महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार : जुन्या चेहऱ्यांबरोबरच पंकजा मुंडे, नितेश राणे, भरत गोगावले यांची चर्चा

महाराष्ट्र सरकार शपथविधी

फोटो स्रोत, ANI

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नागपुरात आज फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दोन आठवडे होत आले, तरी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कुठल्याच हालचाली दिसत नव्हत्या. मंत्रिपदांच्या वाटपावरून कोंडी झाल्याची चर्चा होती.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार चांगली खाती, तसंच मंत्र्यांच्या संख्येवरून अडून बसले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला आहे. आज (15 डिसेंबर) नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होऊन, महायुतीतले नेते मंत्रिपदाची शपथ घेतील.

खातेवाटपात गृह, अर्थ, नगरविकास, महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांवरून महायुतीत तिढा असल्याची चर्चा होती. शिवाय, कुणाला जास्त मंत्रिपदं, तर कुणाला कमी, यावरूनही दुमत होते. अखेरीस 13 डिसेंबरच्या रात्री हा तिढा सुटला असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागर निवासस्थानी रात्रीत भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला.

महायुतीतील 'या' नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती

आज (15 डिसेंबर) नागपुरात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती आहे.

या नेत्यांची यादी पुढीलप्रमाणे :

भाजप : नितेश राणे, पंकज भोईर, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील , जयकुमार रावल, पंकजा मुंडे, गणेश नाईक , मेघना बोर्डीकर

शिवसेना (शिंदे गट) : शंभूराज देसाई, उदय सांमत, दादा भूसे, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, योगश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर

राष्ट्रवादी : आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ

महायुतीच्या मंत्रिमंडळातील संभाव्य चेहऱ्यांची ही यादी असून. शपथविधीनंतरच मंत्रिमंडळात नेमकं कोण कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

कुणाला कोणती खाती मिळण्याची शक्यता?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:कडे गृहखाते ठेवणार असल्याची चर्चा आहे.

तसंच, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, आदिवासी विकास, पर्यटन, वने अशी महत्वाची खातीही भाजपकडे राहण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिंदे सरकारमध्ये जी खाती होती, तीच खाती पुन्हा फडणवीस यांच्या सरकारमध्ये कायम राहणार असल्याची माहिती आहे.

वित्त, सहकार, कृषि, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालकल्याण, अन्न आणि औषध प्रशासन, क्रीडा आणि युवक कल्याण, मदत आणि पुनर्वसन अशी महत्त्वाची खाती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असतील, असं म्हटलं जातंय.

तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, उत्पादन शुल्क, जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय अशी खाती असतील, अशी शक्यता आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

उद्या (15 डिसेंबर) दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

महायुतीच्या या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता आहे.

काही मंत्रिपदं रिक्त राहू शकतात...

नागपुरात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपदं रिक्त ठेवू शकतात, अशी शक्यता आहे.

दोन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रिपदं रिक्त ठेवली जाऊ शकतात, असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार सचिन गडहिरे व्यक्त करतात.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

नागपुरात मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याची प्रशासनाला सूचना

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनदेखील सुरू होणार आहे, त्यामुळे नागपूर येथे मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्याचे समजते.

राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आलाय.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

33 वर्षांनंतर नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार

यापूर्वी 1991 मध्ये नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता.

1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून बंड करत काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावेळी तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमाण्यम यांनी नागपूरमध्ये त्यांना शपथ दिली होती. त्यानंतर आता 33 वर्षांनी पुन्हा एकदा नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

नागपूर आणि विदर्भाचे राज्याच्या राजकारणातील स्थान अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपूर निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)