'तो अखेरचा मित्र' ज्यानं श्रीदेवींसह अनेकांचे पार्थिव त्यांच्या त्यांच्या मायदेशात पाठवले

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमिताभ भट्टसाली
- Role, बीबीसी न्यूज बांगला
तारीख होती 24 फेब्रुवारी 2018. दुबईच्या एका हॉटेलमध्ये सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूने जगभरातील श्रीदेवींच्या चाहत्यांवर शोककळा पसरली होती.
त्यानंतर काही दिवसांनी श्रीदेवी यांचं एम्बाल्बिंग सर्टिफिकेट (शवसंस्कार प्रमाणपत्र) माध्यमांच्या हाती लागलं. त्या प्रमाणपत्रावर एक मोबाईल नंबर लिहिलेला होता.
तो नंबर होता अशरफ थामारास्सेरी यांचा. श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांनीच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांचे पार्थिव शरीर ताब्यात घेतले.
मूळचे केरळचे रहिवासी असणारे आणि सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या अजमान शहरात राहणाऱ्या अशरफ यांनीच श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात पाठवला.
मी त्यावेळीच म्हणजे 2018मध्ये त्यांच्याशी बोललो होतो. त्यानंतर अनेकदा आम्ही बोललो आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की, श्रीदेवी आणि अशरफ थामारास्सेरी यांचा नेमका संबंध काय होता? पण फक्त श्रीदेवीच नाही तर आखाताततल्या देशांमध्ये राहणाऱ्या अनेकांसाठी अशरफ हेच 'शेवटचे मित्र' ठरले आहेत.
याचा अर्थ असा की आखातातल्या देशांमध्ये कोणत्याही स्थलांतरिताचा मृत्यू झाल्यास, अशरफ कोणत्याही मोबदल्याविना मृतांच्या नातेवाईकांना पार्थिव शरीर पाठवण्याची व्यवस्था करतात.
ते हे काम सुमारे अडीच दशकांपासून करत आहेत. या कामाबद्दल त्यांचं खूप कौतुक देखील झालं आहे. गेल्या काही वर्षांत, त्यांना अनेक कुटुंबांकडून प्रेम मिळालं आहे. ते अनेक कुटुंबांचा सदस्य बनले आहेत.


भारत सरकारनेही त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातून अमिरातीला शेफ म्हणून काम करण्यासाठी गेलेल्या झुनू मंडलचे देखील ते 'अखेरचे मित्र' ठरले होते.
गेल्या वर्षी, 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी, दुपारी 3.30-4.00 च्या सुमारास, नादिया येथील सोनिया मंडल यांच्या घरी एक फोन आला. पाकिस्तानी नागरिक अबीद गुज्जरने दुबईहून जिल्ह्यातील शांतीपूर भागात राहणाऱ्या मंडल कुटुंबाच्या घरी फोन केला होता.
झुनू मंडल यांची मोठी मुलगी सोनिया यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं, "आबेद काका माझ्या वडिलांचे मित्र होते. जेव्हा त्यांनी फोनवर माझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी आम्हाला सांगितली तेव्हा आम्ही खूप दुःखी झालो."
'मंडल कोलकाता बिर्याणी'
सोनिया सांगतात की, झुनू मंडल इतकी चांगली बिर्याणी बनवत असत की हॉटेल मालकाने त्यांच्या नावावरून हॉटेलचे नाव 'मंडल कोलकाता बिर्याणी' असं ठेवलं होतं.
ते (झुनू) सुमारे 25 वर्षांपासून आखातात राहत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हृदयविकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांच्या पत्नीने आणि दोन मुलींनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की त्यांना अचानक त्याच्या मृत्यूची बातमी ऐकायला मिळेल.
त्यांची मुलगी सोनिया म्हणते, "माझ्या वडिलांच्या हृदयात ब्लॉकेज होते. त्यांचे ऑपरेशनही झाले होते. त्यानंतर त्यांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. ते आमच्याशी फोनवर बोलत असत. पण आबिद काकांचा फोन आल्यानंतर अचानक काय झाले ते आम्हाला समजले नाही."
यानंतर कुटुंबाला त्यांचा मृतदेह भारतात कसा येईल याची चिंता वाटू लागली.

