अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात बेपत्ता झालेली 4 मुलं 40 दिवसांनी ‘अशी’ जिवंत सापडली

कोलंबियाच्या जंगलात बेपत्ता झालेली चार मुलं 40 दिवसांनी जिवंत सापडली आहेत. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात कोसळलेल्या विमानात ही मुले होती.

ही बेपत्ता मुलं सापडणं आणि तीही जिवतं, ही बाब अनेकांसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीय.

दक्षिण-पूर्ण कोलंबियातील या चार आदिवासी मुलांनी विमान अपघातानंतर तब्बल 40 दिवस दुर्गम आणि घनदाट जंगलात घालवले.

1 मे 2023 रोजी ही मुलं त्यांच्या आई आणि इतर दोन व्यक्तींसह एका छोट्या विमानात प्रवास करत होती. हे विमान जंगलात कोसळलं. या दुर्घटनेत ही चार मुलं वगळता इतरांचा मृत्यू झाला.

या चारही जणांची वयं अनुक्रमे चौदा, नऊ, चार आणि एक वर्ष आहेत. अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात हे सर्व जण एकएकटे राहिले.

दीर्घ शोध मोहिमेनंतर लष्कराने या चारही मुलांना शुक्रवारी म्हणजे 9 जून 2023 रोजी जंगलातून शोधून काढलं. शनिवारी (10 जून) त्यांना कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये आणण्यात आलं. तिथं त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही मुलं जिवंत सापडण्याचा ‘चमत्कार’, ‘बचावकार्याची मोहीम’ आणि मुलांच्या ‘शौर्याचे किस्से’ या सगळ्यांनी कोलंबियन माध्यमं भरभरून बोलत आहेत.

20 हजार किलोमीटरवर पसरलेल्या या भागात शोधमोहिमेसाठी सरकार, आदिवासी समाजाचे लोक आणि लष्कराने एकत्रितपणे काम केले.

तसंच, या भागातील 150 गणवेशधारी कर्मचारी आणि आदिवासी समाजातील 100 लोकही शोध पथकाचा भाग बनले होते.

40 दिवसांनंतर मुलं कशी सापडली?

या बेपत्ता मुलांचा शोध घेणाऱ्या पथकानं मुलांच्या आजीच्या आवाजात एक संदेश रेकॉर्ड केला आणि जंगलावरून फिरणाऱ्या हेलिकॉप्टरमधून हा संदेश लाऊडस्पीकरवरून जाहीर करण्यात आला. स्पॅनिश आणि स्थानिक आदिवासी भाषेत हा संदेश होता.

या संदेशात मुलांची आजी म्हणात होती की, “मला मदत करा, मी तुमची आजी बोलतेय. तुम्ही माझं ऐकताय ना? तुम्ही जिथं असाल, तिथंच थांबा. लोक तुम्हाला शोधण्याचे प्रयत्न करतायेत. माझा आवाज ऐका आणि असाल तिथेच थांबा. जेणेकरून तुम्हाला शोधणं सोपं जाईल.”

फातिमा यांनी फ्रान्स 24 या न्यूज वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, “विमान अपघातामुळे माझी मुलगी तर माझ्यापासून हिरावली गेलीय. आता माझं कुणीच नाहीय. आहेत ती फक्त ही नातवंडं. त्यामुळे मी माझ्या नातवंडांचा शोध घेतेय.”

शोधमोहिमेदरम्यान एका झोपडीजवळ दुधाची बाटली सापडली. ही झोपडी मुलांनीच बांधली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय.

गेल्या शुक्रवारी एका ठिकाणी पायाचे ठसे आढळून आले. ते ठसे सुद्धा बेपत्ता मुलांपैकी एकाचे असावेत, असं मानलं गेलं.

पुटुमायो येथील जिरीजिरी आदिवासी समुदायातील मिगुएल रोमॅरियो आणि मुलांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना असं वाटत होतं की, मुलांना जंगलात कसे राहायचे हे माहिती आहे, त्यांना काहीही होणार नाही.

या शोधमोहिमेदरम्यान मिगुएल रोमॅरियो म्हणाले होते, “मुलं बऱ्या अवस्थेत आहेत, असं आम्ही गृहित धरलंय. निसर्गमाता मुलांचं रक्षण करेल. तसंच, मुलं जिवंत राहण्यासाठी त्यांना आवश्यक गोष्टीही निसर्गमाता देईल.”

