अ‍ॅनोस्मिया: वायू प्रदूषणामुळे वास घेण्याची क्षमता कमी होते का?

    • Author, टीम स्मेडली
    • Role, लेखक
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मातीवर पावसाचे पहिले थेंब, उमललेली फुलं, एखादं छान परफ्युम, आईच्या हातचं जेवण आणि लीक होणारा गॅस...

या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे? गंध. पदार्थाची चव असो किंवा धोक्याची सूचना. वास घेण्याची क्षमता माणसाला जगण्यासाठी फार महत्त्वाची आहे.

पण वायू प्रदूषणामुळे माणूस ही क्षमता गमावत असल्याचं नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

अ‍ॅनोस्मिया म्हणजे काय?

वास घेण्याची क्षमता जाणं याला 'अ‍ॅनोस्मिया' म्हणतात. काही आजारपणांमुळे किंवा सतत सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो.

पण अलीकडे अनेकांना बरेच दिवस तोंडाची चव गेली आहे किंवा वास घेण्याची क्षमता कमी झाली आहे, असा त्रास जणावतो आहे, विशेषतः शहरी भागात.

कोरोना विषाणूसारखा संसर्ग, ऋतू बदलताना झालेलं सर्दी-पडसं, तुम्ही घेतलेली औषधं, काही व्हिटॅमिन्सची कमतरता यांमुळे तात्पुरतं असं होऊ शकतं, असं डॉक्टर्स सांगतात.

पण वायू प्रदूषणामुळे आणि विशेषत: हवेतील पार्टिकयुलेट मॅटर म्हणजे धुलीकणांमुळेही कायमचा अ‍ॅनोस्मिया होत असल्याचं नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

खरंतर याआधीही या विषयावर अनेकदा अभ्यास झाला आहे. पण बहुतांश वेळा तो स्मोकिंग करणाऱ्या व्यक्ती, औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती अशा मर्यादित गटांवर जास्त भर देणारा होता.

पण अमेरिकेतील बाल्टिमोरच्या जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनचे ऱ्हायनोलॉजिस्ट म्हणजे नासिकाशास्त्रज्ञ मुरुग्प्पन रामनाथन ज्युनियर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं संशोधन घ्राणेंद्रियावर प्रदूषणाचा परिणाम किती जास्त प्रमाणात होतो आहे, हे सिद्ध करतं.

प्रदूषणामुळे घटते वास घेण्याची क्षमता

शहराच्या प्रदूषित भागातून येणाऱ्या रुग्णांना हा त्रास जास्त होत असल्याचं रामनाथन यांना जाणवलं. त्यांनी मग पर्यावरणीय साथरोगतज्ज्ञ झेन्यू झँग यांच्यासारख्या आपल्या सहकाऱ्यांसह शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला.

रामनाथन यांनी मागच्या चार वर्षांत त्यांच्याकडे अ‍ॅनोस्मियाची तक्रार घेऊन आलेल्या 2,690 रुग्णांकडून माहिती गोळा केली आणि या सगळ्यांचे पत्ते आणि शहरात प्रदूषण कुठे जास्त आहे याची त्यांनी तुलना केली.

त्यातून समोर आलं की स्वच्छ हवा असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत जिथे हवेत धुलीकणांमुळे प्रदूषणाची पातळी बरीच जास्त आहे, तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या वास घेण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे.

रामनाथन सांगतात, “आमचा अभ्यास सांगतो की सतत वायूप्रदूषण असलेल्या जागी राहणाऱ्या व्यक्तींमध्ये अ‍ॅनोस्मिया निर्माण होण्याचा धोका 1.6 ते 1.7 पट जास्त असतो. अशा धुलिकणांचं प्रमाण थोडंही वाढलं त्याचं अ‍ॅनोस्मियाशी नातं जोडता येतं.”

वय, वर्ण, लिंग, शरीराचं वजन काहीही असलं तरी सर्वांना प्रदूषणामुळे वास न येण्याचा धोका तेवढाच असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

तसंच या संशोधनात सहभागी 20 टक्के लोक सिगरेटचं सेवन करत नव्हते, तरीही त्यांचा वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता.

याआधी जगभरात इतर ठिकाणी झालेल्या काही अभ्यासातूनही अशाच गोष्टी समोर आल्या होत्या.

2006 साली मेक्सिकोतील संशोधनानुसार ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांपेक्षा वायूप्रदूषणानं प्रभावित मेक्सिको सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांची वास घेण्याची क्षमता कमी झाली होती.

ब्राझिलच्या साओ पावलो शहरात आणि इटलीच्या ब्रेशिया शहरातही संशोधकांनी अशाच स्वरुपाचे निष्कर्ष काढले.

पण हे असं का होतं?

