डेटिंग आणि प्रेमाचा सल्ला आता AI कडून? मनाच्या गोष्टींसाठी मशीनवर विश्वास ठेवणं खरंच योग्य आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुझॅन बेअरन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
या वर्षाच्या सुरुवातीला रॅचल एका मुलाला भेटली होती. त्याच्यासोबत ती डेटही करत होती. नंतर मित्रांच्या एका ग्रुपमध्ये ते पुन्हा भेटणार होते. त्यामुळे आधी त्याच्याशी मनमोकळं बोलून दोघांमधील गैरसमज दूर करायचं तिने ठरवलं.
शेफिल्डमध्ये राहणारी रॅचल (नाव बदललं आहे) सांगते, "मी चॅट जीपीटीचा वापर नोकरी शोधण्यासाठी केला होता. पण याचा वापर डेटिंगच्या सल्ल्यासाठीही केला जातो असं माझ्या ऐकण्यात आलं होतं.
"मी खूप अस्वस्थ होते आणि मला योग्य मार्गदर्शन हवं होतं. महत्त्वाचं म्हणजे मला यात माझ्या मित्रांना आणायचं नव्हतं."
मित्राला फोन करण्यापूर्वी तिने मदतीसाठी चॅटजीपीटीचा आधार घेतला. "मी विचारलं, दोघांमधील ही चर्चा मी कशी हाताळू? तसेच ती चर्चा बचावात्मकही असू नये"
"चॅटजीपीटीने नेहमीसारखाच प्रतिसाद दिला. पण हे उत्तर देताना असं काहीसं म्हटलं, 'व्वा, हा खूप समजूतदार प्रश्न आहे, म्हणजे तू भावनिकदृष्ट्या प्रगल्भ आहेस. या काही टिप्स आहेत.' चॅटजीपीटीचं हे उत्तर पाहून मला ते अगदी माझ्या बाजूने उभं राहिल्यासारखं वाटलं. जणू मीच बरोबर आणि माझा मित्र चुकीचा."
एकंदर पाहता, तिला चॅट जीपीटीचा प्रतिसाद 'उपयोगी' वाटला, पण ती भाषा फार 'थेरपी'सारखी होती, जसं 'सीमा' (बाऊंड्रीज) सारखे शब्द वापरण्यात आले, असं ती म्हणाली.
"यातून मला फक्त एवढं शिकायला मिळालं की, मी माझ्या मार्गाने किंवा माझ्या अटीनुसार ते करू शकते, पण मी त्याला जास्त गांभीर्याने घेतलं नाही."
नातेसंबंधातील समस्या सोडवण्यासाठी AI चा वापर
नातेसंबंध हाताळण्यासाठी एआयकडे सल्ला मागणारी रॅचल ही एकटी नाही.
ऑनलाइन डेटिंग कंपनी मॅचच्या संशोधनानुसार, जवळजवळ अर्ध्या जेन-झी अमेरिकन (जन्म 1997 ते 2012) लोकांनी डेटिंग सल्ल्यासाठी चॅट जीपीटीसारखी एलएलएमचा वापर केला आहे. हे प्रमाण इतर कोणत्याही पिढीपेक्षा जास्त आहे.
लोक एआयचा वापर ब्रेकअप मेसेज तयार करण्यासाठी, डेट करत असलेल्या व्यक्तीशी होणाऱ्या संभाषणांचं विश्लेषण करण्यासाठी, आणि नातेसंबंधातील समस्या सोडवण्यासाठी करताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Anastasia Jobson
डॉ. ललिता सुग्लानी, मानसशास्त्रज्ञ आणि नातेसंबंध तज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात की, एआय एक उपयुक्त साधन ठरू शकतं. विशेषतः ज्यांना नातेसंबंधात संवाद साधताना दडपण आल्यासारखं किंवा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटतं, त्यांच्यासाठी.
त्या म्हणतात, एआय त्यांना मेसेज तयार करण्यास, गोंधळात टाकणारे संदेश समजून घेण्यास किंवा दुसरं मत मिळवण्यास मदत करू शकते. ज्यामुळे त्वरित प्रतिसाद देण्याऐवजी थोडा वेळ विचार करण्याची संधी मिळते.
"अनेक मार्गांनी एआय जर्नलिंग किंवा विचार मांडण्याच्या जागेसारखं (रिफ्लेक्टिव्ह स्पेस) काम करू शकतं. ते फक्त साधन म्हणून वापरल्यास मदत करू शकतं. परंतु, नातेसंबंधाची जागा घेऊ शकत नाही," असं डॉ. सुग्लानी यांनी म्हटलं.
परंतु, त्यांनी काही चिंताही व्यक्त केल्या आहेत.
