देश सोडून इंग्लंडला निघाला, 14 वर्षांचा तो किनाऱ्यावरही पोहोचला, पण अवघ्या 10 मीटर अंतरावर...

- Author, एंड्रयू हार्डिंग
- Role, बीबीसी न्यूज
त्या रात्री 14 वर्षांचा अब्दाह अब्द रबवाह गोठवून टाकणाऱ्या पाण्यात बुडाला. आपल्याला पोहता येईल असा विश्वासच त्याच्याकडे नव्हता.
अंधारलेल्या त्या काळोख्या रात्री लाटांकडे स्वतःला सुपूर्द करताना तो एकच सांगत होता, "तुला पोहता येत नाही."
मात्र वयाची चोवीशी गाठलेल्या अब्दाहचा मोठा भाऊ आसेर याने त्याचा हात मरेपर्यंत सोडला नाही.
नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी सीरिया सोडलं होतं. समुद्रातून प्रवास करायची ही त्यांची तिसरी वेळ होती. प्रत्येक वेळी अब्दाह घाबरलेला असायचा कारण त्याला पोहता येत नव्हतं. या प्रवासाबद्दल तो नाखूष होता.
त्या रात्री उत्तर फ्रान्समधील समुद्रकिनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर बुडून मृत्युमुखी पडलेल्या पाच लोकांमध्ये अब्दाह आणि आसेर यांचा समावेश होता.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका छोट्या नावेतून ब्रिटनला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी ते एक होते.
एखाद्या मुलाला अशा परिस्थितीत काय त्रास होत असेल हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने अब्दाहचा सीरियातील हा प्रवास पुन्हा मांडला आहे.
यासाठी आम्ही अब्दाहचे नातेवाईक आणि त्याच्यासोबत आलेल्या इतरांचे व्हीडिओ, संदेश आणि मुलाखती वापरल्या आहेत. प्रत्येक पावलावर आलेले कठीण प्रसंग वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं ध्येय आहे.
पालक, नातेवाईकांवर असणारा असाधारण दबाव आम्ही या बातमीतून उघड केला आहे. या शोधात आम्हाला ब्रिटनमध्ये पोहोचू इच्छिणाऱ्यांचे हेतू, असे सर्व प्रयत्न रोखण्यासाठी ब्रिटीश आणि इतर सरकारांनी उभे केलेले अडथळे जाणून घेता आले.
गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनमध्ये येणाऱ्या विस्थापितांचा ओघ वाढला आहे. यापैकी सुमारे डझनभर लोक दक्षिण सीरियातील दारा शहरातील होते.
या लोकांमध्ये अब्दाह सारखी लहान मुलं देखील होती. या मुलांना तुम्ही मोठे झाला आहात असं म्हणत प्रवासासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र यामुळे काही फायदा होईल, असं दिसत नव्हतं.
पुरुषांनी असा प्रवास करणं त्यातलं त्यात सोपं होतं. मात्र स्त्रियांनी असा प्रवास करणं धोकादायक आणि तुलनेने असुरक्षित होतं.
कारण त्यांना युद्धग्रस्त लिबियातून प्रवास करावा लागणार होता. पण तरीही त्या रात्री आपल्या किशोरवयीन मुलांसह दोन स्त्रिया सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या.
त्या रात्री पाण्यात उभ्या असलेल्या नावेत काही लोक आधीच चढून बसले होते. तर काहीजण आपल्याला जागा मिळेल या आशेने तिथे गर्दी करून उभे होते. इतक्या लोकांना या नावेत बसायला जागा नव्हती.
माणसांची तस्करी करणाऱ्या तस्करांनी नावेत बसलेल्या लोकांना मध्येच पळून जावं लागलं तर मोटारसायकलच्या टायरच्या ट्यूब काढून दिल्या होत्या. पण नाव इंग्लंडला जाईपर्यंत त्या फुगवू नका असेही निर्देश दिले होते.
लाटा आता वाढू लागल्या आणि नावेला खोल पाण्यात खेचू लागल्या. 14 जानेवारीच्या रात्री हवेचा दाब कमी झाला होता. इंग्लंडला निघालेली 2024 च्या वर्षातली ही पहिलीच खेप होती.