प्रदूषणामुळे नाकावर कसा परिणाम होतो?

वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्यामागे मुख्य कारण आहे हवेतील पार्टिक्यूलेट मॅटर अर्थात PM 2.5 हे धुलीकण, ज्यांचा आकार मानवी केसाच्या व्यासापेक्षाही कित्येक पटींनी कमी असतो.

जीवाष्म इंधनाच्या ज्वलनातून आणि बांधकामादरम्यानही मोठ्या प्रमाणात धुलीकण हवेत सोडले जातात आणि त्यामुळे फुप्फुसाचे विकार होतात, हे तुम्ही आधी वाचलं असेल.

रामनाथन यांच्या मते हे धुलीकण नाकावाटे शरीरात शिरल्यावर घ्राणेंद्रियावर दोन प्रकारे परिणाम करतात. ते इथल्या मज्जातंतूंना इजा पोहोचवतात किंवा मेंदूपर्यंत पोहोचतात.

नेमकं काय होतं हे समजून घेण्याआधी नाकाची रचना कशी असते, त्यावर नजर टाकूयात.

आपल्या नाकाच्या आत, मेंदूच्या खाली ओलफॅक्टरी बल्ब नावाचा ब्रशसारखा दिसणारा तंतूमय भाग असतो. ओलफॅक्टरी बल्ब हे घ्राणेंद्रियाच्या नसेचं टोक आहे जी नस मेंदूशी जोडलेली असते आणि आपल्याला एखाद्या वस्तूच्या वासाची जाणीव करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. नाकात शिरणारे कोणतेही कण, प्रदूषकं किंवा विषाणू यांना हे तंतू मेंदूत शिरण्यापासून रोखतात.

पण सतत अशा धुलीकणांचा मारा झाला, तर या तंतूंना सूज येऊ शकते, त्यांची झीज होऊ शकते. समुद्रकिनाऱ्यावर लाटांमुळे जशी धूप होते, तसंच काहीसं हे आहे. या तंतूंची झीज आणि वास घेण्याची क्षमता कमी होणं याचं जवळचं नातंय.

स्वाभाविकपणे जितकं वय जास्त, तितकं ही झीज होण्याचं प्रमाण झास्त असतं आणि त्याचा वास घेण्याच्या क्षमतेवर कमी होते. वयानुसार वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, असं याआधी स्टॉकहोमच्या इनग्रिड एकस्ट्रॉम यांनी केलेल्या संशोधनातून समोर आलं होतं.

आता प्रदूषण जास्त असल्यावर वास घेण्याची क्षमता आणखी कमी होते, असं आता रामनाथन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे.

या धुलीकणांपासून फुप्पुसाचे आजार आणि कॅन्सरही होऊ शकतो. फुप्फुसाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूपैकी निम्मे मृत्यू वायूप्रदूषणामुळे होतात. तसंच हृदयविकार आणि स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी एक चतुर्थांश मृत्यूंचा वायूप्रूषणाशी संबंध आहे.

तुलनेनं वास घेण्याची क्षमता कमी होणं हे तेवढं मोठं नुकसान वाटत नाही. पण रामनाथन आणि एकस्ट्रॉम या दोघांनाही तसं वाटत नाही.

वास घेण्याची क्षमता चव घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करते. लोक जेवण बेचव लागत असल्यानं खाणं अजिबात कमी करतात आणि त्यांचं वजन कमी होत जातं. दुसरीकडे काहीजण चव लागावी म्हणून मग जास्त मीठ किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खाऊ लागतात, ज्याचा तब्येतीवर आणखी घातक परिणाम होऊ शकतो.

वास घेण्याची क्षमता कमी होण्याचा संबंध संशोधकांनी नैराश्यासारख्या मानसिक आजाराशीही जोडला आहे.

काही धुलीकण नाकातला हा अडथळा भेदून मेंदूपर्यंत पोहोचून नुकसान करतात आणि अन्य आजारांना कारणीभूत ठरतात असा दावा ब्रिटनच्या लँकास्टर विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राच्या प्राध्यापक बार्बरा माहेर यांनी आपल्या संशोधनातून केला होता. अल्झायमर्ससारख्या आजारात 90 टक्के लोकांची वास घेण्याची क्षमताच कमी झाली असते, असंही त्या नमूद करतात.

त्यामुळेच वायुप्रदूषण रोखणं आणि एयर क्वालिटी म्हणजेच हवेची गुणवत्ता सुधारण यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करणं गरजेचं आहे.

रामनाथन सांगतात, “याविषयीचे आणखी कडक नियम करण्याची आणि त्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनेक लोकांना माहितही नसतं की ते किती घातक प्रदूषणाच्या संपर्कात आले आहेत. राजकारणी यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)