AI मुळे स्व-विकासात अडथळा
"एलएलएम म्हणजे चॅट जीपीटीसारखी प्रणाली मदत करणारी आणि सहमत राहणारी असतात. जी तुम्ही काय सांगत आहात तेच परत सांगतात. त्यामुळे ते कधी कधी चुकीच्या नातेसंबंधांच्या पद्धतींना किंवा चुकीच्या कल्पनांना खूप हलक्यारितीने मान्य करू शकतात.
विशेषतः जर तुम्ही विचारलेले प्रश्न पक्षपाती असतील. यामुळे चुकीच्या गोष्टींना बळ मिळू शकतं किंवा टाळाटाळ करण्याची सवय वाढवू शकतात."
त्या एक उदाहरण देऊन सांगतात की, ब्रेकअप मेसेज तयार करण्यासाठी एआय वापरणं हा अस्वस्थता टाळण्याचा एक मार्ग असू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे लोक त्यांच्यात टाळाटाळ करण्याची सवय वाढवू शकतात. कारण ती व्यक्ती खरोखर काय वाटतं याचा विचार करत नाही.
एआय वापरल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या विकासात देखील अडथळा येऊ शकतो.
डॉ. सुग्लानी म्हणतात, "जर एखादी व्यक्ती नेहमी एआयकडे वळत असेल जेव्हा ती काय म्हणायचं किंवा कसं वाटतं हे ठरवू शकत नाही. ती हळूहळू आपली अंतर्ज्ञान, भावना आणि नातेसंबंध समजून घेण्याची क्षमता एआयवर अवलंबून ठेवू लागते."
त्या म्हणतात की, एआयचे मेसेजेस भावनिकदृष्ट्या कोरडे असतात आणि संभाषण तयारी केलेलं म्हणजे स्क्रिप्टेड वाटू शकतात. असे मेसेजेस मिळाल्यास थोडं अस्वस्थ वाटू शकतं.
अडचणी असूनही, नातेसंबंधांचा सल्ला देणाऱ्या सेवा आता वाढत आहेत.
इतरांना विचारण्यापेक्षा एआयला लोकांचं प्राधान्य
मेई ही एक मोफत एआय सेवा आहे. ही ओपन एआय वापरून तयार केलेली आहे. नातेसंबंधातील समस्या विचारल्यावर ही संभाषणासारखं प्रतिसाद देते.
न्यूयॉर्कमधील संस्थापक एस ली म्हणतात, "हे लोकांना तात्काळ नातेसंबंधांबाबत मदत मिळावी म्हणून बनवलं आहे. कारण सर्वजण मित्र किंवा कुटुंबाशी बोलू शकत नाहीत. लोक काय म्हणतील याची भीती त्यांना असते."
ली सांगतात की, एआय टूलवर आणलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या या सेक्ससंबंधित असतात. ही अशी गोष्ट आहे की, जी अनेक लोक मित्र किंवा थेरपिस्टशी बोलू इच्छित नसतात.

फोटो स्रोत, Es Lee
ते म्हणतात, लोक फक्त एआय वापरत आहेत. कारण इतर सेवा पुरेशा नाहीत.
एखादी सामान्य वापराची गोष्ट म्हणजे, मेसेज पुन्हा कसा लिहावा किंवा नात्यातील समस्या कशी सोडवावी. "जणू लोकांना ही समस्या खरोखर अस्तित्वात आहे याची खात्री करण्यासाठी एआयची आवश्यकता आहे," असं त्यांनी म्हटलं.
नातेसंबंधांचा सल्ला देताना सुरक्षिततेची समस्या उद्भवू शकते. मानवी सल्लागार कधी हस्तक्षेप करावा आणि क्लायंटला धोके टाळण्यासाठी कशी मदत करावी हे जाणतो.
रिलेशनशीप अॅप त्याच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकतं का?
ली सुरक्षिततेबाबतची चिंता समजून घेतात. ते म्हणतात, "एआयच्याबाबतीत धोका जास्त आहे. कारण ते इतर तंत्रज्ञानाप्रमाणे वैयक्तिक पातळीवर आपल्याशी जोडू शकतं. इतर तंत्रज्ञान असं करू शकत नाही."
पण ते म्हणतात की, मेईने एआयमध्ये सुरक्षिततेच्या काही मर्यादा ठेवल्या आहेत.
"आम्ही व्यावसायिक आणि संस्थांना आमच्याशी जोडून एआय उत्पादनांच्या विकासात सक्रिय भूमिका घेण्याचं आमंत्रण देतो," असं ते म्हणाले.