नाव किनाऱ्यावरून निघताना काही लोक त्यावर जबरदस्तीने चढण्याचा प्रयत्न करू लागले. यातून प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
हा किनारा फ्रान्सच्या उत्तर किनाऱ्यासारखा लांबलचक नव्हता. त्याऐवजी नाव बुलोन बंदराच्या उत्तरेला असलेल्या विमिरिओच्या छोट्याश्या भागातून चालली होती. या चिंचोळ्या भागात समुद्राच्या भरतीचं पाणी शिरलं होतं.
तिथून जाण्यासाठी उथळ समुद्र नव्हता आणि अशातच लोक नावेत चढण्याचा प्रयत्न करत होते.
भ्रमाच्या पलीकडे
वाचलेल्यांपैकी एकाने सांगितलं की, 'आम्हाला याची कल्पना नव्हती.'
पश्चिम लंडनमध्ये अंथरुणावर बसलेला नादा पंचविशीचा तरुण आहे. हा अब्दाहचा दुसरा मोठा भाऊ. तो सतत आपल्या फोनकडे पाहतोय. फोन पाहता पाहता रात्रीचे एक वाजून गेले.
काही तासांपूर्वी नादा आणि त्याच्याबरोबर प्रवास करत असलेल्या सर्वांशी तो बोलला होता.
तेव्हा ते सर्वजण फ्रान्समधील कॅलेस येथील एका पुलाखाली त्यांच्या तात्पुरत्या शिबिरात शेकोटीभोवती फेर धरून बसले होते. पुढच्या प्रवासाबद्दल ते आश्वस्त होते.
डोक्यावर विणलेली काळी टोपी आणि गळ्यात निळा स्कार्फ अडकवलेल्या अब्दाहसुद्धा तेव्हा त्याच्या प्रवासासाठी तयार होता.
नादाने वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत दोन वर्षांपूर्वी हा धोकादायक प्रवास सुरू केला होता. नादाच्या वडिलांनी त्याला संयम ठेवायला सांगितला होता. त्यांना असं वाटत होतं की हे युद्ध लवकरच संपेल.
नादा सांगतो, आम्ही जवळपास 12 वर्षं वाट पाहिली पण युद्ध संपत नाही. ना कोणती सुरक्षा आहे ना कुठलं सुरक्षित आश्रय स्थान. नादाच्या म्हणण्यानुसार त्याने या गोष्टी आपल्या वडिलांना सांगितल्या होत्या.
मितभाषी असलेला नादा त्याच्या इतर भावांसारखाच उंचपुरा आहे.
नादाने आश्रय घेण्यासाठी इंग्लंडची निवड केली कारण त्याच्या एका काकाने दहा वर्षांपूर्वी असंच केलं होतं आणि त्यांना इंग्लंड मध्ये राहण्याची परवानगी मिळाली होती.
नादा सांगतो, "मी आणि माझे काका, आम्ही दोघेही बेकायदेशीरपणे स्थलांतरित झालो कारण आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता."
असायलम एड या धर्मादाय संस्थेच्या म्हणण्यानुसार, ते स्थलांतरितांना कायदेशीर सल्ला देतात. सीरियन नागरिकांना इंग्लंड मध्ये प्रवेश हवा असेल तर त्यांच्याकडे अर्ज करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.
आणि कदाचित म्हणूनच बहुसंख्य स्थलांतरित बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांच्या देशात व्हिसासाठी प्रणाली नाही. यातले काहीजण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या आपल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी म्हणून येतात. अशात कधी त्यांचा व्हिसा नाकारला जातो, तर काहींना कधीकधी मंजूर केला जातो.
याशिवाय, पुनर्वसन योजनांद्वारे अल्पसंख्यांकांना प्रवेश दिला जातो. इंग्लंडच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की, सप्टेंबर 2023 मध्ये या योजनेअंतर्गत सुमारे 325 सीरियन शरणार्थिंना इंग्लंड मध्ये प्रवेश देण्यात आला होता.