फोटो स्रोत, LIPI PUBLICATIONS
झुनू यांची मुलगी रडवेल्या आवाजात सांगत होती की, "वर एकच अल्लाह आहे, त्याने सर्व व्यवस्था केली आहे. आबिद काकांनी आम्हाला अशरफ सरांचा नंबर दिला होता. त्यानंतर आम्हाला काहीही विचार करावा लागला नाही."
"त्यांनी सर्व व्यवस्था केली. अशरफ यांनी माझ्या वडिलांचा मृतदेह दोन आठवड्यांनंतर शवपेटीत भरून कोलकाता विमानतळावर पाठवला. आम्ही 15 डिसेंबर रोजी त्यांना दफन केले."
सोनिया मंडल नादियातील शांतीपूर येथून पहाटे 4 वाजताची ट्रेन पकडून कोलकाता येथे पोहोचल्या. अशरफ सरांनी त्यांच्या वडिलांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी दफन करण्यासाठी कुटुंबाकडे पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्या दोन अनोळखी व्यक्तींची ती पहिली भेट होती.
'मी केरळमध्ये ट्रक चालवायचो'
मूळचे केरळचे असलेले अशरफ थामारास्सेरी 1993 मध्ये पहिल्यांदा आखातात गेले. पूर्वी ते सौदी अरेबियात राहत होते. त्यापूर्वी अशरफ केरळमध्ये ट्रक चालवायचे.
सौदी अरेबियात अनेक वर्षे राहिल्यानंतर ते घरी परतले. पण 1999 मध्ये ते पुन्हा एकदा त्यांच्या मेहुण्यासोबत परदेशात गेले.
यावेळी ते संयुक्त अरब अमिरातीला गेले. तिथे अजमान शहरात त्यांनी त्यांच्या मेहुण्यासोबत एक गॅरेज उघडलं. आता त्यांची लोकप्रियता आखाती देशांमध्ये पसरली आहे. कारण ते स्थलांतरितांचे 'शेवटचे मित्र' बनले आहेत.

फोटो स्रोत, LIPI PUBLICATIONS
श्रीदेवी यांचे पती आणि निर्माते बोनी कपूर यांच्यासह ते अमिराती-सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या अनेक सामान्य कुटुंबांपर्यत ते अनेक कुटुंबांचा भाग बनले आहेत.
तसेच पश्चिम बंगालमधील शांतीपूर शहरातील झुनू मंडल जे दुबईला आचारी म्हणून काम करण्यासाठी गेले होते त्यांच्यासारख्या हजारो कुटुंबांसाठी अशरफ हे आधार बनले आहेत.
जवळजवळ अडीच दशकांपासून, अशरफ कोणाकडूनही पैसे न घेता नातेवाईकांचे पार्थिव शरीर त्यांच्या देशात पाठवण्याची व्यवस्था करत आहेत.
ते दावा करतात की आतापर्यंत त्यांनी 40 हून अधिक देशांमध्ये 15 हजारांहून अधिक मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना पाठवले आहेत. याशिवाय, अशरफ यांनी आखातातील देशांमध्ये सुमारे दोन हजार मृतदेहांच्या दफनविधीची व्यवस्थाही केली आहे.
आतापर्यंत त्यांनी सर्वाधिक मृतदेह केरळला पाठवले आहेत. पण त्याशिवाय, त्यांनी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील अनेक कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह पाठवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांनी असे अनेक मृतदेह बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानलाही पाठवले आहेत. याशिवाय, त्यांनी युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेतील विविध देशांतील स्थलांतरितांचे मृतदेह पाठवण्याची व्यवस्था देखील केली आहे.
ज्या कुटुंबांसाठी ते ''शेवटचा मित्र' बनले आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या धर्मांचे आणि अनेक देशांचे लोक आहेत.
सुरुवात कशी झाली?
2000 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीच्या अजमान शहरात गॅरेज चालवणाते अशरफ एका आजारी मित्राला भेटण्यासाठी शारजाह रुग्णालयात गेले होते.
तिथून परत येत असताना त्यांना दोन तरुण रडताना दिसले. त्यांना पाहून अशरफ यांना वाटलं की ते दोघेही कदाचित केरळचेच असावेत.
अशरफ थामारास्सेरी म्हणतात, "मी त्यांना त्यांच्या रडण्याचं कारण विचारलं. त्यांनी मला सांगितलं की त्यांचे वडील वारले आहेत. पण त्यांना मृतदेह भारतात कसं घेऊन जायचा हे माहीत नव्हतं."
ते म्हणाले, "मलाही या प्रक्रियेबद्दल काहीही माहिती नव्हती. पण तरीही, मी त्यांचं सांत्वन केलं आणि शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. माझं बोलणं ऐकून त्यांचा चेहरा उजळला."
त्यानंतर, अशरफ यांनी स्थानिक लोकांकडून मृतदेह संबंधित देशांमध्ये पाठवण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती गोळा केली.

