You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅमेझॉन जंगलाच्या रक्षणासाठी लिओनार्डो डी कॅप्रिओची 5 मिलिअन डॉलर्सची मदत
'पृथ्वीचं फुप्फुस' असं वर्णन केल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या सदाहरित जंगलाला भीषण आग लागली. या जंगलांना लागलेल्या आगीमुळे दुर्मीळ प्रजातीची वृक्षसंपदा नष्ट झाली आहे.
आगीनं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी हॉलीवूड अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रिओने 5 मिलिअन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली आहे. लिओनार्डोची पर्यावरणासाठी काम करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत ही रक्कम दिली जाईल.
'अॅमेझॉन जंगलांना लागलेल्या आगीमुळे अतिशय व्यथित झालो आहे. हवामान बदल, जैवविविधता आणि स्थानिकांची स्थिती यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकांनी पुढाकार घेऊन अॅमेझॉन जंगलांसाठी पुढाकार घ्यावा,' असं आवाहन लिओनार्डोने इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे केलं आहे.
अॅमेझॉनचं रक्षण करणाऱ्या 'अर्थ अलायन्स' या संस्थेतर्फे स्थानिक गट आणि समाजाला ही मदत पुरवण्यात येईल. अॅमेझॉन जंगलांमध्ये गेल्या वर्षभरात आग लागल्याचे 72 हजार हून अधिक प्रसंग घडल्याची माहिती ब्राझीलमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्च संघटनेने दिली आहे.
'अॅमेझॉन जंगलात लागलेल्या आगीमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन होत आहे. कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारी ही जंगलं झपाट्याने नष्ट झाली आहेत. हवामान बदलाचं संकट रोखण्यात या जंगलाची भूमिका निर्णायक आहे', असं अर्थ अलायन्सने म्हटलं आहे.
पाच विविध संस्थांना विभागून ही रक्कम देण्यात येणार आहे.
शेती, खाणकाम या कारणांसाठी जाणीवपूर्वक जंगलतोड करण्यात आली. यामुळेच आग लागण्याचं प्रमाण वाढलं.
पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी पुरेशा उपाययोजना हाती घेतल्या नसल्याचा आरोप ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोलसोनारो यांच्यावर होत आहे. काही स्वयंसेवी संस्था आग लागण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.
लिओनार्डो आणि अन्य काहीजणांनी मिळून अर्थ अलायन्स ही संस्था सुरू केली आहे. वन्यजीवरक्षण, हवामान बदलाचा परिणाम कमी व्हावा यासाठी प्रयत्न तसंच स्थानिकांचे हक्क यासाठी ही संस्था काम करते.
अॅमेझॉन जंगलातील अतिविशिष्ट भागाच्या रक्षणासाठी 'द अॅमेझॉन फॉरेस्ट फंड' आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी 7 राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने या प्रश्नासाठी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय करार होण्याची शक्यता आहे.
युकेकडून अॅमेझॉन जंगलांच्या रक्षणासाठी 10 मिलिअन पौंड देण्यात येईल असं युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)