इंग्लंडमध्ये आश्रयासाठी अर्ज करणारे 90% पेक्षा जास्त सीरियन लोक त्यांच्या देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे शरण घेण्यासाठी आले आहेत.
नादा इंग्लंडला पोहोचला...
इंग्लंडमध्ये आल्यावर नादाने अधिकाऱ्यांना सांगितलं की, दमास्कसमधील त्याच्या विद्यापीठात सरकारशी निष्ठा न ठेवल्याबद्दल त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याला सीरियन सैन्यात भरती व्हायचं नव्हतं.
तो म्हणाला की, सैन्यात भरती होणं खूप धोकादायक आहे. एक तर तुम्ही लोकांना मारा किंवा स्वतः मरा हे त्यांचं धोरण आहे. मला असं जगायचं नव्हतं.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नादाला निर्वासिताचा दर्जा आणि पाच वर्षांसाठी इंग्लंडमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती.
त्याला आता वेम्बलीजवळील एका गोदामात नोकरी मिळालीय.
तो आता इंग्रजी भाषेचा अभ्यास करतोय आणि लवकरच तो त्याच्या पत्नीला सीरियातून बाहेर काढणार आहे. तिलाही निर्वासित म्हणून अर्ज करण्याची परवानगी आहे. नादाला आपलं कायद्याचं शिक्षण पुन्हा सुरू करायचं आहे.
इंग्लंडमध्ये आल्यानंतर नादाने आपल्या भावांनाही सीरियामध्ये येण्यासाठी मनवलं. त्याने अब्दाहला इंग्लंडमध्ये येऊन अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
सीरियन गृहयुद्ध सुरू झाल्यापासून त्याचे अनेक चुलत भाऊ ब्रिटनमध्ये आले आहेत. दारा या शहरातून अनेक लोक इंग्लंडमध्ये येत असतात. असद राजवटीविरुद्ध क्रांतीचं जन्मस्थान म्हणून दारा हे शहर ख्यातनाम आहे.
नादाने त्याच्या भावांना सांगितलं की, "तुम्ही इथे येऊन नवीन जीवन जगू शकता."

अब्दाह दारा शहरातील एका शाळेत शिकत होता. तो खूप हुशार असल्याने पुढे जाऊन त्याला डॉक्टर करता येईल असं त्याच्या भावांना वाटत होतं. याचसोबत तो फुटबॉल मध्येही निपुण होता. त्याला इंग्लंडमध्ये मँचेस्टर सिटीचा खेळ पाहायचा होता आणि याविषयी त्याने नादाला सांगून ठेवलं होतं.
सीरियातील त्याच्याच समवयस्क मित्राने सांगितलं, "अब्दाह लहान वयातच गेला, त्याचं हे जाण्याचं वय नव्हतं."
अब्दाहने इंग्लंडला जावं यासाठी त्याच्या पालकांनी त्याच्यावर दबाव टाकला होता. सीरियातील परिस्थिती पाहून त्याच्या वडिलांचा भ्रमनिरास झाला होता.
त्याचे वडील अबू एसर यांना आरोग्याच्या तक्रारी होत्या आणि आपल्याला इंग्लंड मध्ये उपचार मिळतील या आशेवर ते होते. अब्दाहची आई इम एसर एका व्हीडिओत म्हणते की, "माझा लहान मुलगा इंग्लंडसाठी रवाना झालाय, भविष्यात आम्ही त्याला भेटू."
पुन्हा भेटण्याची संधी
दारा येथील त्याचा एक शेजारी नाव बुडताना अब्दाह सोबत होता.
या शेजाऱ्याने आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितलं की, "इंग्लंडमध्ये आल्यावर अब्दाह त्याच्या भावाला भेटणार होता. आणि तिथे पोहोचल्यावर तो त्याच्या आई वडिलांना फोन करणार होता. त्याच्या वडिलांना परदेशात उपचार मिळावे यासाठी तो इंग्लंडला चालला होता."
खरंतर अब्दाहच्या आई वडिलांची ही योजना फोल होती. कारण त्याचा एक भाऊ आधीच इंग्लंडमध्ये राहत होता. अब्दाह अल्पवयीन असल्याने असंही काही करू शकत नव्हता किंवा आपल्या आईवडिलांना तिथे बोलवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करू शकत नव्हता.