ते म्हणतात, "मी प्रथम पोलिसांना कळवलं. तिथून परवानगी मिळाल्यानंतर मी दूतावासाला याबद्दल माहिती दिली. मला सांगण्यात आलं की मृत व्यक्तीचा व्हिसा रद्द करावा लागेल."
"या प्रक्रियेला पाच दिवस लागले. तोपर्यंत मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. शेवटी, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पाचव्या दिवशी मृतदेह दुबईहून शवपेटीत भारतात पाठवण्यात आला."
स्वतःचं काम सोडून एका पूर्णपणे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह त्याच्या देशात पाठवण्याच्या या घटनेची माहिती सर्वत्र पसरली होती. त्याच कारणामुळे, काही दिवसांनी त्यांना पुन्हा फोन आला.
त्यांना सांगण्यात आलं की पश्चिम बंगालमधील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यांचं पार्थिव भारतात पाठवण्याची व्यवस्थाही करावी लागेल. त्यांचं पार्थिव भारतात घेऊन जाण्यासाठी कोणीही नव्हतं.
अशा परिस्थितीत, अशरफ यांनी विमानाचे तिकीट काढले आणि मृतदेह असलेली शवपेटी कोलकात्यातील दम दम विमानतळावर घेऊन गेला.
"बहुतेक प्रकरणांमध्ये मी मृतदेह विमानाने पाठवतो, परंतु कधीकधी मी स्वतः मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली केले आहेत," अशरफ यांनी बीबीसी बांगलासोबत बोलताना हे सांगितलं.
ते म्हणाले, "या काळात मला अनेक नवीन अनुभव मिळाले. श्रीदेवीसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींव्यतिरिक्त, मला अनोळखी लोकांचे आणि माझ्या जवळच्या मित्रांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांनाही द्यावे लागले."
तीन दिवस पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये घालवले
गॅरेज त्यांच्या मेहुण्याला सोपवल्यानंतर, अशरफ त्यांच्या गाडीतून जागोजागी फिरतात आणि ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची व्यवस्था करण्यात व्यस्त राहतात.
ते ईदच्या दिवशीही आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत, पण या कामासाठी ते कोणाकडूनही पैसे घेत नाही.
आर्थिक मदत कोण करतं? असं विचारलं असता अशरफ म्हणतात, "कधीकधी एखादा दयाळू माणूस देणगी देतो, तर कधी एखादी एनजीओही या कामात मदत करते. मी गॅरेज माझ्या मेहुण्याला सोपवले आहे. त्या बदल्यात तो मला घराचा खर्च चालवण्यासाठी दरमहा एक निश्चित रक्कम देतो."
"आम्ही अशा प्रकारे काम करतो. पण मृतदेह त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी मी कधीही कोणाकडून एक दिरहमही घेतलेला नाही."
ते म्हणतात की, या कामासाठी पैसे न घेतल्यामुळे त्यांना अनेक सुखद अनुभव आले आहेत. भारतातील ओडिशातील एका व्यक्तीचा अमिरातीमध्ये मृत्यू झाल्यानंतर, त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे पाठवावा लागला.

