सीरियाचे राष्ट्राध्यक्ष 'गरिबांच्या कोकेन'मुळे कसे झाले श्रीमंत?

फोटो स्रोत, Getty Images
अरब जगतात एक जुनं ड्रग नव्याने परत आलं आहे. त्याचं नाव कॅप्टागॉन असं आहे.
नैराश्य कमी करण्यासाठी या गोळीचा उपयोग पाश्चिमात्य देशात केला जायचा. मात्र त्याचं व्यसन लागतंय असं लक्षात आल्यावर त्यावर बंदी घालण्यात आली.
ही गोळी आयसीसचा पैसा कमावण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे असं काही वर्षांपूर्वीपर्यंत मानलं जात होतं. म्हणूनच तिला 'ड्रग ऑफ टेररिस्ट' म्हटलं जायचं.
आता ही गोळी परत एकदा लिव्हेंट आणि आखाती प्रदेशात उत्पादित आणि वितरित होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच हा एक मोठा मुद्दा बनला आहे.
वॉशिंग्टनस्थित एक थिंकटँक न्यूलाइन इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिसी अँड स्ट्रेटेजीने नुकताच सीरियातील ड्रग्ज उत्पादनावर एक सखोल संशोधन केलेला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या थिंक टँकशी संबंधित ज्युडी केरोलिन यांनी बीबीसीशी चर्चा केली आणि माहिती दिली.
केरोलिन म्हणाल्या, "कॅप्टागॉन ही गोळी सीरियाच्या सरकारसाठी उत्पन्नाचं मोठं साधन बनलीय असं आम्हाला तपासातून लक्षात आलंय. सीरिया ही गोळी निर्यात करणारा प्रमुख देश झाला आहे. त्यामध्ये सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे नीकटवर्तीय सहभागी आहेत असं निरीक्षणात आढळलंय. त्यांचे धाकटे भाऊ माहेर अल असद यांचाही यात हात आहे. ते सीरियाच्या सैन्याच्या चौथ्या विभागाचे कमांडरसुद्धा आहेत."
सीरियन सरकारने मात्र कॅप्टागॉनशी आपला संबंध असण्याच्या निरीक्षणाचं अनेकदा खंडन केलंय. आपल्यासंदर्भात प्रकाशित झालेले सर्व अहवाल खोटे असल्याचं सरकारने म्हटलंय.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीरियाच्या गृहमंत्र्यांनी फेसबूकवर लिहिलं होतं, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचं सीरिया समर्थन करतोय. त्यातही ड्रग्ज तस्करीविरोधातील मोहिमेचं जास्तच समर्थन करतो. या मोहिमेला सीरिया मदत करतो.
ऑक्टोबर 2021मध्ये सीरियातील माध्यमांशी बोलताना गृहमंत्री मोहम्मद अल रहमून म्हणाले होते, सीरिया एक ड्रग्जमुक्त देश आहे मात्र त्याचं भौगोलिक स्थान ड्रग्ज तस्करीच्या मार्गात येतं.
अर्थात सीरियाच्या सरकारच्या कॅप्टागॉनशी असलेल्या संबंधांवर फक्त न्यूलाइनच नव्हे तर अनेक संस्थांनी बोट ठेवलंय.

