सेक्स आहारः कलिंगडात आहे व्हायग्रासारखी 'पॉवर', संशोधकांचं मत

फोटो स्रोत, Getty Images
उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड शरीरासाठी किती चांगलं असतं हे सांगायला नकोच. कलिंगडाचे अनेक चांगले परिणाम आपल्या शरीरावर होतात.
पण या फळाच्या एका फायद्याविषयी तुम्ही ऐकलं नसेल.
कलिंगड खाण्याचे परिणाम व्हायग्रा घेण्यासारखेच आहेत असा दावा अमेरिकेतल्या संशोधकांनी केला होता.
कलिंगडात एक सिट्रुलीन नावाचं रसायन असतं, ज्यामुळे त्याला व्हायग्रासारखे गुणधर्म प्राप्त होतात.
'व्हायग्रा'ची सर्वसामान्यांच्या भाषेत ओळख म्हणजे कामसुख देणारी 'निळी गोळी'. यूकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 'सिल्डेनाफिल' एक औषध असून याचा वापर 'Erectile Dysfunction' म्हणजे पुरूषांच्या लिंगात ताठरता येत नसेल तर त्यावर उपचार म्हणून केला जातो.
कामोत्तेजना (सेक्स करण्याची इच्छा) उत्पन्न झाल्यानंतर हे औषध घेतल्यास पुरुषांच्या लिंगामध्ये तात्पुरत्या काळासाठी रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे लिंगात ताठरता येण्यास मदत होते.
'सिल्डेनाफिल' औषध विविध नावांनी बाजारात उपलब्ध आहे. पण, जगभरात प्रसिद्ध आहे ती म्हणजे 'सेक्स लाईफ' सुधारणारी व्हायग्रा.
व्हायग्रा शरीरातल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करते त्याच प्रमाण कलिंगडात जे नैसर्गिक रसायन सिट्रुलीन सापडतं ते शरीरातल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतं.
सिट्रुलीन शरीरातल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं त्यामुळे शरीरात रक्ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होतं.
अमेरिकेतल्या 'टेक्सस फ्रुट अँड व्हेजिटेबल इंप्रुव्हमेंट सेंटर' या संस्थेने हे संशोधन केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. भीमू पटेल या संशोधनाचे मुख्य रिसर्चर होते, ते म्हणाले की, "कलिंगड शरीरासाठी चांगलं आहे हे आपल्याला माहिती आहे. पण जसा जसा यावर अभ्यास होतोय, याचे अधिकाधिक फायदे समोर येत आहेत."
ते पुढे म्हणतात, "कलिंगडामुळे व्हायग्रासारखा विशिष्ट अवयवांवरच परिणाम होईल असं नाही, पण त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स वाटतं, त्या मोकळ्या होतात आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात."
कलिंगडाचे आणखीही इतर फायदे आहेत.
शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढतं
मानवी शरीरात पाण्याची पातळी समतोल असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जरासंही डिहाड्रेशन झालं तर थकवा येणं, डोकेदुखी, स्नायू आखडणं आणि ब्लड प्रेशरही वाढू शकतं.
कलिंगडात 92 टक्के पाणी असतं. आपल्याला शरीराला जितकं पाण्याची गरज असते त्यातली 20 टक्के गरज आपली अन्नातून पूर्ण होते, त्यामुळे कलिंगडाचा आहारात समावेश असला तर उत्तम.

फोटो स्रोत, STEVE EVANS/ WIKIMEDIA COMMONS
जेष्ठांच्या बाबतीत कलिंगड अतिशय उपयुक्त ठरतं कारण त्यांना तहान ज्या प्रमाणात लागायला हवी त्या प्रमाणात लागत नाही त्यामुळे त्यांच्या शरीरातली पाण्याची गरज पूर्ण होत नाही. कलिंगड खाल्ल्यामुळे ती गरज पूर्ण होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
कलिंगडात पाण्याचं प्रमाण जास्त असण्याचा दुसरा फायदा असा की यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे भरपूर कलिंगड खाल्लं तरी तुमच्या शरीरात फॅट्स वाढण्याचा धोका नाहीये. कलिंगड खाल्ल्याने पोटंही भरतं आणि वजन वाढण्याचा धोकाही नसतो. त्यामुळे आहारात कलिंगडाचा समावेश केला किंवा त्याचे सॅलड्स खाल्ले तर वजन कमी करण्यातही मदत होते.
त्वचेला तकाकी आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं
कलिंगडाच्या लालबुंद, गुलाबीसर गरात खूप सारी पोषणद्रव्यं असतात. या पोषणद्रव्यांना कॅरोटनॉईड्स म्हणतात. कलिंगडात बीटा कॅरोटीन भरपूर असतात. याचंच पुढे जाऊन व्हिटॅमीन ए बनतं.
यामुळे आपल्या त्वचेला तकाकी येते आणि डोळ्यांचं आरोग्यही सुधारतं.
कॅन्सर, डायबेटिजचा धोका कमी होण्याची शक्यता
कलिंगडात असणाऱ्या कॅरोटनॉईड्सपैकी आणखी एक म्हणजे लिकोपेन. खरंतरं कलिंगडातलं लिकोपेन शरीरात फार पटकन शोषलं जातं.
सध्या लिकोपेनवर अभ्यास होतोय आणि काही अभ्यासांमधून असं दिसून आलंय की लिकोपेनमुळे कॅन्सर आणि टाईप - 2 डायबेटिजचा धोका कमी होतो.
कलिंगडापासून कोणाला धोका असू शकतो का?
कलिंगड खरंतर सगळ्यांसाठी आरोग्यदायी आहे. बहुतांश लोक ते खाऊ शकतात पण अगदी तुरळक लोकांना याची अॅलर्जी असू शकते. ही अॅलर्जी अगदीच दुर्मिळ आहे, पण ज्या लोकांना पॉलीनची अॅलर्जी आहे त्यांना कलिंगडाचा कदाचित त्रास होऊ शकतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