गेल्या वर्षी मे महिन्यात अब्दाह आणि त्याचा भाऊ आसेर दमास्कसहून लिबियाला जाण्यासाठी विमानात बसले. तेव्हा अब्दाह फक्त 13 वर्षांचा होता. सीरियन लोकांना लिबियाला जाण्यासाठी व्हिसाची गरज नसते.
दुबईत काम करणाऱ्या एका काकाने त्यांना पैशाची मदत केली होती, पण दुबईमध्ये आश्रय घेता येत नसल्यामुळे त्यांनी काकाकडे जाण्याचा विचार केला नाही.
आखाती देशात आश्रितांसाठी काहीच व्यवस्था नाही. अब्दाह तिथे शाळेत जाऊ शकला नसता, त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला ब्रिटनला पाठवलं.

फोटो स्रोत, Getty Images
पालकांनी प्रोत्साहन दिल्यामुळे आणि मोठ्या भावाने उत्साह दाखवल्यामुळे अब्दाह प्रवासासाठी तयार तर झाला. पण प्रवासात येणारे धोके त्याला अजून माहीत नव्हते.
लीबियामध्ये पोहोचल्यानंतर या दोन्ही भावांना बराच काळ प्रतिक्षा करावी लागली. सरतेशेवटी ऑक्टोबर 2023 मध्ये या दोन्ही भावांनी त्रिपोलीतील तस्करांच्या माध्यमातून भूमध्यसागर पार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना ट्युनिशियाच्या गस्त घालणाऱ्या नौकेने पकडले आणि लिबियाला परत नेले. इथे त्यांना स्थानिक तस्करांच्या ताब्यात देण्यात आलं.
यात 23 वर्षीय फारिस देखील होता. तो सांगतो, "आम्हाला एक महिना बंदिवासात ठेऊन अतोनात छळ करण्यात आला. त्यांना थंड फरशीवर झोपवलं जायचं, दिवसातून एकदाच जेवण दिलं जायचं. शेवटी या दोन भावांना त्यांच्या दुबईत राहणाऱ्या काकाने आर्थिक मदत केली. त्या तस्करांना 900 डॉलर देऊन त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली."
प्रवासाच्या या टप्प्यावर अब्दाहला शंका येऊ लागली.
तो घाबरला होता...
फारिस सांगतो, "तो घाबरला होता. आम्ही त्याच्याशी बोलायचो त्याला बळ द्यायचो, कशाचीही काळजी करू नको असं सांगायचो. पण त्याला त्याची काळजी घेणारं कोणीतरी हवं होतं."
त्यानंतर अब्दाहसोबत असणाऱ्या काही लोकांना एक तस्कर सापडला होता. तो या सगळ्यांना इटलीला घेऊन जायला तयार होता. यावेळी मात्र अब्दाहने आपल्या आईवडिलांना स्पष्ट सांगितलं की, भूमध्यसागर पार करण्याचा हा त्याचा शेवटचा प्रयत्न असेल, त्यातूनही काही झालं नाही तर तो घरी परत येईल.
फारिस सांगतो, "डिसेंबरमध्ये दुसऱ्या नावेत बसताना मी त्याचा हात धरला आणि त्याला सांगितलं की, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुला घाबरण्याची गरज नाही."
आणि यावेळी ते यशस्वी झाले. 22 तास समुद्रात प्रवास केल्यानंतर ते इटालियन लॅम्पेडुसा बेटावर पोहोचले. स्थानिक प्राधिकरणांद्वारे त्यांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे त्यांना इटलीशिवाय इतर कोणत्याही युरोपियन देशात आश्रयासाठी अर्ज करणं अवघड होतं.
पण इटालियन भूमीवर पाय ठेवताच त्याने बोलोग्ना नंतर मिलान गाठलं आणि नंतर सीमा ओलांडून फ्रान्सला गेला.
दरम्यान, नादाला आता स्वतःवरच संशय येऊ लागला होता. ब्रिटनने स्थलांतरितांचे नियम अधिक कठोर केले होते. अशात आपल्या भावांना बोलावणं नादासाठी धोक्याचं ठरणार होतं.