फोटो स्रोत, AFP
जॉर्डन आणि इटलीसह अनेक देशांच्या कोस्टगार्डच्या अहवालांत, न्यू यॉर्क टाइम्स आणि द गार्डियनच्या अहवालात, सेंटर फॉर ऑपरेशनल अनालिसिस अँड रिसर्च आणि ऑर्गनाइझ्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या सर्वांनी दमास्कसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय.
सीओएआरने गेल्या वर्षी याचे संकेत दिले होते. पारंपरिक औद्योगिक व्यवसाय थंडावल्यामुळे लोक ड्रग्ज उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. यावर सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सत्तेशी संबंधित लोकांचं नियंत्रण आहे. त्यात परदेशी सहकाऱ्यांचाही समावेश आहे.
गेलं दशकभर सीरियात गृहयुद्ध सुरू आहे त्यामुळे तिथलं अर्थव्यवस्था कोलमडलीय आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे ती मान वर काढू शकत नाहीये. त्यामुळे अशा स्थितीत कॅप्टागॉनच्या उत्पादनामुळे अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय होतोय असं एका संशोधनात लक्षात आलंय.
सीओएआरचे विश्लेषक इयान सार्सन सांगतात, "ज्या प्रदेशात कॅप्टागॉनचं उत्पादन होतं तो प्रदेश बशर अल असद आणि त्यांच्या नीकटवर्तींयांच्या ताब्यात आहे."
किती कमाई होते?
न्यूलाइनच्या संशोधनानुसार फक्त 2021 मध्ये कॅप्टागॉनच्या अवैध व्यापारातून 5.7 अब्ज डॉलरची कमाई झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
कॅरोलिन रोज सांगतात, सीरिया सरकारला यातून किती पैसा मिळतोय हे ठामपणे सांगता येणार नाही पण त्यातला मोठा वाटा या लोकांच्या खिशात नक्कीच जात असणार, एवढं मात्र आपण सांगू शकतो.
संशोधकांच्या मते 10 वर्षांच्या युद्धामुळे अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्यावर सरकारसाठी कॅप्टागॉन हा उत्पन्नाचा मोठा स्रोत बनला आहे. सरकारशी संबंधित नसलेले लोकही त्यातून फायदा मिळवत आहेत.
औषधापासून बंदी घातलेल्या ड्ग्जपर्यंत प्रवास
कॅप्टागॉनचं 1960 च्या दशकात उत्पादन केलं जायचं. जगभरात त्याचा वापर अँटिडिप्रेसंट म्हणून केला जाातो. त्याबरोबरच इतर अनेक आजारांमध्येही हे औषध डॉक्टर सुचवतात.
रोज सांगतात, "एकेकाळी हे ड्रग डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत नसे, नंतर त्यावर बंदी घालण्यात आली. मग मध्य-पूर्वेत ते एक अवैध ड्रग म्हणून मोठया प्रमाणात वापरलं जाऊ लागलं. विशेषतः मध्यपूर्व, लिव्हँट आणि इराण आखातात त्याचा वापर वाढला."
संशोधकांच्या या प्रदेशात ही गोळी नशेसाठी इतकी प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे दुसऱ्या ड्रग्जप्रमाणे याचा परिणाम फारसा नकारात्मक नाही. याशिवाय तिथली आर्थिक आणि राजकीय स्थितीही कारणीभूत आहे.
अरब जगतात पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत ड्रग्जला फार वाईट समजलं जातं. कॅप्टागॉन दीर्घकाळापर्यंत वैध होती आणि याची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही.
ज्या देशांत याचं सेवन केलं जातंय तिथं दीर्घकाळ राजकीय आणि आर्थिक स्थिती चांगली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिथं लोकांचं जीवन खडतर आहे. जे लोक फार काम करतात ते या गोळीकडे आकर्षित होतात. या गोळीला खाऊन लोक भूक आणि वेदनांपासून सुटका करुन घेतात आणि दुसऱ्या ड्रग्जच्या तुलनेत फार महाग नाही.
यामुळेच या गोळीला गरिबांचं कोकेन म्हटलं जातं.
आपली शक्ती वाढलीय असं ही गोळी खाणाऱ्यांना वाटतं त्यामुळे ती जास्त प्रसिद्ध झाली आहे.