अॅलेक्स रुफिनो हे आदिवासी समाजाबद्दलचे जाणकार आणि नॅशनल यूनिव्हर्सिटीत प्रोफेसर आहेत. तसंच, ते फोटोग्राफरही आहेत.

बीबीसी मुंडोशी बोलताना अॅलेक्स रुफिनो म्हणाले, माध्यमांमधून या घटनेचं ज्या पद्धतीनं वृत्तांकन केलं जातंय, त्यावरून एक स्पष्ट होतंय की, कथित मुख्य प्रवाहाला आदिवासी समाजाबद्दल किती कमी माहिती आहे.

रुफिनो पुढे म्हणतात की, “ही मुलं जंगलात हरवलेली नव्हती, तर ती त्यांच्या नैसर्गिक वातावरणात होती. जंगल त्यांची काळजी घेत होतं आणि शतकानुशतके निसर्गासोबत जगणाऱ्या आदिवासी समाजाचे अस्सल शहाणपण त्यांच्याकडे होतं.”

रुफिनो हे मान्य करतात की, या 40 दिवसांमध्ये बेपत्ता झालेल्या मुलांच्या जीवाला मोठा धोका होता. त्यांच्याकडे अन्नाची कमतरता तर होतीच, पण जंगलातील इतर प्राणीही त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकत होते.

पण पुढे ते असंही म्हणतात की, निसर्गमाता त्यांचं रक्षण करत होती आणि तसंही मुलांचं जंगलाशी एक दृढ नातं होतंच.

अॅलेक्स रुफिनो यांच्याशी बीबीसीच्या मुंडो न्यूज सर्व्हिसनं बातचित केली आणि काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली.

प्रश्न – मुलं 40 दिवस जंगलात कशी राहिली?

रुफिनो - मुलं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून खूप काही शिकत असतात. जंगलात शिकारीला गेल्यावर ही मुलं लक्षपूर्वक सर्व गोष्टी पाहत असतात. कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्या मदतीला कशा येऊ शकतात वगैरे गोष्टींवर त्यांचं लक्ष असतं.

जंगलात काय खावं, काय खाऊ नये, हे वडीलधारी मंडळी सांगत असतात. तेही मुलं लक्षात ठेवतात.

जंगलातील प्रत्येक झाड, प्रत्येक कीटक, प्रत्येक प्राणी आपण कुठे आहोत याची माहिती देतो. काय उपलब्ध आहे आणि काय धोके आहेत, हे कळत जातं. आदिवासी समाजातील मुलांना ही चिन्हे कशी वाचायची आणि त्यांचा अर्थ काय हे माहित असतं.

स्वतः शिकलेल्या गोष्टींसोबतच त्यांना प्राण्यांचीही मदत मिळते.

उदाहरणार्थ, माकडांच्या खाण्याच्या सवयी माणसांसारख्याच असतात. माकडे कोणती फळे खातात हे पाहिल्यास कोणती फळे खाण्यास योग्य आहेत हे कळू शकते. आपल्यात आणि माकडांमध्ये सहअस्तित्व आहे. माकडे कधी कधी झाडावरची फळे खाली टाकतात, जी तुम्ही खाऊ शकता.

जंगलातील माकडांच्या उड्या किंवा त्यांच्यासारखं धावणं मात्र माणसाला शक्य नाही. कारण माकडं माणसापेक्षा या बाबतीत अधिक चपळ असतात.

अन्नासाठी माकडांचं अनुकरण फायद्याचं ठरू शकतं. कारण जंगलात अन्न नेमकं कुठे आहे, हे माकडांना नेमकं माहिती असतं. माकडं फांद्या तोडत असतात, तेव्हा तो धोक्याचा इशारा असतो. उदहारणार्थ, जंगलात वाघ किंवा वाघसदृश प्राणी किंवा अजगर त्यांना दिसलेला असू शकतो.

जंगलात माकडांशी नातं निर्माण करून आपण आपले संरक्षण करू शकतो.

प्रश्न – मुलं जंगलात पुढे जात का राहिली?

रुफिनो – जंगलात एका ठिकाणी कोणीही राहू शकत नाही. तुम्ही विचारच अशा प्रकारे करू लागता की, आपोआप चालू लागता. रात्र नीट घालवता येईल, यासाठी आवश्यक गोष्टींच्या शोधात तुम्ही चालू लागता.

ज्या जंगलात ही चार मुलं अडकली होती, ते खूप घनदाट जंगल आहे. या प्रदेशात सर्वांत मोठी झाडं देखील आहेत. हे असे क्षेत्र आहे जिथे मानवी प्रवेश आतापर्यंत खूप मर्यादित आहे. या जंगलात जी काही मानवी वस्ती आहे, ती खूप आत आहे आणि तीही नदीच्या काठावर आहे.