चॅट जीपीटी तयार करणारी ओपन एआय सांगते की, त्यांच्या नवीन मॉडेलमध्ये भावनिक अवलंबित्व आणि दुष्टपणा किंवा सायकोफेन्सी टाळण्यासाठी सुधारणा केल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, "कधी कधी लोक संवेदनशील प्रसंगी चॅट जीपीटीकडे वळतात. म्हणून आम्हाला खात्री करायची आहे की, ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उत्तर देतात. यात योग्य वेळेस लोकांना व्यावसायिक मदतीसाठी मार्गदर्शन करणं, संवेदनशील प्रश्नांना उत्तर देताना सुरक्षा वाढवणं आणि दीर्घ सत्रांमध्ये थोडा ब्रेक घेण्याची सूचना देणं यांचा समावेश आहे."
दुसरी मोठी चिंता म्हणजे गोपनीयता. असे अॅप्स खूप संवेदनशील माहिती गोळा करू शकतात, आणि जर ती हॅकर्सकडे गेली तर याचा खूप त्रास होऊ शकतो.
ली म्हणतात, "वापरकर्त्यांची गोपनीयता नेहमी जपली जाते. आम्ही फक्त तीच माहिती गोळा करतो, जी चांगली सेवा देण्यासाठी आवश्यक आहे."
त्यांच्या धोरणानुसार ली सांगतात की, इ-मेल वगळता त्या व्यक्तीची ओळख स्पष्ट होईल, अशी कोणतीही माहिती मेई विचारत नाही.
ली म्हणतात की, संभाषण काही काळासाठी गुणवत्ता तपासण्यासाठी जतन केली जातात. परंतु, 30 दिवसांनी ते हटवले जातात. "सध्या ते कायमस्वरूपी कोणत्याही डेटाबेसमध्ये जतन करून ठेवले जात नाहीत."
थेरपिस्ट आणि एआयची एकत्रित मदत
कोरिनने (नाव बदललं आहे) गेल्या वर्षी तिचे नातेसंबंध संपुष्टात आणायचं ठरवलं होतं. या क्षणाला कसं सामोरं जायचं हे जाणून घेण्यासाठी तिने चॅट जीपीटीकडे मदत मागायला सुरुवात केली.
लंडनमध्ये राहणारी कोरिन सांगते की, तिच्या हाऊसमेटनं तिला याबद्दल सांगितलं होतं. डेटिंग सल्ल्यासाठी, ब्रेकअप कसं करायचं किंवा इतर सल्ल्यासाठी एआय मदत करू शकतं. त्यावेळी तिने एआयकडे वळायचं ठरवलं.
तिने चॅट जीपीटीला तिच्या प्रश्नांना सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले नातेसंबंध तज्ज्ञ जिलियन टुरेकी किंवा हॉलिस्टिक मानसशास्त्रज्ञ डॉ. निकोल लेपेरांसारख्या शैलीत उत्तर देण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा तिने पुन्हा डेटिंगला सुरूवात केली, तेव्हा तिने पुन्हा चॅट जीपीटीकडे तिच्या आवडत्या नातेसंबंध तज्ज्ञांच्या शैलीत सल्ला मागितला.
"जानेवारीमध्ये मी एका मुलासोबत डेटवर गेले होते. मला तो शारीरिकदृष्ट्या आकर्षक वाटत नव्हता, पण आमचं चांगलं जमत होतं. म्हणून मी चॅट जीपीटीला विचारलं की आणखी एक डेट करायला हवी का.
मला आधीच माहीत होतं की, होकारार्थी उत्तर येईल. कारण मी त्यांची पुस्तकं वाचली होती. पण माझ्या परिस्थितीनुसार मला सल्ला मिळाला, त्यामुळे मला आनंद झाला."

फोटो स्रोत, Getty Images
थेरपिस्ट असलेली कोरिन म्हणते की, तिच्या थेरपिस्टशी होणाऱ्या चर्चेत अधिक बालपणाच्या गोष्टी समजून घेण्यात जातात. तर डेटिंग किंवा नातेसंबंधाबाबतच्या प्रश्नांसाठी ती चॅट जीपीटीकडे जाते.
ती म्हणते की, एआयचा सल्ला ती लगेच पाळत नाही, थोडं अंतर ठेवते.
मी कल्पना करू शकते की, लोक नातं संपवतात किंवा असं संभाषण करतात जे करायचं नसतं. कारण चॅट जीपीटी फक्त तेच परत सांगतं, जे तुम्हाला ऐकायचं असतं.
"जीवनात ताण असेल तेव्हा हे उपयुक्त आहे. मित्र नसेल तेव्हा हे मला शांत करतं," असं ती सांगते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