फोटो स्रोत, AFP
कॅरोलिन रोज म्हणतात, "कॅप्टागॉनचा अंफेटामाइन आधारित फॉर्म्युलाही बदलला आहे. यात अंफेटामाइनचं प्रमाण वाढवलं आहे. याशिवाय कॉपर, झिंक, क्विनाइन असे दुसरे घटकही मिसळले गेले आहे."
या गोळीचं व्यसन लागू शकतं असं एका संशोधनात आढळल्यावर तिच्यावर बंदी घालण्यात आली. काही संशोधकांच्या मते या ड्रगमुळे व्यक्ती हिंसक होऊ शकते. रक्तदाब वाढू शकतो आणि हृद्यरोग होऊ शकतो.
रोज सांगतात, "कॅप्टगॉनचे अनेक उपयोग आहेत. त्याचा फॉर्म्युलाच असा रोचक आहे त्यामुळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने ती वापरतात."
सीरियाचा व्यवसाय
इस्लामिक स्टेटच्या आधीपासून अरब जगतात ही गोळी वापरली जात आगे. मात्र या काही वर्षांमध्ये त्याचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावर पोहोचलं आहे.
2021मध्ये जगभरात याच्या 25 कोटी गोळ्या पकडल्याचं न्यू यॉर्क टाइम्सच्या बातमीत म्हटलं होतं. हा आकडा चार वर्षांत जप्त केलेल्या गोळ्यांच्या 18 पट आहे.
रोज यांच्यामते "2022च्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार यावर्षीही हा आकडा वाढण्याची शक्यता आहे."
तज्ज्ञ सांगतात, "मोठ्या प्रमाणात या गोळीचं उत्पादन होत आहे. यात फक्त सीरिया सरकार नाही तर अरब जगतातील जमीनदार, मोठे व्यावसायिकही सहभागी आहेत. मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवलं जात आहे."
रोज सांगतात, व्यक्तिगत किंवा लहान स्तरावर याचं उत्पादन होत नाही. सीरिया सरकार आणि त्यांचं सैन्य त्याच्या उत्पादनात सक्रीय झालं असून ते नेटवर्क गुंतागुंतीचं झालंय.
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे लहान भाऊ माहेर अल असद
न्य़ूजलाइन इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार सीरियाचे सरकार याच्या उत्पादनापासून वितरणापर्यंत सहभागी असल्याचे संकेत मिळतात.

फोटो स्रोत, Ramji Haidri
संशोधक सांगतात, "आम्हाला हे उत्पादन सैन्याशी संबंधित असलेल्या जागांवरही दिसून आलंय. याशिवाय सीरिया सरकारच्या सरकारी संस्थांनी लघू, मध्य किंवा मोठ्या प्रमाणात याचं प्रयोगशाळांत उत्पादन केलं आहे."
रोज सांगतात, "सीरियाच्या सरकारी बंदरांसह अनधिकृत बंदरांचाही याच्या वाहतुकीसाठी वापर होतो. सीरियाच्या किनाऱ्याला लागून असलेल्या लेबनॉन किनऱ्यापर्यंत ते पसरलंय. सीमेवरील चौक्यांमधूनही ते पुढं जातं. हे इतकं जटील नेटवर्क आहे की सीरिया सर्वात मोठं नार्को स्टेट बनलंय. किमान सध्याच्या वेळेला आपण ही उपमा सीरियाला देऊ शकतो."
2020मध्ये ग्रीसच्या एका बंदरावर सुमारे 1.5 कोटी डॉलर किमतीचं कॅप्टागॉन पकडण्यात आलं. हे जहाज सीरियाच्या लटाकियामधून आलं होतं. या गोष्या कॉफी, मसाले आणि भुश्याच्या खाली दडवलेल होतं.
एका अहवालानुसार हे जहाज ताहेर अल कयाली याचं आहे. त्यांच्यावर इटली सरकारनेही निर्बंध घातले आहेत. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि भाऊ मुदार अल असद यांच्याशी ते संबंधीत होते.

फोटो स्रोत, AFP
सीरियाच्या सरकारने या तस्करांवर कारवाई केल्याचं स्पष्ट केलं आहे.
उत्पन्नाचा नवा स्रोत
सीरियामध्ये दहा वर्षांपासून यादवी युद्ध सुरू आहे. तसेच अर्थव्यवस्थाही डबघाईला आली. अशा स्थितीत ते ड्रग तस्करीला उत्पन्नाचा स्रोत मानत आहेत.
न्यूजलाइन रिपोर्टनुसार, "सीरियाच्या सरकार कॅप्टागॉनच्या माध्यमातून अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यामार्फत आपल्या सहकाऱ्यांना मदत करत आहे."
बशर अल असद सत्तेत असेपर्यंत हे उत्पादन थांबणार नाही असं तज्ज्ञांना वाटतं.
रोज म्हणतात, "आमच्या अंदाजानुसार कालानुरुप हा व्यवसाय वाढत जाणार. हे फक्त कायदा सुव्यवस्थेसाठीच नाही तर सर्वांसाठीच धोकादायक होईल. अनेक लोक याचा वापर करतील,. फॉर्म्युलात बदल केल्यानंतर ते घातकही ठरू शकत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