पण भावांनी ऐकण्यास नकार दिला...
ब्रिटनने गेल्याच वर्षी नवीन बेकायदेशीर स्थलांतर कायदा मंजूर केला होता. त्यामुळे अब्दाहसारख्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ब्रिटनमध्ये आश्रय घेता येणार नव्हता.
पण समुद्रातून प्रवास करत येणाऱ्या लोकांना कुठे पाठवायचं याबाबत कोणताही कायदा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शरणार्थी अजून अस्थिर परिस्थितीत होते.
पॅरिसचा प्रवास
नादाचे भाऊ पॅरिसच्या रेल्वे प्रवासाला निघाले. इथे ते कोणालाही ओळखत नव्हते.
नादा सांगतो की, अब्दाह माझ्याकडे येणार म्हणून मागे लागला होता.
आणि म्हणूनच जानेवारीच्या सुरुवातीला अब्दाह, त्याचा भाऊ आसेर आणि अर्धा डझन सीरियन कॅलेसजवळ पोहोचले. त्यांनी पुलाखाली तंबू टाकले. पण पोलिसांनी ते उचलून त्यांना पुढे जायला सांगितलं.
बीबीसीने कॅलेसमधील शरणार्थिंना मदत करणाऱ्या स्थानिक धर्मादाय संस्थेशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की त्यांनी अब्दाहला अल्पवयीन म्हणून आश्रय दिला होता. पण त्याला त्याच्या भावासोबतच राहायचं होतं. या संस्थेने अब्दाह सारख्या इतर दोन किशोरवयीन मुलांनाही मदत देऊ केली होती.
धर्मादाय संस्थेच्या प्रतिनिधीने बीबीसीला सांगितलं की, कॅलेसमधील या मुलांना तस्करांनी 'स्वतःचे निर्णय घेण्यापासून' रोखलं होतं कारण ते देखील 'त्यांच्या कुटुंबीयांच्या दबावाखाली' होते.
यातल्याच एका मुलाने सांगितलं की, "एका तस्कराने त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्या पालकांच्या दबावाखाली आहोत आणि त्यांच्यामुळेच आम्हाला असं करणं भाग आहे."
एका आठवड्याहून अधिक काळ लोटल्यानंतर तस्करांनी अब्दाहच्या गटातील मुलांना तयार व्हायला सांगितलं. या मुलांनी त्यांना ब्रिटनला नेण्यासाठी प्रत्येकी दोन हजार युरो दिले. शनिवारी रात्री ते रवाना होणार होते.

प्रतिकूल वातावरण
किनाऱ्यावरील वाऱ्याचा वेग कमी झाला होता. पण तापमान मात्र रक्त गोठेल इतपत थंड होतं.
विमेरियो इथून जात असताना नाव घसरली आणि काही लोक पाण्यात पडले. अब्दाह आणि त्याचा भाऊ देखील पाण्यात पडले होते.
फारिस सांगतो, "ते मदतीसाठी याचना करत होते. मी देखील समुद्रात पडलो होतो, मात्र स्लिपवेवर चढण्यात मला यश मिळालं. लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मी मदत करत होतो, मला अब्दाहचा आवाज येत होता पण तो नक्की कुठे आहे हे अंधारामुळे समजलं नाही."
फारिस सांगतो, "मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण ते पाण्यात गायब झाले. पाण्याने त्यांना आत खेचून घेतलं होतं. पाणी इतकं खोल असेल याचा अंदाज कोणालाच आला नव्हता."
जवळच फ्रेंच पोलीस गस्तीवर होते. ब्रिटनकडून मिळालेल्या अतिरिक्त निधीमुळे फ्रान्सला या प्रदेशातील अधिकाऱ्यांची संख्या वाढवता आली. पण तरीही तस्करी होत असलेल्या 150 किमी किनारपट्टीच्या प्रत्येक भागावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची संख्या पुरेशी नव्हती.
नौदलाचे हेलिकॉप्टर आणि गस्त घालणारी नौका पहाटे 2 वाजता घटनास्थळी पोहोचली. मदत कर्मचाऱ्यांनी हायपोथर्मियाने ग्रस्त 20 स्थलांतरितांवर उपचार करण्यास मदत केली. पण या सगळ्यांत अब्दाह कुठेच नव्हता.
