाण 2022 सालच्या जागतिक पातळीवरील कार्बन डायऑक्साईड (CO2) च्या उत्सर्जनाच्या जवळपास दोन वर्षांच्या उत्सर्जनाइतकं आहे.

मात्र वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की जंगलतोड आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे या प्रदेशातील आणखी भाग कार्बन शोषून घेण्याऐवजी कार्बन उत्सर्जन करू लागण्याचा धोका आता वाढतो आहे.

त्यांचं म्हणणं आहे की जर आपण ॲमेझॉनचं जंगल गमावलं तर ते हवामान बदलाच्या संकटाविरोधातील लढाई हरल्यासारखं असेल.

उष्णकटिबंधीय जंगलं, ढगांचा एक थर तयार करतात. हा थर सूर्याची किरणं परावर्तित करून अंतराळात परत पाठवतात. यामुळे पृथ्वी थंड राहण्यास किंवा पृथ्वीचं तापमान संतुलित राहण्यास मदत होते. जोपर्यंत ही पक्रिया सुरू असते, ती पृथ्वीचं तापमान वाढण्याची गती कमी करत असते.

ब्राझीलमधील वन वैज्ञानिक टासो अजेवेदो म्हणतात, "ज्याप्रमाणे ॲमेझॉनसारखी उष्णकटिबंधीय जंगलं कार्बन शोषून पृथ्वीचं तापमान मर्यादित ठेवतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये ग्रहांना थंड ठेवण्याची क्षमतादेखील असते."

ते म्हणतात, "त्यामुळे तापमान वाढत असलेल्या या जगासाठी ॲमेझॉन हे एखाद्या एअर कंडिशनरसारखंच आहे."

आधी सांगितल्याप्रमाणे, गोड्या पाण्याच्या जगातील सर्वात मोठ्या साठ्याचा जागतिक हवामानावर खोलवर परिणाम होतो.

वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की गोड्या पाण्याचा हा विशाल प्रवाह अटलांटिक महासागराच्या प्रवाहांना दिशा देण्यास मदत करतो.

तसंच या प्रवाहात झालेल्या कोणत्याही बदलाचा परिणाम समुद्राच्या प्रवाहांबरोबरच प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील हवामान प्रणालींवर देखील होऊ शकतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.