फोटो स्रोत, LIPI PUBLICATIONS
अशरफ म्हणतात की, या कामाची जबाबदारी घेऊ शकेल अशा व्यक्तीची ओळख नव्हती. त्या वेळीही अशरफ यांनी स्वतःच्या पैशाने तिकीट खरेदी केले होते आणि मृतदेह शवपेटीसह त्याच्या घरी पाठवला होता.
ते म्हणतात, "त्या माणसाच्या कुटुंबाकडे दोन-तीन फोन नंबर होते. दुबईहून उड्डाण करण्यापूर्वी, कुटुंबातील सदस्य मृतदेह घेण्यासाठी भुवनेश्वरला येतील असं ठरले होते, परंतु तिथे पोहोचल्यानंतर कुणीही आमचा फोन उचलत नव्हतं."
"त्या व्यक्तीचे घर भुवनेश्वरपासून खूप दूर होते. त्यानंतर मी रुग्णवाहिकेत बसलो आणि स्थानिक पोलीस स्टेशनला पोहोचलो. ओडिशामध्ये माझी ही पहिलीच वेळ होती. मला स्थानिक भाषाही येत नव्हती. संपूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर पोलिसांनी मला त्याचे घर शोधण्याचे आश्वासन दिले."

ते म्हणाले, "मी सतत पोलीस स्टेशनमध्ये बसून होतो. रात्री मी तिथेच जेवण केलं आणि पोलिसांनी मला लॉकअपमध्ये झोपण्याची व्यवस्था केली. मी कोणताही गुन्हा केला नव्हता तरी मला रात्र पोलिसांच्या लॉकअप मध्ये घालवावी लागली."
दोन दिवस पोलिस स्टेशनमध्ये वाट पाहिल्यानंतरही, त्या व्यक्तीचा पत्ता सापडला नाही, तेव्हा त्यांनी पोलिस स्टेशनला त्यांचा नंबर दिला आणि ते दुबईला परत आले.
दुबईला पोहोचताच त्यांना ओडिशातील त्या पोलिस स्टेशनमधून फोन आला. पोलिसांनी सांगितलं की, मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये अशरफवर लक्ष ठेवलं होतं. त्यांना वाटलं की दुबईहून विमानाने मृतदेह आणण्याच्या बदल्यात अशरफ त्यांच्याकडे पैसे मागतील.
अशरफ म्हणतात, "पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं की कुटुंब एवढं गरीब होतं की त्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते. पैसे देण्याच्या भीतीमुळे ते पुढे आले नाहीत."
अशरफ यांच्यावर पुस्तक लिहिण्यात आलं आहे
केरळमधील प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक जी. प्रजेश सेन यांनी अशरफ थामारास्सेरी यांच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे. 'द लास्ट फ्रेंड - द लाइफ ऑफ अशरफ थामारास्सेरी' या पुस्तकात अशाच प्रकारची आणखी एक घटना नमूद आहे.
एकदा, एका ब्रिटिश प्रवासी व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याची पत्नी मृतदेह घेण्यासाठी दुबईला आली. ती महिला हवाई दलात पायलट होती. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, विमानतळावर वाट पाहत असताना, त्यांनी अशरफला पाच हजार डॉलर्स दिले.
अशरफ म्हणाले की, जेव्हा मी हे पैसे घेण्यास नकार दिला तेव्हा त्या ओरडू लागल्या.
पुस्तकात अशरफ यांनी नेमकं काय म्हणलं आहे हे सांगितलं आहे, "त्यांना वाटलं की कदाचित ही रक्कम खूप कमी आहे. त्यानंतर, त्यांना त्यांच्या पतीच्या संस्थेतील एका पर्यवेक्षकाने समजावून सांगितलं की कमी-जास्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते या कामासाठी पैसे घेत नाहीत. त्यानंतर, त्या महिलेने माझा हात धरला आणि रडू लागली."