सार्जंट मेजर मॅक्सिम मेनो सांगतात, "माझ्या कानात अजूनही तो आवाज घुमतोय. त्या मृत्यूच्या आर्त किंकाळ्या होत्या."
मॅक्सिम मेनो यांनी त्याच भागात सुरू असलेल्या दुसऱ्या बचाव मोहिमेत भाग घेतला होता. त्यांनी गोठवणाऱ्या पाण्यात उडी मारून लोकांना वाचवलं.
काही मिनिटांनी नादाच्या लंडन मधील फोनवर एक फोन आला.
समोरून एक व्यक्ती सांगत होता, 'ते दोघेही गेले.'
हा फोन अब्दाह सोबत असलेल्या एका सीरियन व्यक्तीचा होता. पोलिसांनी आधी आसेरला पाण्यातून बाहेर काढलं पण एव्हाना खूप उशीर झाला होता. त्यानंतर त्यांनी अब्दाहचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पोहता येत नसल्याने ते दोघेही स्लिपवेपासून (किनाऱ्यावरील रस्ता) दहा मीटर अंतरावर बुडाले.
फोन खाली ठेऊन नादा पलंगावर गेला आणि ओक्साबोक्शी रडू लागला. मग त्याने आपले ओले डोळे पुसले.
मी त्याला विचारलं की पुढे काय होणार आहे हे तुला आधीच माहीत असतं तर तू सीरियातच राहिला असतास का?
नादा म्हणाला, 'होय आसेर आणि अब्दाहच्या बाबतीत जे घडलं ते पाहता मी सीरियातच राहिलो असतो.'
त्या दोघांना प्रवास करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल तुला दोषी वाटतंय का?
तो म्हणाला, 'हो, होय.'
शेवटची भेट
पुढच्याच संध्याकाळी कॅलेस मधील 100 स्थानिक लोक आणि मूठभर शरणार्थी मरण पावलेल्या पाच लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहराच्या मध्यभागी जमले.
अलिकडच्या वर्षांत इंग्लिश खाडी ओलांडण्याच्या प्रयत्नात मरण पावलेल्यांच्या यादीत अब्दाह आणि आसेरच नावही जोडलं गेलंय.
एका स्थानिक फ्रेंच महिलेने घाबरलेल्या जमावाला सांगितलं की, "सर्वांत मोठा दोष युरोपियन कायद्यांचा आहे जे स्थलांतरितांचं जगणं अशक्य करतात, त्यांना कोणतेही अधिकार देत नाहीत. सर्व दोष युरोपियन कायद्यांचा आहे."
आता दाराच्या माध्यमातून अब्दाहच्या आईवडिलांचा एक व्हीडिओ आलाय. यात त्यांच्या मुलाची रिकामी खोली दिसते आहे.
अब्दाहची आई हुंदके देऊन रडते आणि म्हणते, "आम्हाला आमच्या मुलांना शेवटचं बघायचं आहे. ही माझी विनंती आहे. लहान मुलगा 14 वर्षांचा होता. त्याला दफन करण्यापूर्वी मला त्याला बघायचं आहे."
अब्दाहचे वडील म्हणाले, "मी एक आजारी माणूस आहे. मला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे."
अशा प्रवासात मुलाचा जीव धोक्यात घालून त्याला पाठविणाऱ्या पालकांची चूक असल्याची टीका अनेकजण करताना दिसतात.
पण ज्या लोकांना सीरियासारख्या युद्धक्षेत्रातील जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव आहे ते कदाचित असा युक्तिवाद करणार नाहीत.
येत्या काही दिवसांत अब्दाह आणि त्याच्या भावाला कॅलेसमध्ये दफन करण्यात येईल. फ्रेंच अधिकारी सांगतात की, त्यांना ब्रिटनमध्ये पाठवणं शक्य नाही आणि नादा म्हणतो, त्यांना सीरियाला परत पाठवण्याचा खर्च खूप जास्त आहे.