थंड, दमट आणि डासांनी भरलेला असा हा भाग आहे. चित्ता, अॅनाकोंडा आणि अमेरिकेत आढळणाऱ्या सर्वांत विषारी सापांचं हे क्षेत्र आहे.

जंगलातला प्रत्येक क्षण, प्रत्येक ठिकाण तुमच्याशी संवाद साधत असतो. तुम्ही त्याच्याशी एकरूप झाला नाहीत, संवाद साधला नाहीत, तर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. हे आध्यात्मिक वाटेल, पण असंच असतं.

प्रत्येक वस्तूचे, प्रत्येक झाडाचे स्वतःचे अस्तित्व असते, ज्यातून काही ना काही शिकता येते. हे असं नातं असं आहे की, त्या बदल्यात औषधं आणि अन्न-पाणी मिळू शकतं.

उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही रात्री झोपता, तेव्हा झाड तुमच्या संरक्षकाची भूमिका बजावत असतं. ते आश्रय देतात, मिठी मारतात.

प्रश्न - जंगलात जिवंत राहण्यासाठी मुलांनी काय केलं असेल?

रुफिनो - मुलांना बरीच ओली पाने आणि पाण्याचे छोटे प्रवाह सापडले असतील. पण पिण्यालायक पाणी न मिळण्याचीही शक्यता आहे. पण या जंगलात अशीही पाने आहेत, जी पाणी शुद्ध करतात. मात्र, काही पानं विषारीही असतात.

शरीर स्वच्छ करण्यासाठी खास पानांचा वापर करण्याचे तंत्र या मुलांनी अवलंबलं असावं. असं केल्याने डास आणि कीटकांचा त्रासदायक आणि कधीकधी जीवघेणा ठरणारा हल्ला थांबवता येतो.

पोट भरण्यासाठी त्याने किडे खाल्ले असावेत. कीटकांपासून पक्ष्यापर्यंत सर्व काही जंगलातील अन्न आहे. शिकार केल्यानंतर चित्ता जे काही मागे सोडतो, हा देखील अन्नासाठी चांगला पर्याय असतो.

या मुलांनी फळं खाल्ली असण्याची शक्यता आहे. इथं लाल रंगाच्या गोड बिया मोठ्या प्रमाणात मिळतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि ऊर्जाही मिळते.

जंगलात तुमचे वजन कमी होत आहे, याची जाणीवही होत नाही. आपण बरे आहोत असे आपल्याला नेहमी वाटते. जेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांना भेटता, तेव्हाच तुम्हाला धोका होता, असं वाटू शकतं.

तुम्हाला कधीच वाटत नाही की, तुम्ही मरणार आहात, तुम्ही फक्त पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करत असता.

प्रश्न – अशा परिस्थितीत राहणं सामान्य आहे का?

रुफिनो – हे अगदी सामान्य आहे. सरासरी दर दहा दिवसांनी अशी घटना समोर येते. अनेकजण अन्न शोधण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी बाहेर पडतात आणि पुढे जात राहतात आणि जंगलात वाट विसरतात.

याचा अर्थ, ते हरवले, असा होत नाही. कारण ते त्यांच्याच वातावरणात असतात. पण ते पुढे जात आहेत आणि ते घरी परतू शकतील की नाही हे त्यांना माहीत नसतं. त्यांना मार्ग माहित नसल्यानं असं घडतं.

हे असं जग आहे, जिथे सर्व काही विकलं जातं. म्हणून या बेपत्ता मुलांच्या सापडण्याला माध्यमं ‘चमत्कार’ म्हणत आहेत आणि प्रेक्षकांना, वाचकांना खिळवून ठेवत आहेत.

आदिवासी समाजाला समजून घेणे अवघड आहे, पण या घटनेच्या निमित्ताने ते समजून घेणे आवश्यक झाले आहे.

जंगलात वेळ घालवणारी मुलं या 40 दिवसांत शिकलेले धडे आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. विमान कोसळलं, तेव्हा जंगलात मुलांचा शोध घेण्यात आला.

पण मुलं शतकानुशतके जंगलात राहत आली आहेत. ती कशी राहतात आणि कशी जगतात हे बघायला कुणी येत नाही.

या मुलांचा जंगलाला धोका नव्हता, म्हणून तर जंगलाने त्यांना जिवंत ठेवलं.

हे वाचलंत का?