भारत सरकारकडून सन्मान
भारत सरकारने 2015 साली अशरफ यांना प्रवासी भारतीय सन्मान देऊन सन्मानित केलं. जवळपास पंचवीस वर्षं एकही पैसा न घेता हजारो स्थलांतरितांचे मृतदेह भारतात पाठवण्याच्या त्यांच्या कार्याचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
भारत सरकार विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना हा सन्मान देतं.
या सन्मानाशी संबंधित एका घटनेचा उल्लेख प्रजेश सेन यांच्या पुस्तकातही करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, TWOCIRCLES
एका उत्तर भारतीय कुटुंबातील 12 वर्षांच्या मुलीचा घरावरून पडून मृत्यू झाला होता.
अशरफ यांच्या पुढाकारानेच तिचा मृतदेह सापडला. अशरफ म्हणतात, "त्या मुलीचा अंत्यसंस्कार अमिरातीमध्येच होणार होता. पण मला त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजांबद्दल माहिती नव्हती. मी काही लोकांशी बोलून याबद्दल माहिती मिळवली."
पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार अशरफ म्हणाले, "या घटनेने मी इतका हादरलो होतो की मी तिच्या पालकांना स्मशानभूमीत सोडून परत येऊ शकलो नाही. भारतीय दूतावासातून फोन आला तेव्हा मी या धक्क्यातून अजून सावरलो नव्हतो."
अशरफ त्यांचा भारताकडून मिळालेल्या पुरस्काराची आठवण सांगतात की "जेव्हा मला हा फोन आला तेहा मी स्पष्ट सांगितलं की पुरस्काराला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा दूतावासातील अधिकाऱ्याने म्हटलं की तुम्ही फक्त दूतावासात टॅक्सीने या. तितके पैसे तुमच्याकडे असले तरी पुरेसं आहे."

फोटो स्रोत, LIPI PUBLICATIONS
दूतावासात पोहोचल्यानंतर त्यांना दिल्लीचे विमान तिकीट आणि एक पत्र देण्यात आलं. तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला.
तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, जेव्हा मोदी दुबईला गेले तेव्हा अशरफ यांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी दूतावासाकडून आमंत्रण मिळाले होते, परंतु त्यावेळी ते मृतदेह घेऊन भारतात आले होते.
नंतर, अशरफ यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली आणि मृतदेह परत आणण्यासाठी होणाऱ्या खर्चाबद्दल तक्रार केली.
अशरफ म्हणाले, "सत्कार समारंभाच्या वेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मी सुषमा स्वराज यांच्याकडेही याबद्दल तक्रार केली होती. मोफत मृतदेह आणण्याची व्यवस्था करता येत नव्हती, परंतु आता दोन ते तीन हजार दिरहममध्ये मृतदेह येथे आणणे शक्य आहे."
ते नुकतेच भुवनेश्वरहून कोलकात्याला आले होते. या वर्षी प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन भुवनेश्वरमध्येच करण्यात आलं होतं.
दुबईतील एका दयाळू व्यक्तीने नुकत्याच निधन झालेल्या झुनू मंडलच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत पाठवली होती. संभाषणादरम्यान, अशरफचा फोन वारंवार वाजत होता.
आखातात राहणाऱ्या स्थलांतरितांचा 'अखेरचा मित्र' ठरलेले अशरफ म्हणाले, "आता बघा, केरळमधील एका माणसाचा मृत्यू झाला आहे. आता, मृतदेह आणण्याची व्यवस्था येथून फोनवरून संभाषण करून करावी लागेल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











